सोलापूर: 4 दिवसांचं स्वातंत्र्य, 4 हुतात्म्यांना फाशी, सोलापूरच्या 'मार्शल लॉ'चा हा इतिहास माहिती आहे का?

मल्लप्पा धनशेट्टी, किसन सारडा, जगन्नाथ शिंदे, कुर्बान हुसेन
फोटो कॅप्शन, (डावीकडून) मल्लप्पा धनशेट्टी, किसन सारडा, जगन्नाथ शिंदे, कुर्बान हुसेन
    • Author, हर्षल आकुडे,
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी.

भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात कित्येक संघर्षपूर्ण आणि तितक्याच प्रेरणादायी घटनांचा समावेश आहे.

ब्रिटिश सरकारकडून स्वातंत्र्य मिळवण्यासाठी कित्येक ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्यसैनिकांनी आपल्या जीवाची बाजी लावली. त्यांनी दिलेल्या बलिदानामुळेच आज भारताला स्वातंत्र्याची चव चाखता येत आहे, असं म्हटलं जातं.

भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील काही घटना ठळकपणे सर्वांना ज्ञात आहेत, तर काही घटनांविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही.

भारताच्या इतिहासातील अशीच एक महत्त्वपूर्ण घटना म्हणजे सोलापूरचा स्वातंत्र्यलढा.

या लढ्याच्या माध्यमातून सोलापूरने देशाला स्वातंत्र्य मिळण्याच्या 17 वर्षांपूर्वीच चार दिवसांचं स्वातंत्र्य उपभोगलं होतं. 9, 10, 11 व 12 मे 1930 असे एकूण चार दिवस सोलापूर स्वतंत्र होतं.

त्या कालावधीत देशात इतर अनेक शहरांमध्येही आंदोलने झाली, पण केवळ सोलापूर शहरात 'मार्शल लॉ' लावून ब्रिटिश सरकारने ते लष्कराच्या ताब्यात दिलं होतं.

ब्रिटिश सरकारच्या 150 वर्षांच्या राजवटीत 'मार्शल लॉ'ची अंमलबजावणी करण्यात आलेलं एकमेव शहर म्हणजेच सोलापूर अशीही इतिहासात नोंद आहे.

अखेर, या संपूर्ण घटनाक्रमादरम्यान 12 जानेवारी 1931 रोजी सोलापुरातील चार हुतात्म्यांना फाशीही शिक्षा ठोठावण्यात आली होती.

यंदाच्या 12 जानेवारी 2023 रोजी चार हुतात्म्यांना फाशी देण्याच्या घटनेला 92 वर्षं पूर्ण झाली. तर आज, 9 मे 2022 रोजी चार दिवसाच्या स्वातंत्र्याला 92 वर्षं पूर्ण होतील.

त्यानिमित्ताने सोलापूरचा स्वातंत्र्यलढा, मार्शल लॉ आणि चार हुतात्मे या सर्व गोष्टींची आपण माहिती घेऊ -

सविनय कायदेभंग आणि सोलापूर

या संपूर्ण प्रकरणाची नाळ महात्मा गांधी यांच्या सविनय कायदेभंग चळवळीशी जोडलेली होती. महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली देशातला स्वातंत्र्यलढा जोर पकडू लागला होता.

1930 मध्ये गुजरातमध्ये साबरमती आश्रमात काँग्रेसच्या कार्यकारी बैठकीत महात्मा गांधीजींनी सविनय कायदेभंग चळवळीची घोषणा केली.

महात्मा गांधी

फोटो स्रोत, Getty Images

त्याचाच एक भाग म्हणून मीठाच्या कराविरुद्ध महात्मा गांधी यांनी 12 मार्च 1930 रोजी दांडी यात्रेस सुरुवात केली.

त्यावेळी सोलापुरात सार्वजनिक सभा, लोकसभा, जिल्हा सभा, मुंबई इलाखा प्रांतिक सभा यांची अधिवेशने आयोजित केली जात असत. दुसरीकडे वृत्तपत्रांचाही जनमानसावरील प्रभाव वाढत होता.

5 एप्रिल 1930 रोजी दांडी यात्रा संपन्न झाली. सविनय कायदेभंग आणि दांडी यात्रा यांना देशभरात प्रचंड प्रतिसाद मिळाला.

या आंदोलनात सोलापूरनेही भरभरून सहभाग नोंदवला. काँग्रेस कमिटीने मीठाच्या सत्याग्रहादरम्यान शहराच्या मध्यवर्ती भागात मीठाच्या पुड्या बनवून त्या जाहीर लिलावाने विकून कायदेभंगास सुरुवात केली.

जिथे समुद्र किनारा नाही तेथील लोकांनी दारुबंदीचा प्रचार करावा, ताडीची झाडे काढून टाकावीत, असं आवाहन महात्मा गांधींनी केलं होतं.

त्यानुसार, सोलापुरातील रुपाभवानी मंदिर परिसरात असलेल्या शिंदीच्या झाडांनाही सत्याग्रहींनी लक्ष्य केलं.

गिरणगाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोलापुरात त्यावेळी पाच कापड गिरण्या होत्या. या कापड गिरण्यांमध्ये 15 ते 20 हजार कामगार त्यावेळी काम करत असायचे.

शहरात पुकारण्यात येणाऱ्या कोणत्याही आंदोलनांमध्ये या गिरणी कामगारांचा उत्स्फूर्त सहभाग असायचा.

त्या काळात सतत कोणत्या ना कोणत्या प्रभातफेरी, मोर्चे, संप यांचं आयोजन करण्यात येत असे. या सर्व आंदोलनांमुळे शहरातील वातावरण अतिशय स्फूर्तिदायक आणि देशभक्तीमय बनलं होतं.

'पकडे गये गांधीजी, अब तो निंद छोडो'

सविनय कायदेभंग चळवळीवर नियंत्रण मिळवण्यासाठी ब्रिटिश सरकारने महात्मा गांधी यांना अटक करण्याचा निर्णय घेतला.

त्यानुसार, गुजरातच्या कारडी गावात महात्मा गांधींना 4 मे 1930 रोजी अटक करण्यात आली. ही बातमी सोलापुरात 5 मे 1930 रोजी रात्रीच्या सुमारास पोहोचली.

महात्मा गांधी

फोटो स्रोत, Getty Images

गांधीजींच्या अटकेची माहिती मिळताच सोलापुरातील काँग्रेस कमिटीच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थेतेचं वातावरण निर्माण झालं.

त्यावेळी श्रीनिवास काडगावकर नामक एक कार्यकर्ते आपल्या जोरदार आणि पहाडी आवाजासाठी ओळखले जात असत.

काडगावकर यांनी लागलीच डोक्यावर 'किटसन' बत्ती घेऊन गांधीजींच्या अटकेची माहिती लोकांना देण्यास सुरुवात केली.

'पकडे गये गांधीजी, अब तो निंद छोडो, नहीं चलेगी, नहीं चलेगी, जुलमी सरकार नहीं चलेगी,' अशा घोषणा देत त्यांनी रात्रभर लोकांना जागवलं आणि वातावरण निर्मिती केली.

पुढच्या दिवशी म्हणजेच 6 मे रोजी कडकडीत हरताळ पाळण्याचा संदेश काँग्रेस कमिटीने दिला.

त्यानुसार, 6 मे रोजी स्थानिक नेत्यांच्या जाहीर निषेध सभा झाल्या. काँग्रेसच्या वतीने रामकृष्ण जाजू यांनी गांधीजींच्या अटकेची अधिकृत माहिती सर्वांना दिली.

शहरात दिवसभर तणाव कायम होता. कापडगिरण्या, बाजारपेठा, व्यापारी व्यवहार वगैरे त्यादिवशी बंद ठेवण्यात आले.

दरम्यान, रस्त्यांवर आलेल्या जमावाचा असंतोष ठिकठिकाणी दिसू लागला. लहान-मोठ्या मिरवणुका, घोषणाबाजी, दारू दुकानांची नासधूस इत्यादी प्रकार सुरू झाले.

जमावातील एका गटाने मद्रास मेल अडवून ठेवली. लोकांमधील संतप्त भावना आवरणं आता कठीण झालं होतं. त्यामुळे ज्येष्ठ नेत्यांनी पुढच्या दिवशीचे (7 जानेवारी) सर्व कार्यक्रम रद्द केले.

पण युवक संघाला ही भूमिका पटली नाही. त्यांनी तिथंच सभा घेऊन कापड गिरण्या बंद करण्याचा आणि 3 दिवस हरताळ पाळण्याचा आदेश दिला.

7 मेच्या दिवशी सकाळपासूनच वातावरणात तणाव होता. शहरात लक्ष्मी-विष्णु मिलजवळ पोलिसांना गोळीबार करावा लागला.

दिवसभर मिरवणुका, पोलिसांची हुर्यो उडवणं, त्यांना गांधी टोपी घालायला लावणं, असे प्रकार सुरू होते.

नेत्यांनी सर्वांना शांतता राखण्याचं आवाहन केलं. उद्या गिरण्या बंद करू नका, शहरात हुल्लडबाजीला ऊत आला आहे, असं ते म्हणाले.

मात्र, गांधीजींच्या अटकेचा निषेध शक्य त्या मार्गाने केला गेला पाहिजे, या भूमिकेवर युवक संघाचे कार्यकर्ते ठाम होते.

पोलिसांविरुद्धचा संघर्ष

8 मे 1930 रोजी वीर नरिमन आणि जमनालाल बजाज यांच्या अटकेची वार्ता सर्वत्र पसरली. वीर नरिमन हे युवक संघाचे प्रमुख होते. त्यांच्या अटकेच्या निषेधार्थ एक मिरवणूक काढण्यात आली.

मिरवणूक संपवून नेते मंडळी परतली. दरम्यान, काही तरुण रुपाभवानी मंदिराकडे शिंदीची झाडे तोडण्यासाठी गेले. नियोजित कार्यक्रमानुसार असं काही ठरलेलं नव्हतं. पण तरूण आंदोलकांच्या उत्साहाला उधाण आलं होतं.

याची माहिती मिळताच पोलिसांनी कुमक बोलावून परिसरात नाकाबंदी केली. इन्स्पेक्टर नॅपेट हे पोलिसांच्या पथकाचं नेतृत्व करत होते. जमावाने दगडफेक करून पोलिसांना हुसकवण्याचा प्रयत्न केला, पण नॅपेट यांनी गोळीबार केला. शिवाय, 9 जणांना अटकही केली.

मात्र, तरीही जमाव मागे सरकला नाही. त्यांनी अटक केलेल्या तरुणांना सोडण्याची मागणी केली.

दरम्यान, या घटनेची माहिती सोलापूरचे तत्कालीन कलेक्टर हेनरी नाईट तसंच पोलीस उपअधीक्षक प्लेफेअर यांना देण्यात आली.

दोघेही आणखी जास्त कुमक घेऊन रुपाभवानी मंदिर परिसरात दाखल झाले. कलेक्टर हेनरी नाईट हे हातात बंदूक घेऊन आवेशातच गाडीतून खाली उतरले.

त्यांची ती भूमिका पाहून जमाव अधिकच संतप्त झाला. पकडलेल्या सर्वांना सोडा, या मागणीवर सर्वजण ठाम होते.

दगडफेकीत DSP फ्लेपेअर आणि 3 पोलीस जखमी झाले. पोलिसांकडील गोळ्या संपत असल्याचं पाहून जमावाने आणखी आक्रमकपणे पोलिसांचा विरोध सुरू केला.

या संघर्षाची माहिती मिळताच तरुण कार्यकर्ते मल्लप्पा धनशेट्टी आणि त्यांच्यासोबत जिवराज मुलूकचंद तिथे आले. मल्लप्पा धनशेट्टी यांचा शहरातील तरुणांवर प्रभाव होता. पकडलेल्यांची नावे लिहून घेऊन त्यांना सोडून द्या, अशी विनंती मल्लप्पा धनशेट्टी पोलिसांना करत होते.

इतक्यात शंकर शिवदारे नामक तरुण कार्यकर्ता हातात तिरंगा झेंडा घेऊन कलेक्टर नाईट यांच्या दिशेने धावत आला. तेव्हा कलेक्टर नाईट यांच्या जिवीतास धोका असल्याचं वाटून सार्जंट हॉल यांनी शंकर शिवदारे यांच्यावर गोळी झाडली.

शिवदारे जागीच कोसळले. या संपूर्ण घटनाक्रमात पहिला हुतात्मा म्हणून शंकर शिवदारे यांचंच नाव घेतलं जातं.

दरम्यान, शिवदारे खाली कोसळल्याचं पाहून संतप्त जमाव कलेक्टर नाईट यांच्या दिशेने चाल करून येऊ लागला. त्यांच्या वाहनाला घेराव घातला.

मात्र मल्लप्पा धनशेट्टी यांनी जमावाला रोखलं आणि कलेक्टर नाईट यांच्याशी केलेल्या चर्चेनंतर पोलिसांनी पकडलेल्या लोकांना सोडून दिले. त्यानंतर पोलिसांच्या गाड्यांना रस्ता मोकळा करून देण्यात आला. मात्र, यामुळे मल्लप्पा धनशेट्टी हेच जमावाचं नेतृत्व करतात, अशी कलेक्टर नाईट यांची धारणा बनली.

कलेक्टर नाईट यांनी जमावातून बाहेर पडत असताना अचानक पोलिसांना गोळीबार करण्याचा आदेश दिला. त्यामध्ये तीन जण धारातिर्थी पडले. अनेकजण जखमी झाले.

पोलिसांच्या अशा अनपेक्षित प्रतिक्रियेमुळे सोलापूरच्या जनतेत प्रचंड असंतोष निर्माण झाला. यानंतर मात्र सोलापुरात पोलीस आणि नागरिक यांच्यातील जोरदार संघर्ष शिगेला पोहोचला.

'4 दिवसांचं स्वातंत्र्य'

संतप्त जमावाने आपला मोर्चा जवळच्याच मंगळवार पेठ पोलीस चौकीकडे वळवला. पोलीस चौकीवर हल्ला करून जमावाने एका पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण करून पेटवून दिलं.

तर दुसऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याला पोलीस चौकीला आग लावून आतमध्ये ढकलून दिलं. दोन पोलीस कर्मचारी यात मृत्युमुखी पडले.

सोलापुरातील ऐतिहासिक मंगळवार पेठ पोलीस चौकी
फोटो कॅप्शन, सोलापुरातील ऐतिहासिक मंगळवार पेठ पोलीस चौकी

त्यानंतर जमाव गोलचावडी येथील कोर्टाकडे गेला. कोर्टाची कागदपत्रे, इमारत त्यांनी पेटवून दिली. हा संपूर्ण प्रकार तीन ते चार तास सुरू होता. पण सकाळच्या रुपाभवानी मंदिराकडील अनुभवामुळे कलेक्टर आणि पोलीस उप-अधीक्षक यांनी याबद्दल बघ्याची भूमिका घेतली.

दरम्यान, जमावाचा हा प्रक्षोभ पाहून इतर पोलीस चौक्यांमधील इंग्रज अधिकारी व इतर कर्मचारी यांनी शहरातून काढता पाय घेणंच उचित समजलं.

सोलापूर शहर शांत होत नाही, हे पाहून कलेक्टर हेनरी नाईट यांनी यासंदर्भात मुंबईला अहवाल पाठविला व लष्कराची मदत मागविली.

मुंबईच्या गृह सचिवांनी केंद्र सरकारला याबाबत कळवलं, "सोलापुरात 18 हजार कामगार मोकाट सुटले आहेत, ब्रिटिश अधिकारी व त्यांच्या कुटुंबीयांना धोका आहे, ते जीव मुठीत धरून जगत आहेत तरी लष्कर ताबडतोब पाठवावे.'

वरीष्ठ इंग्रज अधिकाऱ्यांनी सर्वप्रथम आपल्या कुटुंबीयांना रेल्वेमार्गे मुंबई-पुण्याकडे पाठवून दिलं. अधिकाऱ्यांनी सोलापूर रेल्वे स्थानकात आश्रय घेतला.

आपल्या कुटुंबीयांना एकत्रित करण्याच्या कामात व्यत्यय येऊ नये, लोकांचं लक्ष दुसरीकडे वेधलं जावं, यासाठी सशस्त्र पोलिसांकडून दुपारी एक वाजल्यापासून ते सायंकाळी सात वाजेपर्यंत दोन गाड्यांमधून गोळीबार यादरम्यान पोलिसांनी 103 गोळ्या चालवल्याची नोंद आहे. या गोळीबारात अनेकांचा मृत्यूही झाला.

यानंतर कलेक्टर नाईट हे रजेवर गेले. इतर इंग्रज अधिकारी पोलिसांच्या बंदोबस्तात रेल्वे स्टेशनवरच बसून होते.

9, 10, 11 व 12 मे 1930 असे पुढचे एकूण चार दिवस सोलापूर शहर एकप्रकारे स्वतंत्रच होतं. यादरम्यान, 10 मे रोजी बकरी ईदचा नमाज नेहमीप्रमाणे शांततेत पार पडला.

शहरातील विविध कामे युवक संघाच्या तरुण कार्यकर्त्यांना वाटून देण्यात आली होती. गांधी टोपी परिधान केलेले कार्यकर्ते पोलिसांनी पळून जाताना फेकलेल्या रायफली हातात घेऊन ट्रेझरीवर पहारा देत होते.

...आणि तिरंगा फडकला

शहरात कार्यकर्त्यांमार्फत रहदारी नियंत्रण तसंच इतर व्यवहार वगैरे कामे सुरळीत चालू होती. फक्त इंग्रज सरकारमधील अधिकारी किंवा पोलीस प्रशासनाची तिथं उपस्थिती नव्हती.

"ओस पडलेल्या पोलीस ठाण्यांमध्ये लोकांनी गाढवं नेऊन बांधली होती," असं इतिहास अभ्यासक डॉ. श्रीकांत येळेगावकर यांनी बीबीसीशी बोलताना म्हटलं.

शहरातील संपूर्ण व्यवस्थेचं नियंत्रण त्यावेळी सोलापूर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रामकृष्ण जाजू यांनी केलं. यामुळे त्यांना नंतर 'मार्शल जाजू' म्हणून नवी ओळख मिळाली, असं म्हटलं जातं.

या कालावधीत कलेक्टर कार्यालय, फौजदार चावडीवर तिरंगा झेंडा फडकविण्यात आला. संपूर्ण भारतात तिरंगा फडकवण्याचा मान मिळवणारी सोलापूर ही पहिलीच नगरपालिका ठरली होती.

या चार दिवसांच्या स्वातंत्र्याचा उल्लेख त्यावेळी 'गांधीराज' म्हणून केला जायचा, स्वातंत्र्य मिळाल्यावर भारतीय लोक त्यांचं राज्य कसे चालवतील याचा वस्तुपाठ सोलापूरकरांनी त्या चार दिवसांत घालून दिला, असं अभिमानाने सोलापूरकर सांगतात.

या कालावधीत मुंबई-पुण्याच्या वृत्तपत्रांमध्ये ब्रिटिश प्रोपगंडानुसार सोलापूर शहर गुंडांच्या ताब्यात गेल्याच्या बातम्या प्रसिद्ध होत होत्या. पण सोलापुरात 'कर्मयोगी' आणि 'सोलापूर समाचार' या वृत्तपत्रांनी संपूर्ण हकीकत मांडली. त्यांचे विक्रमी अंक यादरम्यान विकले गेले होते.

'मार्शल लॉ'

शहरातील सर्व व्यवहार आता सुरळीत सुरू असल्याचं काँग्रेस कमिटीने मुंबई सरकारला कळवलं होतं. पण तरीही स्थानिक इंग्रज अधिकाऱ्यांच्या विनंतीनुसार इंग्रज लष्कर 12 मे रोजी रात्री सोलापुरात दाखल झालं.

सोलापुरात चार हुतात्मा चौक येथे मल्लप्पा धनशेट्टी, श्रीकिसन सारडा, जगन्नाथ शिंदे आणि कुर्बान हुसेन यांचे पुतळे उभारले आहेत.
फोटो कॅप्शन, सोलापुरात चार हुतात्मा चौक येथे मल्लप्पा धनशेट्टी, श्रीकिसन सारडा, जगन्नाथ शिंदे आणि कुर्बान हुसेन यांचे पुतळे उभारले आहेत.

लष्कराने पोहोचता क्षणीच शहरात मार्शल लॉ लागू केला. दिसेल त्याला गोळी घालण्याचे आदेश जारी करण्यात आले होते.

यावेळी सोलापूरच्या नगरपालिकेवरील तिरंगा झेंडा काढण्याचा हुकूम लष्कराने दिला होता. पण नगराध्यक्ष माणिकचंद शहा यांनी त्यास नकार दिला, तेव्हा लष्करी न्यायालयाने त्यांना 7 वर्षे सक्तमजुरी व 1 लाख रुपये दंड अशी शिक्षा सुनावली.

तर तुळशीदास जाधव यांनी गांधी टोपी परिधान केल्यामुळे त्यांनाही 7 वर्षे सक्तमजुरी आणि 1 लाख रुपये दंड अशी शिक्षा देण्यात आली. (पुढे गांधी-आयर्विन करारानुसार यामध्ये सवलत देण्यात आली होती.)

मंगळवार पेठ पोलीस चौकी जळीतप्रकरणात 13 मे रोजी जगन्नाथ शिंदे, श्रीकिसन सारडा यांना तर 14 मे रोजी मल्लप्पा धनशेट्टी आणि कुर्बान हुसेन यांना अटक करण्यात आली.

त्यावेळी वरील चौघांसह शहरातील ज्येष्ठ काँग्रेस कमिटी कार्यकर्त्यांवर अतिशय अमानुष अत्याचार इंग्रज अधिकाऱ्यांनी केले.

दोरखंड बांधून, सिगारेटचे चटके देऊन त्यांना रात्रभर मारहाण करण्यात आली. दुसऱ्या दिवशी शहरात सर्वांची धिंडही काढण्यात आली. परिणामी शहरात स्मशान शांतता पसरली.

पकडलेल्या सर्वांवर खटले भरून त्यापैकी धनशेट्टी, सारडा, शिंदे आणि हुसेन यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. हायकोर्टानेही ही शिक्षा कायम केली.

शहरात मार्शल लॉ लागू असल्यामुळे वरील चौघेही आपलं निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी पुरावे आणू शकले नाहीत.

मार्शल लॉ कालावधीत पोलिसांवरील खर्च सोलापूरकरांवर जादा कर बसवून वसूल करण्यात आला. अखेर, 49 दिवसांनंतर शहरातील मार्शल लॉ 30 जून 1930 रोजी मागे घेण्यात आला.

4 हुतात्म्यांना फाशीची शिक्षा

सोलापूर शहरात मार्शल लॉ लागू झाल्यानंतर ब्रिटिश सरकारविरोधात कट रचणे, सरकारविरोधात कट करण्यासाठी जमावास एकत्रित करणे, ब्रिटिश सरकारच्या सेवेतील दोन पोलीस कर्मचाऱ्यांना जाळून मारणे, या आरोपांखाली जगन्नाथ रेवणसिद्धप्पा धनशेट्टी (वय 32, श्रीकिसन लक्ष्मीनारायण सारडा (वय 36), जगन्नाथ भगवान शिंदे (वय 24) आणि अब्दुल रसूल कुर्बान हुसेन (वय 20) या चार तरूणांना अटक करण्यात आली.

1. मल्लप्पा धनशेट्टी - मल्लप्पा धनशेट्टी हे पंढारकर पेढीत मुख्य मुनीम म्हणून काम करत. लोकांमध्ये ते विशेष लोकप्रिय होते.

सविनय कायदेभंगाच्या चळवळीत अनेक वेळा सभांचे अध्यक्ष वा प्रमुख वक्‍ते म्हणून असत. राष्ट्रीय चळवळीचं प्रतीक म्हणून ते नेहमी गांधी टोपी वापरायचे.

शहरातील सर्व प्रमुख कार्यक्रमांमध्ये त्यांचा सहभाग असायचा. सिद्धेश्वर प्रासादिक मंडळ, श्रद्धानंद समाज याठिकाणी त्यांचा वावर होता. सिद्धरामेश्‍वराच्या यात्रेमधील नंदीध्वज वाहकाचे काम करत असल्याने त्यांच्याभोवती धार्मिक वलयही होतं.

रुपाभवानी मंदिर परिसरात पोलीस-आंदोलक संघर्षादरम्यान जमावाला शांत करण्याचं कामही त्यांनी केलं होतं. पण त्याच दरम्यान कलेक्टर हेनरी नाईट यांचा रोष त्यांच्याबाबत तयार झाला होता.

2. श्रीकिसन सारडा - सोलापूर शहरातील सधन व्यापारी म्हणून यांची ओळख होती. सोलापुरातील अनेक सार्वजनिक कार्यक्रमांना ते मोठ्या उत्साहाने मदत करत.

यात्रा, सार्वजनिक उत्सव, त्या निमित्ताने होणारे कुस्त्यांचे आखाडे या कार्यक्रमांमध्ये ते आवर्जून सहभागी होत असत.

सारडा व मल्लप्पा धनशेट्टी हे चांगले मित्र म्हणून ओळखले जात. राष्ट्रीय चळवळीची आर्थिक बाजू सांभाळत इंग्रज सरकारचा त्यांच्यावर रोष होता.

3. जगन्नाथ शिंदे - युवक संघ व मजूर संघ यांचे सेक्रेटरी म्हणून जगन्नाथ शिंदे काम पाहत असत. ते तालीम संघाचेही सेक्रेटरी होते. शिंदे यांनी सोलापुरातील युवक वर्ग, कापड गिरणी कामगार व तालीम संघाची पैलवान मंडळी अशी ताकद राष्ट्रीय चळवळीमागे उभी केली.

कसरतीने कमावलेलं शरीर यांमुळे त्यांची तरुणांमध्ये विशेष ओळख होती. त्यांनी सोलापूरात राष्ट्रीय चळवळीला सामान्य माणसांच्या घराघरांत पोचवण्याचे काम केलं होतं. अभ्यासू वृत्ती व शैलीदार वक्तृत्व या गोष्टींसाठीही जगन्नाथ शिंदे यांचं नाव घेतलं जाई.

4. कुर्बान हुसेन - फाशीची शिक्षा ठोठावण्यात आलेल्यांपैकी कुर्बान हुसेन हेच सर्वात लहान होते. फ्रेम तयार करण्याचं काम करणाऱ्या कुटुंबात त्यांचा जन्म झाला होता.

सुरुवातीला गिरणी कामगार म्हणून त्यांनी कामाची सुरुवात केली. पुढे उत्तम लिखाण आणि वक्तृत्व गुणांमुळे ते सार्वजनिक जीवनात लोकप्रिय झाले. त्यांनी गझनफर नामक मराठी वृत्तपत्र सुरू केलं होतं.

कुर्बान हुसेन यांनी सोलापूरमधील कापड गिरण्यांमधून विखुरलेल्या अठरापगड जातींचा गिरणी कामगार सर्वप्रथम 'कामगार संघा'च्या माध्यमातून एकत्र आणला.

हजारोंच्या संख्येमध्ये असणारे सोलापूरचे गिरणी कामगार राष्ट्रीय चळवळीत सामील झाल्याने राष्ट्रीय चळवळीची ताकद कमालीची वाढली.

कोणत्याही कार्यक्रमात कुर्बान हुसेन यांचं भाषण होणार, हे ठरलेलंच असायचं. त्यांच्या या लोकप्रियतेमुळेच इंग्रज सरकारची वक्रदृष्टी त्यांच्याकडे गेली होती.

वरील चौघांना अटक करून त्यांची रवानगी पुण्याच्या येरवडा जेलमध्ये करण्यात आली. इंग्रज सरकारने या चौघांचा मंगळवार पेठ पोलीस चौकी जळीत प्रकरणात कसा सहभाग होता, ते पटवून दिलं.

हायकोर्टात न्या. माडगावकर यांनी चौघांच्या फाशीचं जन्मठेपेत रुपांतर करावे, अशी सूचना केली होती. पण इतर ब्रिटिश न्यायाधीशांनी त्याला असहमती दर्शवली. त्यानंतर धनशेट्टी, सारडा, शिंदे आणि हुसेन यांना फाशीची शिक्षा कायम करण्यात आली.

अभ्यासक डॉ. श्रीकांत येळेगावकर सांगतात, "चार वेगवेगळ्या समाजघटकांमधील तरुणांची नावे वेचून फाशीच्या शिक्षेसाठी निवडण्यात आली. सर्वच समाजांवर ब्रिटिश राजवटीची दहशत बसावी, असा सरकारचा प्रयत्न होता. पण या घटनेतून देशाची राष्ट्रीय एकात्मता दिसून आली. आजही ही घटना राष्ट्रीय एकात्मतेचं प्रतीक आहे."

12 जानेवारीच का?

सोलापूरच्या चार सुपुत्रांना ठोठावण्यात आलेल्या फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी करण्यासाठी इंग्रज सरकारने 12 जानेवारी 1930 चा दिवस निवडला होता.

सुरुवातीला 13 जानेवारी या तारखेबद्दल विचार सुरू होता. पण नंतर ती बदलून एक दिवस आधीच म्हणजे 12 जानेवारीचा दिवस निवडण्यात आला.

सोलापुरात मकर संक्रातीच्या दिवशी भरवण्यात येणारी श्री सिद्धेश्वर गड्डा यात्रा
फोटो कॅप्शन, सोलापुरात मकर संक्रातीच्या दिवशी भरवण्यात येणारी श्री सिद्धेश्वर गड्डा यात्रा

सोलापूर शहरात 14 जानेवारी हा संक्रातीच्या सणाचा दिवस मोठ्या उत्सवाचा दिवस असतो. ग्रामदैवत सिद्धरामेश्वर यांच्या या उत्सवाला नऊशेहून अधिक वर्षांचा इतिहास आहे. या दिवशी संपूर्ण शहरात मानाच्या सात काठ्यांची मिरवणूक काढण्यात येते. याला गड्डा यात्रा म्हणूनही ओळखलं जातं.

या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर यापुढे कुणीही ब्रिटिश सरकारविरुद्ध बंड करू नये, लोकांच्या मनात दहशत बसावी या हेतूने 12 जानेवारी 1931 हाच दिवस निवडला, असं अभ्यासक सांगतात.

12 जानेवारी रोजी सकाळी 6 वाजता चौघांनाही फाशी देण्यात आली. शिवाय चार हुतात्म्यांचे मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात न देता इंग्रज सरकारनेच त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले.

ही बातमी सोलापूरला पोहोचल्यानंतर इतिहासात प्रथमच सिद्धेश्वर यात्रेनिमित्त निघणाऱ्या काठ्यांची मिरवणूक रद्द करण्यात आली होती.

आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल

सोलापूरच्या चार हुतात्म्यांच्या या बलिदानामुळे देशातील अनेक स्वातंत्र्यसैनिकाना प्रेरणा मिळाली. तसंच आंतरराष्ट्रीय पातळीवर या घटनेची दखल घेण्यात आली.

कामगारवर्गीय सत्ता असलेल्या त्यावेळच्या रशियन नेत्यांनी मार्शल लॉ उठावाचा 'सोलापूर कम्यून' असं संबोधून गौरव केला होता. मॉस्को येथे रेडिओवरून यासंदर्भात बातमी प्रसारित झाली.

तसंच हा मुद्दा ब्रिटिश संसदेतही त्यावेळी उपस्थित करण्यात आला होता. बोल भिडूच्या एका लेखानुसार ब्रिटिश सरकारचा निषेध म्हणून मजूर पक्षाचे खासदार फेनर ब्रॉकवे यांनी सोलापूरच्या घटनेचा उल्लेख करत गांधी टोपी घालून ब्रिटिश संसदेत भाषण केलं होतं, हे विशेष.

पुढे भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहलाल नेहरू यांनी सोलापूरला भेट दिली होती. सोलापूर हे स्वातंत्र्य ज्योतीने प्रेरित झालेल्या धगधगत्या तरुणाईचे, हुतात्म्यांच्या रक्ताच्या बलिदानाने पवित्र झालेले 'शोला'पूर आहे, अशा शब्दांत जवाहरलाल नेहरुंनी सोलापूरचं कौतुक त्यावेळी केलं होतं.

संदर्भ -

  • मार्शल लॉ आणि सोलापूरचे चार हुतात्मे : प्रा. डॉ. नीळकंठ पुंडे
  • योजना मासिक डिसेंबर 2021 अंकातील प्रा. प्रभाकर कोळेकर, सोलापूर विद्यापीठ यांचा लेख
  • थिंक महाराष्ट्रसाठी अनिरुद्ध बिडवे यांनी लिहिलेला लेख
  • कर्तव्यसाधनासाठी रविंद्र मोकाशी यांनी लिहिलेला लेख

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)