ऑनलाईन शॉपिंग करताना वस्तूंचे खोटे रिव्ह्यू ओळखण्याच्या 3 टिप्स

फोटो स्रोत, Getty Images
ऑनलाईन शॉपिंग करणं खूप सोयीचं आणि अनेकदा किफायतशीर असतं हे बहुधा सगळ्यांनाच पटेल. प्रातर्विधी उरकताना असो, ऑफिसमध्ये पोहोचताना असो किंवा रात्री झोपण्यापूर्वी पडल्या पडल्या, तुम्ही हवं ते चुटकीसरशी खरेदी करू शकता.
ऑनलाईन शॉपिंगच्या जगात रिव्ह्यूंना विशेष महत्त्व असतं. एक स्टार असलेलं इलेक्ट्रॉनिक गॅजेट तुम्ही घ्याल का? किंवा एक स्टार मिळालेल्या सलूनमध्ये जाल का?
गुगलवरचे फेक रिव्ह्यू ही एक मोठीच समस्या आहे.
पैसे देऊन मनासारखे ऑनलाईन रिव्ह्यू मिळवता येतात, असं बीबीसीला आपल्या तपासात आढळलं.
युकेपुरतं बोलायचं तर आपल्या दवाखान्यांना चांगली रेटिंग्ज मिळावी आणि इंटरनेटवर त्यांची चर्चा रहावी म्हणून ते दवाखाने चालवणाऱ्यांनी पैसे दिल्याचंही समोर आलंय.
फक्त चांगले रिव्ह्यू इतकीच समस्या नाही, प्रतिस्पर्ध्याचं नुकसान व्हावं म्हणून त्यांचे नकारात्मक रिव्ह्यूही लिहून घेतले जातात.
रिव्ह्यूंकडे दुर्लक्ष करणं तर शक्य नाही. मग खरे रिव्ह्यू आणि खोटे रिव्ह्यू यांच्यात फरक कसा करायचा? या सोप्या टिप्स तुम्हाला मदत करतील
1. प्रमाणाबाहेर कौतुक
सर्वसाधारणपणे जे बनावट सकारात्मक रिव्ह्यू असतात त्यांच्यातले बहुतांश हे पाच स्टार देणारे असतात आणि बनावट नकारात्मक रिव्ह्यू एक स्टार देतात.
जे लोक खरंखुरं मूल्यमापन करू इच्छितात ते या दोन्ही टोकांना जाताना दिसत नाहीत.
एखादी कमेंट खूपच कौतुक करत असेल पण त्याबद्दल ठोस कुठले मुद्दे मांडत नसेल तर त्यापासून सावध राहा, असं बीबीसीच्या बिझनेस प्रतिनिधी एमा व्हार्दी म्हणतात.
उदाहरण म्हणून हा रिव्ह्यू पाहा : “हे प्रॉडक्ट उत्तम आहे, मला ही कंपनी फार आवडते”, आता यात त्या उत्पादनाबद्दल काय आवडलं किंवा त्या कंपनीची कुठली गोष्ट त्यांना रुचली याबद्दल काहीच स्पष्टपणे सांगितलेलं नाही.

फोटो स्रोत, Getty Images
हा रिव्ह्यू खऱ्याखुऱ्या ग्राहकाने लिहीला असण्याची शक्यता खूप कमी आहे.
खऱ्या रिव्ह्यूंमध्ये फक्त स्तुती नसते, त्यात चांगल्या आणि वाईट गोष्टींचं समतोल विवरण असतं.
कपड्यांच्या बाबतीत बोलायचं तर ते कापडाबद्दल कौतुक करू शकतात किंवा जाहिरातीत दाखवलंय तसाच तो कपडा प्रत्यक्षात आहे असंही म्हणू शकतात. समजा डिलीव्हरी वेळेत आली नसेल तर त्याबद्दल टीका केलेली असू शकते.
2. ओढूनताणून लिहिलंय का?
कमेंट्समध्ये व्याकरण किंवा लिहिण्यात खूप चुका आहेत का हे तपासा.
बीबीसीच्या बिझनेस प्रतिनिधी एमा व्हार्दी म्हणतात, की प्रसंगी कुठूनतरी मजकूर कॉपी पेस्ट करून ऑनलाईन ट्रान्सलेटर वापरून लिहिलेला असण्याची शक्यता असू शकते.

फोटो स्रोत, Getty Images
तुम्ही स्वतः एखादी गोष्ट लिहिताना कशी लिहिता? लिहिण्यात एक नैसर्गिक बाज असतो. तुम्हाला दिसणाऱ्या रिव्ह्यूमध्ये तसा सहजपणा आहे का हे तपासा. जर तो ओढून ताणून लिहिल्यासारखा वाटत असेल तर तो खोटा असण्याची शक्यता असू शकते.
जर त्या युझरने ब्रँडचं नाव सर्वसाधारण व्यक्ती जितक्यांदा वापरेल त्यापेक्षा खूप जास्त वेळा वापरलं असेल, त्यात एखाद्या मार्केटिंग कँपेनचा जर भास होत असेल तर तो रिव्ह्यू फेक असण्याची पुरेपूर शक्यता असते.
3. जगभरातले रिव्ह्यू
जो रिव्ह्यू तुम्ही वाचताय त्या व्यक्तीने इतर कंपन्यांबद्दल इतरही स्थानिक ब्रँड्सबद्दल काही रिव्ह्यू लिहीले आहेत का हे तपासा किंवा आंतरराष्ट्रीय कंपन्यांची उत्पादनं किंवा सेवांबद्दल त्यांनी कुठे रिव्ह्यू लिहिलेले दिसत आहेत का हे देखिल तपासा.
आंतरराष्ट्रीय कंपन्यांवरच जर कमेंट्स असतील तर तो रिव्ह्यू फेक असू शकतो असं व्हार्दी यांचं मत आहे.
ज्या व्यक्तीने लिहिलेल्या रिव्ह्यूबद्दल तुम्ही विचार करताय त्यांनी इतर किती रिव्ह्यू लिहिले आहेत आणि इतर कोणती उत्पादनं विकत घेतली आहेत हे सुद्धा तपासा.
गुगलचं म्हणणं आहे की ते फेक रिव्ह्यू काढून टाकतात आणि बनावट अकाउंट्सही बंद करतात.
तसं असलं तरी काही रिव्ह्यू या सगळ्या फिल्टर्सची नजर चुकवून निसटतात आणि सोशल मीडियावर किंवा इंटरनेटवर आपल्यापर्यंत पोहोचतातच.
हेही नक्की वाचा
हा व्हीडिओ पाहिलात का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)









