जेव्हा लुधियानातील एका उद्योजकाने नाझी सैनिकांच्या तावडीतून वाचवले ऑस्ट्रियन ज्यू लोकांचे प्राण

फोटो स्रोत, Vinay Gupta
- Author, सुधा जी टिळक
- Role, बीबीसी न्यूजसाठी
"मी तुला एक गुपित सांगते. तुझ्या आजोबांनी ज्यू कुटुंबांना नाझींपासून वाचवण्यास मदत केली होती."
आईकडून हे ऐकल्यानंतर विनय गुप्ता हे आपल्या आजोबांच्या भूतकाळाचा शोध घेण्यासाठी निघाले. पण त्यांना जी गोष्ट समजली, ती त्यांच्या कल्पनेपेक्षा कितीतरी अधिक रोमांचक आणि प्रेरणादायी होती.
ही एका अशा भारतीय व्यावसायिकाच्या शौर्याची कहाणी होती, जी फार कमी लोकांना माहीत आहे. युरोपमधल्या अत्यंत कठीण काळात, या भारतीयानं काही अनोळखी लोकांना वाचवण्यासाठी आपलं संपूर्ण आयुष्य पणाला लावलं होतं.
भारतात परतल्यानंतर कुंदनलाल नावाच्या या व्यक्तीने ज्यू लोकांना रोजगार मिळावा म्हणून व्यवसाय सुरू केला आणि त्यांच्यासाठी घरंही बांधली.
त्यांची गोष्ट ही कल्पनेहून देखील अद्भुत आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
दुसरं महायुद्ध सुरू झाल्यानंतर ब्रिटिश सरकारने कुंदनलाल यांना 'शत्रू' घोषित करून नजरकैदेत ठेवलं होतं. लुधियानामधील एका गरीब मुलापासून ते युरोपमध्ये ज्यूंचे प्राण वाचवणारा उद्योजक होण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास एखाद्या महाकाव्यापेक्षा कमी नव्हता.
वयाच्या 13 व्या वर्षी लग्न झालेल्या कुंदनलाल यांनी हाती पडेल ते काम करत शिक्षण घेतलं.
लाकूड, मीठ, बैलगाडीची चाकं आणि प्रयोगशाळेची उपकरणं विकण्यापासून ते कपड्यांचा आणि काडीपेटीचा कारखाना सुरू करण्यापर्यंतचा प्रवास करणाऱ्या कुंदनलाल यांनी लाहोरमध्ये शिक्षण घेतलं.
कुंदनलाल हे वयाच्या 22 व्या वर्षी कॉलोनियल सिव्हिल सर्व्हिसमध्ये (वसाहती नागरी सेवा) भरती झाले. परंतु, स्वातंत्र्य आंदोलनात आणि व्यवसायात योगदान देण्यासाठी त्यांनी ही नोकरी सोडली.
आपल्या आयुष्यात ते पं. जवाहरलाल नेहरू यांना देखील भेटले होते आणि त्याकाळच्या प्रसिद्ध अभिनेत्री देविका राणी यांची एका प्रवासादरम्यान त्यांनी भेट घेतली होती, असा त्यांच्या आयुष्याचा पट भव्य होता.
विनय गुप्ता यांनी 'अ रेस्क्यू इन व्हिएन्ना' या पुस्तकात आपल्या आजोबांच्या या धाडसी मोहिमेची कहाणी लिहिली आहे. हे पुस्तक कौटुंबिक पत्रं आणि बचावलेल्या ज्यूंच्या मुलाखतींच्या आधारे तयार करण्यात आलं आहे.
वर्ष 1938 मध्ये हिटलरने ऑस्ट्रिया ताब्यात घेतल्यानंतर, कुंदनलाल यांनी काही ज्यूंना भारतात गुपचूप नोकरीची संधी दिली, जेणेकरून त्यांना 'लाइफ सेव्हिंग व्हिसा' मिळू शकेल. त्यांनी या कुटुंबांना रोजगार उपलब्ध करून दिला आणि भारतात त्यांच्यासाठी घरंही बांधली.
कुंदनलाल यांनी पाच कुटुंबांचे प्राण वाचवले
30 वर्षीय ज्यू वकील फ्रिट्झ वाइस आजाराच्या बहाण्यानं व्हिएन्नामधल्या एका हॉस्पिटलमध्ये लपून बसले होते. त्याच दरम्यान, स्वतःच्या आजाराच्या उपचारासाठी तिथं आलेले भारतीय उद्योजक कुंदनलाल यांच्याशी त्यांची भेट झाली.
नाझींनी वाइस यांना त्यांच्या घराबाहेरचा रस्ता साफ करण्यास भाग पाडलं होतं. यानंतर कुंदनलाल यांनी त्यांना नव्या आयुष्याची वाट दाखवली. त्यांनी वाइस यांना 'कुंदन एजन्सीज' नावाच्या काल्पनिक कंपनीत नोकरीचा प्रस्ताव दिला आणि याचमुळे त्यांना भारताचा व्हिसा मिळाला.
पुढच्या काही महिन्यांत ते आणखी काही लोकांना भेटले. कुंदनलाल यांनी वर्तमानपत्रांमध्ये जाहिराती देऊन अशा कुशल कामगारांचा शोध सुरू केला, जे भारतात स्थायिक होण्यास तयार होते. वाचस्लर, लॉश, शाफ्रानेक आणि रेटर सारख्या लोकांनी त्यांना साथ दिली.
यानंतर लाकूडकाम करणारे अल्फ्रेड वाचस्लर कुंदनलाल यांना भेटले. वाचस्लर आपल्या गरोदर पत्नीला तपासणीसाठी रुग्णालयात घेऊन आले होते. कुंदनलाल यांनी त्यांना भारतात स्थायिक होण्याचं आणि फर्निचर उद्योगात भविष्य घडवण्याचं आश्वासन दिलं.

फोटो स्रोत, Vinay Gupta
जानेवारी 1938 ते फेब्रुवारी 1939 या काळात त्यांचं कुटुंब भारतात पोहोचलेल्या पहिल्या ज्यू कुटुंबांपैकी एक होतं.
टेक्स्टाईल टेक्निशियन हॅन्स लॉश यांचाही कुंदनलाल यांच्याशी संपर्क झाला. त्यांना लुधियानामधील एक काल्पनिक कंपनी 'कुंदन क्लॉथ मिल्स'मध्ये मॅनेजर पदाची ऑफर देण्यात आली, ज्यात राहण्याची सोय, नफ्यात वाटा आणि सुरक्षित प्रवासाचाही समावेश होता. लॉश यांनी भारतात नवीन सुरूवात केली.
यानंतर वेळ आली अल्फ्रेड शाफ्रानेक यांची, जे प्लायवूड फॅक्टरी चालवत होते. त्यांनी भारतात सर्वात आधुनिक प्लायवूड युनिट सुरू करण्यात कुंदनलाल यांना साथ दिली. त्यांचे मेकॅनिक भाऊ सिगफ्राइड आणि संपूर्ण कुटुंब भारतात आले.
सिगमंड रेटर हे मशीन टूल्सच्या व्यवसायात होते. कुंदनलाल यांच्याशी संपर्क झालेले ते पहिले व्यक्ती होते. नाझींच्या काळात त्यांचा व्यवसाय बंद पडला होता. कुंदनलाल यांनी त्यांना भारतात आणून पुन्हा व्यवसाय सुरू करण्यास मदत केली.
या सगळ्या प्रयत्नांची सुरुवात व्हिएन्नामधल्या एका रुग्णालयातील बेडपासून झाली, जिथे 45 वर्षीय कुंदनलाल मधुमेह आणि मूळव्याधीच्या उपचारासाठी दाखल झाले होते.
1938 मध्ये शस्त्रक्रियेनंतर त्यांची भेट लूसी आणि अल्फ्रेड वाचस्लर यांच्याशी झाली. त्यांच्याशी झालेल्या संवादातून कुंदनलाल यांना ज्यूविरोधी हिंसेचं गांभीर्य जाणवलं.
कुंदनलाल यांनी या सर्वांना नोकरीची हमी दिली आणि भारतात येण्यासाठी आवश्यक असलेला व्हिसा मिळवून देण्यासाठी मदतही केली.
विनय गुप्ता लिहितात, "या कुटुंबांसाठी कुंदनलाल यांच्या योजनेचा एक खास भाग असा होता की, त्यांनी हे सर्व पूर्णपणे गुप्त ठेवलं होतं. त्यांनी आपली ही योजना ना कोणत्या भारतीय अधिकाऱ्याला सांगितली, ना ब्रिटिश अधिकाऱ्याला. त्यांच्या कुटुंबालाही याची माहिती ते घरी अनेक महिन्यांनी परत आले, तेव्हाच समजली."
ज्यू कुटुंबांना करावा लागला अडचणींचा सामना
ऑक्टोबर 1938 मध्ये, कुंदनलाल यांच्या मदतीने लुधियानात पोहोचणारे पहिले व्यक्ती हॅन्स लॉश होते. गुप्ता लिहितात की, त्यांचं स्वागत कुंदनलाल यांच्या घरी करण्यात आलं. परंतु, लुधियाना त्यांना फारसं आवडलं नाही. काही आठवड्यांतच ते मुंबईला गेले आणि पुन्हा कधी लुधियानाला परतले नाहीत.
फ्रिट्झ वाइस फक्त दोन महिनेच लुधियानात राहिले. त्यांच्यासाठी तयार करण्यात आलेली काल्पनिक कंपनी 'कुंदन एजन्सीज' कधी सुरूच होऊ शकली नाही. लवकरच ते मुंबईला गेले आणि तिथं फ्लोअरिंगचं काम सुरू केलं. 1947 मध्ये ते इंग्लंडला गेले.
गुप्ता लिहितात की, हे सगळे लोक लुधियाना सोडून गेले तरी कुंदनलाल यांना त्याचं काहीही वाईट वाटलं नाही. ते लिहितात, "माझ्या मावशीनं सांगितलं की उलट कुंदनलाल यांना याची खंत होती की ते त्यांना व्हिएन्नासारखी जीवनशैली आणि सामाजिक वातावरण देऊ शकले नाहीत. त्यांना वाटायचं, जर तसं करता आलं असतं, तर कदाचित हे सगळे इथंच राहिले असते."
पण सर्वांच्या कहाण्यांचा शेवट असा नव्हता.
अल्फ्रेड आणि लूसी वाचस्लर आपल्या नवजात मुलासह समुद्र, रेल्वे आणि रस्तामार्गे लुधियानात पोहोचले. ते कुंदनलाल यांनी दिलेल्या मोठ्या घरात राहू लागले.
अल्फ्रेड यांनी फर्निचरचं एक वर्कशॉप सुरू केलं. स्थानिक शीख कामगारांच्या मदतीनं त्यांनी सुंदर डायनिंग सेट तयार केले, ज्यांपैकी एक सेट आजही विनय गुप्ता यांच्या कुटुंबात आहे.

फोटो स्रोत, Vinay Gupta
मार्च 1939 मध्ये अल्फ्रेड शाफ्रानेक, त्यांचे भाऊ सिगफ्राइड आणि त्यांचं कुटुंब ऑस्ट्रियामधून लुधियानात आलं. त्यांनी भारतातील सर्वात जुन्या प्लायवुड कारखान्यांपैकी एका कारखान्याची सुरुवात केली.
गुप्ता लिहितात, "काम खूप कठीण होतं. त्यांना पंजाबच्या उष्णतेचा अंदाज नव्हता. एकटेपणाही स्पष्ट दिसत होता, विशेषतः महिलांसाठी, ज्या बहुतांश वेळा घरापुरतंच मर्यादित राहायच्या."
जसजसा काळ जाऊ लागला, तसतसं सुरुवातीचा आराम नको वाटू लागला, कंटाळा जाणवू लागला. पुरुष दिवसभर कामामध्ये गुंतलेले असायचे, तर महिलांना भाषा कळत नसल्यामुळे आणि समाजात मिसळता न आल्यामुळे घरातच राहावं लागायचं.
सप्टेंबर 1939 मध्ये हिटलरने पोलंडवर हल्ला केला आणि काही दिवसांतच ब्रिटनने जर्मनीविरुद्ध युद्ध घोषित केलं. यासोबतच भारतालाही या युद्धात सहभागी केलं गेलं. या युद्धात 25 लाखांहून अधिक भारतीय सहभागी झाले, त्यापैकी 87,000 जण परतलेच नाहीत.
1940 पर्यंत ब्रिटिश धोरणांनुसार, भारतात राहणाऱ्या सर्व जर्मन नागरिकांना (ते ज्यू असो किंवा नसो) नजरकैद शिबिरांमध्ये पाठवलं जाऊ लागलं.
वाचस्लर आणि शाफ्रानेक कुटुंबांना पुण्याजवळील पुरंदर नजरकैद शिबिरात हलवण्यात आलं. तिथं त्यांना रॉकेलचे दिवे आणि अगदी कमी सोयी-सुविधा असलेल्या मोकळ्या बॅरेकमध्ये राहावं लागलं.
आजही सुरू आहे कुंदनलाल यांनी सुरू केलेली शाळा
पुरंदर नजरकैद शिबिर 1946 मध्ये, युद्ध संपल्यानंतर जवळपास एक वर्षानंतर बंद करण्यात आलं.
1948 मध्ये अल्फ्रेड वाचस्लरच्या एका चुलतभावानं त्यांना अमेरिकेमध्ये शरणार्थी व्हिसा मिळवून देण्यास मदत केली. त्याच वर्षी ऑक्टोबरमध्ये ते भारतातून निघून गेले आणि मग कधी परत आलेच नाहीत.
बंगळुरूमध्ये यशस्वी व्यवसाय केल्यानंतर शाफ्रानेक कुटुंब 1947 मध्ये ऑस्ट्रेलियाला गेले.
पुस्तकासाठी शोध घेत असताना विनय गुप्तांची भेट अॅलेक्स वाचस्लर यांच्याशी झाली. अॅलेक्सचे वडील अल्फ्रेड यांनी तो टेबल बनवला होता, ज्याचा वापर कुंदनलाल त्यांच्या लहान ऑफिसमध्ये करत असत. 1973 मध्ये अल्फ्रेड यांचे निधन झाले.

फोटो स्रोत, Vinay Gupta
गुप्ता लिहितात, "अॅलेक्स वाचस्लर लहानपणापासूनच अमेरिकेत राहतात, पण अजूनही त्यांनी भारतातलं आपलं बालपण लक्षात ठेवलेलं आहे. वयाची 80 वर्षे त्यांनी पूर्ण केली आहेत.
"ते भारतीय रेस्टॉरंटमध्ये जेवतात, भारतीय लोकांना भेटल्यावर त्यांना खूप आनंद होतो आणि आपल्या उर्दू भाषेनं ते लोकांना आश्चर्यचकितही करतात."
लुधियानाला परतल्यावर कुंदनलाल यांनी आपल्या मुलींसाठी घरातच एक शाळा सुरू केली. ही शाळा पुढे जाऊन पंजाबमधील सगळ्यात जुन्या शाळांपैकी एक बनली. आजही या शाळेत 900 हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
कुंदनलाल यांची पत्नी सरस्वती यांचा 1965 मध्ये छतावरून पडून मृत्यू झाला. त्यांना पाच मुलं होती, ज्यात चार मुली होत्या. पत्नीच्या मृत्यूच्या एका वर्षानंतर, 73 वय असताना कुंदनलाल यांचाही हृदयविकारामुळे मृत्यू झाला.
गुप्ता लिहितात, "कुंदनलाल यांना केवळ बघ्याची भूमिका घेऊन जगणे आवडायचे नाही. जर त्यांना कुठलीही समस्या दिसली किंवा कोणालाही मदतीची गरज भासली, तर ते अगदी न घाबरता पुढे येत असत. आव्हान किती मोठं आहे, याची त्यांना काळजी नसायची."
हे शब्द त्या माणसाची खरी ओळख दाखवतात, जो फक्त व्यापारी नव्हता, तर दया आणि साहस असलेला माणूस होता.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











