फेनर ब्रॉकवे : इंग्रज खासदाराने गांधी टोपी घालून ब्रिटीश संसदेत सोलापूरच्या 'मार्शल लॉ'चा निषेध केला

फोटो स्रोत, Brian Seed
- Author, हर्षल आकुडे,
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
ब्रिटिश अधिपत्याखालील भारत. 1930 चा काळ. पूर्ण स्वातंत्र्याच्या मागणीसाठी एकीकडे महात्मा गांधींनी ब्रिटिश सरकारविरोधात रान उठवलं होतं.
महात्मा गांधींजीनी पेरलेली असहकार आंदोलनाची बीजं देशभरात पसरून सर्वत्र त्याचे पडसाद उमटू लागले होते. याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्रातील सोलापुरातही आंदोलनाचा वणवा पेटला होता.
या सगळ्या घडामोडींनी भांबावून गेलेलं ब्रिटिश सरकार शक्य त्या पद्धतीने हे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करत होतं.
या प्रतिकूल परिस्थितीतही एक ब्रिटीश खासदार ब्रिटिशांच्याच देशात त्यांच्याच सरकारविरोधात उभा ठाकला.
भारतीय भूमिपासून हजारो किलोमीटरवर असलेल्या इंग्लंडच्याच भूमीत या इंग्रज खासदाराने त्यावेळी सोलापुरात 'मार्शल लॉ'च्या आडून सुरू असलेल्या अत्याचारांना वाचा फोडली.
हे ब्रिटिश खासदार केवळ मार्शल लॉचा निषेध नोंदवून थांबले नाहीत. त्यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्याचं प्रतिक असलेली गांधी टोपी डोक्यावर परिधान करुन ब्रिटिश संसदेत जोरदार भाषण केलं होतं.
फेनर ब्रॉकवे असं या धाडसी खासदाराचं नाव. ब्रॉकवे यांनी त्यावेळी घेतलेल्या या कठोर भूमिकेमुळे त्यांना निलंबनासही सामोरं जावं लागलं.
पण तोपर्यंत त्यांनी भारतात सुरू असलेल्या ब्रिटिश सत्ताधाऱ्यांच्या अत्याचाराचा मुद्दा चव्हाट्यावर आणण्याचं काम पूर्ण केलं होतं.
ब्रॉकवे यांच्या भाषणामुळे सोलापुरातील मार्शल लॉची दखल जगभरात घेतली गेली. आजही ब्रॉकवे यांची आठवण निघाल्यास त्यांनी गांधी टोपी घालून केलेल्या या ऐतिहासिक भाषणाचा उल्लेख होतोच होतो.
1 नोव्हेंबर फेनर ब्रॉकवे यांचा जन्मदिन. या निमित्ताने सोलापुरातील मार्शल लॉ आणि ब्रिटिश संसदेत ब्रॉकवे यांनी केलेला निषेध या संपूर्ण घटनाक्रमाची माहिती आपण घेऊ
4 दिवसांचं स्वातंत्र्य, 'मार्शल लॉ' आणि अत्याचार
भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात सोलापूरचं योगदान अतिशय उल्लेखनीय असं राहिलं आहे. देशाला स्वातंत्र्य मिळण्याच्या 17 वर्षांपूर्वीच 4 दिवसांचं स्वातंत्र्य उपभोगणारं शहर म्हणून सोलापूरची नोंद आहे.
1930 साली 9, 10, 11 आणि 12 मे असे एकूण चार दिवस सोलापूर स्वतंत्र होतं. या कालावधीत सोलापूरच्या स्थानिक नेत्यांनी एकत्रितपणे यशस्वीरित्या शहराचा गाडा हाकला.

या कालावधीत शहरातील सर्व व्यवहार सुरळीत सुरू असल्याचं काँग्रेस कमिटीने मुंबई सरकारला कळवलं होतं.
पण इंग्रजांना हुसकावून लावून चार दिवस स्वातंत्र्य उपभोगलेल्या सोलापूरला नंतर मात्र त्याची मोठी किंमत मोजावी लागली.
स्थानिक इंग्रज अधिकाऱ्यांच्या विनंतीनुसार इंग्रज लष्कर 12 मे रोजी रात्री सोलापुरात दाखल झालं.
लष्कराने पोहोचता क्षणीच शहरात अत्यंत कठोर असा 'मार्शल लॉ' लागू केला. इंग्रज सरकारने आपल्या 150 वर्षांच्या राजवटीत 'मार्शल लॉ' लावलेलं एकमेव शहर म्हणूनही सोलापूर ओळखलं जातं.
या काळात सुरुवातीला दिसेल त्याला गोळी घालण्याचे आदेश देण्यात आले होते, नंतर राजकीय नेत्यांवर अनेक निर्बंध लावण्यात आले होते. सर्व शिपायांचं त्यावेळी विशेषतः गांधी टोपी घालणाऱ्या नागरिकांवर विशेष लक्ष असे. एखादा गांधी टोपी घालणारा दिसला की त्याच्यावर हल्ला करून टोपी ताब्यात घेतली जाई. टोपी डोक्यावरून काढायला लावून हवेत भिरकावली किंवा पायाखाली तुडवली जाई.
'मार्शल लॉ' च्या नावाने इंग्रज सरकारने सोलापुरातील जनतेवर अनन्वित अत्याचार केल्याची नोंद इतिहासात आहे.
अनेक नेत्यांना तुरुंगात डांबून ठेवण्यात आलं. दोरखंड बांधून, सिगारेटचे चटके देऊन मारहाण करण्यात आली. धरपकड केलेल्या आंदोलकांची शहरात सर्वांची धिंडही काढण्यात आली.
याच काळात मल्लप्पा धनशेट्टी, श्रीकिशन सारडा, जगन्नाथ शिंदे आणि कुर्बान हुसेन या तरूण आंदोलकांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.
शहरात मार्शल लॉ लागू असल्यामुळे वरील चौघेही आपलं निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी पुरावे आणू शकले नाहीत.

फोटो स्रोत, ABHISHEK ADEPPA
यावेळी सोलापूरच्या नगरपालिकेवरील तिरंगा झेंडा काढण्याचा हुकूम लष्कराने दिला होता. पण नगराध्यक्ष माणिकचंद शहा यांनी त्यास नकार दिला, तेव्हा लष्करी न्यायालयाने त्यांना 7 वर्षे सक्तमजुरी व 1 लाख रुपये दंड अशी शिक्षा सुनावली.
तर तुळशीदास जाधव यांनी गांधी टोपी परिधान केल्यामुळे त्यांनाही 7 वर्षे सक्तमजुरी आणि 1 लाख रुपये दंड अशी शिक्षा देण्यात आली.
मार्शल लॉ कालावधीत पोलिसांवरील खर्च सोलापूरकरांवर जादा कर बसवून वसूल करण्यात आला. अखेर, 49 दिवसांनंतर शहरातील मार्शल लॉ 30 जून 1930 रोजी मागे घेण्यात आला.
कणखर तुळशीदास जाधव
'मार्शल लॉ'च्या घडामोडींदरम्यान स्वातंत्र्यसैनिक तुळशीदास जाधव यांचा कणखर बाणा दिसून आला.
तुळशीदास जाधव यांचा जन्म 25 जानेवारी 1905 रोजी सोलापूर शहराजवळील दहिटणे या छोट्याशा गावात झाला. 1920 साली त्यांनी आपलं सातवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. सुरुवातीला पुढे महात्मा गांधी यांच्या विचारांकडे आकर्षिक होऊन ते सामाजिक जीवनात आले. पुढे त्यांना सोलापूर काँग्रेस कमिटीत सचिव पदावर काम करण्याची संधी मिळाली. चार दिवसांच्या स्वातंत्र्याच्या काळात शहराचं कामकाज सांभाळणाऱ्या नेत्यांमध्ये तुळशीदास जाधव हेसुद्धा होते.

फोटो स्रोत, Abhishek Adeppa
लेखक व्यं. गो. अंदूरकर यांनी त्यांच्या 'चणे खावे लोखंडाचे' या पुस्तकात स्वातंत्र्यसैनिक तुळशीदास जाधव यांचा जीवनप्रवास लिहिलेला आहे.
ते लिहितात,
"सोलापूर शहरात मार्शल लॉ लागू झाल्यानंतर येथील मध्यवर्ती भागातील मेकॅनिक चौकात शंभर-दीडशे सशस्त्र शिपाई पहाऱ्यावर होते.
त्यावेळी वयाच्या पंचविशीत असलेला, सडपातळ बांध्याचा, ओठावर मिसरूडही नीट न फुटलेला एक तरूण अंगावर खादीचा सदरा, डोक्यावर गांधी टोपी आणि पंचेवजा धोतर नेसून आलेल्या तरुणाभोवती या सैनिकांनी गराडा घातला.
'निकालो गांधी टोपी' असा एकच कल्ला करून त्या तरुणाच्या निरनिराळ्या भागावर चोहोबाजूंनी संगीनीची अणकुचीदार टोके भिडवली गेली.
इंग्रज लष्करातील कॅप्टनने धावत येऊन गांधी टोपी काढण्याचा आदेश जाधव यांना दिला. पण तशा भयानक, जीवघेण्या परिस्थितीतही तो तरूण तसूभरही ढळला नाही किंवा गोंधळून घाबरलाही नाही.
कॅप्टन पुन्हा म्हणाला, "समजलं नाही तुला मी काय म्हटलं ते?
"हो समजलं," तुळशीदास इतकंच म्हणाले.
"मग काढ डोक्यावरची ती गांधी टोपी तुझ्या हाताने," कॅप्टन म्हणाला.
"ते शक्य नाही, माझ्या देशाचं ते मानचिन्ह आहे." जाधव यांनी उत्तर दिलं
"तुला पुन्हा बजावतो, काढ डोक्यावरची गांधी टोपी. मी तुला पाच मिनिटांचा अवधी देतो. पाच अंक मोजेपर्यंत तुझ्या डोक्यावरची टोपी काढली नाहीस तर हे पिस्तुल तुझ्या शरीराच्या चिंधड्याचिंधड्या उडवील," चिडून कॅप्टनने निर्वाणीचा इशारा दिला.
मात्र तरीही जाधव तसेच उभे होते.
त्यावर कॅप्टनने चिडून पुन्हा गर्जना केली.
"मघाशी मी तुला सांगितले, ते तुला कळलं नाही? तुला अजून एक संधी देतो, तीन अंक मोजून होण्याआधी तू ही डोक्यावरची गांधी टोपी काढली नाहीस तर या पिस्तुलाच्या गोळीने तुझ्या देहाच्या ठिकऱ्या-ठिकऱ्या होतील."
कॅप्टनने तीन अंक मोजले. पण तुळशीदास यांनी डोक्यावरची टोपी काढली नाही. पुन्हा कॅप्टनने आणखी पाच अंक मोजण्याचा इशारा दिला.
तेव्हा तुळशीदास निडरपणे उत्तरले, "मी गांधी टोपी काढणार नाही, माझ्या देशाच्या स्वाभिमानाचं ते प्रसाद चिन्ह आहे. प्रतिक आहे."
"माझी आज्ञा नाकारणाऱ्याला दहा वर्षाची शिक्षा आणि दंड पत्करावा लागतो. इथे मार्शल लॉ पुकारला आहे. गांधी टोपीला मनाई आहे," कॅप्टनने दम भरला.
"हो, मला सर्व माहीत आहे. हे माहीत असूनही मी गांधी टोपी काढणार नाही," असं उत्तर जाधव यांनी दिल्यानंतर कॅप्टन मिश्किलपणे हसला. पिस्तुल छातीवरून मागे घेतलं गेलं. मरणाला कःपदार्थ लेखण्याचे त्याला कौतुक वाटलं. पण सभोवतालच्या शिपायांना तो आपल्या वरिष्ठांचा अपमान वाटला.
फरफटत त्यांना चौकातून बाजूच्या मेकॅनिकी थिएटरात नेले. सकाळपासून दुपारपर्यंत तुळशीदास जाधव यांचा अनन्वित छळ करण्यात आला. इथूनच त्यांची रवानगी तुरुंगात करण्यात आली. पुढे गांधी-आयर्विन करारानंतर त्यांना तुरुंगातून मुक्त करण्यात आलं.
यानंतरही तुळशीदास जाधव यांचं तुरुंगात येणं-जाणं सुरूच होतं. 1932 साली महात्मा गांधी आणि ते एकाच वेळी येरवडा तुरुंगात होते. तिथे त्यांनी महात्मा गांधी यांचे स्वीय सहायक म्हणून कामही केलं.

फोटो स्रोत, ABHISHEK ADEPPA
पुढे 1937-39, 1946-51 आणि 1951-57 या काळात ते सोलापूर मतदारसंघातून मुंबई विधानसभेचे सदस्य होते. तर 1962-67 आणि 1967-71 या काळात ते अनुक्रमे नांदेड आणि बारामती मतदारसंघातून लोकसभेवरही निवडून गेले.
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी 'शब्दाचे सामर्थ्य' या पुस्तकात तुळशीदास जाधव यांचा उल्लेख केला आहे.
ते लिहितात,
"1930 साली सोलापुरात मार्शल लॉ पुकारला होता. त्यावेळी गांधी टोपी घालून रस्त्यावर येणं म्हणजे साक्षात मृत्यूला आमंत्रण देण्यासारखं होतं. है धैर्य तुळशीदासांनी स्वीकारलं. मी माझ्या शाळकरी जीवनात त्यांच्याबाबत वर्तमानपत्रात वाचलं होतं. पुढे माझी त्यांची भेट 1933 साली तुरुंगात राजबंदी म्हणून झाली.
जेलमध्ये राजकीय बंद्यांच्या काही रास्त मागण्या अधिकारी मान्य करत नव्हते. त्यावेळी तुळशीदासांनी अन्नसत्याग्रह सुरू केला होता. अशा वेळी मी त्यांना पहिल्यांदा राजबंदी म्हणूनच भेटलो. उपोषणाने थकलेले, पण मनाने निर्धारी अशी त्यांची वृत्ती पाहून मी सादर परत आलो."
तुळशीदास जाधव यांना दोन मुले तर चार मुली अशी एकूण सहा अपत्ये होती. त्यांच्या कलावती या मुलीचा विवाह माजी मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले यांच्याशी झाला. तर त्यांच्या दुसऱ्या कन्या निर्मला या सोलापूर शहर दक्षिण मतदारसंघातून 1972 साली विधानसभेत गेल्या. पुढे त्यांना महाराष्ट्राच्या विधान परिषदेवरही संधी देण्यात आली होती.
...आणि फेनर ब्रॉकवे गांधी टोपी घालून संसदेत आले
मार्शल लॉदरम्यान स्वातंत्र्यसैनिक तुळशीदास जाधव यांना गांधी टोपीच्या मुद्द्यावरून झालेली मारहाण आणि अटक या घटनेचे पडसाद त्यावेळी ब्रिटिश संसदेत आणि जगभरात उमटले.
ब्रिटिश संसदीय कामकाज नोंदींनुसार,
19 मे 1930 रोजी येथील इंडिपेंडंट लेबर पार्टीचे खासदार फेनर ब्रॉकवे यांनी हा प्रश्न ब्रिटिश संसदेत उपस्थित केला. यावेळी ते चक्क गांधी टोपी घालून संसदेत उपस्थित राहिले होते. शिवाय, त्यांनी नेहरू-गांधी यांच्या अटकेचा विरोधही त्यांनी नंतर केला.
त्यावेळी पंतप्रधान रॅमसे मॅकडोनल्ट यांचं 'लेबर पार्टी'चं सरकार ब्रिटनमध्ये सत्तेत होतं. विशेष म्हणजे, ब्रॉकवे यांच्या 'इंडिपेंडंट लेबर पार्टी'चा या सरकारला पाठिंबा होता.

फोटो स्रोत, Pawel Libera
म्हणजे, सत्तेत वाटेकरी असलेल्या पक्षाचे प्रतिनिधी असलेल्या ब्रॉकवे यांनी सरकारविरोधी भूमिका घेण्याचं धाडस या निमित्ताने दाखवलं होतं.
फेनर ब्रॉकवे यांच्या या भूमिकेमुळे साहजिकच त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.
ब्रिटिश संसदेच्या हाऊस ऑफ कॉमन्सच्या अध्यक्षांनी प्रोटोकॉल मोडल्याचं कारण दाखवून ब्रॉकवे यांचं सभागृहातून निलंबन केलं.
पत्रकार ते कामगार नेते
फेनर ब्रॉकवे यांचा जन्म भारतातील कलकत्ता (आताचे कोलकाता) येथे 1 नोव्हेंबर 1888 रोजी झाला होता. फेनर यांचे आई-वडील ख्रिश्चन धर्मप्रसाराचं काम करायचे.
फेनर 4 वर्षांचे झाल्यानंतर त्यांना त्यांच्या आजी-आजोबांकडे इंग्लंडमधील रँगामोर येथे पाठवून देण्यात आलं. वयाच्या आठव्या वर्षी फेनर मिशनरी शाळेत जाऊ लागले होते. सोळाव्या वर्षी फेनर यांनी शिक्षण सोडून पत्रकार म्हणून काम सुरू केलं.
ते पत्रकार म्हणून वेगवेगळ्या वृत्तपत्रांसाठी काम करत. डाव्या चळवळीतील नेत्यांच्या मुलाखती घेणं हे त्यांच्या आवडीचं काम होतं. अशाच एका मुलाखतीदरम्यान ते किर हार्डी यांना भेटले. त्यांच्या विचारांनी प्रभावित होऊन त्यांनी 1907 साली इंडिपेंडंट लेबर पार्टीत प्रवेश केला. भारताला स्वातंत्र्य देण्यात यावं, अशी या पक्षाची भूमिका होती.
भारताला स्वातंत्र्य बहाल करण्यात यावं, यासंदर्भात ब्रॉकवे यांचं एक व्याख्यान लंडनमध्ये आयोजित करण्यात आलं होतं. यादरम्यान त्यावेळी लंडनच्या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये कायद्याचं शिक्षण घेत असलेले जवाहरलाल नेहरू हे ब्रॉकवे यांचं व्याख्यान ऐकण्यासाठी गेले होते.

फोटो स्रोत, Getty Images
1912 साली इंडिपेंडंट लेबर पार्टीच्या लेबर लीडर या वृत्तपत्राच्या संपादकपदावर ब्रॉकवे यांची नियुक्ती झाली.
पुढे 1914 ते 1919 या काळात फेनर ब्रॉकवे यांनी शांततावादी आणि युद्धविरोधी भूमिका सातत्याने मांडली. पहिल्या महायुद्धातील ब्रिटनच्या सहभागाला त्यांनी आक्रमक विरोध दर्शवला. त्यांच्या या भूमिकेमुळे त्यांना अनेकदा तुरुंगातही जावं लागलं.
पुढेही त्यांनी ब्रिटनच्या साम्राज्यवादी धोरणांचा सातत्याने विरोध केला. महात्मा गांधींच्या निमंत्रणावरून त्यांनी भारतात कांग्रेस पक्षाच्या एका परिषदेला उपस्थितीही लावली होती.
ब्रॉकवे यांनी त्यांच्या 'द इंडियन क्राईसिस' या पुस्तकात भारताविषयीचं मत स्पष्टपणे मांडलं आहे.
ते म्हणतात, "भारताला भेट देणाऱ्या प्रत्येक पर्यटक येथील विषमतेमुळे आश्चर्यचकीत होतो. बॉम्बेसारख्या शहरात (आताचं मुंबई) तुम्हाला एखादी साधी बैलगाडी आणि आरामदायक कार एकाच वेळी रस्त्यावरून धावताना दिसेल.
सामाजिक, सांस्कृतिक पातळीवरही येथील लोकांमध्ये खूप अंतर आहे. मलबाल हिलमध्ये भारताच्या व्यावसायिकांची टुमदार घरे तुम्हाला दिसतील. तर काही मैलावरच एखाद्या तुरुंगवजा अंधाऱ्या खोलीत संपूर्ण कुटुंब राहत असलेलंही तुम्हाला पाहायला मिळेल. डिसरेली यांनी एकदा म्हटलं होतं की ब्रिटनमध्ये दोन देश आहे. पण इथे भारतात एकाच वेळी दोन युग सुरू आहेत."
भारताची स्थिती सुधारण्यासाठी सल्ला देताना ब्रॉकवे लिहितात,
"भारत हा एका बाबतीत युरोपपेक्षा खूप वेगळा आहे. येथील लोकांना समूहाने एखादी कृती करण्याची सवय आहे. भारतात एखाद्या धार्मिक उत्सवाच्या वेळी संपूर्ण शहर त्या कार्यक्रमात सहभागी होतं. हरताळ लावला तर एकही दुकान उघडलं जात नाही, कोणताच व्यक्ती कामावर जात नाही. कोणताही विद्यार्थी शाळेत जात नाही. समजा, एखाद्या मिलमध्ये काही वादाचा प्रसंग उद्भवतो. अशा वेळी संघटनेशी संबंधित शे-दोनशे सदस्य असले तरी सगळे मिल कामगार संपात एकत्रितपणे सहभागी होतात. ग्रामीण भागात एखाद्या व्यक्तीने एखादी गोष्ट केली, तर अख्खा गाव त्याचं अनुकरण करतं. त्यामुळे भारतात क्रांती घडवण्यासाठी मास सायकोलॉजी (समूह मानसिकता) तयार करणं आवश्यक आहे.
नवा भारत तयार होणं यावरच अवलंबून आहे. भारतात बदल आपोआप घडेल. पण त्यासाठीचा पहिला टप्पा म्हणजे भारताला राजकीय स्वातंत्र्य देणं हा आहे. यानंतर सामाजिक स्वातंत्र्य हा पुढचा मोठा टप्पा असेल."
फेनर ब्रॉकवे पुढील अनेक वर्षे ब्रिटिश राजकारणात सक्रिय होते. 28 एप्रिल 1988 रोजी त्यांचं निधन झालं. त्यांच्या कार्याचा सन्मान म्हणून भारत सरकारने 1989 साली पद्मभूषण पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला.
संदर्भ -
1. मार्शल लॉ आणि सोलापूरचे चार हुतात्मे : प्रा. डॉ. नीळकंठ पुंडे
2. चणे खावे लोखंडाचे : व्यं. गो. अंदूरकर
3. भारताचा स्वातंत्र्यलढा : 1930-34 : डॉ. वा. ना. कुबेर
4. द इंडियन क्राईसिस : लॉर्ड फेनर ब्रॉकवे
5. शब्दांचे सामर्थ्य : यशवंतराव चव्हाण
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








