सुखशांतीसाठी या गावाची सोने वापरावर मर्यादा, महिलांना लग्नात किती दागिने घालायची परवानगी?

फोटो स्रोत, Varsha Singh
- Author, वर्षा सिंह
- Role, बीबीसी प्रतिनिधी
बाजारात सोन्याच्या वाढत्या किमतींवर उत्तराखंडच्या आदिवासी भागातील शेतकऱ्यांनी एक उपाय शोधून काढला आहे.
जौनसर बावर या आदिवासी भागातील शेतकऱ्यांनी गावात सुखशांती राखण्यासाठी दागिन्यांच्या वापरावर मर्यादा घातली आहे.
मात्र, महिलांशी संबंधित असलेला हा निर्णय त्यांच्या अनुपस्थितीत घेण्यात आला आहे.
अलीकडेच, कंदाद आणि इंद्रोली गावातील पुरुषांनी सोन्याच्या गगनाला भिडणाऱ्या किमतींबद्दल चिंतीत होऊन एक सभा बोलावली होती.
या वेळी लग्नाचे मुहूर्त निघू लागले होते आणि गावातील दोन कुटुंबांतील लग्नं देखील ठरलेली होती.
सोनं आपल्या आवाक्याबाहेर गेलं आहे याची पुरुषांना काळजी वाटत होती. दागिन्यांवरून घरांमध्ये वाद सुरू झाले होते.
दोन्ही गावांच्या पंचायत प्रमुखांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत पुरुषांनी एकमतानं एक निर्णय घेतला. महिला यापुढं लग्नं समारंभात फक्त तीन दागिनेच घालतील, असा हा निर्णय होता. त्यात नाकातली नथ, कानातलं आणि गळ्यातील मंगळसूत्र यांचाच समावेश असेल.
कंदाद आणि इंद्रोली ही गावं उत्तराखंडच्या जौनसर बावर या आदिवासी प्रदेशाचा भाग आहेत.
देहरादून जिल्ह्यातील चकराता तालुक्यात टोंस आणि यमुना नद्यांच्या दरम्यान वसलेला हा परिसर त्याच्या खास सांस्कृतिक आणि सामाजिक वातावरण, सामूहिक भावना तसेच उत्सवांसाठी ओळखला जातो.
'शेतकरी दागिने खरेदी करू शकणार नाहीत'
कंदाद ग्रामसभेत ,कंदाद आणि इंद्रोलीसह चार गावांचा समावेश होतो. इथं 65 हून अधिक कुटुंबं राहतात आणि मतदारांची संख्या सुमारे 650 आहे.
गावचे प्रमुख स्याणा अर्जुनसिंह रावत सांगतात की, "बैठकीला सुमारे 60-70 पुरूषांनी उपस्थिती लावली होती. गावातील नोकरदार लोक दागिने खरेदी करू शकतात, परंतु शेतकरी ते खरेदी करू शकणार नाही. त्यामुळेच दागिने घालण्यावर मर्यादा घालण्याचा निर्णय घेण्यात आला.
मग असं ठरलं की, लग्नासारख्या समारंभात महिला नाकात, कानात आणि गळ्यात असे मिळून तीनच दागिने घालतील."

फोटो स्रोत, Varsha Singh
पारंपरिक पद्धतीनुसार, गावातील सभांमध्ये महिलांचा समावेश करून घेतला जात नाही.
रावत सांगतात की, "या सभांना पुरुष मंडळीच येतात आणि तेच निर्णय घेतात. कोणी आमचा निर्णय मान्य केला नाही तर त्याला 50,000 रुपये दंड भरावा लागेल."
कंदाद गावातील पुरुष या निर्णयावर खूश आहेत आणि या निर्णयामागील युक्तिवादाशी महिला देखील सहमत आहेत. मात्र तरीही, त्यांच्या सहमतीमागं काहीशी निराशा दिसून येतेय.
'दागिने घालण्यावर मर्यादा असू नये'
अशीच निराशा स्याणाजी यांच्या पत्नी अनारी देवी यांच्या बोलण्यातही जाणवते.
त्या म्हणतात, "आम्ही सगळ्या गावकऱ्यांचा निर्णय मान्य केला. आमचे सगळे दागिने हिसकावून घेण्यात आले त्याचं वाईटही वाटलं. पण तेही ठीक होतं. ज्यांच्याकडे पैसे नाहीत, ते दागिने कसे घेऊ शकतील?"
भूतकाळातील आठवणींबद्दल बोलताना अनारी देवीं म्हणाल्या की, "माझ्या सासूबाईंकडे भरपूर दागिने होते. त्या सगळ्याची त्यांच्या मुलांमध्ये विभागणी झाली. आता दागिने बनवणं कठीण झालं आहे. अशाही महिला आहेत ज्यांच्याकडं इतके दागिने नाहीत. गावकऱ्यांना वाटलं की सगळ्यांनी एकसारखंच असायला हवं."

अनारी देवींना वाटतं की, दागिने ही महिलांची संपत्ती आहे. जेव्हा कोणती समस्या, आजारपण येतं किंवा घर बनवायचं असेल तेव्हा हेच दागिने उपयोगालाही येतात.
ग्रामपंचायतीचा हा निर्णय सर्वप्रथम गावच्या प्रमुखांच्या कुटुंबासाठी लागू करण्यात आला. त्यानंतर 20 दिवसांनी म्हणजेच 29-30 ऑक्टोबर रोजी स्याणा अर्जुनसिंग रावत यांच्या दोन मुलांची लग्नं झाली.
चकराताच्या भंगार गावातून कंदादची सून म्हणून आलेल्या रेखा चौहान त्यांच्या दागिन्यांकडे पाहून म्हणतात, "दागिने सौंदर्य वाढवतात. काही महिलांना दागिन्यांवर मर्यादा नसावी असं वाटतं. मात्र, हा निर्णय एका अर्थानं बरोबरच आहे, प्रत्येकाची आर्थिक परिस्थिती एकसारखी नसते."
'सामाजिक समतेसाठी प्रयत्न'
2000 मध्ये सोन्याची किंमत 10 ग्रॅमसाठी 5,000 रुपयांपेक्षा कमी होती.
आता, 2025 मध्ये 10 ग्रॅमसाठी हा आकडा 1 लाख रुपयांच्या पुढं गेला आहे. ज्या वेगानं सोन्याच्या किमती वाढल्यात, त्या वेगानं शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढलेलं नाही.
दुपारचं जेवण झाल्यानंतर अमृता रावत या शेतात कामाला जाताना दिसल्या.
त्या म्हणाल्या, "शेतीत फारसं उत्पन्न मिळत नाही. नोकरदारच आता दागिने बनवू शकतात. बाहेरची महिला सुंदर असते. गावातील महिला उन्हातान्हात काम करून खंगलेली असते.
प्रत्येकीला वाटतं आपल्याकडे पण असे दागिने असायला हवे होते. आता प्रत्येकजण तीनच दागिने घालू शकते. यामुळे समानता येईल आणि इतर गावांनांही शिकवण जाईल."

फोटो स्रोत, Varsha Singh
जौनसार बावर आपल्या प्रगत शेतीसाठीदेखील ओळखलं जातं.
इथल्या शेतकरी महिला कविता रावत म्हणतात, "आम्ही पहाटे 5 वाजता उठतो, स्वयंपाक करून शेतात येतो आणि दुपारी 12 वाजता जेवायला घरी परत येतो आणि मग पुन्हा शेतात जातो. आम्हाला सकाळ-संध्याकाळ जनावरांना खायला घालावं लागतं. आमच्याकडे विश्रांती घ्यायला देखील वेळ नसतो."
"सणासुदीला किंवा लग्नसोहळा असला की गावातल्या सगळ्या महिला एकत्र येतात. आम्ही गाणी गातो. आपआपले दागिने घालतो. गरजेला देखील ते उपयोगी पडतात."
मात्र, गावातील बहुतांश महिलांना या मुद्द्यावर गप्प बसायचं आहे.
सोन्याच्या दागिन्यांमुळे गावातील श्रीमंत आणि गरीब यांच्यातील दरी आणखी वाढत आहे, असं गावातील पुरुष शेतकऱ्यांना वाटतं.
' आमच्या वर्षभराच्या कमाई इतका सोन्याचा एक तोळा'
कंदाद गावचे रहिवासी जीतसिंग रावत हे शेतकरी आहेत, तर त्यांचा एक भाऊ देहरादून शहरातील एका बँकेत मॅनेजर आहे आणि दुसरा भाऊ सरकारी नोकरीत आहे.
ते म्हणतात, "एक तोळा सोन्याची किंमत सुमारे सव्वा लाख आहे आणि सव्वा लाख ही आमच्या वर्षभराची कमाई आहे. आम्ही सोनं कसं घेऊ शकतो? जेव्हा घरातल्या सगळ्या बायका लग्नाला जमतात, तेव्हा शहरात राहणाऱ्या आमच्या वहिनी राणीहार, मोठमोठे कानातले घालतात, काही नाकात मोठ्या नथी घालतात."
"आम्ही रानात रात्रंदिवस कष्ट करतो, भाजीपाल्याची पीकं घेतो, असा राणीहर विकत घेणं आमच्या हातातली गोष्ट नाही. म्हणूनच आम्ही हा निर्णय घेतला जेणेकरून एखाद्या महिलेला असं वाटू नये की, माझ्याकडं दागिने कमी आहेत आणि दुसऱ्या कोणाकडं जास्त दागिने आहेत."

सामाजिक कार्यकर्त्या दीपा कौशलम यांनी चकरातासह जौनसार बावर भागातील खेड्यांमध्ये उपजीविकेसंबंधित विषयावर महिलांसोबत काम केलं आहे.
त्या म्हणतात, "सोशल मीडियासह इतर ठिकाणी बरीच चर्चा आहे की महिलांवर अत्याचार केले जात आहेत आणि ते त्यांच्यावर लादले जात आहेत, मला वाटतं की अशी प्रतिक्रिया देणं खूप घाईचं ठरेल."
दीपा म्हणतात, "जौनसार बावर हा अतिशय संघटित समाज आहे. हा परिसर स्वतःचे निर्णय स्वतःच घेत आला आहे. घरांमध्ये दागिन्यांच्या बाबतीत भांडणं झाली असतील, म्हणूनच असा निर्णय घेण्यात आला असावा.
सांस्कृतिक समजूतदारपणानं त्यातील भावनिक बाजूकडं पहा. जेव्हा आपण एखाद्यासमोर स्वतःला लहान समजतो, तेव्हा ती भावना व्यक्त केली जाऊ शकत नाही, ती केवळ अनुभवली जाऊ शकते.
'दागिन्यांसाठी जमीन विकावी लागत असेल तर काय उपयोग?'
दीपा कौशलम म्हणतात, "सोनं ही एक प्रकारची संपत्ती आहे, ज्याचा गरज पडल्यावर पुरुषही फायदा घेतात. पण त्याचा महिलांच्या अस्तित्वाशी संबंध नाही. महिलांची खरी संपत्ती म्हणजे सोनं घालणं नसून त्यांचा आत्मविश्वास, शिक्षण, समाजातील त्यांचं स्थान आणि निर्णय घेण्याची शक्ती ही आहे.
इंद्रोली गावचे अरविंद सिंह चौहान हे कंदाद ग्रामसभेचे ग्रामप्रमुख आहेत आणि गावाच्या सामूहिक निर्णयानं त्यांची बिनविरोध निवड झाली आहे.
या निर्णयाला सहमती दिल्याबद्दल अरविंद यांनी गावातील महिलांचे आभार मानले आहेत.

फोटो स्रोत, Varsha Singh
ते म्हणतात, "गावात समानता आणण्याचा हा प्रयत्न आहे. आमच्याकडे घरातील पहिल्या मुलाचा विवाह मोठ्या थाटामाटात केला जातो. एखाद्यानं जर 10-20 लाखांचे दागिने खरेदी केले तर इतर कुटुंबांवर देखील दागिने खरेदी करण्यासाठी दबाव निर्माण होत होता.
यामुळे बरेच लोक आपली शेती विकत होते किंवा गहाण ठेवत होते. दागिन्यांसाठी जमीन विकावी लागत असेल तर काय उपयोग?"
अरविंद सांगतात की कंदार ग्रामसभेच्या आणखी दोन गावांनी, बांगियासेद आणि संतोली या गावांनीही मर्यादित दागिन्यांचा हा निर्णय मान्य केला आहे.
यासोबतच परिसरातील इतर गावंही सार्वजनिक सभा घेत आहेत आणि आपल्या गावात हा निर्णय लागू करत आहेत.
'आदिवासी महिलांचे हक्क'
चकराता तहसीलमधील खरसी गावानंही असा निर्णय घेतला आहे.
गावातील एक तरुण सुरेश चौहान म्हणतात, "कंदाद गावात मर्यादित दागिन्यांच्या निर्णयानंतर आमच्या गावातही याचा विचार होऊ लागला. बाहेरील लोकांना वाटतंय की, आम्ही महिलांवर कमी दागिने घालण्यासाठी दबाव आणत आहोत. आमच्या भागात महिलांबद्दल खूप आदर आहे.
आम्ही आदिवासी समाज आहोत आणि महिलांच्या निर्णयाचा आदर करतो. जर एखाद्या महिलेनं कोणत्याही विषयावर आपली पगडी काढली तर त्या वेळी ती जे काही म्हणेल ते सर्वांना पाळावं लागेल."

फोटो स्रोत, Varsha Singh
आपल्या युक्तिवादाला पुष्टी देण्यासाठी सुरेश पारंपरिक प्रथेचं उदाहरण देतात, "आमच्या प्रदेशात जर एखाद्या महिलेला कोणी पुरुष आवडत नसेल तर ती त्याच्याशी लग्न करण्यास नकार देऊ शकते आणि पुन्हा लग्न करायला स्वतंत्रही असते. जर तिला तो आवडला नाही तर ती त्यालाही सोडून जाऊ शकते, इतकं स्वातंत्र्य कोणता समाज देऊ शकतो."
दीपाच्या मते, ज्याप्रमाणे युवांसंबंधित धोरणं तयार करण्यापूर्वी तरुणांना समाविष्ट केलं गेलं पाहिजे, त्याचप्रमाणे महिलांशी संबंधित धोरणांमध्ये महिलांचाही समावेश केला गेला पाहिजे.
'दारूवर बंदी का नाही'
दागिन्यांशी संबंधित असलेल्या या निर्णयामुळे जौनसार बावरच्या गावांमध्ये खळबळ उडाली आहे.
घरगुती भांडणं आणि खर्चामुळे जर दागिन्यांवर मर्यादा येत असेल, तर दारूवर का नाही, अशीही मागणी केली जात आहे.

फोटो स्रोत, Varsha Singh
कंदाद गावचे टीकम सिंग याच्याशी सहमत आहेत की, इथले तरुण दारूच्या नशेत वाया जात आहेत, "आम्ही (वाईन शॉपमधून विकत घेतलेली) शुद्ध दारू रोखण्यासाठी तयारी करत आहोत. मात्र, अद्याप अशा कोणत्याही निर्णयाची अंमलबजावणी झालेली नाही.
त्याचबरोबर खारसी गावात दारू पिण्यावर बंदी घालण्यात आली आहे.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.










