स्वतःच्या लेकीपेक्षा चांगले मार्क्स मिळवतो म्हणून आईने केला तिच्या वर्गमित्राचा खून

शाळेतील स्पर्धा तीव्र झाली आहे पण त्या स्पर्धेचा तणाव पालकांवरही पडतो हे अनेक उदाहरणातून दिसून आलं आहे. पण या स्पर्धेच्या तणावाचा बळी एक छोटा मुलगा ठरला.

आपल्या मुलीपेक्षा जास्त मार्क्स मिळवणाऱ्या मुलाची हत्या करण्याचाच निर्णय एका महिलेनी घेतला आणि त्या मुलाचा यात जीव गेला.

पुद्दुचेरीच्या कराईकल शहरात राहणाऱ्या एका महिलेने मुलीच्या वर्गमित्राचा खून केला. या महिलेने त्या मुलाच्या सॉफ्ट ड्रिंकमध्ये काही गोळ्या टाकून दिल्या आणि त्याची प्रकृती बिघडली.

हे शीतपेय प्यायल्यानंतर या शाळकरी मुलाला चक्कर आणि उलटयांचा त्रास व्हायला लागला. म्हणून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दोन दिवसांच्या उपचारांनंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.

नेमकं काय झालं?

आरोपी महिलेची मुलगी खासगी शाळेत आठवीत शिकत होती त्याच शाळेत, तिच्या वर्गात हा चुणचुणीत मुलगा देखील शिकत होता. तो अभ्यासातही हुशार होता आणि इतर उपक्रमांतही सहभाग घ्यायचा.

या मुलामुळेच आपल्या मुलीला संधी मिळत नाही अशी या महिलेची समजूत झाली आणि त्या मुलाचा काटा काढण्याचा निर्णय तिने घेतला.

त्या महिलेनी शीतपेयांच्या दोन बाटल्यांमध्ये गोळ्या मिसळल्या आणि ते शाळेच्या सुरक्षारक्षकाकडे सोपवले आणि त्या मुलाला द्यायला सांगितले.

सुरक्षारक्षकाला वाटले की त्याचाच घरातील व्यक्तीने हे दिले आहे. त्याने ते त्या मुलाला दिले आणि मुलाने त्याचे प्राशन केले.

त्या मुलाला घरी गेल्यावर उलट्या होऊ लागल्या. त्याच्या पालकांनी त्याला तत्काळ कराईकल येथील सरकारी रुग्णालयात हलवलं. तिथे त्याच्यावर उपचार करण्यात आले.

मुलाला दवाखान्यात दाखल करून मुलाचे आईवडील आणि नातेवाईक शाळेत गेले, तिथे त्यांनी चौकशी सुरू केली.

त्यावेळी गेटवर असणाऱ्या सिक्युरिटी गार्डने त्यांना सॉफ्ट ड्रिंक घेऊन आलेल्या महिलेची माहिती दिली. त्यानंतर सीसीटीव्ही फुटेज चेक करून पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली.

त्यानंतर हे सॉफ्ट ड्रिंक त्या मुलाच्या वर्गमैत्रिणीच्या आईने दिल्याचं पोलीस तपासात उघड झालं.

या महिलेने चौकशी दरम्यान परस्परविरोधी माहिती दिल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. पोलिसी खाक्या दाखवल्यावर मात्र या महिलेने सर्व कबूल केलं. हा मुलगा अभ्यासात तर हुशार होताच पण सोबतच तो शालेय उपक्रमांमध्येही पुढे असायचा. याच गोष्टीबाबत त्या महिलेच्या मनात ईर्ष्या उत्पन्न झाली.

दोन दिवसांपासून उपचार घेत असलेल्या या मुलाचा शनिवारी रात्री अकराच्या सुमारास मृत्यू झाला. यानंतर त्याचे आईवडील आणि नातेवाईकांनी रुग्णालय परिसरात निदर्शने केली. यावर पुद्दुचेरी सरकारने चौकशीचे आदेश दिले आहेत.

यावर पोलीस काय म्हणाले?

बीबीसी तमिळने कराईकलचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक लोकेश्वरन यांच्याशी या विषयावर चर्चा केली.

त्यांनी सांगितलं की, "त्या महिलेने आपल्या जबाबात म्हटलंय की, तो मुलगा शाळेत हुशार होता. त्यामुळे तिच्या मनात त्याच्याविषयी द्वेषभावना निर्माण झाली होती. त्या दिवशी शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन होणार होतं. आणि त्याला या कार्यक्रमात भरपूर बक्षिसे मिळणार होती.

"त्यामुळे तिने मेडिकलमधून काही गोळ्या घेतल्या. तीन गोळ्या असणारी तीन पाकीट तिने घेतली. सोबतच तिने सॉफ्ट ड्रिंकच्या 2 बॉटल्स घेतल्या आणि गोळ्यांचं एक एक पाकीट मिक्स केलं. पुढे या बॉटल्स तिने शाळेत जाऊन सिक्युरिटी गार्डच्या हातात दिल्या," असे पोलिसांनी सांगितले.

त्यांनी पुढे सांगितलं की, "या विद्यार्थ्याने शाळेतच एक बॉटल प्यायली होती. नंतर दुसरी बॉटल घेऊन तो घरी आला आणि त्याला उलट्या सुरू झाल्या. त्याला दवाखान्यात नेल्यावर दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवार रात्री 9 पर्यंत त्याची प्रकृती स्थिर होती. पण रात्री 11 च्या सुमारास त्याला कफ झाला आणि गुदमरून त्याचा जीव गेला."

खुनाच्या आरोपाखाली महिलेला अटक

लोकेश्वरन पुढे सांगतात की, बक्षीस मिळू नयेत म्हणून या महिलेने त्याला या गोळ्या दिल्या होत्या.

"मुलाचा मृत्यू कोणत्या कारणामुळे झाला याचा तपास डॉक्टर करत आहेत. चौकशी अहवाल आल्यावरच पुढच्या गोष्टी समजतील. सध्या या महिलेवर आयपीसीच्या कलम 302 अन्वये गुन्हा दाखल केला असून तिला अटक केली आहे.

"चौकशी सुरू असताना ही महिला मानसिकदृष्ट्या स्थिर नसल्याचं जाणवलं. हा मुलगा अभ्यासात तिच्या मुलीच्या पुढे असल्यामुळे तिला त्याचा मत्सर वाटू लागला होता का अशा सर्व शक्यतांचा आम्ही तपास करीत आहोत."असं ही लोकेश्वरन यांनी सांगितलं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)