अशीन विराथू : या बौद्ध भिक्खूंना 'म्यानमारचा लादेन' का म्हटलं जातं?

म्यानमारच्या लष्करी सरकारने वादग्रस्त बौद्ध भिक्खू अशीन विराथू यांची सुटका केली आहे. विराथू राष्ट्रवादी आणि मुस्लीमविरोधी भूमिकेसाठी ओळखले जातात.

यापूर्वी त्यांच्यावर नागरी सरकारने राजद्रोहाचा खटला दाखल केला होता. म्यानमारमध्ये फेब्रुवारी महिन्यात सैन्याने नागरी सरकार हटवून सत्ता स्वतःच्या ताब्यात घेतली.

आक्रमक भाषणं करणारे विराथू लष्कराचं समर्थन करणारी भूमिका घेत आले आहेत.

मुस्लिमांना आणि विशेषतः रोहिंग्यांना लक्ष्य करणाऱ्या त्यांच्या भाषणांमुळे त्यांना 'बौद्ध बिन लादेन' असंही संबोधलं जातं.

गेल्या काही वर्षांमध्ये ते सैन्याच्या पाठिंब्यावर झालेल्या सभांमध्ये सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं. या सभांमध्ये त्यांनी राष्ट्रवादी विचार मांडणारी भाषणं केली आणि म्यानमारच्या नेत्या आँग सान स्यू की यांच्यावर व त्यांच्या नेतृत्वाखालील 'नॅशनल लीग फॉर डेमॉक्रसी'च्या सरकारवर टीका केली.

गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात शरणागती पत्करली

नागरी सरकारविरोधात 'द्वेष' भडकावून सरकारचा 'अवमान' केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली.

यानंतर विराथू फरार झाले. पण गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये ते प्रशासनाला शरण आले. त्यानंतर त्यांना सुनावणीची वाट पाहावी लागली.

सोमवारी (6 सप्टेंबर) लष्करी सरकारने विराथू यांच्या विरोधातील सर्व खटले रद्द केले आणि या निर्णयाचं कोणतंही कारण सरकारने दिलेलं नाही.

विराथू यांच्यावर सैनिकी रुग्णालयात उपचार सुरू आहेत आणि अजून त्यांची तब्येत सुधारलेली नाही, असंही लष्करी सरकारने सांगितलं.

कोण आहेत अशीन विराथू?

म्यानमारमध्ये रोहिंग्या मुस्लिमांविरोधात झालेल्या हिंसाचारादरम्यान कट्टरतावादी बौद्ध भिक्खू अशीन विराथू चर्चेत आले.

रॉयटर्स या वृत्तसंस्थेनुसार, रोहिंग्यांवरील हिंसक कारवाईच्या विरोधात इंडोनेशियामध्ये म्यानमारच्या दूतावासाबाहेर निदर्शनं झाली, त्या वेळी निदर्शनकर्त्यांच्या हातातील फलकांवर अशीन विराथू यांच्या छायाचित्रांवर 'अतिरेकी' असं लिहिलं होतं.

विराथू त्यांच्या भाषणांमधून अल्पसंख्याक मुस्लिमांविरोधात वातावरणनिर्मिती करतात, असा आरोप पूर्वीपासून होत आला आहे.

जानेवारी 2015 मध्ये विराथू यांनी संयुक्त राष्ट्रांच्या म्यानमारमधील विशेष प्रतिनिधी यांगी ली यांच्या विरोधात 'कुत्री' आणि 'वेश्या' असे शब्द वापरले, तेव्हा त्यांच्यावर बरीच टीका झाली.

वादांच्या भोवऱ्यात

दशकभरापूर्वी मंडालेमधील या बौद्ध भिक्खूविषयी फारशा लोकांना माहिती नव्हती.

1968 साली जन्मलेल्या अशीन विराथू यांनी चौदाव्या वर्षी शाळा सोडली आणि भिक्खू जीवनाचा स्वीकार केला.

विराथू 2001 साली राष्ट्रवादी आणि मुस्लीमविरोधी भूमिका घेणाऱ्या '969' या संघटनेशी जोडले गेले, तेव्हा त्यांचं नाव लोकांपर्यंत पोहोचलं. म्यानमारमध्ये ही संघटना कट्टरतावादी मानली जाते, पण संघटनेचे समर्थक मात्र हा आरोप नाकारतात.

विराथू यांना 2003 साली 25 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली, पण 2010 मध्ये इतर राजकीय कैद्यांसोबत त्यांची सुटका झाली.

प्रसिद्धीच्या झोतात कसे आले?

सरकारने नियम शिथील केल्यानंतर लगेचच विराथू समाजमाध्यमांवर सक्रिय झाले.

त्यांनी यूट्यूब व फेसबुक यांचा वापर करून स्वतःच्या विचारांचा प्रचार सुरू केला. सध्या फेसबुकवर त्यांचे 45 हजारांहून अधिक फॉलोअर आहेत.

2012 साली राखाइन प्रांतातील रोहिंग्या मुसलमान व बौद्ध यांच्यात हिंसक संघर्ष सुरू झाला, तेव्हा विराथू चिथावणीखोर भाषणं करून लोकांच्या भावनांना हात घातला.

भाषणाची सुरुवात कशी करतात?

"तुम्ही कोणतंही काम राष्ट्रवादी भूमिकेतून करायला हवं," या खास वाक्याने ते भाषणाची सुरुवात करतात. त्यांची भाषणं ऑनलाइन प्रसारित होतात आणि स्वाभाविकपणे त्यांचा अधिकाधिक प्रसार होत जातो.

परंतु, राजकीय कोलाहलाच्या काळात अशीन विराथू यांची भाषणबाजी खूपच तीव्र झाली.

तुम्ही म्यानमारमधील बिन लादेन आहात का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला, तेव्हा अशा प्रकारचं वर्णन कोणी केलं तर आपण ते नाकारणार नाही, असं ते म्हणाले.

आपण शांतता प्रस्थापित करण्यासाठी कार्यरत असल्याचंही ते म्हणतात, असं काही बातम्यांवरून कळतं.

त्यांचं उद्दिष्ट काय आहे?

जुलै 2013 मध्ये 'टाइम' या नियतकालिकाने मुखपृष्ठावर अशीन विराथू यांचं छायाचित्र छापलं आणि त्या अंकाचा मथळा होता- 'दी फेस ऑफ बुद्धिस्ट टेरर' (बौद्ध दहशतवादाचा चेहरा).

त्यांच्या भाषणांमधून वैरभाव जाणवतो, आणि मुस्लीम समुदाय, विशेषतः रोहिंग्या मुस्लीम, या वैरभावाच्या लक्ष्यस्थानी असतात.

रोहिंग्या मुस्लिमांना बाहेरच्या देशात हाकलून द्यावं, अशी मागणी करणाऱ्या मोर्च्यांचं नेतृत्वही त्यांनी केलं आहे.

हिंसक संघर्षांसाठी मुस्लीम जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला आणि मुस्लिमांच्या जन्मदरासंदर्भातही काही निराधार विधानं केली.

बौद्ध महिलांचं सक्तीने धर्मांतर केलं जात असल्याचाही दावा त्यांनी केला होता.

कौतुक आणि टीका

सरकारच्या परवानगीशिवाय बौद्ध महिलांना इतर धर्मांमधील पुरुषांशी विवाह करू देऊ नये आणि या संदर्भात बंदी आणणाला कायदा करावा, यासाठी चालवल्या जाणाऱ्या मोहिमेचंही विराथू समर्थन करतात.

म्यानमारमधील बौद्ध भिक्खू समुदायाचा विराथू यांना कितपत पाठिंबा मिळेल, हे सांगणं जवळपास अशक्य आहे. त्यांच्या विरोधात टीकेचे सूरही उमटले आहेत.

बाहेरच्या देशात मात्र विराथू हे बौद्ध समुदायाचा चेहरा म्हणून प्रसिद्धीच्या झोतात आले आहेत.

विराथू यांच्या विरोधात तक्रार केली जात नाही, तोवर त्यांच्यावर कारवाई केली जाणार नाही, असं आधीच्या सरकारमधील धर्मविषयक मंत्रालयाने म्हटलं होतं.

विराथू त्यांच्या महिलाविरोधी विचारांसाठीही ओळखले जातात. महिलांची दडपणूक करणाऱ्या विवाहविषयक कायद्यांचं त्यांनी समर्थन केल्याचं सांगितलं जातं.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो क

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)