लैंगिक आरोग्य : सेक्सदरम्यान स्त्रीच्या संमतीविना पुरुषाने काँडम काढला तर..

    • Author, रॅचेल स्टोनहाऊस,
    • Role, न्यूजबीट.

दोन वर्षांपूर्वी गेमा (नाव बदललं आहे) यांचा एका माणसाशी शरीरसंबंध आला, तेव्हा त्या माणसाने गेमा यांना माहिती नसताना व त्यांच्या संमतीविना संबंधांच्यावेळेस कॉंडम काढला होता.

युनायटेड किंगडममधील कायद्यानुसार, अशा प्रकारच्या लपवाछपवीची कृती म्हणजे 'स्टेल्दिंग' (कॉंडम घालून परस्परांशी संभोग करायचं ठरलेलं असताना पुरुषाने स्त्रीच्या संमतीविना लपवाछपवीने कॉंडम काढण्याचं कृत्य) हा बलात्कार मानला जातो. पण आतापर्यंत अशा केवळ एकाच प्रकरणात यशस्वीरित्या खटला चालवण्यात आला आहे. 2019 साली हा खटला झाला होता.

"माझ्याबाबतीत असं काही घडेपर्यंत मला स्टेल्दिंगविषयी काहीच माहिती नव्हतं," ती रेडिओ-1 न्यूजबीटशी बोलताना म्हणाली.

"त्याने काय केलंय हे मला नंतरच कळलं आणि मला खूप वाईट वाटलं नि चिंताही वाटायला लागली.

"मी गर्भनिरोधक गोळी घेतली, पण पुढच्या महिन्यात पाळी आली नाही तेव्हा मी गरोदरपणाची चाचणी केली."

ही चाचणी पॉझिटिव्ह आल्याचं गेमा सांगते. आपण गरोदर आहोत हे कळल्यावर तिला धक्का बसला.

'गर्भपातासाठी 50 पौंड खर्च येतो, असं त्याने मला सांगितलं'

"मी खूपच चिडले, भावनिक झाले आणि गोंधळून गेले. मी संबंधित माणसाला मेसेजवरून हे कळवलं, पण त्याला यात काही मोठंसं झालंय असं वाटतच नव्हतं.

गर्भपातासाठी 50 पौंड खर्च येतो असं त्याने मला सांगितलं. पण माझं आयुष्यच या घटनेने बदलून गेलं.

"शेवटी मी गर्भपाताचा निर्णय घेतला, पण हा निर्णय घेणं माझ्यासाठी खूप अवघड होतं- मला मूल हवं होतं, पण परिस्थिती योग्य नसल्याचंही मला कळत होतं, त्यामुळे मी यावर स्वतःला खूप दोष देत राहिले."

गेमाने तिचा अनुभव पोलिसांना सांगितला, पण या तक्रारीचं पुढे काही झालं नाही.

"हा बलात्कारच असल्याचं माझ्या लक्षात आलं, आणि मी गरोदर राहिले होते, तेव्हा मी पोलिसांकडे गेले."

पोलीस त्या माणसाशी बोलले, पण इथे 'मी त्याच्या विरोधात बोलत होते आणि तो नाकारत होता', आणि इतर काही पुरावा नव्हता, असं पोलिसांनी सांगितलं.

गेल्या वर्षी बीबीसी-वनच्या 'आय मे डिस्ट्रॉय यू' या मालिकेमध्ये हा विषय हाताळण्यात आला होता.

या मालिकेच्या चौथ्या भागात आराबेला मुख्य पात्र एका पुरुषाशी शारीरिक संबंध ठेवतं, आणि तो माणूस तिच्या नजरेआड कॉंडम काढतो.

अनेक स्त्रियांप्रमाणे आराबेलालासुद्धा हा बलात्कार असल्याचं तेव्हा लक्षात येत नाही. नंतर ती या विषयावरचा पॉडकास्ट ऐकते तेव्हा तिला हे कळतं.

'आपण बलात्काराबद्दल बोलतो आहोत'

'रेप क्रायसिस' या स्वयंसेवी संस्थेच्या प्रवक्त्या म्हणाल्या की, स्टेल्दिंग हा प्रकार 'अधिकाधिक' घडल्याचं कानावर येतं आहे.

"अशा घटना जास्त घडत असल्यामुळे तक्रारींचं प्रमाण वाढलं आहे की लोक आता याबद्दल अधिक जागरूक झालेत आणि मोकळेपणाने यावर चर्चा होत आहेत, म्हणून हे प्रमाण वाढलंय, याबद्दल काही सांगणं अवघड आहे," असं या संस्थेच्या केटी रसेल म्हणाल्या.

'स्टेल्दिंग' ही संज्ञा फारशी उपयुक्त नाही, असंही त्यांना वाटतं.

"ही तुलनेने नवीन संज्ञा आहे आणि नक्की काय प्रकार आहे हे लोकांना कळण्यासाठी असा वापर एकाअर्थी उपयोगी असतो, पण दुसऱ्या बाजूने पाहिलं तर त्यातून दिशाभूल होते."

"अशा संज्ञेच्या वापराने ती कृती सौम्य असल्याचं भासतं, पण प्रत्यक्षात आपण बलात्काराबद्दल बोलत असतो.

"हा संमतीविना कॉंडम काढण्याचा प्रकार आहे, असं आपण स्पष्टपणे म्हणायला हवं. गंमतीत, किंवा खोडसाळपणे करून पाहावं आणि तरीही बेमालूनपणे त्यातून अंग काढून घ्यावं- असा हा प्रकार नाही.

हे अतिशय गंभीर कृत्य आहे, त्याचा समोरच्या व्यक्तीच्या संपूर्ण जीवनावर आणि आरोग्यावर खरोखरच हानिकारक परिणाम होऊ शकतो."

स्टेल्दिंगचे प्रकार किती संख्येने घडतात, याची आकडेवारी 'रेप क्रायसिस'कडे किंवा पोलिसांकडे उपलब्ध नाही, कारण अशा कृत्यांची नोंद बलात्कार म्हणून होते.

'नॅशनल पोलीस चीफ्स कौन्सिल'चे प्रवक्ते सांगतात: '101 नंबरवर फोन करून किंवा प्रत्यक्ष पोलीस स्टेशनमध्ये येऊन अशा घटनांची माहिती द्यावी, असं आम्ही लोकांना कायमच आवाहन करत आलो आहोत.'

आपल्याबाबतीतही अशीच घटना घडल्याचं एडम बार्बरा नटमी सांगते.

"मी कोणाशी तरी सहजपणे संबंध ठेवले होते आणि सेक्स करताना त्यांनी माझ्या परवानगीशिवाय कॉंडम काढला.

मी त्यांना याबद्दल जाब विचारला, पण त्यांनी असं काही केल्याचं नाकारलं नि ते आक्रमक झाले. मग मी त्यांच्याशी बोलणं थांबवायचं ठरवलं," ती न्यूजबीटशी बोलताना म्हणाली.

"मी याबद्दल पोलिसांकडे तक्रार केली नाही, कारण मला हवं तसं काही त्यातून निष्पन्न होईल असं मला वाटलं नाही.

"बलात्काराच्या प्रकरणांमध्ये तपासाला बराच वेळ लागतो आणि तुमची सगळी उपकरणं जब्त केली जातात, हे मला चांगलंच माहीत होतं. प्रकरण सुटायला खूप वेळ जातो. मला या सगळ्यातून जायचं नव्हतं."

गेल्या पाच वर्षांमध्ये पोलिसांकडे येणाऱ्या बलात्काराच्या तक्रारींची संख्या वाढली आहे, पण ही प्रकरण न्यायालयांमध्ये जाण्याचं प्रमाण अर्ध्याहून कमी झालं आहे.

'क्राउन प्रोसिक्यूशन सर्व्हिस'ने एका निवेदनाद्वारे न्यूजबीटला सांगितलं की, "बलात्काराची प्रकरणं न्यायालयांमध्ये जावीत यासाठी प्रयत्न वाढवण्याचा निश्चय आम्ही केला आहे. खूपच थोड्या पीडितांना न्याय मिळतोय. ही परिस्थिती बदलण्यासाठी आम्ही जोरकसपणे खटपट करतो आहोत."

एडम आता लैंगिक आरोग्य क्षेत्रात काम करते. स्टेल्दिंगच्या घटनांची नोंद घेणारी, फौजदारी न्याय यंत्रणेचा सहभाग नसणारी पद्धत असावी, असं तिला वाटतं.

'मी आता ते स्वीकारलं आहे'

"मला वाटतं, असे प्रकार खूप वेळा घडतात आणि पीडितांना तक्रार करता येईल, पण पोलिसांचा सहभाग त्यात नसेल, अशा रितीने काहीतरी मार्ग निघायला हवा, असं मला वाटतं," ती म्हणते.

"मी आता ते स्वीकारलं आहे. मला एखादा लैंगिक संक्रमणातून होणारा आजार झाला असेल की काय, अशी सर्वांत मोठी भीती मला तेव्हा वाटली होती. आम्ही निव्वळ तात्पुरते संबंध ठेवले होते, त्यात काही घनिष्ठ नातं नव्हतं.

"असे तात्पुरते सहज संबंध असतील तर आपापल्या मर्यादांचा आदर ठेवणं आणि सुरक्षितपणे वागणं अतिशय महत्त्वाचं असतं, विशेषतः अनेक लोकांशी सेक्स होत असेल, तर हे जास्तच गंभीर ठरतं, त्यामुळे मी चिडले होते."

केट पार्कर या वकील असून 'स्कूल्स कन्सेन्ट प्रोजेक्ट'च्या संचालक म्हणून कार्यरत आहेत. तरुण माणसांना संमतीविषयी शिकवणारी ही संस्था आहे. कायद्यानुसार स्टेल्दिंग हा बलात्कार मानला जातो, हे कळल्यावर अनेकांना आश्चर्य वाटतं, असं त्या सांगतात.

"कॉंडमचा वापर करून सेक्स करायला कोणीतरी संमती दिली आहे, त्यामुळे तुम्ही कॉंडम काढायला समोरच्या व्यक्तीने संमती दिली नसतानाही तुम्ही तसं केलंत, तर तो गुन्हा ठरतो."

मर्यादांचा आदर राखण्याशी संबंधित व्यापक संवादांमध्ये याचा उहापोह व्हायला हवा आणि संमतीचा मुद्दा अभ्यासक्रमांमध्ये समाविष्ट करायला हवा, असं त्या सांगतात.

"सध्या सेक्स आणि नातेसंबंध यांविषयी सर्व शाळांमध्ये शिकवलं जातं, पण संमतीचा विषय पर्यायी असतो, त्यामुळे काही शाळा या विषयाला अजिबातच स्पर्श करत नाहीत.

"माझ्या मते, सेक्स एज्युकेशनमध्ये संमतीचा मुद्दा असणं अतिशय आवश्यक आहे. तरुण लोकांना याबद्दल योग्यरित्या शिकवलं जाताना दिसत नाही."

'स्टेल्दिंगमुळे आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं'

या घटनेचा आपल्या आयुष्यावरील परिणाम उद्ध्वस्त करणारा होता, असं गेमा सांगते. या विषयाबाबत अधिक माहिती दिली जायला हवी, असं तिलाही वाटतं.

"त्या घटनेनंतर मला घरी जाऊन राहावं लागलं, कारण माझ्या फ्लॅटमध्ये असताना मला कायम त्याच घटनेची आठवण यायची आणि त्यातून बाहेर पडायला मला उपचारांची गरज भासली.

"स्टेल्दिंगमुळे आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं. या संदर्भात आपण लोकांना अधिक माहिती द्यायला हवी."

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)