निक जोनास : सोलापुरी चादर कशी असते? तिचा वापर कपड्यांसाठी केला जाऊ शकतो का?

फोटो स्रोत, Instagram
- Author, हर्षल आकुडे
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
प्रियंका चोप्राचा पती आणि सुप्रसिद्ध पॉपस्टार निक जोनास आणि सोलापुरी चादर सध्या प्रचंड चर्चेत आहेत. निक जोनास आणि सोलापुरी चादर यांचा एकत्रित उल्लेख करण्याचं कारण तुम्हाला एव्हाना कळलंच असेल. कदाचित तुम्हीही निकचा व्हायरल झालेला फोटो पाहिला असेलच.
निक जोनासने नुकताच एक फोटो त्याच्या इंन्स्टाग्रॅम अकाऊंटवर पोस्ट केला होता. हा फोटो सध्या सर्वत्र प्रचंड व्हायरल होत आहे. या फोटोत निकने एक आगळावेगळा शर्ट घातल्याचं दिसून येतं.
हा फोटो पोस्ट करताना निक जोनास म्हणतो, "सेंट लुईसमध्ये काल रात्री. उकाडा प्रचंड होता. पण शो खूप चांगला झाला. आभारी आहे."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
Instagram पोस्ट समाप्त
एका कॉन्सर्टमध्ये निकने हा शर्ट वापरला आहे. राखाडी रंगाच्या कापडावर जांभळ्या रंगाचं डिझाईन असलेला हा शर्ट सोलापुरी चादरीपासून बनवल्याचं तुम्हाला लांबूनच कळून येईल. फोटो झूम करून पाहिल्यानंतर त्या शर्टवर खाली SUR लिहिल्याचं स्पष्टपणे दिसतं. तर उजव्या हातावर चाटला असं लिहिल्याचंही त्यामध्ये दिसून येईल.
सोलापूर हे चादरींसाठी देशभरात प्रसिद्ध असल्याचं आपल्या सर्वांना माहीत आहे. सोलापूरमध्ये चाटला चादर शोरुम नावाचं एक दुकानही आहे. त्यामुळे निक जोनासचा हा शर्ट सोलापुरी चादरीपासूनच बनवण्यात आल्याची चर्चा सुरू झाली.
350 रुपयांची चादर
निकच्या 'चादरी' शर्टविषयी अधिक माहिती घेण्यासाठी बीबीसी मराठीने चाटला चादर शोरूमचे संचालक गोवर्धन चाटला यांच्याशी बातचीत केली. ही चादर आपल्याच दुकानातील असल्याचं त्यांनी सांगितलंय.
निक जोनासच्या शर्टचा किस्सा सांगताना ते म्हणाले, "शुक्रवारी (10 सप्टेंबर) सकाळी आमच्या एका ग्राहकाने आम्हाला निक जोनासचा हा फोटो पाठवला. त्यामध्ये झूम करून पाहा, असं आम्हाला सांगितलं. शर्टचं डिझाईन पाहून ही आमचीच चादर आहे, असं लागलीच आमच्या लक्षात आलं होतं. झूम केल्यानंतर आम्हाला चाटला टेक्स्साईलचा नोंदणीकृत लोगोही त्यात दिसला. ते पाहून आम्हाला आनंद तर झालाच शिवाय आश्चर्याचा धक्काही बसला. तोपर्यंत सगळीकडेच हा फोटो व्हायरल झाला होता. आम्हाला एकामागून एक लोकांचे मॅसेज येऊ लागले. आम्ही खूप भारावून गेलो."

चाटला टेक्सटाईल गेल्या 60 वर्षांपासून सोलापुरात आहे. सध्या त्यांची तिसरी पीढी या व्यवसायात उतरली आहे.
"आमच्या आजोबांनी हा व्यवसाय स्थापन केला होता. आमच्या चादरींना देशभरासह जगभरातून मागणी आहे, स्वस्त टिकाऊ आणि आकर्षक म्हणून सोलापूर चादरी सुप्रसिद्ध आहेत. मुळात सोलापूर चादरींसाठीच ओळखलं जातं. निकच्या फोटोंनी हीच ओळख पुन्हा लोकांसमोर आणली आहे," असं त्यांनी सांगितलं.
निक जोनासने घातलेल्या शर्टच्या मूळ चादरीच्या किंमतीवरूनही जोरदार तर्क-वितर्क लावले जात होते. गोवर्धन चाटला यांनी निकच्या चादरीची खरी किंमत बीबीसीला सांगितली.
ही एक जेकॉर्ड प्रकारची चादर असून ती काय फार महागडीही नाही. फक्त 350 ते 400 रुपयांना ती बाजारात उपलब्ध आहे, असं चाटला म्हणाले.
सोशल मीडियावर जोरदार चर्चा
निक जोनासने सोलापुरी चादरीपासून बनवलेला शर्ट घातल्याचं समजताच सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा महापूर आल्याचं दिसून आलं. लोकांनी आपल्या सर्जनशीलतेला नव्या उंचीवर नेत विविध प्रकारचे मीम्स त्यावरून बनवले. हे मीम्सही आता मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत.
ट्विटरवर जलालुद्दीन शेख म्हणतात, "निक जोनासने अक्षरशः सोलापूरच्या चाटला यांच्या चादरीपासून बनवलेला शर्ट घातला आहे. पांघरूण घेण्याचं कापड कुणी शर्ट म्हणून कसा काय घालू शकतो? हसून हसून डोळ्यातून पाणी आलं."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
नितीन गोहोकर म्हणतात, "प्रियंका चोप्राने तिच्या वॉचमनच्या जुन्या चादरीपासून शर्ट बनवून निकला दिला."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
निकच्या फोटोवर इंन्स्टाग्रॅमवर करण्यात आलेल्या प्रतिक्रियाही मजेशीर आहेत.
निकच्या फोटोखाली कमेंट करताना ओंकार हळखेडे यांनी म्हटलं, "सोलापूर हा एक ब्रँडच आहे. नुस्ता राडा."
हेमंत थळंगे या युझरने म्हटलं, "निक भाऊंनी रुखवतीत दिलेल्या सोलापुरी चादरीचा शर्ट शिवून घेतला आहे."
लॅकमे फॅशन विक 2006
याच ओघात आम्हाला सोशल मीडियावर आणखी काही फोटो सापडले. यामध्ये सोलापुरी चादरीपासून बनवलेले कपडे घालून अनेक मॉडेल्स कॅट वॉक करताना दिसून येत आहेत.

फोटो स्रोत, james ferreira
म्हणजेच सोलापुरी चादरीचा वापर पोशाखासाठी करणारा निक जोनास काय पहिलावहिला व्यक्ती नाही. यापूर्वीही चादरींचा वापर कपडे म्हणून परिधान करण्यासाठी झाल्याचं निदर्शनास आलं आहे.
2006 मध्ये मुंबईत लॅकमे फॅशन विकचा एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात फॅशन डिझायनर जेम्स फेरेरा यांनी बनवलेल्या कपड्यांचं प्रदर्शन करण्यात आलं.
त्यामध्ये सोलापुरी चादरीपासून बनवलेले अनेक कपडे सादर करण्यात आले. अनेक मॉडेल्स चादरींपासून बनवण्यात आलेले हे कपडे घालून कॅटवॉक करताना यामध्ये दिसून येतात.

फोटो स्रोत, james ferreira
म्हणजे सुमारे 15 वर्षांपूर्वीच चादरींचा वापर पोशाख म्हणून करण्यासाठी प्रयत्न करण्यात आला होता.
निक जोनासच्या फोटोबाबत प्रतिक्रिया देताना फॅशन डिझायनर जेम्स फेरेरा सांगतात, "खरं तर निक जोनासचा परवाचा फोटो पाहिल्यानंतर मी खूप उत्साहित झालो. मला 2006 सालचा लॅकमे फॅशन विकचा तो कार्यक्रम जसाच्या तसा पुन्हा आठवला. त्यावेळी मी बॉम्बे टू टोकियो नावाचं एक सादरीकरण केलं होतं. त्यामध्ये महाराष्ट्रातील पारंपारिक कपड्यांचा मी वापर केला. हे कपडे माझ्या पद्धतीने डिझाईन करून आम्ही हे सादरीकरण केलं. जपानच्या ओरिगामी आणि झिरो वेस्ट वन पीस कटिंग पद्धतीतून प्रेरणा घेऊन या सर्व डिझाईनची मला कल्पना सुचली होती."
फेरेरा यांच्या मते, "सोलापुरी चादरीचं कापड परिधान करण्यासाठीही अतिशय उपयुक्त ठरू शकतं. विशेषतः जिन्स, जॅकेट यांच्याप्रमाणे ते वापरता येऊ शकतं. सोलापुरी चादरीच्या सुताचे गुणधर्म काही प्रमाणात खादीशी मिळतेजुळते आहेत. ते तुम्हाला थंडीत उबदार ठेवतात. तर उन्हाळ्याच्या दिवसात तुम्हाला गारवा देतात."

फोटो स्रोत, james ferreira
याव्यतिरिक्त सोलापुरी चादर आणि लेदरच्या एकत्रिकरण करून काही बॅग्जही आम्ही डिझाईन केल्या आहेत, सोलापुरी चादरींना ट्रेंडी आणि आकर्षक लूक देता येऊ शकतो, त्यामध्ये क्षमता आहे, असं फेरेरा म्हणाले.
2006 सालच्या फॅशन शोनंतर तुम्ही सोलापुरी चादरीपासून बनवलेल्या कपड्यांना मागणी आली का, या प्रश्नाचं उत्तर देताना फेरेरा म्हणतात, "दुर्दैवाने नाही. मी वेगळी वाट निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पण त्याला यश आलं नाही. आपले नोकर-चाकर पांघरूण म्हणून वापरत असलेलं कापड भारतीय लोकांना बिलकुल परिधान करायचं नाही. भारतीय नागरिकांचं ग्रामीण ते शहरी असं रुपांतर वेगाने होतं. मागास वर्गाशी संबंधित असलेल्या अथवा मानल्या जाणाऱ्या गोष्टी या प्रवासात मागे सोडून दिल्या जातात."
चादर व्यावसायिकांनी मानले निक जोनासचे आभार
सोलापुरातील चादर व्यवसाय सद्यस्थितीत डबघाईला आल्याचं सांगितलं जातं. गेल्या दोन वर्षांत कोरोना व्हायरसचा फटका चादर व्यवसायाला बसला. पण त्याच्याही आधीपासून विक्री कमी झाल्याने चादर व्यावसायिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावं लागत आहे. पण निक जोनासच्या फोटोमुळे आता पुन्हा एकदा सोलापुरी चादरीची चर्चा सर्वत्र होऊ लागली आहे. यामुळे निक जोनासचे आभारी आहोत, अशी भावना चादर व्यावसायिकांमध्ये आहे.

सोलापूर यंत्रमागधारक संघाचे अध्यक्ष पेंटप्पा गड्डम म्हणतात, "सोलापुरी चादर ही शंभर टक्के सुती कापडापासून बनवली जाते. स्वस्त दर, आकर्षक डिझाईल, रंगसंगती, टिकाऊपणा ही या चादरीची वैशिष्ट्ये आहेत. एकदा चादर घेतली की 15 ते 20 वर्षं खराब होत नाही. वर्षातील बाराही महिने सर्वच ऋतूंदरम्यान ही चादर वापरता येते. पॉलिस्टर चादरी घेतल्यानंतर होणाऱ्या समस्या म्हणजे अंगाला खाज सुटणं किंवा चिडचिड होणं अशा गोष्टी होत नाहीत. पण सगळं उत्तम असूनही सध्या या चादरींच्या व्यवसायाला उतरती कळा लागली आहे."
ते सांगतात, "सोलापूर पूर्वी टेक्स्टाईल हब मानलं जायचं. शहरातील मिल बंद पडल्या तशी या व्यवसायाला घरघर लागली. पूर्वीच्या तुलनेत फक्त 15 ते 20 टक्केच हा व्यवसाय उरला. लोकांची बदलती लाईफस्टाईल, बनावट चादरींची निर्मिती यांचा चादर व्यवसायाला मोठा फटका बसलेला आहे. सोलापूरच्या चादरींना जिओ टॅगिंग मिळालेलं आहे. पण तरीही हरयाणा, तामिळनाडूमध्ये काही ठिकाणी सोलापूरचं नाव देऊन चादर बनवली जाते. बाजारात सोलापुरी चादर म्हणून या बनावट चादरी धडाक्याने विकल्या जातात. याचा फटका बसून विक्री थंडावल्याने सोलापुरातील चादर व्यावसायिक आता टॉवेल निर्मितीकडे वळत आहेत."
निकच्या फोटोमुळे सोलापुरच्या चादरींना नव्याने ओळख मिळेल, अशी अपेक्षा गड्डम यांनी व्यक्त केली.

स्थानिक उद्योजक केतन शहा म्हणतात, "सोलापूरच्या चादरीचं नाव आधीच सातासमुद्रापार पोहोचलेलं आहे. पण त्याला योग्य मार्केट मिळवून देण्यासाठी सोलापुरातील विमानतळ, टेक्स्टाईल हब यांच्या निर्मितीची खरी गरज आहे. फक्त फोटो व्हायरल झाल्याने विक्री वाढेल, असा विचार करून न थांबता उत्तम मार्केटिंग करावं लागेल. त्या अनुषंगाने निक जोनासचा फोटो हा आपल्यासाठी आशेचा किरण म्हणून पाहायला हरकत नाही."
"चादर व्यवसायाला पुन्हा उभारी देण्यासाठी स्थानिक पातळीवर एकत्रितपणे अनेक प्रयत्न करण्यात आले. पण त्यामध्ये अपेक्षेप्रमाणे यश मिळालं नाही. त्यामुळे उत्पादनातील त्रुटी दूर करून त्यामध्ये काळानुरूप योग्य बदल करणं सर्वाधिक गरजेचं आहे. चादर व्यवसायाने आता कात टाकायला हवी. चादरीप्रमाणेच त्याच कापडापासून शर्ट अथवा इतर कपडे बनवता आले तर उत्तमच आहे. सुताच्या साईजमध्ये बदल करून ते परिधान करण्यायोग्य करता येतील का याबाबत चर्चा व्हायला हवी. आपल्याकडे अनेक आकर्षक डिझाईन आहेत, त्यांचा वापर कपड्यांमध्ये केला जाऊ शकतो," असं शहा यांना वाटतं.
'जिन्सप्रमाणे चादरही वापरली गेली तर आश्चर्य नाही'
निक जोनास आणि चादरी शर्टबाबत आम्ही फॅशन डिझायनर मृण्मयी अवचट यांच्याशीही बातचीत केली. त्या म्हणाल्या, "सध्या वेगवेगळ्या गोष्टींचा वापर करून पोशाख बनवले जातात. फॅशन शोच्या रॅम्पवरतर अगदी वाट्टेल त्या मटेरियलचे कपडे घातले जातात. तर मग आपली सोलापुरी चादर का नाही? या निमित्ताने आपल्या पारंपारिक मानल्या जाणाऱ्या एका कापडाला एक आंतरराष्ट्रीय व्यासपीठ मिळत आहे, मग का नाही?

यामध्ये मला काहीच वावगं वाटत नाही. कधी कधी आपण आपल्याच पारंपरिक कपड्यांकडे संकुचित दृष्टीकोनातून पाहतो. हे कापड फक्त साडीचंच आहे, हे फक्त चादरीसाठीचं आहे, असा विचार आपण करतो.
पण हे कापड जागतिक पातळीवर पोहोचवण्यासाठी त्यात काही प्रयोग होणं गरजेचं असतं. अन्यथा हे कपडे एका मर्यादेतच अडकून पडतात. मग हे कपडे बोरिंग वाटू लागतात.
तसंही आईच्या जुन्या साडीचं आपण काहीतरी करून वापरतो. मग बनवतानाच नव्या पद्धतीने का नाही बनवायचं. मला वाटतं आपण बदलत्या काळाबरोबर बदललं पाहिजे. तरच या गोष्टी जतन होऊ शकतात. पुढे जाऊ शकतात."
ही गोष्ट समजावून सांगताना मृण्मयी यांनी जिन्स किंवा डेनिम कापडाचं उदाहरण दिलं.
त्या म्हणतात, "डेनिम कापड आधी एका खाणीतल्या कामगारांसाठी बनवण्यात आलं होतं. तिथं कामगारांचे कपडे सारखे फाटू नयेत, किंवा धुवावे लागू नयेत, त्यासाठी अतिशय रफ अँड टफ म्हणून जिन्स कापड तयार करण्यात आलं. पण पुढे पुढे डेनिम आपल्या रोजच्याच वापराचा भाग बनलं. सध्या जिन्स वापरत नाही, असा एकही व्यक्ती तुम्हाला सापडणार नाही. जिन्स ही एक स्टाईल स्टेटमेंट बनली आहे. आजघडीला कोट्यवधी रुपयांची ही इंडस्ट्री आहे. दिवसेंदिवस स्टाईल बदलते, तसं नव स्वरूप जिन्स घेते. पण कापड तेच असतं. त्यामुळे तसं अॅडॅप्टेशन एखाद्या कापडाने घेतलं तर ते कधीच कालबाह्य होत नाही."
चादर व्यवसाय डबघाईला जात असल्यास त्याला आजच्या फोटोचा खूप उपयोग होईल, असंही मृण्मयी यांना वाटतं.

फोटो स्रोत, james ferreira
त्या म्हणतात, "पहिल्यांदा एखादी गोष्ट घडते, तेव्हा ती काही प्रमाणात विचित्र वाटू शकते. फक्त कपडेच नव्हे तर इतर अनेक बाबतीत असं घडतं. पण नंतर नंतर त्याच गोष्टी दैनंदिन जीवनाचा भाग बनतात, मग आपल्याचा त्याचं काहीच वाटत नाही. लोकांना त्याची सवय होऊ लागते.
त्यामुळे निक जोनासचा चादरीचा शर्ट ही त्याची सुरुवात म्हणून पाहता येईल. फॅशनच्या बाबतीत कोणतीही नवी गोष्ट सेलिब्रिटींकडून सुरू केली जाते. नंतर-नंतर पुढे त्याची सवय होऊ ती तळागाळात पोहोचते.
त्यामुळेएखादी गोष्ट कुणाला आवडली किंवा नाही आवडली, ते ठीक आहे. पण आज निक जोनासच्या निमित्ताने हजारो-लाखो लोकांना सोलापुरी चादर काय आहे, हे तर कळलं. माहीत नसलेल्या लोकांनी गुगल तरी करून पाहिलं असेल. ही चादर तुम्ही कोणत्या तरी पद्धतीने प्रेझेंट करत आहात, तर ही त्याची प्रसिद्धीच आहे."
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








