SSC, ICSE,CBSE : बोर्डाच्या 10 वर्षांपूर्वीच्या टॉपर्स आता काय करतायत?

फोटो स्रोत, RUJUTA DOSHI
- Author, दीपाली जगताप
- Role, बीबीसी मराठी
"मला दहावीला 100 टक्के मिळून आता दहा वर्षं उलटली आहेत. पण कालांतराने माझ्याही असं लक्षात आलं की आपण कायम 100 पैकी 100 मिळवू शकत नाही आणि बोर्डाचा निकाल शिक्षणाचा महत्त्वाचा टप्पा असला तरी पुढे बरीच मोठी आव्हानं असतात. माझ्या करिअरमध्ये असेच अनेक चढ-उतार आले."
2012 साली दहावी बोर्डाच्या परीक्षेत 100 टक्के गुण मिळवणाऱ्या ऋजुता दोशीने ही प्रतिक्रिया दिली.
बोर्डाचा निकाल जाहीर होणार म्हटलं की सर्वांत जास्त टक्के कोणाला मिळाले म्हणजेच टॉपर कोण आहे याची उत्सुकता सगळ्यांना असते.
पण तुम्ही कधी असा विचार केलाय का की हे टॉपर्स भविष्यात पुढे काय करतात? ते कोणत्या क्षेत्रात करिअर करतात? त्यांना कायम असंच घवघवीत यश मिळतं राहतं का? की टॉपर्स असले तरी त्यांनाही पुढे जाऊन अपयश आणि आव्हानांचा सामना करावा लागतो? अशाच काही प्रश्नांची उत्तरं आपण जाणून घेणार आहोत थेट दहा वर्षांपूर्वीच्या काही टॉपर्सकडून.
2012 साली म्हणजेच बरोबर 10 वर्षांपूर्वी राज्य शिक्षण मंडळाच्या म्हणजेच SSC बोर्डाच्या परीक्षेत रुजूता दोशी हीने 100 टक्के गुण मिळवले होते. तर याच वर्षी ICSE बोर्डाच्या परीक्षेत ठाण्याची शलाका कुलकर्णी अव्वल आली होती. तिला 98.8 टक्के होते.
100 टक्के मिळवल्यानंतर पुढे काय?
ऋजुता दोशी सध्या बंगळुरूमध्ये असते. ती फिल्म मेकींग क्षेत्रात आहे. पण इथपर्यंतचा तिचा प्रवास सोपा नव्हता. दहावीत असताना 100 टक्के गुण मिळवले तरीही आर्किटेक्ट असलेल्या ऋजुताला करिअरसाठी संघर्ष करावा लागला.

फोटो स्रोत, RUJUTA DOSHI
दादरच्या बालमोहन शाळेत ती शिकत होती. अभ्यासात हुशार तर होतीच शिवाय ती एक उत्तम बेस बॉल खेळाडू होती. ती राष्ट्रीय पातळीवरही बेस बॉल खेळली आहे. याचा तिला दहावीच्या निकालात फायदा झाला. कारण तिचे स्पोर्ट्सचे गुण ग्राह्य धरण्यात आले आणि तिचा निकाल 100 टक्क्यांपर्यंत पोहोचला.
बीबीसी मराठीशी बोलताना ऋजुता दोशी म्हणाली, "बोर्डाच्या निकालाची भीती सर्व विद्यार्थी, पालकांना असते तशी मलाही होती. पण अभ्यास चांगला झाला होता. अर्थात 100 टक्के गुण मिळतील, असं वाटलं नव्हतं. निकाल जाहीर झाल्यावर पुढचे काही दिवस कौतुक समारंभ सुरू होता. त्यानंतर पुन्हा अगदी सामान्य जीवन सुरू झालं."
"हुशार मुलं म्हटलं की ते विज्ञान शाखेत शिकणार ही भारतीय शैक्षणिक मानसिकता माझीही होती. त्यामुळे मी सुद्धा विज्ञान शाखेत रूईया महाविद्यालयात प्रवेश घेतला. मला बारावीत 94 टक्के गुण मिळाले. त्यानंतर मी आर्किटेक्ट व्हायचं ठरवलं. पण खरं सांगू का मला तेव्हा अजिबात कल्पना नव्हती की आर्किटेक्ट म्हणजे नेमकं काय? त्यांचं काय काम असतं. शिकता शिकता सर्वकाही ठीक होईल असं मला वाटलं."
ऋजुताने आर्किटेक्टचं पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. पण बहुतांश मुलांसारखी ती सुद्धा थोडी गोंधळलेली होती. हे काम आपल्याला करायला आवडेल ना? अशी शंका तिच्या मनात होती. प्रत्यक्ष काम सुरू झालं की आपला या कामात रस वाढेल असं तिने स्वत:ला समजवलं. पण तिचं मन काही त्या कामात रमलं नाही.
'आपली आवड वेळीच ओळखा'
ऋजुता सांगते, "कमला रहेजा या मुंबईतील महाविद्यालयातून मी आर्किटेक्ट केलं होतं. या महाविद्यालयात मी बऱ्याच गोष्टी शिकले. विज्ञान आणि पारंपरिक शिक्षणापलिकडे अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत हे कळालं. तिथे मला लिखाणाची, कविता करण्याची, फोटोग्राफीची आवड निर्माण झाली. त्यावेळी मी फिल्मशी संबंधित विषयांवर काही वर्कशॉप केले होते. फिल्म अँड पॉलिटिक्स हा विषय मला आवडला."

फोटो स्रोत, RUJUTA DOSHI
"काम करत असताना कालांतराने माझ्या लक्षात आलं की आर्किटेक्ट म्हणून काम करण्यापेक्षा आपण फिल्म मेकींग आणि संबंधित काम अधिक एंजॉय करत आहोत. यातच आपल्याला पुढे करिअर करायला हवे. फिल्म मेकिंगमध्येही फिक्शनपेक्षा वास्तववादी लिखाण आणि घडामोडींमध्ये मला रस वाटू लागला आणि मी आर्किटेक्चरची नोकरी सोडली."
ऋजुता सध्या बंगळुरूमध्ये डॉक्यूमेंट्री मेकींगचं काम करतेय. यासाठी तिने पुण्यातील FTII या संस्थेतून फिल्म अप्रिसिएशनचे कोर्सेस केले.
शिक्षण एका क्षेत्रातलं आणि नोकरी दुसऱ्या क्षेत्रात असं करणारी ऋजुता काही एकटीच मुलगी नाही. आपल्या आजूबाजूला अशी असंख्य मुलं आहेत. असं का होतं? याविषयी बोलताना रुजूता म्हणाली,
"मी शाळेत असताना किंवा शिक्षणासाठीचे निर्णय घेताना मला कोणीतरी सांगितलं असतं किंवा मी अशा काही विषयांची आधीच ओळख करून घेतली असती तर कदाचित मी माझ्या आवडत्या विषयातच पदवीचं शिक्षण घेऊ शकले असते. मला कुठलाही पश्चाताप नाहीय. मी शिक्षण पूर्ण केलंय आणि पुन्हा कधीही त्या क्षेत्रात परतण्याचा मार्ग माझ्याकडे मोकळा आहे. पण मला वाटतं दहावी बोर्डाच्या निकालाचा लार्जर पिक्चरचा विचार केला तर फार फरक पडत नाही."
'आपण कायम 100 पैकी 100 असू शकत नाही'
मी दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांनी तणावात राहू नये, असं ऋजूता सांगते. "आपल्याला 90 टक्केच मिळाले पाहिजेत असं काही नाहीय. कारण भविष्यात या मार्कांचा फारसा थेट फरक पडत नाही असं मला वाटतं. परीक्षा आणि निकाल महत्त्वाचा आहे पण करिअर घडवताना असे चढ-उतार येत असतात आणि तुम्ही त्याचा सामना करू शकता. बोर्डाची परीक्षा ही केवळ एक पायरी आहे. पूर्ण करिअर नाही."
ती पुढे सांगते, "मला त्यावेळी असं वाटलं की 100 टक्के मार्क मिळालेत तर विज्ञान शाखेत शिकायलाच हवे. कला शाखेत आपल्याला रस आहे की नाही हे मी पाहिलं सुद्धा नाही. पण कालांतराने हा निकाल फार मॅटर करत नाही. काळजीपूर्वक तुमचं क्षेत्र निवडा, तुमची आवड ओळखा. त्यासाठी वेळ द्या आणि त्यादृष्टीनेच मेहनत करा. आपण कायम 100 पैकी 100 असू शकत नाही. चूक होणं स्वाभाविक आहे. 100 टक्के हा प्रॅक्टिकली भ्रम आहे."
ICSE बोर्डाची टॉपर ते न्यूयॉर्कपर्यंतचा प्रवास
आता जाणून घेऊया शलाका कुलकर्णीविषयी, 2012 मध्ये Indian Certificate of Secondary Education (ICSE) दहावीच्या परीक्षेत अव्वल आलेली शलाका कुलकर्णी सध्या न्यूयॉर्कमध्ये असते.
शलाकाने दहावीची परीक्षा तर टॉप केलीच शिवाय दोन वर्षांनी म्हणजेच बारावीनंतर होणारी JEE ADVANCE ही प्रवेश परीक्षा सुद्धा शलाकाने टॉप केली होती. देशभरातून मुलींमध्ये शलाकाने पहिला क्रमांक पटकवला होता.
त्यानंतर तिने आयआयटी बॉम्बेमधून इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्समध्ये बीटेकपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. पदवी शिक्षणाची ही चारही वर्षं ती मुलींमध्ये पहिला क्रमांक पटकावत राहिली.
शलाका केवळ अभ्यासात हुशार नव्हती. तर एक्स्ट्रा करिक्यूलर अक्टिव्हिटिजमध्येही ती कायम सक्रिय असायची. IITB मध्येही तिने इतरही अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या. ती मूड इंडिगो या फेस्टिवलची मॅनेजर सुद्धा होती.
IIB तून पदवी मिळवल्यानंतर शलाकाची नामांकीत येल विद्यापीठात स्कॉलरशीपसाठी निवड झाली. या स्कॉलशिपसाठी जगभरातून केवळ 12 विद्यार्थ्यांची निवड होते. येल विद्यापीठात याला 'एमबीए सिल्व्हर स्कॉलर प्रोग्राम' असं म्हटलं जातं. ही संधी शलाकाला मिळाली. येल विद्यापीठातून तिने MBA पूर्ण केलं.
शलाका कुलकर्णी सांगते, "मला आठवतं बोर्डाच्या निकालानंतर मला अनेक जण पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करत होते. मला पेढे भरवले जात होते. मुलाखती आणि सत्काराचे कार्यक्रम झाले. आई, बहीण आणि माझ्या शाळेच्या सहकार्यामुळेच मी हे यश मिळवू शकले होते. काही दिवसांनी माझं आयुष्य पुन्हा सामान्य झालं. पुन्हा अभ्यास सुरू झाला. मी JEE परीक्षेची तयारी सुरू केली."
'बोर्डाची परीक्षा आणि निकाल म्हणजे मेहनतीचा प्रवास असतो'
एकदा टॉपर म्हणून ओळख बनल्यानंतर पुढे तेवढेच गुण मिळवण्याचा ताण असतो का? यासंदर्भात बोलताना शलाका म्हणाली, "माझ्यासाठी अभ्यास करणं कधीच कठीण नव्हतं. मला अभ्यासामुळे कधीही ताण आला नाही. गुण आणि रँक्सपेक्षा अभ्यास, शिक्षण हे नवीन शिकण्यासाठीचा प्रवास आहे असं मला वाटतं. मी माझं लक्ष्य अभ्यासावर केंद्रीत करत राहीले. माझी उद्दीष्ट पूर्ण करण्याचा दबाव मला जाणवला नाही. मी आनंदाने अभ्यास करायचे."
हुशार विद्यार्थ्यांना फार मेहनत करावी लागत नाही असंही अनेकांना वाटतं, त्याविषयी सांगताना शलाका म्हणाली,
"विद्यार्थी हुशार असला, टॉपर असला तरी त्याला मेहनत करावीच लागते. मला वाटतं टॉपर्स अभ्यासक्रम समजून घेण्यासाठी स्मार्ट वर्क करतात आणि परीक्षेत त्यानुसार त्यांचं सादरीकरणही असतं."
जाता जाता बोर्डाच्या विद्यार्थ्यांना शलाकाने एक सल्ला दिलाय. ती सांगते, "बोर्डाच्या परीक्षा या निकालापेक्षा जास्त एक प्रवास आहे. मेहनत आणि निष्ठेने अभ्यास करण्याचा प्रवास. चांगल्या विद्यार्थ्यांनी केलेली मेहनत त्यांच्या खरंच कामी येते. ही तयारी आयुष्यभराच्या यशासाठीची असते. बोर्डाच्या परीक्षा येतील आणि जातील पण दृष्टीकोन जास्त काळ राहतो."
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)









