SSC, ICSE,CBSE : 'दहावीच्या निकालाचा दिवस आठवला की आजही काटा येतो..'

फोटो स्रोत, Getty Images
- Author, रोहन नामजोशी
- Role, बीबीसी मराठी
10 जून 2002. माझ्या दहावीच्या निकालाचा दिवस. त्या काळी सकाळी दहा वाजता निकाल जाहीर व्हायचा. पत्रकार परिषद व्हायची. विभागवार मेरिट लिस्ट यायची आणि त्यातून राज्यात पहिला कोण हे ठरायचं.
मग ते गुणवंतांचं कौतुक, शाळेत सत्कार, दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये नाव फोटो, नातेवाईकांमध्ये कौतुक हे सगळं व्हायचं. 15 वर्षांच्या वयात हे सगळं कोणाला नको असतं? मलाही हवं होतंच. काहीही करून मेरिट लिस्टमध्ये नाव यायला हवं यासाठी जीवाचा आटापिटा केला होता.
तर 10 जून. सकाळपासून जीव टांगणीला लागला होता. रात्री झोप लागणं शक्यच नव्हतं. कधी एकदाचे दहा वाजताहेत असं वाटलं.
साडेनऊ वाजता मी आई बाबांना नमस्कार वगैरे करून निकाल पाहायला सायकलने निघालो. माझ्या शाळेत गेलो तर त्यांनी सांगितलं की 3 वाजता मार्कलिस्ट घ्यायला या. डोकंच फिरलं. मग तिथून एका दुसऱ्या शाळेत गेलो.
तिथे जाऊन पाहिलं तर प्रचंड गर्दी, काही लोक 70 टक्के मिळाले म्हणून खूश होते, काही पास झाले म्हणून त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही.
एका मुलीला 84 टक्के होते पण मेरिट आली नाही म्हणून तिथेच रुमाल डोळ्याला लावला. आता धाकधूक प्रचंड वाढली. इतर मुलं त्यांच्या आई वडिलांबरोबर आले होते. मी आपला एकटाच आलो होतो.
तिथल्या शाळेतल्या क्लार्क लोकांचा त्यादिवशी भाव वाढला होता. मला एकाने कागदावर रोल नंबर लिहायला सांगितला. येऊन त्याने मला फक्त मार्क सांगितले, 612. म्हणजे 750 पैकी 612 म्हणजे फक्त 81.60%.
दहावीच्या अभ्यासाबरोबर किती मार्क मिळाले म्हणजे किती टक्के याचा आराखडा मांडला होता. त्यामुळे तात्काळ टक्केवारी डोळ्यासमोर तरळली. तेवढाच अभ्यास गणिताचा केला असता तर टक्केवारी वाढली असती असं आता 19 वर्षानंतर वाटतं. पण ते असो.
निकालावर माझा विश्वासच बसेना. मी त्या क्लार्कला पुन्हा एकदा चेक करता का अशी विनवणी केली. त्याने ती धुडकावून लावली.
मी प्रचंड निराश झालो. तेव्हा मोबाईल नव्हते त्यामुळे भसाभसा मित्रांना फोन करून, किंवा घरी फोन करून निकाल कळवावा इतकं ते सोपं नव्हतं.
आता घरी काय सांगायचं हा एक मोठा प्रश्न होता. थोडावेळ एकट्याने विचार केला आणि निकाल पुन्हा एकदा कन्फर्म करण्याचा विचार केला.
आणि सायकल दामटत पुन्हा एकदा एका वृत्तपत्राच्या कार्यालयात गेलो. रस्त्यात पूर्णवेळ कुठं चुकलं असेल याचाच विचार करत बसलो. आता या मार्कावर कोणत्या कोणत्या कॉलेजमध्ये अडमिशन मिळू शकेल हाही विचार करून झाला.
शेवटी कसाबसा वृत्तपत्राच्या कार्यालयात पोहोचलो. तिथेही तोच आकडा. आता ब्रह्मदेवसुद्धा हा आकडा बदलणार नाही हे लक्षात आलं.
घरी फोन केला. आईने आधी झापलं की इतका वेळ काय करतोय? आणि कुठे आहे?
विचार करा, आपला मुलगा निकाल पहायला गेलाय आणि त्याचा काहीच संपर्क नाही, तो आपला आपलाच निकालाचा आकडा वाढवायला निघाला आहे याची त्यांना कल्पना नाही तेव्हा त्यांची काय अवस्था झाली असेल. मी रडवेला होऊन सांगितलं की 82 टक्केच आहेत. तेव्हा आईने सांगितलं की बरोबर आहे तितकेच मिळाले आहेत. घरी ये.
घरी गेल्यावर वातावरण तंग होतं. 'हां ठीक आहे, इतकेही काही कमी नाही' वगैरे सांत्वनाचे शब्द झाले. मग मित्रमैत्रिणींना किती मिळाले याची आकडेवारी सांगून झाली.
माझ्या अगदी जवळच्या मित्राला 83 टक्के होते त्यामुळे या दु:खात कोणीतरी साथीदार आहे हे बघून हायसं वाटलं.
तरी आपण मेरिटमध्ये आलो नाही याचं शल्य होतंच. नववीत मला 611 मार्क होते आणि दहावीत 612. इतकी मेहनत करून एकच मार्क वाढला हा विचार करून आणखीच वाईट वाटायला लागलं. आता मी हा सगळा विचार करत होतो हे आठवून इतकं हसायला येतं. पण ती वेळ तशीच होती.
शेवटी 3 वाजता मार्कलिस्ट हातात आली. गणितात मार खाल्ला होता. बाकी विषयात चांगले मार्क होते. आता तो आकडा अंगवळणी पडत चालला होता.

निराशेचं मळभ अजूनही होतंच, पण कसातरी परिस्थितीचा स्वीकार केला. दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये मेरिट लिस्ट आली. ती दहादा वाचून काढली. आपलं नाव नाही याचे कढ पुन्हा काढून झाले आणि पुढच्या कामाला लागलो.
आता खरं सांगायचं झालं 82 टक्के हे काही कमी नाही. चांगले मार्क आहेत. पण वर्षभर मेरिट यायचं म्हणून जीवाचा आटापिटा केला होता.
दहावीत मी आयुष्यात सगळ्यांत जास्त अभ्यास केला होता. दहावीत जर चांगले मार्क मिळाले नाही तर आयुष्यात आपलं काहीही होऊ शकत नाही हे का कोण जाणे पण खूप खोलवर रुतलं होतं.
त्यात प्रिलिम परीक्षेत 89 टक्के मिळाल्यामुळे आता मेरिटमध्ये येणार हे नक्की होतं. पण तो शेवटचा एक महिना अभ्यासात ढिलाई दाखवली आणि तिथेच घात झाला.
दुसरं असं की तुलना हा सगळ्यांत मोठा अवगुण आपल्यात असतो. आपल्यापेक्षा इतरांना किती कमी किंवा जास्त मार्क मिळाले याचा आपण इतका विचार करतो की आपलं सगळं बाजूलाच राहतं.

फोटो स्रोत, Getty Images
या तुलनेने जास्त त्रास होतो. ती तुलना करू नये, आपले मार्क हे आपले असतात, आपल्या मेहनतीने कमावलेले असतात. त्यामुळे त्यांचा अपमान करू नये हे माझ्या खूप उशीरा लक्षात आलं.
दहावीच्या मार्कांचा खरंच फरक पडतो का? याचं कोणतंही उत्तर नाही. शिक्षणाच्या आणि व्यवसायाच्या नोकरीच्या एका टप्प्यावर त्यांना कोणीही विचारत नाही.
पण तिथे जाईपर्यंत त्यांचं महत्त्व नक्कीच असतं. माझ्या अनेक मित्रांना 59 टक्के असल्याने इंजिनिअरिंगला चांगले मार्क असून सुद्धा मोठमोठ्या कंपन्यांनी घेतलं नाही कारण किमान 60 टक्के हवे अशी अपेक्षा होती. अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये दहावीत 60 टक्क्यांची अट असते. त्यामुळे दहावीत मार्क हवेच पण त्याचा बाऊ करू नये.
दहावी होऊन 19 वर्षं झाले. मी माझ्या नोकरी व्यवसायात स्थिरावलो आहे, माझे मेरिटमध्ये आलेले मित्र मैत्रिणी सुद्धा चांगल्या पदावर काम करताहेत. ते अजूनही माझे चांगले मित्र आहे.
तो मेरिटचा किंवा टक्केवारीचा आकडा कधीही मैत्रीच्या आड आला नाही, आतापर्यंत आला नाही याचाच अर्थ पुढेही येणार नाही. ज्यांना माझ्यापेक्षाही कमी मार्क मिळाले त्यापैकी काही लोक आज माझ्यापेक्षाही पुढे गेले आहेत.
दहावी बारावीचे दिवस खूप स्वप्नाळू असतात. 'लाथ मारीन तिथे पाणी काढीन' अशी जिद्द मनात असते. काहीही करायची तयारी असते, त्या वेळचं यशापयश आयुष्यभर साथ करत असतं.
यशाने हुरळून जाऊ नये आणि अपयशाने खचून जाऊ नये ही अक्कल उशीरा येते. ज्या दिवशी निकाल लागतो त्या दिवशी डोळ्यासमोर मार्क दिसत असतात. बाकी सगळं व्यर्थ असतं.
'पैसा खुदा तो नही, पर खुदा से कम भी नही' असं म्हणतात. मार्कांचंही तसंच आहे. नाही का?
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)









