चिरदाह वेदनांचा टाहो आणि मृतदेह शोधाची हताश प्रतीक्षा

फोटो स्रोत, Getty Images
- Author, विनीत खरे
- Role, बीबीसी प्रतिनिधी
ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यात घडलेल्या भीषण रेल्वे अपघातातील मृतांची संख्या 275 वर पोहोचली आहे. दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या 275 लोकांपैकी 187 जणांची ओळख अद्यापही पटलेली नाही.
अपघाताचं वृत्त समोर येताच अपघातग्रस्तांच्या कुटुंबीयांची बालासोरमध्ये रीघ लागली.
बालासोरमधील एका बिझनेस पार्कच्या मोठ्या हॉलमध्ये मृतदेह ठेवण्यात आलेत. आपल्या जवळच्या व्यक्तीचा मृतदेह याठिकाणी आहे का, हे बघण्यासाठी अनेक कुटुंबं या ठिकाणी येऊ लागली आहेत.
या पार्कच्या जिन्यांवर आमची भेट मालदा येथील सीमा चौधरी यांच्याशी झाली. त्या त्यांच्या पतीला, दीपांकर मंडलला शोधत होत्या.
आपल्या जवळचा व्यक्ती या अपघातात सापडल्याची व्यथा कुटुंबियांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती.
कदाचित शेवटच्या क्षणी तरी त्यांचा चेहरा पाहता येईल या एकाच आशेने ते तिथवर आले होते.
इमारतीच्या बाहेरच्या जिन्यावर सीमा उभ्या होत्या. फोनवर रडत रडत बंगाली भाषेत आपलं दुःख दुसऱ्या कोणाला तरी सांगत होत्या.
मृतदेहाच्या शोधात रडणारे लोक
त्या रडत रडतच आमच्याशी बोलल्या, "मी सगळी रुग्णालयं पालथी घातली. आता मी भुवनेश्वरला जाणार आहे. इथे काहीच माहिती मिळत नाहीये. मी सगळे मृतदेह पाहिले पण काहीच सापडलं नाही."
बिझनेस पार्कमध्ये आलेले हे लोक खेड्यापाड्यातले, निमशहरी भागातले होते. या लोकांसाठी रेल्वे हे प्रवासाचं परवडणारं साधन आहे.
बिझनेस पार्कच्या बाहेर लोकांना मदत करण्यासाठी अधिकारी, स्वयंसेवक उपस्थित होते. बिझनेस पार्कच्या मोकळ्या जागेतून पुढे गेल्यावर काचेच्या दरवाजा पलीकडे एक मोठा हॉल आहे.

त्याच हॉलच्या एका भागात फरशीवर पडलेल्या काळ्या पॉलिथिनच्या जाड पिशवीत वितळलेल्या बर्फात भिजलेला मोबाईल, कपड्यांनी भरलेल्या अनेक पिशव्या, तंबाखूची एक डबी दिसली.
हे सामान ज्या लोकांचं होतं ते आता या जगात नाहीत.
हॉलच्या दुसऱ्या बाजूला प्रोजेक्टरच्या स्क्रीनवर मृतदेहांची छायाचित्रं दाखवली जात आहेत
आपल्या जवळच्या व्यक्तीचं छायाचित्र यात दिसतंय का म्हणून कुटुंबीय एकटक त्या स्क्रीनकडे बघत आहेत.
अशी आणखी काही छायाचित्र लगतच्या टेबलावर ठेवली होती. ज्या लोकांचे मृतदेह बिझनेस पार्कमध्ये आणण्यात आले होते मात्र नंतर ते इतर रुग्णालयात पाठवण्यात आले अशांची छायाचित्र तिथे ठेवली होती.
मृतदेह सुरक्षित ठेवणं कठीण
मृतांच्या कुटुंबियांच्या गराड्यात सापडलेल्या बालासोरच्या तहसीलदार निर्लिप्ता मोहंती सांगतात, छायाचित्र पाहून आपल्या व्यक्तीचा मृतदेह कोणत्या रुग्णालयात आहे हे नातेवाईकांना समजेल. त्याप्रमाणे त्यांना मृतदेह घेऊन जाता येतील.
मृतदेह बालासोरमधून बाहेर पाठवण्याच्या मुद्द्यावर त्या म्हणाल्या, "याठिकाणी मृतदेह जास्त दिवस ठेवणं कठीण होतं. भुवनेश्वरमध्ये मोठी रुग्णालये आहेत. त्यामुळेच मृतदेह त्याठिकाणी पाठवण्यात आले."

शेजारी सुमित कुमार नामक एक तरुण उभा होता. तो त्या मृतदेहांच्या छायाचित्रांमध्ये आपल्या आतेभावाला नीरज कुमारला शोधत होता. शनिवारी सायंकाळपासून तो प्रत्येक ठिकाणी जाऊन चौकशी करण्याचा प्रयत्न करतोय.
सुमित सांगतो, "आम्ही खूप शोध घेतल्यानंतर त्या छायाचित्रात नीरज दिसला. त्यानंतर मी दोनशे अडीचशे मृतदेहांना स्पर्श करून पाहिला."
स्थानिक अधिकारी कुटुंबीयांना त्यांच्या नातलगांची ओळख पटवण्यात मदत करत आहेत.
प्रशासनासमोर मोठं आव्हान आहे. बाहेरच्या राज्यातून आलेल्या कुटुंबांसाठी, ज्यांच्यासाठी हे ठिकाण नवीन आहे, त्यांच्यासाठी तर या गोष्टी आणखीनच कठीण आहेत.
अंतहीन वेदना
स्थानिक सामाजिक कार्यकर्ते व्ही उदय कुमार सांगतात की, लोकांना माहिती देणारे डेस्क रेल्वे स्थानक, बस स्थानकापासून खूप दूर अंतरावर आहेत. या सुविधा स्थानकांजवळ उपलब्ध करून द्यायला हव्या होत्या.
येथे सर्वसामान्यांपासून ते स्वयंसेवी संस्थांपर्यंत सर्वच अधिकारी प्रवाशांना मदत करण्यात व्यस्त आहेत.

स्थानिक प्रशासनासाठी काम करणारे सुब्रत मुखी आणि त्यांचे अनेक सहकारी कित्येक तास मृतदेह रुग्णवाहिकांमध्ये ठेवण्यासाठी मदत करत होते.
त्यांचा एक सहकारी तर इतका दमला होता की, तो अक्षरशः जमिनीवर पडून होता.
सुब्रत सांगतात, "आम्ही काल रात्री आठ वाजल्यापासून इथे आहोत. हे सगळं बघून आमचं मन कासाविस होतंय, डोळ्यांतून अश्रूंचा धारा वाहू लागल्यात. मृतांचे नातेवाईक येऊ लागलेत. कोणी बंगाली बोलतंय तर कोणी तामिळ बोलतंय."
पण ज्यांना या घटनेला सामोरं जावं लागलंय, ते क्वचितच आपलं दुःख विसरू शकतील.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








