हिटलर, ईदी अमीनपासून ते पोट पोलपर्यंत, हुकूमशहांचा लहरीपणा आणि त्यांच्या क्रूरतेचे किस्से

फोटो स्रोत, Getty Images
- Author, रेहान फझल
- Role, बीबीसी हिंदी
हुकूमशहांबाबत असं म्हटलं जातं की त्यांना त्यांच्याच लोकांची सगळ्यात जास्त भीती वाटते.
जगात होऊन गेलेल्या हुकूमशहांबाबत आणखी एक गोष्ट समान आहे आणि ती म्हणजे प्रत्येक हुकूमशहाची एक 'एक्स्पायरी डेट' असते. काही काळानंतर प्रत्येक हुकूमशहाचे पतन निश्चित असते.
आजवर जगभरात अनेक हुकूमशहा होऊन गेले. त्यात प्रामुख्याने चीनचे माओ, पाकिस्तानचे झिया उल हक, इराकचे सद्दाम हुसैन, लिबियाचे कर्नल गद्दाफी, युगांडाचे ईदी अमीन यांचा समावेश होतो.
अनेक देशांमध्ये भारताचे राजदूत राहिलेले राजीव डोगरा यांचे 'ऑटोक्रॅट्स, करिश्मा, पॉवर अँड देअर लाइव्ह' हे पुस्तक अलीकडेच प्रकाशित झाले आहे.
या पुस्तकात त्यांनी जगातील हुकूमशहांची मानसिकता, त्यांची कार्यशैली आणि त्यांच्या आयुष्याचा अत्यंत बारकाईने आढावा घेतला आहे.
या पुस्तकात डोग्रा असं सांगतात की, त्यांना रोमानियामध्ये भारताचे राजदूत म्हणून नियुक्त केलं गेलं. आणि तिथे राहताना त्यांना असं आढळलं की निकोल चाउसेस्कु यांचा मृत्यू होऊन एक दशक उलटल्यानंतरही तेथील लोकांमध्ये प्रचंड दहशत होती. असं म्हटलं जायचं लोक त्यांच्या सावलीला देखील घाबरत.


राजीव डोग्रा यांनी लिहिलंय की, "तिथले लोक अजूनही त्यांचा कुणीतरी पाठलाग तर करत नाही ना हे पाहण्यासाठी वारंवार वळून बघायचे."
"एखाद्या उद्यानात समोरच्या बाकावर बसलेला व्यक्ती वर्तमानपत्र त्याच्या चेहऱ्यासमोर ठेवून त्यांच्यावर पाळत तर ठेवत नाही ना हे लोक तपासायचे. जर कुणी वर्तमानपत्र वाचत बसला असेल, तर त्याच्या वर्तमानपत्रात छिद्र करून तो इतरांच्या हालचालींवर नजर ठेवत असल्याची शंका अनेकांच्या मनात असायची."
हुकूमशहांना विरोध सहन होत नाही
डोगरा लिहितात की, रोमानियाचा प्रसिद्ध चित्रपट आणि थिएटर अभिनेता इओन कॅरामित्रो याने हुकूमशाहीच्या आठवणींचं वर्णन करताना म्हटलं होतं की, "त्याकाळात आमच्यावर सतत नजर ठेवली जायची. आमच्या प्रत्येक कामावर सरकारचं नियंत्रण असायचं."
"आम्ही कुणाशी भेटणार, कुणाशी बोलणार, किती वेळ बोलणार, कुणाशी बोलायचं नाही, आम्ही कुठे खायचं, काय खायचं, किती खायचं, काय खरेदी करायचं हे सगळं प्रशासनातर्फे ठरवलं जायचं. आमच्यासाठी काय चांगलं आणि काय वाईट हेही प्रशासनच ठरवायचं."

फोटो स्रोत, Getty Images
लहानपणापासूनच हुकूमशाहीचं बाळकडू मिळतं
असं म्हटलं जातं की हुकूमशहांच्या क्रूरतेमागे त्यांचं बालपण आणि सुरुवातीचं आयुष्य जबाबदार असतं.
लेव्हिन ॲरेड्डी आणि ॲडम जेम्स यांनी त्यांच्या '13 फॅक्ट्स अबाउट बेनिटो मुसोलिनी' या पुस्तकात लिहिलं आहे की, "मुसोलिनी हा एक व्रात्य मुलगा होता. त्याला शिस्त लागावी म्हणून त्याच्या पालकांनी त्याला एका कठोर शिस्तीच्या कॅथलिक बोर्डिंग स्कूलमध्ये पाठवलं. त्या शाळेतील शिक्षक देखील मुसोलिनीला शिस्त लावू शकले नाहीत."
त्यांनी पुढे असं लिहिलंय की, "वयाच्या 10 व्या वर्षी, एका विद्यार्थ्यावर पेन चाकूने हल्ला केल्याबद्दल मुसोलिनीला शाळेतून काढून टाकण्यात आलं. 20 वर्षाचा होईपर्यंत बेनिटो मुसोलिनीने त्याच्या एका गर्लफ्रेंडवर आणि इतर काही लोकांवर चाकूहल्ला केला होता."

फोटो स्रोत, Getty Images
स्टालिन हे देखील त्यांच्या तरुणपणी बंडखोर स्वभावाचा होते. त्यांनी अनेक दुकानांवर मशाली फेकून आग लावली होती.
त्यांच्या पक्षासाठी निधी जमा करण्यासाठी त्यांनी अनेक लोकांचं अपहरण केलेलं होतं. नंतर त्यांनी स्वतःच नाव 'स्टालिन' असं ठेवलं, या शब्दाचा अर्थ होतो, 'लोखंडापासून बनलेला माणूस.'
या दोन्ही उदाहरणांच्या अगदी उलट किस्सा आहे उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जाँग-उन यांचा. त्यांचं बालपण अतिशय वैभवसंपन्न आणि ऐषोरामाचं होतं. लहानपणी किम जाँग-उन यांच्या देखभालीसाठी सैनिकांची एक संपूर्ण टीमच तैनात करण्यात आली होती.
युरोपातील कुठच्याही खेळण्यांच्या दुकानात नसतील एवढी खेळणी किम यांच्याकडे होती. त्यांच्या मनोरंजनासाठी त्यांच्या घरातल्या बागेत माकड आणि अस्वलांना पिंजऱ्यात बंदिस्त करून ठेवण्यात आलं होतं.
एवढ्या लाडाकोडात वाढूनही किम जाँग-उन यांना इतर हुकूमशहांप्रमाणेच सतत असुरक्षित वाटतं.
नेहमी सत्तेत राहण्याच्या क्लुप्त्या
एखाद्या हुकूमशहाच्या हातात सत्ता आल्यानंतर त्यांची पहिली प्राथमिकता ही ती सत्ता टिकवून ठेवण्याला असते.
राजीव डोगरा लिहितात, "ही सत्ता टिकवण्यासाठी हे महत्त्वाचं असतं की या हुकूमशहांच्या वागणुकीचा अंदाज कुणालाही लावता येऊ नये. आणि त्यामुळे माध्यमांवर संपूर्ण नियंत्रण आणावे लागते."
"ते सर्वव्यापी असल्याचं भासवतात आणि त्यासाठी देवाप्रमाणे तुमच्या प्रत्येक हालचालींवर नजर ठेवून असतात. जर कुणी या हुकूमशहांच्या विरोधात आवाज उठवण्याचा प्रयत्न केला तर तो आवाज तिथेच चिरडणं या हुकूमशहांसाठी अत्यंत महत्त्वाचं असतं."

फोटो स्रोत, Getty Images
जगातील जवळपास सर्व हुकूमशहा हे खोटा प्रचार (प्रपोगंडा) करण्यात आणि करवून घेण्यात तरबेज असतात.
सियु प्रोदो यांनी 20 सप्टेंबर 2019 च्या न्यू स्टेट्समनच्या अंकात लिहिलेल्या, ‘द ग्रेट परफॉर्मर्स, हाऊ इमेज अँड थिएटर गिव डिक्टेटर्स देअर पावर’ या लेखात असं सांगितलं आहे की, "मुसोलिनी यांना हे पक्कं ठाऊक होतं की त्यांचा विमान चालवायला शिकतानाचा एक फोटो हा त्यांच्यावर लिहिण्यात आलेल्या कित्येक संपादकीय लेखांपेक्षा अधिक प्रभावी ठरेल."
1925 मध्ये मुसोलिनी यांनी त्यांच्या पहिल्या रेडिओ संभाषणानंतर देशभरातल्या शाळांना सुमारे चार हजार रेडिओ संच फुकट वाटले होते. एकूण आठ लाख रेडिओ संच मोफत दिले गेले आणि चौकाचौकात लाऊड स्पीकर लावून लोकांना रेडिओ ऐकवले गेले."
सियु प्रोदो लिहितात की, "बेनिटो मुसोलिनी यांचा चेहरा अंघोळीच्या साबणांवर देखील छापण्यात आला होता, जेणेकरून तुम्ही अंघोळ करत असताना देखील मुसलोनी यांचा चेहरा तुम्हाला सतत दिसत राहील. त्यांच्या कार्यालयातील विजेचे दिवे रात्रभर जाळण्यात यायचे, जेणेकरून ते रात्रभर काम करतात हे दाखवणं शक्य होईल."
जेवणाच्या विचित्र सवयी
ही गोष्ट खूप कमी लोकांना माहिती आहे की हिटलर सारखा हुकूमशहा हा संपूर्ण शाकाहारी होता. हिटलरच्या आयुष्यातील शेवटचे दिवस हे फक्त सूप आणि बटाटा खाऊन गेले.
किम जाँग-इल यांना शार्क माशाचं आणि कुत्र्याच्या मांसापासून बनलेलं सूप खूप आवडायचं.
डेमिक बार्बरा यांनी 'डेली बिस्ट'च्या 14 जुलै 2017 रोजी प्रकाशित झालेल्या अंकात ‘द वे टू अंडरस्टँड किम जोंग इल वाज थ्रू हिज स्टमक’ हा लेख लिहिला आहे, त्यात त्या असं लिहितात की, "किम यांच्याकडे महिलांची एक टीम होती. या टीममध्ये काम करणाऱ्या महिला हे सुनिश्चित करायच्या की किम यांच्या जेवणातील भाताचं प्रत्येक शित हे एकसारखं असलं पाहिजे, त्याचा रंग आणि स्वरूप एकच असला पाहिजे याची त्या काळजी घ्यायच्या. कॉग्नेक नावाची ब्रँडी त्यांना आवडायची. किम हे हेनेसी कॉग्नेकचे सगळ्यात मोठे खरेदीदार होते."
कंबोडियाचे माजी पंतप्रधान पोल पोट यांना कोब्रा सापाचं हृदय खायला आवडायचं.

फोटो स्रोत, Getty Images
राजीव डोगरा यांना पोल पोट यांच्यासाठी काम केलेल्या एका स्वयंपाक्याने सांगितलं की, "मी पोल पोट यांच्यासाठी कोब्रा शिजवला होता. आधी मी कोब्रा मारला आणि त्यानंतर त्याचं शीर कापून काढलं. शीर कापल्यानंतर मी तो साप झाडाला टांगला, जेणेकरून त्याच्या शरीरातलं विष निघून जाईल. त्यानंतर मी त्या सापाचं रक्त एका कपात काढलं आणि व्हाईट वाईन सोबत पोल पोट यांना सर्व्ह केलं. त्यानंतर मी 'कोब्रा खिमा' बनवला, तो खिमा मी गवती चहा आणि अद्रक घालून सुमारे एक तास पाण्यात उकळवला आणि पोल पोट यांना वाढला."
कच्चा लसूण आणि ऑलिव्ह ऑइल घालून बनवलेले सॅलड हे मुसोलिनी यांचे आवडते खाद्य होते. त्यांच्या हृदयासाठी ते उत्तम असल्याचा विश्वास त्यांना होता. डोगरा लिहितात की, "यामुळेच मुसलोनीच्या तोंडाला नेहमी लसणाचा वास यायचा, यामुळेच जेवणानंतर त्यांची पत्नी दुसऱ्या खोलीत निघून जायची."
हिटलरचे जेवण चाखण्यासाठी नियुक्त केला जायचा 'फूड टेस्टर'
युगांडाचे राष्ट्राध्यक्ष ईदी अमीन यांच्या हयातीत ते त्यांच्या विरोधकांना मारून त्यांचे मांस खात असल्याच्या अफवा पसरल्या होत्या.
अनीता श्योरविक्ज यांनी त्यांच्या ‘डिक्टेटर्स विद स्ट्रेंज ईटिंग हैबिट्स’ मध्ये लिहिलं आहे की, "एकदा ईदी अमीन यांना विचारण्यात आलं की त्यांना माणसाचं मांस खायला आवडतं का? त्यावर ते म्हणाले होते की माणसाचं मांस खूपच खारट असतं आणि म्हणून त्यांना ते खायला आवडत नाही."
ईदी अमीन हे एका दिवसात सुमारे 40 संत्री खात असत, कारण त्यांचा असा विश्वास होता की संत्रं एखाद्या कामोत्तेजकासारखं काम करतं.

फोटो स्रोत, Getty Images
हिटलरच्या पानात वाढलेलं जेवण आधी एका फूड टेस्टरला चाखवलं जायचं. मार्गोट वोल्फ या हिटलरच्या फूड टेस्टर होत्या. त्यांनी 'द डेन्व्हर पोस्ट'च्या 27 एप्रिल 2013 च्या अंकात लिहिलंय की, "हिटलरला अत्यंत स्वादिष्ट जेवण दिलं जायचं. जेवणात उत्कृष्ट भाज्या वापरल्या जायच्या."
"पास्ता किंवा भातासोबत या भाज्या हिटलरला वाढल्या जायच्या. फूड टेस्टर म्हणून काम करताना आमच्या मनात नेहमी त्या जेवणात विष कालवल्याची भीती असायची म्हणून त्या स्वादिष्ट जेवणाचा आस्वाद कधीच घेता आला नाही. रोज जेवताना असं वाटायचं की आता ही आमच्या आयुष्यातलं शेवटचं जेवण ठरू शकतं."
माओ त्से तुंग यांनी कधीही दात घासले नाहीत
जगभरातील हुकूमशहा त्यांच्या विचित्र कृती आणि सवयींसाठी प्रसिद्ध आहेत. चीनचे माओ त्से तुंग यांनी आयुष्यभर दातच घासले नाहीत.
माओ यांचे डॉक्टर झीसुई ली त्यांच्या 'प्रायव्हेट लाइफ ऑफ चेअरमन माओ' या पुस्तकात लिहितात, "माओ दात घासण्याऐवजी ग्रीन टीने गार्गल करायचे. आयुष्याच्या अखेरीस त्यांचे सर्व दात हिरवे झाले होते आणि त्यांच्या हिरड्यांमध्ये पू भरले होते."
एकदा त्याच्या डॉक्टरांनी त्याला दात घासण्याचा सल्ला दिला तेव्हा त्याची प्रतिक्रिया होती, "सिंह कधीही दात घासत नाही. तरीही त्याचे दात इतके तीक्ष्ण का आहेत?"
जनरल ने विन यांनी 1988 पर्यंत म्हणजे सुमारे 26 वर्षं ब्रह्मदेशावर (म्यानमारवर) राज्य केलं. त्यांना जुगार, गोल्फ आणि महिलांचा शौक होता. त्यांना खूप लवकर राग यायचा.

फोटो स्रोत, Getty Images
राजीव डोगरा लिहितात की, "एकदा एका ज्योतिषाने त्यांना सांगितले होते की 9 हा अंक त्यांच्यासाठी खूप शुभ आहे. त्याचा परिणाम असा झाला की त्यांनी आपल्या देशात चलनात असलेल्या सर्व शंभराच्या नोटा रद्द करून नव्वदच्या नोटा चलनात आणल्या होत्या."
"याचा परिणाम असा झाला की बर्माची अर्थव्यवस्था कोलमडली आणि लोकांनी त्यांची आयुष्यभराची कमाई गमावली."
अल्बेनियाच्या हुकूमशहांचा 'बॉडी डबल'
अल्बेनियाचे एनव्हर होक्सा हे 1944 ते 1985 पर्यंत सत्तेत राहिले. त्यांना सतत त्यांच्या देशावर हल्ला होण्याची भीती वाटायची. आणि म्हणून त्यांनी संपूर्ण देशभरात 75 हजार बंकर बांधले.
बँकेच्या नोटांवर त्यांचा चेहरा छापण्यास त्यांनी नकार दिला. त्यांना भीती होती की त्याच्या मदतीने त्यांच्यावर जादू केली जाईल.

फोटो स्रोत, Getty Images
ब्लेन्डी फेव्हझिऊ यांनी त्यांच्या ‘एनव्हर होक्सा, द आयरन फिस्ट ऑफ अल्बानिया’ या पुस्तकात लिहिलंय की, "त्यांना त्यांचा खून होण्याची एवढी भीती होती की त्यासाठी त्यांनी स्वतःचा बॉडी डबल शोधला होता. त्यांच्यासारख्या दिसणाऱ्या एका व्यक्तीला एका गावातून उचलण्यात आलं आणि त्याच्यावर अनेक प्लास्टिक सर्जरीज (शस्त्रक्रिया) करून त्याला होक्सा यांचा बॉडी डबल बनवण्यात आलं."
"त्या व्यक्तीला एनव्हर होक्सा यांच्यासारखं हुबेहूब चालायला आणि बोलायला शिकवलं गेलं. त्याने अनेक कारखान्यांचं उदघाटन केलं आणि अनेक ठिकाणी भाषणंही दिली."
तुर्कमेनिस्तान आणि हैतीच्या हुकूमशहांचा लहरीपणा
तुर्कमेनिस्तानचे हुकूमशहा सपरमुरत नियाझोव्ह यांनी त्यांच्या गरीब देशाच्या राजधानीत स्वतःचा सोन्याचा मुलामा दिलेला पन्नास फुटी पुतळा उभारला. त्यांनी ‘रूहनामा’ नावाचं एक पुस्तकही लिहिलं आहे.
त्यांनी असा आदेश काढला होता की त्यांच्या देशात ज्या व्यक्तीने त्यांचं संपूर्ण पुस्तक पाठ केलं असेल केवळ त्यालाच वाहनचालकाचा परवाना दिला जाईल. त्यांनी सार्वजनिक कार्यक्रम आणि दूरचित्रवाणीवरील संगीतावर बंदी घातली होती.
हैतीचे हुकूमशहा फ्रँकोइस डुवालियर इतके अंधश्रद्धाळू होते की त्यांनी त्यांच्या देशातील सगळ्या काळ्या रंगाच्या कुत्र्यांना मारण्याचे आदेश दिले होते.

फोटो स्रोत, Getty Images
ईदी अमीन आणि एनव्हर होक्सा यांची क्रूरता
राजीव डोगरा लिहितात, "70 च्या दशकात युगांडाचे क्रूर हुकूमशहा ईदी अमीन यांनी दावा केला होता की त्यांनी त्यांच्या राजकीय विरोधकांचे मुंडके कापून फ्रीजरमध्ये ठेवले आहेत."
"ईदी अमीन यांच्या आठ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी 80 हजार लोकांची हत्या केली. मारल्या गेलेल्यांमध्ये बँकर, विचारवंत, पत्रकार, कॅबिनेट मंत्री आणि एका माजी पंतप्रधानांचा समावेश आहे."

फोटो स्रोत, Getty Images
त्याचप्रमाणे अल्बेनियाचे हुकूमशहा एनव्हर होक्सा यांनीही त्यांच्या विरोधकांना सोडलं नाही.
ब्लेन्डी फेव्हझिऊ लिहितात की, "त्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात विचारवंत आणि बुद्धिजीवींच्या हत्या घडवून आणल्या की शेवटी त्यांच्या पॉलिट ब्युरोमध्ये असा एकही सदस्य उरला नव्हता ज्याने उच्च माध्यमिक पातळीपेक्षा जास्त शिक्षण घेतलं असेल."
त्यावेळी अल्बेनियामध्ये राहणाऱ्या लोकांच्या आयुष्यावर सरकारी नियंत्रण एवढं कठोर होतं की लोक त्यांच्या मुलांची नावं देखील त्यांच्या इच्छेप्रमाणे ठेवू शकत नसत.
सद्दाम हुसैन यांचा 'फायरिंग स्क्वाड'
इराकचे तत्कालीन अध्यक्ष सद्दाम हुसैन यांनी 1979 मध्ये सत्तेवर आल्यानंतर सात दिवसांनी म्हणजेच 22 जुलै रोजी बाथ सोशलिस्ट पार्टीच्या नेत्यांची बैठक बोलावली होती.
त्यांच्या सूचनेवरून या बैठकीचे व्हिडिओ चित्रीकरण करण्यात आले. त्या बैठकीत सद्दाम हुसैन यांनी जाहीर केलं की तिथे उपस्थित असणारे सुमारे 66 नेते हे देशद्रोही आहेत.

कॉन कॉफलिन यांनी त्यांच्या 'सद्दाम द सिक्रेट लाइफ' या पुस्तकात लिहिलं आहे की, "ज्या क्षणी सद्दाम एखाद्या नेत्याचे नाव घ्यायचे त्याच क्षणी सुरक्षारक्षक त्या नेत्याला उचलून बाहेर घेऊन जायचे. शेवटी त्या बैठकीत उरलेल्या लोकांची भीतीने गाळण उडाली होती."
"त्या सगळ्यांनी उभे राहून आम्ही सद्दाम हुसैन यांच्याप्रती एकनिष्ठ असल्याची प्रतिज्ञा केली. 22 लोकांना सद्दाम हुसैन यांच्या फायरिंग स्क्वाड (गोळीबार पथक) समोर उभे करून गोळ्या घालण्यात आल्या. त्या क्षणानंतर संपूर्ण इराक सद्दाम हुसैन यांचा होता. संपूर्ण देशभर दहशत पसरवण्यात सद्दाम यशस्वी ठरले होते."
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











