ओडिशा रेल्वे अपघात : तीन दिवस होऊनही 187 मृतदेहांची ओळख पटली नाही, कारण...

फोटो स्रोत, DREES MOHAMMED/EPA-EFE/REX/SHUTTERSTOCK
ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यात घडलेल्या भीषण रेल्वे अपघातातील मृतांची संख्या 275 वर पोहोचली आहे.
रविवारी (4 जून) सकाळपर्यंत मृतांची संख्या 288 वर पोहोचल्याचं सांगितलं जात होतं. पण आता ओडिशाचे मुख्य सचिव प्रदीप जेना यांनी ही आकडेवारी दुरुस्त करून मृतांची संख्या 275 असल्याचं सांगितलं आहे.
या अपघातात सुमारे एक हजार लोक जखमी झाले असून त्यापैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगितलं जातंय.
पण यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या 275 लोकांपैकी 187 जणांची ओळख अद्यापही पटलेली नाही. मग अशा परिस्थितीत त्या लोकांच्या कुटुंबीयांना भरपाई मिळणार कशी?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले की, एक हजाराहून जास्त जखमींना भुवनेश्वरपासून बालासोर, भद्रक आणि कटकपर्यंतच्या रुग्णालयात दाखल केलंय. तर इतर जखमींवर उपचार सुरू आहेत.
ते पुढे म्हणाले की, लोकांना नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी सरकारने घेतली असून त्यासाठी हेल्प डेस्कही सुरू करण्यात आलेत.
दुसऱ्या बाजूला ओडिशाचे मुख्य सचिव प्रदीप जेना यांचं म्हणणं आहे की, मृतांची ओळख पटवणं सरकार समोरचं मोठं आव्हान आहे.
ते म्हणाले की, "अजूनही 187 मृतांची ओळख पटलेली नाही.
मृतांचे फोटो काढून एक यादी तयार करण्यात आली आहे. ही यादी तीन सरकारी वेबसाइटवर अपलोड करण्यात आली आहे. गरज पडल्यास सरकार डीएनए चाचणीही करेल."
सचिवांनी सांगितलं की, 170 मृतदेह भुवनेश्वरमध्ये (एम्स आणि इतर रुग्णालयांमध्ये) हलवण्यात आलेत. उर्वरित 17 मृतदेहही भुवनेश्वरला आणले जातील. मृतदेहांचा आदर करत एका रुग्णवाहिकेत केवळ दोनच मृतदेह ठेवण्यात येत आहेत. म्हणजे एकूण 85 रुग्णवाहिकांच्या मदतीने मृतदेह भुवनेश्वरला हलविण्यात आले.
पण घटनास्थळी उपस्थित लोक अत्यंत अनादराने मृतदेह रुग्णवाहिकांमध्ये ठेवत असल्याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
मृतदेहांची ओळख कशी पटवणार?
पीडित कुटुंबियांना मदत करण्यासाठी भुवनेश्वरच्या सत्यनगर मधील महानगरपालिकेत नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे.
मृतदेहांची ओळख पटविण्यासाठी राज्य सरकारने एक यादी तयार केली असून सरकारच्या तिन्ही वेबसाइटवर अपलोड करण्यात आली आहे.
गरज पडल्यास मृतदेहांची डीएनए चाचणी करू, असं मुख्य सचिवांनी म्हटलंय.
मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी प्रशासनाने नातेवाईकांना भुवनेश्वर महापालिकेशी संपर्क साधायला सांगितलंय. यासाठी टोल फ्री क्रमांकही देण्यात आलाय.
पीडित कुटुंब टोल फ्री क्रमांकावर कॉल करून अपघातग्रस्तांची माहिती घेऊ शकतात.
या वेबसाइटवर उपचार सुरू असलेल्या जखमींची माहितीही अपलोड करण्यात आली आहे. मात्र रुग्णालयाच्या म्हणण्यानुसार अद्याप यादी तयार झालेली नाही.

फोटो स्रोत, ani
सोबतच सरकारने इशारा देताना म्हटलंय की, अपघाताची छायाचित्रे अस्वस्थ करणारी असून लोकांनी ती पाहू नयेत.
ही छायाचित्रे केवळ मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी अपलोड करण्यात आल्याचं सरकारने म्हटलंय. त्यामुळे माध्यमातील लोकांना विशेष मदत आयुक्तांच्या परवानगीशिवाय ही छायाचित्रे वापरता येणार नाहीत.
भुवनेश्वरमधील एम्स हॉस्पिटल, कॅपिटल हॉस्पिटल आणि इतर खासगी हॉस्पिटलमध्ये मृतदेह ठेवण्यात आलेत.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
भुवनेश्वरचे महापालिका आयुक्त विजय अमृत कुलांगे यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, मृतांच्या कुटुंबीयांना सर्व प्रकारची मदत मिळेल. लोकांना मृतदेहाच्या शोधात फिरावं लागणार नाही.
मृतदेहाची ओळख पटवल्यानंतर ते घेऊन जाण्यासाठी ओडिशा सरकारने नातेवाईकांसाठी मोफत व्यवस्थाही केली आहे. मात्र त्यापूर्वी मृतदेहाचं शवविच्छेदन केलं जाईल.
मुख्य सचिवांचं म्हणणं आहे की, मृतदेहाची ओळख पटल्यानंतर कुटुंबीयांना नुकसान भरपाईचा दावा करताना अडचण येऊ नये, त्यांना मृत्यूचं प्रमाणपत्र मिळावं यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे.
जर मृतांच्या नातेवाईकांना भुवनेश्वरमध्येच अंत्यसंस्कार करायचे असतील तर त्यांना आवश्यक ती मदत केली जाईल. त्यासाठी शहरातील स्मशानभूमीही उपलब्ध करून दिली जाईल.
यापूर्वी ओडिशाच्या मुख्य सचिवांनी सांगितलं की, "ओळख पटलेल्या मृतदेहांचं शवविच्छेदन केलं जाईल. मात्र ज्यांची ओळख पटू शकलेली नाही त्यांच्या शवविच्छेदनासाठी वैद्यकीय-कायदेशीर कारवाईनंतर अंतिम संस्कारांची व्यवस्था केली जाईल. मृतदेह ठेवण्यासाठी कमी तापमानाचे फ्रीझर हवे आहेत, त्यासंदर्भात रुग्णालयांशी बोलणी सुरू आहेत."
मृतदेहांची ओळख पटविण्यासाठी उशीर का झाला?
बीबीसीचे प्रतिनिधी चंदन जजवाडे सांगतात की, रेल्वे अपघाताचा सर्वाधिक फटका शालीमारहून चेन्नईला जाणाऱ्या कोरोमंडल एक्स्प्रेसला बसला.
कोलकात्यानजिकच्या शालिमार येथून चेन्नईच्या दिशेने निघालेली कोरोमंडल एक्स्प्रेस (12841) सायंकाळी सातच्या सुमारास बाहानगा बाजार रेल्वे स्टेशनजवळ होती. पण तिथे उभ्या असलेल्या एका मालगाडीला ही गाडी धडकली.
येथील रेल्वेमार्ग हा दुहेरी आहे. मालगाडी लूप लाईनवर थांबलेली होती. धडकेनंतर कोरोमंडल एक्सप्रेसचे डबे बाजूच्या रुळावर अस्ताव्यस्त पसरले
दरम्यान, त्याचवेळी बंगळुरू नजिकच्या यशवंतपूर स्थानकावरून कोलकात्याजवळच्या हावडा स्थानकापर्यंत धावणारी यशवंतपूर-हावडा एक्स्प्रेस याठिकाणी आली. रुळांवर आडव्यातिडव्या पसरलेल्या डब्यांना या गाडीने धडक दिली.
अपघाताच्या वेळी कोरोमंडल रेल्वे इंजिनच्या मागे एसएलआर कोच होता आणि त्याच्या मागे जनरल डबा होता.

फोटो स्रोत, REUTERS/ADNAN ABIDI
चंदन सांगतात की, या अपघातात इंजिनसोबत जोडलेल्या या दोन डब्यांचं जास्त नुकसान झालं. या अपघातात कोरोमंडल एक्सप्रेसच्या लोको पायलटचा पाय तुटला तर सहाय्यक लोको पायलटचा हात तुटून बाजूला पडला.
इंजिनच्या मागे असलेल्या एसएलआर कोचमधील आणखी एका लोको पायलटचा मृत्यू झाला.
एसएलआर कोचच्या मागे असलेला जनरल डबा सर्वसामान्य प्रवाशांनी तुडुंब भरला होता. जनरल तिकिटावर प्रवास करणारे या डब्यात असतात.
त्यामुळे या डब्यांमधून प्रवास करणाऱ्या लोकांची संख्या किंवा ओळखीची कोणतीही नोंद रेल्वेकडे उपलब्ध नाही.
त्यामुळेच जनरल डब्यातून प्रवास करणाऱ्यांची ओळख पटवण्यासाठी जास्त वेळ लागतोय.
मदतीची घोषणा
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 10 लाख रुपये, गंभीर जखमींना 2 लाख रुपये आणि किरकोळ जखमींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.
पीएमओने पंतप्रधान आपत्ती मदत निधीतून मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपये आणि जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे.
ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाख रुपये आणि गंभीर जखमींना प्रत्येकी 1 लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे.

फोटो स्रोत, ani
याशिवाय पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राज्यातील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाख रुपये, गंभीर जखमींना प्रत्येकी 1 लाख रुपये आणि सोबतच तीन महिने मदत देण्याची घोषणा केली आहे. ज्यांना किरकोळ दुखापत झाली आहे त्यांना प्रत्येकी 25 हजार रुपयांची मदत देऊ केली आहे.
तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाख आणि जखमींना 1 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.
आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री वाय एस जगन मोहन रेड्डी यांनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 10 लाख रुपये, गंभीर जखमींना प्रत्येकी 5 लाख रुपये आणि किरकोळ जखमींना प्रत्येकी 1 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








