'आमच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्याला आईने ठार केलं, पण आमची भीती अजून गेली नाही'

    • Author, जून केली,
    • Role, होम अफेअर्स प्रतिनिधी, बीबीसी न्यूज

आठ वर्षांपूर्वी, सारा सँड्स यांनी त्यांच्या लहान मुलांचे लैंगिक शोषणाच्या प्रकरणात दोषी असलेल्या गुन्हेगाराची हत्या केली.

तिची तीन मुलं या सगळ्या प्रकाराबद्दल बीबीसीकडे व्यक्त झाले. त्या गुन्हेगाराने केलेल्या लैंगिक शोषणाबद्दल आणि त्यांच्या आईने केलेल्या गुन्ह्याबद्दल असलेल्या त्यांच्या भावना सांगितल्या.

 2014 मध्ये एका रात्री सारा सँड्स आपल्या लंडनमधील बहुमजली इमारतीतून बाहेर पडली. तिने डोक्यावर हूड घेतले होते. तिच्याकडे चाकू होता.

त्या बाजूलाच असलेल्या ब्लॉकमधील फ्लॅटमध्ये ती गेली. तिथे एक प्रौढ पुरुष राहत होता. तिथे गेल्यावर तिने मायकल प्लीस्टेडला आठ वेळा भोसकले.

या कृतीला नंतर 'पूर्वनिश्चित व सतत केलेला हल्ला' असे म्हटले गेले. रक्तस्त्राव होऊन मायकलचा मृत्यू झाला.

प्लीस्टेडचे वय 77 होते आणि लहान मुलांचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी तो दोषी होता. त्या वेळी त्याच्यावर अजून काही गुन्ह्यांचे खटले सुरू होते.

तो राहत असलेल्या सिल्व्हरटाऊनमधील लहान मुलांशी लैंगिक चाळे केल्याचा त्याच्यावर आरोप होता. कायद्यानुसार, अशा प्रकरणांमध्ये सुनावणीच्या वेळी मुलांची नावे प्रसिद्ध केली जात नाहीत.

बीबीसी न्यूज आता प्रथमच या संदर्भात माहिती देऊ शकते. या प्रकरणातील तीन मुले ही प्लीस्टेडची हत्या केलेल्या सारा सँड्सची आहेत.

तिचा सर्वात मोठा मुलगा त्या वेळी 12 वर्षांचा होता. आपल्यासोबत झालेले गैरवर्तन उघड करण्यासाठी गेल्या वर्षी त्याने नाव गोपनीय ठेवण्याची अट काढून टाकली.

आणि बीबीसी न्यूजला मुलाखत देताना त्याच्या एल्फी आणि रीस या दोन जुळ्या भावांनीही नाव गोपनीय ठेवण्याची गरज नाही, असे जाहीर केले. ते त्यावेळी 11 वर्षांचे होते आणि त्यांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप असलेल्या पुरुषाची त्यांच्या आईने हत्या केली.

त्यांची वये आता 19 व 20 आहेत. आपल्या आईने काय केले हे त्यांना समजले तेव्हा नक्की काय घडले होते हे त्यांच्या लक्षात होते. त्यांच्या आईसोबत ते बोलत होते. ते म्हणतात की, आई तुरुंगात असताना आयुष्य खूप कठीण होते. त्यांची आई म्हणते की तिने केलेल्या कृत्याचा तिला पश्चात्ताप होत आहे, पण तिचे मुलगे मात्र तिच्या कृतीचे समर्थनच करतात.

 आपल्या मुलांचे शोषण केल्यानंतर दोषीची भोसकून हत्या करणारी आई

"मी तर तिला सलाम करतो." ब्रॅडलीने बीबीसीला सांगितले. "मी ते अजिबात नाकारणार नाही."

 "त्यामुळे आम्हाला निश्चितच अधिक सुरक्षित वाटले." एल्फी म्हणाला. "पण आम्हाला जी दुःस्वप्न पडायची, ती कमी झाली नाहीत. आता सुरक्षिततेची खात्री होती. कारण आम्ही आता त्या रस्त्यावरून जाताना कोपऱ्यावर तो दिसणार नव्हता."

"तो आमच्या समोरच्याच रस्त्यावर राहत होता." ब्रॅडली म्हणाला. "मला ती खिडकी उघडल्यावर त्याचे घर दिसायचे."

रीस म्हणतो, "त्यावेळी मी 11 वर्षांचा होतो. त्याचा मृत्यू झाला आहे, हे समजल्यावर मला आनंद झाला होता. पण त्यानंतरही माझ्या डोक्यातले विचार गेले नव्हते. आम्ही अनेकदा रडत रडतच झोपेतून जागे व्हायचो आणि आईला हाक मारायचो."

सारा सँड्स प्लीस्टेडच्या घरातून बाहेर पडल्यावरची सीसीटीव्ही इमेज

मायकल प्लीस्टेडवर हल्ला करून त्याच्या घराबाहेर पडणाऱ्या सारा सँड्सची प्रतिमा सीसीटीव्हीमध्ये कैद झाली.

हत्येच्या काही महिने आधी सिल्व्हरटाऊनमधील नवीन घरात सारा सँड्स आणि तिचे कुटुंब शिफ्ट झाले होते.

तिने प्लीस्टेडशी मैत्री केली. तो एकटाच राहत असे. त्याचे व्यक्तिमत्त्व उच्चभ्रू होते. बहुतेक वेळा तो न्यूज एजंट्सच्या बाहेर ठेवलेल्या खुर्चीवर बसलेला असे. त्यामुळे त्यांचा स्थनिकांशी व त्यांच्या मुलांशी संपर्क आला. मला वाटले की तो एक छान माणूस आहे.", असे ती आता म्हणते. "मी त्याच्यासाठी अनेकदा पदार्थ करायचे, त्याची काळजी घ्यायचे. जेव्हा माझ्याकडे वेळ असायचा तेव्हा मी त्याची सोबतही करायचे."

मुलांचे लैंगिक शोषण करणाऱ्याची हत्या केलेल्या व्यक्तीची शिक्षा वाढवली.

प्लीस्टेड त्या दुकानातील वर्तमानपत्रे नीट लावून ठेवायचा आणि काही मुले शनिवारी त्याच्यासोबत काम करायची.

"ब्रॅड त्याला मदत करू शकतो का, असे त्याने विचारले. ब्रॅड खूपच रोमांचित झाला होता," सारा म्हणते.

प्लीस्टेड तिच्या मोठ्या मुलाचे संगोपन करायचा आणि हळुहळू त्याच्या जुळ्या भावांशीही त्याची जवळीक वाढली. त्याने त्या तिघा भावांना घरी बोलवले.

एका संध्याकाळी जुळ्या भावांनी तिला सांगितले की, प्लीस्टेडने त्यांचे लैंगिक शोषण केले. एका आठवड्यानंतर ब्रॅडलीनेही तसेच सांगितले. प्लीस्टेडला अटक झाली आणि तिच्या मुलांविरुद्ध केलेल्या गुन्ह्याबद्दल त्याला शिक्षा झाली.

त्याची सुनावणी अजून व्हायची होती. न्यायाधीशांनी त्याला जामीन दिला आणि तो त्याच्या घरी परतू शकतो, असे सांगितले.

सँड्स हे समजल्यावर प्रचंड अस्वस्थ झाल्या आणि काय करावे ते त्यांना समजत नव्हते. त्यांनी आपल्या कुटुंबाला तिच्या आईच्या लहान घरात शिफ्ट केले.

संपूर्ण जगच थिजले

हल्ल्याच्या दिवशी प्लीस्टेडच्या घरी जातानाचे त्यांचे फुटेज सीसीटीव्हीमध्ये दिसले. त्यांना त्याला सांगायचे होते की, त्याने गुन्हा कबूल करून टाकावा, जेणेकरून तिच्या मुलांना न्यायालयात जाण्याच्या त्रासाला सामोरे जावे लागणार नाही.

“मी तिथे का गेले होते, हे मलाच कळत नव्हते.” त्या म्हणतात, “मी घोडचूक केली आहे हे मला जाणवले. त्याला कोणत्याही प्रकारचा पश्चात्ताप नव्हता. तो म्हणाला की, तुझी मुले खोटं बोलत आहेत. माझ्या डाव्या हातात चाकू होता आणि मला आठवत आहे की तो काढून घेण्याचा प्रयत्न त्याने केला.”

तिला प्लीस्टेडची हत्या करायची नव्हती, ही भूमिका तिने कायम ठेवली होती.

काही तासांनी ती स्वतः पोलीस ठाण्यात गेली. तिच्या हातात रक्ताने माखलेला चाकू होता आणि कपड्यांवरही रक्त लागले होते.

सुनावणीच्या वेळी न्यायाधीश म्हणाले की, चाकू सोबत घेतल्यास नक्की काय घडेल, याचा तिने तर्कशुद्धतेने विचार होता, असे मला वाटत नाही. पुढे ते म्हणाले, “त्याचा वापर करावा लागेल ही शक्यता तिने गृहीत धरली असावी, याची मला खात्री आहे.”

सारा सँड्सला सदोष मनुष्यवधाबद्दल दोषी ठरविण्यात आले. नियंत्रण गमावल्यामुळे हत्या केली, असे निकालपत्रात म्हटले नाही. तिला साडेतीन वर्षांची शिक्षा करण्यात आली. पण नंतर ही शिक्षा साडेसात वर्षांपर्यंत वाढविण्यात आली. कारण सुरुवातीची शिक्षा खूपच सौम्य होती, असा निर्णय देण्यात आला.

अपील न्यायालयाचे न्यायाधीश म्हणाले, प्लीस्टेडला मदत करण्यासाठी तिने काहीही केले नाही, आपत्कालीन सेवेशीही संपर्क साधला नाही.

तिने चार वर्षे तुरुंगात घालवली आहेत. “मी कायदा हातात घेतला,” असे ती आता म्हणते. “माझ्या कृत्यांची जबाबदारी घ्यायला मला कायम शिकवले गेले आहे.”

एकल माता तुरुंगात असल्याने तीन मुलं त्यांच्या आजीसोबत वास्तव्यास होते.

“एकाच खोलीत आम्ही अनेक जण असू. प्रायव्हसी अजिबात नव्हती.”

ब्रॅडलीने बीबीसीला सांगितले, “माझी आजी माझ्या आईशी फोनवर बोलत होती. मी फुटबॉल खेळायला जाऊ शकतो का, माझ्या मित्रांसोबत जाऊ शकतो का, असे ती माझ्या आईला विचारत असे. आई बहुधा नकार देत असे.”

एल्फी म्हणतो की तिघा भावांना अनेक गोष्टी करता आल्या नाहीत. त्यांच्या नियमित तुरुंग भेटींच्या वेळी ते त्यांच्या आईला महिन्यातून एकदा भेटत असत.

“काही वेळा तुम्हाला तुमच्या आईला काहीतरी सांगायचं असतं.” तो आता म्हणतो. त्यांच्या मित्रांना सगळी हकीकत माहीत होती. पण ब्रॅडली म्हणतो, काही लोक त्याला त्याच्या आईबद्दल विचारणा करत.

“त्यांना माझा खूप राग आला होता.” सँड्स सांगते. “मी तुरुंगात जाण्यापूर्वी आम्ही एकमेकांच्या खूप जवळ होतो आणि अचानक मी त्यांच्या आयुष्यातून निघून गेले. तो त्यांना धक्का होता.”

मायकल प्लीस्टेडचे आयुष्य संपवल्याचा त्यांना पश्चात्ताप होत आहे का, असे विचारले असता त्या म्हणाल्या की, मला खूप पश्चात्ताप होत आहे.

त्याबद्दल अजून विचारणा केली असता त्या पुढे म्हणाल्या, “मी या जगात नवीन जीव आणणारी आहे. कधी काळी मी कुणाचा जीव घेईन, असे मला कधीच वाटले नव्हते.”

नाव बदलले

न्यायालयातील सुनावणीच्या समजले की, प्लीटेडने त्याचे रॉबिन मोल्ट हे नाव बदलले होते आणि तो बाललैंगिक प्रकरणातील दोषी होता. गेल्या तीन दशकांमध्ये त्याच्यावर लैंगिक शोषणाचे 24 गुन्हे होते.

त्याच्या गुन्ह्यांमुळे त्याने तुरुंगवासही भोगला होता. पण त्या भागातील कोणालाच, अगदी त्याला राहायला जागा देणाऱ्या स्थानिक मंडळालाही त्याच्या भूतकाळाविषयी माहिती नव्हती.

लैंगिक शोषणाप्रकरणी दोषी सिद्ध झालेल्या ज्या व्यक्ती नाव बदलू इच्छितात त्यावर अधिक काटेकोर बंधने आणण्यासाठी चळवळ चालविणाऱ्यांच्या गटात आता सारा सँड्स सामील झाली आहे.

मजूर पक्षाच्या खासदार सारा चॅम्पियन यांनी हा मुद्दा मंत्र्यांपर्यंत पोहोचवला. त्या म्हणतात, काही लैंगिक शोषणकर्ते गुन्हेगार डीबीएस (डिसक्लोजर अँड बारिंग सर्व्हिस) तपासण्यांमधून पुढे जाण्यासाठी नव्या ओळखीचा वापर करतात. काही पदांसाठी हे सक्तीचे असते आणि त्यांना गुन्हेगारी शिक्षा उघड कराव्या लागतात.

“एकदा त्यांनी नाव बदलले की, त्यांना त्यांच्या नावाचे नवीन ड्रायव्हिंग लायसन्स व पासपोर्ट मिळतो,” असे सारा चॅम्पियन म्हणतात.

“त्यामुळे त्यांना डिस्क्लोजर अँड बारिंग सर्व्हिस मिळते. नंतर असे दिसून येते की या व्यक्ती मग शाळांमध्ये आणि मुले असलेल्या इतर ठिकाणी जातात आणि विश्वास संपादन करून गैरकृत्ये करतात.”

गृह कार्यालयातील प्रवक्त्याने सांगितले की, या मुद्याचा आढावा त्यांनी घेतला आहे, पण तो प्रकाशित केला जाऊ शकत नाही, कारण त्यात संवेदनशील माहिती आहे. गुन्हेगारांकडून या माहितीचा उपयोग यंत्रणेचा गैरवापर करण्यासाठी केला जाऊ शकतो..

समुदायात राहणाऱ्या लैंगिक शोषणकर्त्यांना हाताळण्यासाठी यूकेमध्ये अत्यंत कडक कायदे आहेत, असे म्हणतात.

2018 मध्ये सारा सँड्सची तुरुंगातून सुटका झाली. तेव्हापासून साराशी पुन्हा एकदा नाते पुन्हा एकदा जोडल्याचे तिचे मुलं म्हणतात.

“ती अजूनही आम्हाला लहानच समजते.”, असे रीस म्हणतो. “तेव्हा छान वाटतं, पण ती वर्षे आता निघून गेली, याची जाणीवही होते.”

“कुटुंबातील बंध तुटत नसतात.”, असे ब्रॅडली म्हणाला.

मुले म्हणाली की, ती लहान असताना आपल्या लैंगिक शोषणाबद्दल त्यांच्या आईला सांगितल्याचा खूप खेद वाटत असे. “आम्ही जर आमचे तोंड बंद ठेवले असते, तर आमची आई आमच्यासोबत असती आणि आम्ही शॉपिंगला गेलो असतो, चित्रपट पाहायला गेलो असतो आणि 12 वर्षांची मुले जे काही करतात, ते सगळं केलं असतं.”, असे ब्रॅडली म्हणतो.

पण ते म्हणतात की, पीडितांनी व्यक्त होणे खूप महत्त्वाचे असते. “ते कठीण असते पण भविष्याचा विचार करता तेच हिताचे असते.”, असे रीस म्हणतो. “तुम्ही नेहमी पुढे आले पाहिजे.” असे म्हणत एल्फीनेही दुजोरा दिला. “तुम्ही बोलले पाहिजे. तुम्ही बोलला नाहीत तर परिस्थिती अजून भीषण होत जाईल.”

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)