विकिपीडिया कसं काम करतं? किती विश्वासार्ह आहे? एएनआयने का केला मानहानीचा दावा?

गेल्या काही दिवसांपासून विकिपीडिया दिल्ली हाय कोर्टाच्या एका खटल्यामुळे चर्चेत आहे.

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, उमंग पोद्दार
    • Role, बीबीसी संवाददाता

तुम्ही हा लेख वाचत असाल तर विकिपीडियाबद्दल तुम्हाला माहीत असणं फार स्वाभाविक आहे. साध्या गोष्टींपासून ते गंभीर विषयांची माहिती घेण्यासाठी अनेक लोक सगळ्यात पहिल्यांदा विकिपीडियावरच जातात.

पण गेल्या काही दिवसांपासून विकिपीडिया दिल्ली हायकोर्टातल्या एका खटल्यामुळे चर्चेत आलं आहे. एशियन न्यूज इंटरनॅशनल म्हणजेच एएनआय या वृत्त संस्थेने विकिपीडियाविरोधात मानहानीचा खटला भरला आहे.

एएनआयच्या विकिपीडिया पेजवर ही संस्था चुकीच्या गोष्टी रिपोर्ट करते, असं लिहिलं होतं. पण एएनआयने हे चूक असल्याचं म्हटलंय.

या सगळ्यात एक प्रश्न सातत्याने पुढे येतोय. तो म्हणजे विकिपीडिया नेमकं कसं काम करतं? त्यावरचे लेख कोणी लिहिलेले असतात? हे सगळं चालवतं कोण?

विकिपीडिया काय आहे?

2001 पासून विकिपीडिया संपूर्ण देशामध्ये एक मोफत खुला स्रोत, म्हणजे फ्री ओपन सोर्स म्हणून ओळखला जातो. त्याला आपण ऑनलाईन विश्वकोशही म्हणू शकतो.

ना नफा-ना तोटा तत्त्वावर चालणाऱ्या विकिमीडिया फाऊंडेशनकडून हे सगळं चालवलं जातं. एएनआयनेही विकिमीडिया फाऊंडेशनविरोधातच खटला भरलाय.

२००१ पासून विकिपीडिया संपूर्ण देशामध्ये एक मोफत खुला स्रोत म्हणजे फ्री ओपन सोर्स म्हणून ओळखला जातो.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, 2001पासून विकिपीडिया संपूर्ण देशामध्ये एक मोफत खुला स्रोत म्हणजे फ्री ओपन सोर्स म्हणून ओळखला जातो.

ही जगातल्या सगळ्यात प्रसिद्ध वेबसाइट्सपैकी एक आहे. सद्य स्थितीत यावर 6 कोटींपेक्षा जास्त लेख आहेत आणि जवळपास 10 लाख कोटीहून जास्त पेज व्ह्यूज असतात.

कोणालाही विकिपीडियावर लिहिता येतं का?

हो. कोणतीही नवी माहिती टाकायची किंवा जुन्याच माहितीमध्ये काही बदल करायची किंवा त्यात भर टाकायची परवानगी सगळ्यांना असते. त्यामुळे कुणा एकाच्या किंवा काही लोकांच्या हातात नियंत्रण नाही असा हा प्लॅटफॉर्म आहे.

विकिपीडियावर लेख लिहण्यासाठी आणि उपलब्ध असलेला मजकूर किती खरा आहे हे तपासण्यासाठी सध्या जवळपास तीन लाख लोक स्वयंसेवक म्हणून काम करतात.

हे कोणालाही करता येतं आणि वेबसाइटवर असलेल्या कामाप्रमाणे त्यांना वेगवेगळ्या भूमिका दिल्या जातात.

हे लोक स्वतःच्या मर्जीने काम करतात आणि यासाठी त्यांना कोणतंही मानधन दिलं जात नाही, असं विकिमीडिया फाऊंडेशनचं म्हणणं आहे.

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

हे स्वयंसेवक त्यांची ओळख लपवून ठेवू शकतात. कोणत्या पेजवर काय लिहिलं जातंय यावरही त्यांचं कोणतंही नियंत्रण नसतं असं विकिमीडिया फाऊंडेशनचं म्हणणं आहे. पण याचा अर्थ कुणी काहीही लिहावं असा याचा अर्थ नाही, असंही त्यांनी म्हटलंय.

वेबसाईटवर काय छापलं जाऊ शकतं याबद्दलच्या त्याबद्दल त्यांची धोरणं आणि मार्गदर्शक तत्त्व ठरलेली आहेत.

जसं की, आजपर्यंत छापली गेली नाही अशी कोणतीही नवीन माहिती विकिपीडियावर छापता येत नाही. फक्त विश्वासार्ह छापील स्रोत दाखवता येईल असाच मजकूर इथं लिहिला जाऊ शकतो.

छापल्या गेलेल्या मजकूरावर लक्ष ठेवण्याचं आणि गोष्टी तपासण्याचं काम संपादक, व्यवस्थापक आणि कम्प्युटर बॉटकडून केलं जातं. एखाद्या लेखातला एखाद्या भागाचं संपादन करून तो काढून टाकण्याचं कामही वरिष्ठ संपादकांना करता येतं.

एखाद्या लेखाबद्दल किंवा संपादनाबद्दल वाद झाला तर स्वयंसेवक त्यांचं म्हणणं मांडतात, त्यावर चर्चा करतात आणि आपसात ठरवून नंतर प्रकाशन केलं जातं.

हे वाद-विवादही विकिपीडियाच्या पेजवर सगळ्यांना पाहण्यासाठी उपलब्ध असतात. एखाद्या लेखावर कुणी आक्षेप घेतला तर त्यावर उपाय शोधण्यासाठीही वेगवेगळ्या प्रक्रिया वापरल्या जातात.

मग या वेबसाईटवर चुकीची माहितीही असू शकते?

या पेजवरून माहिती घ्या, पण त्याला विश्वासार्ह मानू नका असं लिहिण्या-वाचण्यात गुंतलेले लोकही सांगतात. या पेजला माहितीचा प्राथमिक स्रोत म्हणून वापरू नका, असं विकिपीडियाने स्वतः सांगितलं आहे.

विकिपीडियावर असलेल्या लेखांमध्ये चुका असू शकतात.

प्रत्येक लेखाच्या खाली संबंधित स्रोतांची यादी दिलेली असते आणि त्याआधारावरच लेख लिहिलेला असतो. त्या यादीतून आपण दिलेल्या माहितीची शहानिशा करू शकतो.

एखाद्या लेखात खूप जास्तवेळा बदल केले जात असतील किंवा त्या बदलांबद्दल सतत वाद होत असेल तर त्यात बदल करण्यावर काही काळासाठी बंदीही घातली जाते.

या पेजला माहितीचा प्राथमिक स्रोत म्हणून वापरू नका, असं विकिपीडियाने स्वतः सांगितलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, या पेजला माहितीचा प्राथमिक स्रोत म्हणून वापरू नका, असं विकिपीडियाने स्वतः सांगितलं आहे.

विकिपीडियाच्या विश्वासार्हतेवर अनेक विशेषज्ञांनी वेगवेगळ्या पद्धतीने शंका घेतली आहेत. अमेरिकेतल्या जॉर्जिया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये एमी ब्रकमॅन या मीडियातज्ज्ञ प्राध्यापक म्हणून काम करतात. एखाद्या कमी महत्त्वाच्या विषयाबद्दलचा विकिपीडियाचा लेख कदाचित विश्वासार्ह नसेलही. पण एखाद्या प्रसिद्ध, चर्चित विषयावरचा लेख हा सगळ्यात जास्त विश्वासार्ह माहिती देणारा असतो, असं त्या म्हणतात.

एखाद्या नियतकालिकात प्रकाशित झालेला लेख काही मोजके तज्ज्ञ पाहतात आणि त्यानंतर त्यात काहीही बदल होत नाहीत. “पण एखाद्या लोकप्रिय विकिपीडिया लेखाची समीक्षा हजारो लोकांकडून केली जाते,” असंही त्या पुढे म्हणाल्या.

बीबीसी मराठीच्या बातम्यांसाठी व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा.
बीबीसी मराठीच्या बातम्यांसाठी व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा.

विकिपीडियावर पक्षपाती असण्याचेही आरोप झालेले आहेत. विकिपीडियावर होणारी एक महत्त्वाची टीका अशी की यावर लेख लिहिणारे बहुतांश पुरूष असतात. त्यामुळेच वेबसाईटवर पुरूषांबद्दलचे लेख जास्त आहेत.

अमेरिकेतल्या डाव्या विचारसरणीच्या सेलिब्रेटींना विकिपीडियावर जास्त नकारात्मक पद्धतीने दाखवण्याची प्रवृत्ती दिसते असं, मॅनहॅटन इन्स्टिट्यूट या एका कंझर्वेटिव्ह थिंक टॅंकच्या संशोधनात समोर आलंय. विकिपीडिया हे महत्त्वाचं सार्वजनिक संसाधन आहे असं ते मानतात.

हे चालवण्यासाठी पैसे कुठून येतात?

तुम्ही विकिपीडियावर काही वाचत असाल तर वेबसाईटच्या सुरूवातीलाच देणगी देण्याची विनंती केलेली दिसते.

विकिपीडियाचा खर्च या देणग्यांवरच चालतो.

2022-23 ला विकिमीडिया फाऊंडेशनला 18 कोटी डॉलरपेक्षाही जास्त देणगी मिळाली होती. म्हणजे भारतातले जवळपास 1513 कोटी रूपये.

विकिपीडिया जाहिरात छापत नाही. वापरणाऱ्यांचा डेटा विकून ते पैसे कमावत नाहीत, असंही त्यांनी सांगितलंय. अशा पद्धतीने खरंतर अनेक वेबसाईट्स पैसे कमावत असतात.

विकिपीडियाचा खर्च देणगीवर चालतो.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, विकिपीडियाचा खर्च देणगीवर चालतो.

तसं पहायला गेलं, तर विकिपीडिया अनेक देशांत वादात अडकला आहे. कमीत कमी 13 देशांमध्ये विकिपीडियावर वेगवेगळ्या पद्धतीचे प्रतिबंध लावले गेलेत.

चीन, म्यानमार आणि उत्तर कोरियाने विकिपीडियावर पूर्णपणे बंदी घातली आहे. तसंच रशिया आणि इराणनेही विकिपीडियाच्या काही लेखांवर बंदी घातलीय.

पाकिस्तानातही 2023 मध्ये विकिपीडिया तीन दिवसांसाठी बंद करण्यात आलं होतं. विकिपीडियावरच्या काही लेखांमुळे देशातल्या मुस्लिमांना ठेच लागली आहे, असं म्हटलं गेलं होतं.

एएनआयच्या खटल्यातही दिल्ली हाय कोर्टातल्या एका न्यायाधीशाने विकिपीडियाला भारतातले कायदे पाळावे लागतील नाहीतर बंदी घालण्याचे आदेश दिले जातील, असं सांगितलं होतं.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.