You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
गिलीन मॅक्सवेल : प्रियकराच्या 'मसाज'साठी अल्पवयीन मुलींची तस्करी करणारी सेलिब्रिटी
- Author, अनघा पाठक
- Role, बीबीसी मराठी
ती लंडन आणि न्यूयॉर्कच्या हाय सोसायटीमधला एक चमकता तारा होती. प्रसिद्धी, वैभव आणि मोठमोठ्या लोकांचा सहवास तिच्या वाटेला आला होता. पण जुनं सगळं वैभव जाऊन तिच्या वाटेला आता असेल जेलमधली एक छोटीशी खोली.
तिच्या विरोधात साक्ष देणाऱ्या महिलेने, कॅरोलिनने म्हटलं की, "मी फार फार तर 14 वर्षांची असेन. खूप अडचणीत होते. मी 4 वर्षांची असताना माझ्यावर माझ्याच आजोबांनी लैंगिक अत्याचार केला होता. माझी आई ड्रग अॅडिक्ट होती. मला पैशांची गरज होती आणि एक माझ्याच वयाच्या दुसऱ्या मुलीने मला पैसे कमवायचा रस्ता सांगितला."
"त्यावेळी मी गिलीन मॅक्सवेलला पहिल्यांदा भेटले. मला एपस्टीनच्या खोलीत जाऊन त्याला 'मसाज' करायचा होता. एकदा गिलीनने माझ्या स्तनांना हात लावून म्हटलं की मी 'त्याच्यासाठी' चांगलं शरीर घेऊन आलेय."
जवळपास दोन वर्षं हा प्रकार चालला. मसाजच्या खोलीत एपस्टीन बरोबर असताना कधी कधी गिलीनही तिथे असायची. असं भासवायची की जे चालू आहे ते सगळं नॉर्मल आहे, काहीच वेगळं घडत नाहीये, दुसऱ्या एका महिला साक्षीदाराने सांगितलं.
अल्पवयीन मुलींना सेक्ससाठी प्रशिक्षण देणं आणि त्यांची तस्करी करण्याच्या आरोपावरून या गिलीन मॅक्सवेलला 20 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली आहे.
काही काळापूर्वी अमेरिकेत एक सेक्स स्कँडल खूप गाजलं. त्यातल्या मुख्य आरोपीने नंतर आत्महत्या केली, आणि त्यावरून तर्कवितर्कही लढवले गेले. अनेक मोठमोठ्या लोकांची नावं त्यात आली होती. ब्रिटनचे राजकुमार अँड्र्यू यांचंही या प्रकरणी नावं आलंय.
पण काय होतं हे प्रकरण? आणि त्याहीपेक्षा यात अल्पवयीन मुलींची तस्करी करणारी एक बाईच होती. तिने असं का केलं, तिच्या आयुष्यात असं काय घडलं होतं की तिला हे करावं लागलं? या प्रकरणातल्या मुख्य आरोपीशी तिचे इतके जवळचे संबंध होते की त्याच्या प्रेमाखातर ती हे करायला मजबूर झाली?
एका गुंतागुंतीच्या प्रकरणाचा लेखाजोखा.
याची सुरुवात होते अमेरिकेत. जेफ्री एपस्टिन हे नाव तुम्ही ऐकलंय का? हा माणूस अमेरिकेतला एक धनाढ्य. याच्यावरच आरोप होते अल्पवयीन मुलींशी सेक्स केल्याचे, इतर पुरुषांना मुली पुरवण्याचे आणि मुलींची तस्करी करणारं नेटवर्क चालवण्याचे.
या माणसाने मागच्या वर्षी ऑगस्ट महिन्यात आपल्या तुरुंगातल्या कोठडीत आत्महत्या केली. अर्थात काही जणांनी ही आत्महत्या नसल्याचाही दावा केलाय.
सेक्स रॅकेट चालवण्याचा आरोप असलेला जेफ्री एपस्टीन सत्तरच्या दशकात न्यूयॉर्क शहरातल्या एका खाजगी शाळेत गणित आणि भौतिकशास्त्र शिकवायचा. त्याने स्वतः गणित आणि भौतिकशास्त्र हे विषय कॉलेजात घेतले होते पण त्याने आपली पदवी पूर्ण केली नाही.
त्याच्या एका विद्यार्थ्याचे वडील जेफ्रीच्या हुशारीवर इतके इम्प्रेस झाले होते की त्यांनी जेफ्रीची ओळख वॉल स्ट्रीट इन्व्हेस्टमेंट बँकेच्या एका अधिकाऱ्याशी ओळख करून दिली.
जेफ्रीने त्यांच्यासोबत काम करायला सुरुवात केली आणि फक्त चार वर्षात तो त्या बँकेत सीनियर पार्टनर झाला. 1982 साली त्याने जे एपस्टीन नावाने स्वतःची फर्म काढली.
जसा जेफ्रीकडे पैसा आला तसा त्याच्या मोठमोठ्या लोकांशी ओळखी झाल्या, त्याने पार्ट्या आयोजित करायला सुरुवात केली.
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी न्यूयॉर्क मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं की, "तो एक मस्त माणूस आहे. माझ्यासारख्याच त्यालाही सुंदर महिला आवडतात, आणि त्यातल्या बहुतांश जणी वयाने लहान असतात."
लैंगिक शोषण
2005 साली अमेरिकेतल्या फ्लोरिडा राज्यातल्या एका 14-वर्षीय मुलीच्या पालकांनी एपस्टीनवर आरोप केला की त्याने त्यांच्या मुलीचं लैंगिक शोषण केलंय. पोलिसांनी जेव्हा एपस्टीनच्या घराची झडती घेतली तेव्हा घरभर त्या मुलीचे फोटो सापडले.
मायमी हेराल्ड या तिथल्या वर्तमानपत्राने बातमी दिली की एपस्टीन कित्येक वर्षांपासून अल्पवयीन मुलींचं शोषण करत होता.
"प्रश्न फक्त एका मुलीचा नव्हता की बुवा तिने आरोप केलेत आणि एपस्टीनने खोडून काढले. अशा 50 हून जास्त मुली समोर आल्या होत्या, आणि सगळ्यांचं कहाणी एकच होती," पाम बीचचे पोलीस प्रमुख मायकल रायटर यांनी पोलिसांना सांगितलं.
स्तंभलेखक मायकल वुल्फ यांनी न्यूयॉर्क मॅगझिनशी बोलताना म्हटलं होतं, "मुलींविषयी त्याने कधी लपवून ठेवलं नाही. त्याच्यावर आरोप झाले तेव्हा एकदा माझ्याशी बोलताना तो म्हणाला होता... काय करू, मला आवडतात लहान मुली. मी त्याला म्हणालो, तुला तरुण महिला म्हणायचं आहे का?"
पण एपस्टीनवर रीतसर खटला चालला नाही. 2007 साली सरकारी वकिलांनी त्याला प्ली डीलवर सही करायला लावली ज्यामुळे त्याला जन्मठेपेच्या शिक्षेऐवजी फक्त 18 महिन्यांची कैद झाली. यातही त्याला आठवड्यातून 6 दिवस 12 तास ऑफिसात जायची परवानी असायची. त्याला 13 महिन्यांनंतर सोडून दिलं.
तेव्हा वर्तमानपत्रांनी आरोप केला की, सरकारी वकील अलेक्झांडर अकोस्टा यांनी एपस्टीनचे गुन्हे लपवायला मदत केली. त्याची एफबीआयकडून चौकशी होऊ दिली नाही. या प्रकरणी आणखी कोणकोण बडी धेंड गुंतलेली होती ते कधी समोर आलं नाही.
अकोस्टा यांना या प्रकरणी 2019 साली राजीनामा द्यावा लागला पण ते म्हणत राहिले की त्यांच्यामुळे एपस्टीनला थोडीफार का होईना शिक्षा झाली, नाहीतर तो मोकाट सुटला.
एपस्टीनची संपत्ती मात्र जप्त झाली नाही.
एपस्टीनचे संबंध अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप आणि इंग्लंडच्या राणी एलिझाबेथ यांचा मुलगा प्रिन्स अँड्र्यू यांच्याशीही होते.
व्हर्जनिया रॉबर्ट्स- गिफ्रे या महिलेने प्रिन्स अँड्र्यू यांच्यावर आरोप केला होता की 2000 च्या दशकात ती 17 वर्षांची असताना तिला त्यांच्यासोबत सेक्स करायला भाग पाडलं गेलं होतं.
प्रिन्स अँड्र्यू यांनी हे आरोप नाकारले आहेत.
2019 साली एपस्टीनला परत अटक केली. त्याला जामीन नाकारण्यात आला. जुलै 2021 मध्ये त्याला दवाखान्यात नेण्यात आलं कारण त्याच्या मानेवर जखमा होत्या. या जखमा का झाल्या याबद्दल ना जेलच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं ना त्याच्या वकिलांना.
त्याला शेवटचं जिवंत पाहिलं गेलं ते 31 जुलै 2021ला जेव्हा त्याला कोर्टात हजर केलं गेलं. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला त्याने तुरुंगात आत्महत्या केली.
त्याच्यावर कधीही खटला चालला नाही आणि अल्पवयीन मुलींच्या तस्करीचं त्याचं रॅकेट किती मोठं होतं, त्यात कोण कोण सामील होतं यातलं संपूर्ण सत्य समोर आलं नाही.
आता इथून सुरू होते गिलीन मॅक्सवेलची गोष्ट.
एपस्टीनच्या मृत्यूनंतर त्याची माजी गर्लफ्रेंड गिलीन मॅक्सवेल चर्चेत आली. या 60 वर्षीय महिलेला जुलै 2020 साली अटक झाली. तिच्यावर आरोप होता की एपस्टीनच्या अल्पवयीन मुलींच्या तस्करीच्या रॅकेटमध्ये गिलीनने त्याला मदत केली.
या अल्पवीयन मुलींना ती हेरायची आणि त्यांना सेक्ससाठी तयार करायची. हे सगळं करताना या मुली वयाने लहान आहेत याची तिला पुरेपूर जाणीव होती.
डिसेंबर 2021 साली न्यूयॉर्कच्या कोर्टाने तिला अल्पवयीन मुलींची तस्करी केल्याप्रकरणी दोषी ठरवलं.
या गुन्ह्यासाठी 40 वर्षांच्या कैदेची शिक्षा होऊ शकते.
कसं होतं या गिलीनचं आयुष्य?
तिचा जन्म झाला त्यानंतर तीनच दिवसात तिच्या मोठ्या भावाचा, मायकलचा अपघात झाला. या अपघातामुळे तो सात वर्षं कोमात होता.
गिलीन गर्भश्रीमंत घरात जन्माला आली असली तरी तिच्याकडे सुरुवातीला कोणी लक्षच दिलं नाही. आपल्या मोठ्या मुलाच्या अपघाताच्या दुःखात असलेले तिचे आईवडील तिच्याविषयी जणू काही विसरूनच गेले होते.
जशी जशी ती मोठी झाली तिला आपल्या वडिलांकडून छळ सहन करावा लागला.
तिचे वडील रॉबर्ट मॅक्सवेल एका गरीब ज्यू कुटुंबात जन्मले होते. दुसऱ्या महायुद्धात जे ज्यूंचं शिरकाण झालं त्यात त्यांचे जवळपास सगळे कुटुंबीय मारले गेले होते.
असा हा एकटा रॉबर्ट ब्रिटनमध्ये आला. आधी त्याने सैन्यात नोकरी केली, युद्धातला हिरो बनला आणि ब्रिटनमधला माध्यम सम्राट आणि खासदार.
रॉबर्ट मॅक्सवेल स्वभावाने विक्षिप्त होते. ते त्यांच्या मुलांना टाकून तर बोलायचेच पण अनेकदा शारिरीक मारहाणही करायचे. त्याचा एक मुलगा इयान यांनी एकदा म्हटलं होतं, "ते आम्हाला पट्ट्यानी मारायचे. मुलगा-मुलगी काही बघायचे नाहीत. जराही त्यांच्या मनाविरुद्ध झालं की मारहाण ठरलेली असायची."
असं असतानाही गिलीन आपल्या वडिलांची खुशामत करायला शिकली होती. ते जसं बोलतील तसं ती वागायची, करायची. वडिलांना खूश ठेवणं हे तिच्या आयुष्याचं एकमेव ध्येय होतं. याचा फायदाही झाला, अल्पावधीतच ती आपल्या वडिलांची आवडती मुलगी बनली.
लेखिका अॅना पॅस्टरनॅक तिच्याच सोबत ऑक्सफर्डमध्ये शिकायला होत्या. बीबीसीच्या जॉन केलींशी बोलताना त्या म्हणतात, "तिला सतत सत्ता हवी असायची. तुमच्याशी बोलताना तिची नजर कायम भिरभिरत राहायची की तुमच्यापेक्षा कोणी मोठं, शक्तिशाली, सत्ताधारी, पैसेवाली व्यक्ती आसपास आहे का."
तिचं शिक्षण पूर्ण झाल्यावर रॉबर्ट मॅक्सवेल यांनी तिला आपल्या मालकीच्या ऑक्सफर्ड युनायडेट या फुटबॉल क्लबचं संचालक बनवलं आणि तिला एक कंपनीही काढून दिली.
पण गिलीनचं आयुष्य बदलणार होतं. रॉबर्ट मॅक्सवेल यांनी आपल्या मालकीच्या 'डेली मिरर' या वृत्तपत्राच्या कर्मचाऱ्यांची पेन्शनचा घोटाळा केला. कंपनीच्या शेअरची किंमत फुगवण्यासाठी त्यांनी असं केलं. जवळपास 58 कोटी 30 डॉलर्सचा घोटाळा होता हा. मिररच्या 32 हजार कर्मचाऱ्यांना आपल्या हक्काचे पैसे गमवावे लागले होते.
हे प्रकरण खूप गाजलं. मॅक्सवेल कुटुंबाची बदनामी झाली. रॉबर्ट मॅक्सवेलची दोन मुलं, इयान आणि केव्हिन यांना 1992 साली अटक झाली. 1996 साली त्यांची निर्दोष मुक्तता झाली.
तिचे वडील दोषी आहे हे अनेकांना दिसत होतं पण गिलीनने मात्र आपल्या वडिलांचं जोरदार समर्थन केलं. 1992 साली व्हॅनिटी फेअर या मासिकाला दिलेल्या मुलाखतीत तिने म्हटलं, "ते काही चोर नाहीयेत. चोर कोण असतं? जो पैसे चोरतो. मला नाही वाटत माझ्या वडिलांनी चोरी केलीये. हो काहीतरी झालं, पण ते पैसे त्यांनी स्वतःच्या खिशात घातले का? ते पैसे घेऊन ते पळून गेले का?"
1991 च्या नोव्हेंबरमध्ये, घोटाळा झाल्यानंतर गिलीनला आणखी एक मोठा धक्का बसला. तिचे वडील त्यांच्या खाजगी आलिशान बोटीवरून गायब झाले. चार दिवसांनी त्यांचा मृतदेह समुद्रात तरंगताना सापडला.
तिच्या भावंडांनी मान्य केलं की आपल्या वडिलांचा एकतर अपघात झालाय किंवा त्यांनी आत्महत्या केलीये, पण गिलीनला खात्री होती की त्यांचा खून झालाय.
तिने याचा पाठपुरावा करण्याचा प्रयत्न केला पण तिला यात यश आलं नाही. लंडनमध्ये तिच्यासाठी आता काही शिल्लक राहिलं नव्हतं.
तिने न्यूयॉर्कच वन-वे तिकिट काढलं. इथे तिला भेटला एपस्टीन.
तिच्या वडिलांसारखाच एपस्टीन गरिबीतून वर आला होता. अखेरीस तिच्या वडिलांसारखाच गुन्ह्यात अडकून संशयास्पद परिस्थितीत त्याचा मृत्यू झाला.
ती न्यूयॉर्कमध्ये आली तेव्हा तिच्याकडे आधीसारखा प्रचंड पैसा नव्हता. असं म्हणतात की ती रिअल इस्टेटमध्ये काम करत होती आणि एका चांगल्या फ्लॅटमध्ये राहात होती, पण ती ज्या घरात वाढली त्या महालाच्या तुलनेत हा चार खोल्यांचा फ्लॅट काहीच नव्हता.
गिलीन आणि एपस्टीनचं नातं एकमेकांना फायदेशीर ठरलं. तिने ओळखीच्या श्रीमंत आणि शक्तीशाली व्यक्तींची एपस्टीनशी भेट घालून गिली आणि त्याच्या बदल्यात तिच्या ऐशोआरामाच्या राहणीमानासाठी एपस्टीन पैसे पुरवत गेला.
2003 साली विकी वार्ड या पत्रकाराला दिलेल्या मुलाखतीत एपस्टीनने गिलीनचं वर्णन 'बेस्ट फ्रेंड' असं केलं होतं. या पत्रकाराने लिहिलं की एपस्टीनच्या आयुष्यातल्या अनेक गोष्टींचं व्यवस्थापन गिलीन करत होती.
तिच्या विरोधात खटला चालू असताना सरकारी वकिलांनी एपस्टीन आणि गिलीन यांचे खाजगी फोटोही कोर्टात सादर केले.
कोर्टातल्या कागदपत्रांमध्ये एपस्टीनच्या आलिशान घरात काम करणाऱ्या एका माजी कर्मचाऱ्याने सांगितलं की गिलीन त्यांच्या घराची मॅनेजर होती, ती कर्मचाऱ्यांवर लक्ष ठेवायची, त्याच्या आर्थिक बाबी सांभाळायची, आणि पार्ट्याही आयोजित करायची.
सारा रन्सोम या महिलेने म्हटलंय की एपस्टीनने तिचा लैंगिक छळ केला. बीबीसी पॅनोरमा या कार्यक्रमात बोलताना त्या म्हणतात, "ती एपस्टीनसाठी मुली आणायची, त्या मुलींवर लक्ष ठेवायची, एपस्टीनला काय आवडतं, काय नाही हे तिला माहिती होतं आणि तशाच प्रकारे ती मुलींना ट्रेन करायची."
गिलीन मॅक्सवेलच्या आयुष्याचा आणि खटल्याचा माग ठेवणारे पत्रकार जॉन स्वीनी म्हणतात, "गिलीन तिच्या विक्षिप्त वडिलांना खूश ठेवण्यासाठी काहीही करायला तयार असायची आणि मग नंतर तिच्या आयुष्यात दुसरा राक्षस आला ज्याच्यासाठी तिने वाट्टेल ते केलं. हेच तिचं आयुष्य होतं."
गिलीनच्या वकिलांना म्हटलं की एपस्टीनच्या गुन्ह्यांसाठी तिला बळीचा बकरा बनवला जातंय.
पण कोर्टात सरकारी वकिलांनी आणि तिच्या विरोधात साक्ष देणाऱ्या पीडित महिलांनी तिच्या कामाचा लेखाजोखा मांडला.
एपस्टीनसाठी मुली शोधण्याची तिची एक ट्रीक होती. ती ज्या मुली शोधायची त्या गरीब घरातल्या असायच्या, अडचणीत सापडलेल्या असायच्या किंवा कधी कधी आधीच लैंगिक शोषणाच्या बळी ठरलेल्या असायच्या.
ती याच मुलींना सांगायची की तुमच्यासारख्या आणखी मुली तुम्ही आणल्यात तर तुम्हाला एक्स्ट्रा पैसे मिळतील.
आधी या मुलींचा विश्वास संपादन करण्यासाठी एपस्टीन आणि गिलीन त्या मुलींना भेटवस्तू द्यायचे, शाळेची फी भरू सांगायचे आणि एपस्टीनचा 'मसाज' करण्यासाठी पैसे द्यायचे.
सरकारी वकिलांनी कोर्टात सांगितलं की, "एपस्टीन या मुलींना हात लावायचा, आणि गिलीन भासवायची की हे फार नॉर्मल आहे, असंच चालतं."
कॅरोलिन या साक्ष देणाऱ्या महिलेने म्हटलं की तिने अशा प्रकारचा मसाज एपस्टीनला कमीत कमी 100 वेळा तरी दिला असेल आणि जेव्हा तिचं वय वाढलं आणि ती लहान राहिली नाही तेव्हा तिचं येणं त्यांनी बंद केलं.
कर्मचाऱ्याची साक्ष
बीबीसीच्या नाडा तौफिक यांनी गिलीन मॅक्सवेल विरोधात चाललेल्या खटल्याचं वार्तांकन केलं आहे. त्या एका महत्त्वाच्या साक्षीचा उल्लेख करतात.
ही साक्ष होती ग्वान अलेसी या कर्मचाऱ्याची.
त्यांनी सांगितलं एपस्टीन दिवसाला तीन 'असे मसाज' घ्यायचा. अलेसी नंतर ती मसाजची खोली साफ करायचे. या खोलीत अनेक सेक्स टॉईज पडलेले असायचे आणि मग अलेसी ते सेक्स टॉईज गोळा करायचे, बास्केटमध्ये भरायचे आणि गिलीनच्या कपाटात ठेवून द्यायचे. हे कपाट गिलीन आणि एपस्टीनच्या बेडरूममध्ये होतं.
अलेसी यांनी सांगितलं की एपस्टीन किंवा गिलीन कधीकधी या मुलींना घेऊन यायला सांगायचे. गिलीनने त्यांना 59 पानांचं नियमांचं एक पुस्तक दिलं होतं. घरात काम करणाऱ्या सगळ्या कर्मचाऱ्यांना हे नियम पाळणं गरजेचं होतं.
यानुसार घरातल्या सगळ्या कर्मचाऱ्यांनी आपले डोळे, कान आणि तोंड बंद ठेवायचं होतं. एपस्टीनच्या नजरेला नजर देण्याचीही बंदी होती.
गिलीन तुरुंगात होती तेव्हा तिच्या भावाने बीबीसीला सांगितलं की तिला एका लहानशा कोठडीत ठेवलं जातंय.
"तिच्यावर 24 तास लक्ष ठेवलं जातंय, तिच्या कोठडीत 10 CCTV कॅमेरे आहेत. तिला तिच्या कोठडीच्या कोपऱ्यात जाता येत नाही आणि कोठडीच्या दरवाजापाशी जायची परवानगी नाही. आता हेच तिचं अस्तित्व आहे."
तोंडात चांदीचा चमचा घेऊन जन्मलेल्या महिलेचं हे आताचं आयुष्य.
गिलीन कायम प्रकाशझोतात राहिली. माध्यमांमध्ये तिच्या बातम्या येत राहिल्या, ती सेलिब्रिटी होती, तिच्या पार्ट्यांच्या कायम चर्चा व्हायच्या, पण तरीही तिचं खरं रूप काय? तिने जे केलं ते का केलं? ती कुठे असायची, कशी जगली याबद्दल फार कमी जणांना माहिती होती.
तिचा उदय आणि अस्त लोकांच्या डोळ्यादेखत झाला तरीही तिच्याविषयी संपूर्ण खरं काय ते कोणालाच कळलं नाही.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)