इंटरनेट सर्फिंग करून पैसे कमवायचेत? मग ही बातमी वाचा...

फोटो स्रोत, Getty Images
- Author, कॅथरीन काइट
- Role, बिजनेस रिपोर्टर, बीबीसी न्यूज.
इंटरनेटवर आपण जे काही पाहतो, वाचतो, ऐकतो, तो प्रत्येक डेटा कोणासाठी तरी महत्वाचं संसाधन ठरत असतो. गुगल आणि फेसबुकसारख्या कंपन्या या डेटाचा वापर करून दरवर्षी कोट्यवधी रुपयांची कमाई करत असतात. या कंपन्यांना हा महसूल मिळतो तो जाहिरातीमुळे. या डेटाचा वापर करून या कंपन्या टार्गेट जाहिराती दाखवतात.
आता आपण उदाहरणच बघू. समजा जर तुम्हाला एखादी नवी जीन्स खरेदी करायची आहे. त्यासाठी तुम्ही फॅशन स्टोअर्सच्या ई-शॉपवर या डिझाइन्स ऑनलाइन बघता. पुढे होतं असं की, जेव्हा पुन्हा तुम्ही तुमचा फोन किंवा कॉम्प्युटर सुरू करता तेव्हा स्क्रीनच्या कोपऱ्यात तुम्हाला डेनिम ट्राउझर्सच्या जाहिराती दिसायला लागतील.
तुम्हाला अगदी काहीही खरेदी करायचं असो, तुम्ही एकदा का, गुगलवर ते सर्च केलं की तुम्हाला त्याची जाहिरात तुमच्या स्क्रीनवर सतत दिसत राहते. गुगल आणि फेसबुक सारख्या कंपन्या इंटरनेटच्या माध्यमातून आपल्यावर ज्या प्रकारे लक्ष ठेवतायत, त्यावरून कधी कधी अस्वस्थ करणारी भावना निर्माण होते.
अलीकडेच यावर एक अभ्यास करण्यात आला होता. या अभ्यासात असं दिसून आलं की, युरोपियन लोक इंटरनेटवर जे काही सर्च करतात त्यासंबंधीचा डेटा दिवसातून 376 वेळा शेअर केला जातो. अमेरिकन लोकांच्या बाबतीत, हा डेटा जवळजवळ दुप्पट प्रमाणात शेअर केला जातो. अमेरिकन लोकांच्या इंटरनेट सर्चची माहिती 747 वेळा शेअर केली जाते.
पण जरा दम धरा. जर यापेक्षा काहीतरी वेगळं चित्र तुमच्यासमोर आलं तर? म्हणजेच हा जो शेअर होणारा डेटा आहे त्यावर तुम्हाला नियंत्रण ठेवता आलं तर? आणि त्यातून तुम्हाला पैसे मिळायला लागले तर?
कमाईचा वायदा
कॅनडातील एका टेक कंपनी 'सर्फ'ने असंच काहीस आश्वासन दिलंय. 'सर्फ'ने गेल्या वर्षी या नावानेच ब्राउझर एक्सटेंशन लाँच केलाय. इंटरनेट सर्फिंग करणाऱ्या लोकांना हे ब्राऊजर पैसे कमवण्याची संधी मिळवून देतं.
'सर्फ' हे सध्या यूएस आणि कॅनडापुरतं मर्यादित आहे. थोडक्यात हे ब्राऊजर गुगलचा पत्ता कट करून तुमचा डेटा थेट रिटेल कंपन्यांना विकतं. त्या बदल्यात, सर्फ तुम्हाला काही पॉइंटस ऑफर करतं. हे पॉईंट्स तुम्ही गिफ्ट कार्ड्स किंवा डिस्काउंटच्या बदल्यात खर्च करू शकता.

फोटो स्रोत, Surf
यासाठी 'सर्फ'ने आतापर्यंत फूट लॉकर, द बॉडी शॉप, क्रॉक्स आणि डायसन या कंपन्यांशी करार केला आहे. 'सर्फ'चं म्हणणं आहे की, युजर्सचा डेटा गोपनीय ठेवला जातो. त्याचा ई-मेल अॅड्रेस किंवा त्याचा टेलिफोन नंबर शेअर केला जात नाही. किंवा साइन-अप करण्यासाठी त्याच्या नावाची गरज नसते.
जरी 'सर्फ' आपल्या युजर्सचं वय, जेंडर आणि पत्ता अशी माहिती विचारत असलं तरी युजरने ही माहिती द्यावीच अशी काही अट नसते. कंपनीला विश्वास आहे की, त्यांचा युजर डेटा ब्रँड वापरण्यास सक्षम आहे. उदाहरणार्थ, 18 ते 24 वर्ष वयोगटातील लोक कोणत्या वेबसाईटला जास्त भेट देतात? या माहितीच्या आधारे कंपन्या आपल्या जाहिराती या ग्राहकांपर्यंत पोहोचवू शकतील.
तसं तर, एक्सटेंशन इंस्टॉल करणारा युझर सर्फिंग करून किती पैसे कमवू शकतो हे काही 'सर्फ'ने अजून सांगितलेलं नाही. पण हे ब्राऊजर वापरून 1.2 मिलियन डॉलरपर्यंत पैसे कमावण्याची संधी युझरला मिळू शकते, असा दावा कंपनीने केला आहे.

फोटो स्रोत, Getty Images
'सर्फ'च्या युझर्ससाठी अजून एक सोय आहे. ती म्हणजे ते कोणत्या प्रकारचा डेटा शेअर करायचा आहे, यावर आपलं कंट्रोल ठेवू शकतात. उदाहरणार्थ, काही वेबसाईटला युझर्स व्हिजिट करतात पण त्यांना ही व्हिजिट गोपनीय ठेवायची इच्छा असेल तर ते तसं ही करू शकतात.
कॅनडातील टोरंटोमध्ये यॉर्क युनिव्हर्सिटीत शिकत असलेली अमिना अल-नूर 'सर्फ'ची युझर आहे. अमिनाला वाटतं की तिच्या ऑनलाइन डेटावर तिचं नियंत्रण आहे.
21 वर्षीय अमिना सांगते, "तुम्हाला सर्फसोबत काय शेअर करायचं आहे ते तुमचं तुम्ही ठरवू शकता. काहीवेळा मी माझे पॉइंट चेक करायला विसरते. पण जेव्हा मी आठवडाभरानंतर पाहते तेव्हा मला माझे पॉइंट वाढलेले दिसतात. सर्व टेक कंपन्या आमची माहिती गोळा करतात, पण टेक्नॉलॉजीचा वापर कसा सुधारता येईल हे महत्त्वाचं आहे."
युझर्सना मिळणार बक्षीसं
सर्फचे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी स्विश गोस्वामी सांगतात की, त्यांच्या कंपनीला इंटरनेट ब्राउझ करणार्या युझर्सना बक्षिसं द्यायची इच्छा आहे.
ते म्हणतात, "आमचं पहिल्या दिवसापासूनच ठरलं होतं की युझर्सच्या डेटावर त्यांचं त्यांचं नियंत्रण राहील. ते स्वत: ठरवतील त्यांना काय शेअर करायचं आहे आणि काय नाही."

फोटो स्रोत, AMINAH AL-NOOR
"मला वाटतं, तुमचं जर ठरलं असेल आणि तुम्ही लोकांना असा विश्वास दिला की, तुम्ही तुमचा डेटा ब्रँडना निनावीपणे शेअर करू शकता, तुम्हाला ब्रँड फसवणार नाहीत कारण त्यांच्याकडे तुमचे नाव, आडनाव काहीच नाही, तर लोक विश्वास ठेवून शक्य तितक्या गोष्टी आमच्याशी शेअर करतील."
सर्फ हा वाढत्या अभियानाचा एक भाग आहे. अनेक विश्लेषक या मोहिमेला 'जबाबदार तंत्रज्ञान' म्हणत आहेत. लोकांचं त्यांच्या डेटावर नियंत्रण राहावं हाच या टेक्नॉलॉजीचा उद्देश आहे.
या क्षेत्रात आणखीन ही कंपन्या आहेत. या क्षेत्रातील अशीच आणखी एक टेक कंपनी आहे. कॅनेडियन स्टार्ट-अप कंपनी वेवरली. ही कंपनी लोकांना त्यांचे न्यूज फीड सबमिट करू देते. या टेक्नॉलॉजीमुळे लोक Google News आणि Apple News सारख्या फिड्स राहत नाहीत.
वेवरलीवर, तुमच्या आवडीचे टॉपिक्स टाकले की वेवरलीच आर्टिफिशियल इंटेलिजन्स सॉफ्टवेअर तुम्हाला वाचायला आवडेल असे लेख शोधते.
त्याचे संस्थापक मॉन्ट्रियलमध्ये राहणारे फिलिप ब्यूदो आहेत. ते पूर्वी गुगलमध्ये इंजीनियर म्हणून काम करायचे.

फोटो स्रोत, PHILIPPE BEAUDOIN
या अॅपचे युजर्स रोजच्या रोज त्यांचा प्राधान्यक्रम बदलू शकतात. आणि त्यांना पाठवल्या जाणार्या लेखांवर फीडबॅक देऊ शकतात.
फिलिप ब्यूदो म्हणतात की, युझर्सना ही थोडे प्रयत्न करावे लागतील. त्यांना काय आवडतं ते अॅपला सांगाव लागेल आणि त्या बदल्यात त्यांना "जाहिरातींपासून सुटका मिळेल."
ते म्हणतात, "जबाबदार तंत्रज्ञानामुळे युझर्समध्ये अधिकाराची भावना तयार होते. पण त्याच वेळी बदल्यात काहीतरी मागायला ही त्यांना संकोच करू नये."
रॉब शेवेल यांची अमेरिकन कंपनी अबाइनने दोन अॅप्स बनवले आहेत. या अँपमुळे युझर्सना त्यांची गोपनीयता वाढवता येते. त्यांची नावे आहेत - ब्लर आणि डिलीट मी.

फोटो स्रोत, CARISSA VELIZ
ब्लरमुळे तुमचा पासवर्ड आणि पेमेंट डिटेल्स ट्रॅक होत नाहीत. तर डिलीट मी सर्च इंजिनमधून तुमचा पर्सनल डेटा हटवला जातो.
शेवेल म्हणतात की त्यांच्या मते, इंटरनेट सर्फिंगमध्ये 'स्वतःची प्रायव्हसी' असायला हवी.
ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या आर्टिफिशियल इंटेलिजेंसच्या सहयोगी प्राध्यापक कॅरिसा वेल्स सांगतात की, "टेक कंपन्यांनी अशा व्यावसायिक मॉडेल्सचा शोध लावला पाहिजे की त्यात पर्सनल डेटाचा काही संबंधच राहणार नाही."
त्या पुढे म्हणतात की, "बहुतेक कंपन्या आपलं आयुष्य नियंत्रित करणारे अल्गोरिदम तयार करतात. आणि हे खरं तर चिंताजनक आहे. हे अल्गोरिदम सार्वजनिक हित आणि मूल्यांचे पालन करतील याची ना खात्री आहे ना कोणत्या गाईडलाईन्स. "
"सर्वच गोष्टींवर पारदर्शकता हा एकमेव उपाय आहे असं मला वाटत नाही. मात्र धोरणकर्त्यांना अल्गोरिदममध्ये नितीमत्ता बाळगली पाहिजे."
दुसरीकडे, गुगल त्याच्या नवीन 'प्रायव्हसी सँडबॉक्स'कडे लक्ष वेधून घेतो. या सँडबॉक्सचा उद्देश "नवीन आणि प्रायव्हेट जाहिराती समोर आणणं आहे.
गुगलचे प्रवक्ते म्हणतात, "आम्ही रेगुलेटर्स आणि वेब कम्युनिटीसोबत मिळून काम करत आहोत. जेणेकरून प्रायव्हसी सँडबॉक्सद्वारे अशी टेक्नॉलॉजी तयार करता येईल जी सर्वांसाठी विनामूल्य उपलब्ध करून देता येईल."
"या वर्षाच्या शेवटी, आम्ही माय अॅड सेंटर लाँच करू. या अॅड सेंटरच्या माध्यमातून लोकांना कोणत्या जाहिराती बघायच्या आहेत त्यावर त्यांचं स्वतःच कंट्रोल राहील."
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








