NEET मध्ये नापास झालात? 'या' आहेत MBBS शिवाय वैद्यकीय क्षेत्रातील करिअरच्या उत्तम संधी

फोटो स्रोत, Getty Images
- Author, प्रियंका झा
- Role, बीबीसी प्रतिनिधी
दिल्लीत राहणाऱ्या दिव्य शर्मा याचं डॉक्टर व्हायचं स्वप्न होतं. मात्र वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळण्यासाठी आवश्यक असणाऱ्या नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रान्स टेस्टमध्ये (एनईईटी) त्याला यश मिळालं नाही. मग त्यानं त्याच्या मनात असलेल्या दुसऱ्या पर्यायाकडे मोर्चा वळवला.
हा दुसरा पर्याय म्हणजे 'प्लॅन बी' होता आयुर्वेद. आज तो बनारस हिंदू युनिव्हर्सिटीत (बीएचयू) बीएएमएसचं (बॅचरल्स ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन अँड सर्जरी) शिक्षण घेत आहे.
दरवर्षी लाखो विद्यार्थी नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रान्स टेस्टमध्ये (एनईईटी) यशस्वी होण्याचा प्रयत्न करतात.
अनेकांना यश मिळतं, तर अनेकजण यात अपयशीदेखील ठरतात. मात्र जर या प्रवेश परीक्षेत यश मिळालं नाही, तर करिअरचे मार्ग बंद होतात का? अजिबात नाही.
दिव्यच्या अनुभवातून हेच दिसतं की, नीट परीक्षा उत्तीर्ण होणं हा काही करिअरमध्ये यशस्वी होण्याचा किंवा वैद्यकीय क्षेत्रात करिअर करण्याचा शेवटचा पर्याय नाही. उलट वैद्यकीय क्षेत्रातील इतर पर्यायांसाठी यामुळे मार्ग खुले होऊ शकतात.
दिव्य 2020 मध्ये 12वीची परीक्षा उत्तीर्ण झाला. त्यानंतर त्यानं लागोपाठ 2 वर्षे 'नीट' परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी प्रयत्न केले. 2020 मध्ये त्याच्यासोबत 13 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. मात्र यात जवळपास 7.5 लाख विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
मात्र जे उत्तीर्ण झाले नाहीत, त्यांचं काय?
दिव्य म्हणतो की, पहिला पर्याय म्हणजे आणखी एक वेळा नीट परीक्षा देणं हा आहे.
तो म्हणाला, "माझ्याबाबतीत असंच झालं होतं. माझ्या प्रयत्नात मी काही मार्कांनी नीट परीक्षा उत्तीर्ण होता होता राहिला होतो. मग वाटलं की, दुसऱ्या प्रयत्नात तर अगदी उत्तीर्ण होईन. मात्र तसं झालं नाही. अर्थात, अनेक विद्यार्थी दुसऱ्या प्रयत्नातही परीक्षा उत्तीर्ण होतात."
या लेखात नीट व्यतिरिक्त करिअरच्या इतर पर्यायांबद्दल जाणून घेऊया.
इतर कोणते पर्याय आहेत?
भारतात एमबीबीएस अभ्यासक्रमात प्रवेश घेण्यासाठी जी प्रवेश परीक्षा उत्तीर्ण करावी लागते, त्याला नीट परीक्षा म्हणतात.
नॅशनल मेडिकल कमिशननुसार, भारतात 13 लाख, 86 हजार, 190 ॲलोपॅथिक डॉक्टर आहेत.
आयुष मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, आयुर्वेद, योग, नॅचरोपॅथी, यूनानी, सिद्ध आणि होमिओपॅथी (आयुष) सारख्या पारंपारिक भारतीय वैद्यकीय पद्धतींमध्ये 7.5 लाखांहून अधिक नोंदणीकृत प्रॅक्टिशनर आहेत.
ज्यावेळेस आपण वैद्यकीय क्षेत्राचा विचार करतो, तेव्हा आपल्या मनात सर्वात आधी डॉक्टर होण्याचा विचार येतो. मात्र एमबीबीएसव्यतिरिक्त इतरही अनेक अभ्यासक्रम आहेत, जे पूर्ण करून वैद्यकीय क्षेत्रात चांगलं करिअर करता येतं.

फोटो स्रोत, Getty Images
या मुद्द्यावर भर देत एज्युकेशनिस्ट आणि करिअर काउन्सलर डॉक्टर अमित त्रिपाठी म्हणतात की, भारतात लोकांमध्ये गैरसमज आहे की वैद्यकीय क्षेत्र म्हणजे फक्त डॉक्टर होणं.
त्रिपाठी बीबीसीला म्हणाले, "आरोग्य सेवेचा विचार केला, तर फक्त 15-20 टक्के लोक डॉक्टर असतात. तर आरोग्य सेवा क्षेत्रातील 80- 85 टक्के मनुष्यबळ अलाईड हेल्थकेअर प्रोफेशनल म्हणजे सहाय्यक आरोग्य सेवांशी निगडीत असतं. यात नर्सिंग, रेडिओलॉजी, लॅब टेक्नोलॉजी, फिजिओथेरेपी, फार्मसी, ऑपरेशन थिएटर टेक्निशियनसारख्या क्षेत्रांचा समावेश आहे."
"कायरोप्रॅक्टिक आणि कॉस्मेटिक मेडिसीन या क्षेत्रांचाही विस्तार होतो आहे. आकडेवारीतून दिसून येतं की, नीट परीक्षेत अपयश येणं म्हणजे करिअरचा शेवट होणं नाही."
'पॅरामेडिकल कोर्स हादेखील असू शकतो पर्याय'
हाच मुद्दा पुढे नेत मोशन एज्युकेशनचे संयुक्त संचालक आणि नीट डिव्हिजनचे प्रमुख अमित वर्मा म्हणतात की, जर कोणी नीट परीक्षा उत्तीर्ण होत नसेल तर त्याच्याकडे पॅरामेडिकल कोर्सचा पर्याय नेहमीच असतो.
ते पुढे म्हणतात की, दरवर्षी जानेवारी-फेब्रुवारीदरम्यान नीट परीक्षेचा फॉर्म निघतो आणि मग मे महिन्यात ही परीक्षा होते. डिसेंबर किंवा जानेवारीपर्यंत परीक्षेची तारीख जाहीर केली जाते. मात्र सर्वसाधारणपणे परीक्षेचा निकाल जूनच्या मध्याच्या सुमारास येतो.
अमित यांच्या मते, विद्यार्थ्यांनी फक्त नीट परीक्षेवर अवलंबून राहण्याऐवजी प्लॅन बी तयार ठेवावा. नीटच्या तयारीव्यतिरिक्त पॅरामेडिकल अभ्यासक्रमांवरदेखील लक्ष ठेवावं.
त्यांच्या मते 'प्लॅन बी'ची तयारी करण्याची हीच योग्य वेळ असते. कारण या वेळेस विद्यार्थ्यांच्या हातात परीक्षेसाठी तयारी करण्यासाठी 6 महिन्यांचा कालावधी असतो.

फोटो स्रोत, Getty Images
विरोहन, पॅरामेडिकल आणि अलाइड हेल्थकेअर प्रोग्रॅमसाठी अनेक प्रसिद्ध कॉलेजांचं इंडस्ट्री पार्टनर आहे.
त्याचे सह-संस्थापक नलिन सलूजा म्हणतात की, विद्यार्थ्यांच्या बाजूची सर्वात मोठी गोष्ट म्हणजे, त्यांना बहुतांश अभ्यासक्रमांसाठी कोणतीही वेगळी तयारी करावी लागत नाही.
ते म्हणतात, "बीएससी नर्सिंग, फिजिओथेरेपी, अलाइड हेल्थकेअरचा पाया 11वी आणि 12वीच्या भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्रावरच आधारलेला असतो. त्याचा अभ्यास तुम्ही नीटसाठीदेखील करता."
"सर्वसाधारणपणे या सर्व अभ्यासक्रमांसाठीचे फॉर्म मार्च ते ऑगस्टदरम्यान येतात. नीट परीक्षेच्या निकालाची वाट पाहण्याऐवजी विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमांसाठी देखील अर्ज केला पाहिजे. जेणेकरून त्यांना सीट न मिळण्याचा धोका राहणार नाही," असंही ते नमूद करतात.
कोणत्या अभ्यासक्रमांचा पर्याय आहे?
चांगल्या करिअरच्या संधी असणारे कोणते पॅरामेडिकल कोर्सेस आहेत, हे विचारलं असता डॉक्टर अमित त्रिपाठी यांनी पुढील अभ्यासक्रमांबद्दल सांगितलं.
बीएसएसी नर्सिंग: हे जगातील सर्वात सुरक्षित, स्थिर हेल्थकेअर करिअर मानलं जातं. आयसीयू, एनआयसीयू, ऑपरेशन थिएटर, आपत्कालीन परिस्थितीत यांना सर्वाधिक मागणी असते. त्याचबरोबर परदेशात नोकरी करण्याची देखील यामुळे मोठी संधी मिळते.
यात प्रवेश घेण्यासाठी स्टेट/कॉलेज लेव्हलची प्रवेश परीक्षा द्यावी लागते. काही प्रकरणांमध्ये मेरिटच्या आधारे प्रवेश मिळतात. यात सुरुवातीला 25 हजार ते 40 हजार रुपये पगार असू शकतो. अनुभव मिळाल्यानंतर पगार 1 लाख रुपयांपर्यंतसुद्धा जाऊ शकतो.
बीपीटी म्हणजे बॅचलर ऑफ फिजिओथेरेपी: क्रीडा, न्युरो, ऑर्थोच्या क्षेत्रात फिजिओथेरेपिस्टची मागणी वेगानं वाढते आहे. यात प्रवेश घेण्यासाठी राज्य स्तरावर वेगवेगळ्या प्रवेश परीक्षा असतात.
काही ठिकाणी सीयूईटी किंवा नीटचे गुणदेखील आवश्यक असतात. फिजिओथेरेपिस्ट वेगवेगळ्या हॉस्पिटल-क्लिनिकमध्ये नोकरी करू शकतात. तसंच स्वतंत्रपणे खासगी प्रॅक्टिसचा मार्गदेखील निवडू शकतात.
बीएमएलटी म्हणजे बॅचलर ऑफ मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी: पॅथॉलॉजी, आयव्हीएफ, हॉस्पिटलमध्ये यांना मोठी मागणी असते. विशेषकरून कोरोनाच्या संकटानंतर यांना असणारी मागणी वाढली आहे. या अभ्यासक्रमात मेरिटच्या आधारे प्रवेश मिळतो किंवा संबंधित कॉलेज/विद्यापीठाची परीक्षा द्यावी लागते.
बीएससी रेडिओलॉजी/इमेजिंग: सीटी स्कॅन, एमआरआय, एक्स-रेसाठी ज्या तंत्रज्ञांची आवश्यकता असते, ते हेच असतात. यामध्ये 60 हजारांपासून ते 1 लाख रुपयांपर्यंत पगार असू शकतो. अनुभवावर पगार अवलंबून असतो. यासाठी मेरिट किंवा कॉलच्या प्रवेश परीक्षेवर प्रवेश अवलंबून असतो.
बॅचलर्स इन फार्मसी: औषध निर्मिती क्षेत्र हे भारतातील तिसरं सर्वात मोठं क्षेत्र असल्याचं सांगत अमित त्रिपाठी म्हणतात की, औषधांच्या निर्मितीशी संबंधित हा 4 वर्षांचा अभ्यासक्रम असतो. म्हणजे औषधांची निर्मिती कशी होते आणि त्यांचा वापर कसा होतो.
यात सुरुवातीला 20 हजार ते 35 हजार रुपयांदरम्यान पगार असू शकतो. अनुभवानुसार तो वाढत जातो. यासाठी राज्य स्तरावर प्रवेश परीक्षा द्यावी लागते किंवा मेरिटच्या आधारे प्रवेश होतो.
बॅचलर ऑफ व्होकेशन: कमी फी भरून लवकर नोकरी मिळवण्याचा हा पर्याय आहे. रेडिओलॉजी, ऑपरेशन थिएटर, डायलिसिस, इमरर्जन्सी केअरमध्ये या प्रोफेशनलची आवश्यकता असते.
अर्थात याची स्वीकार्यता नर्सिंग किंवा फिजिओथेरेपीइतकी नाही. यात थेट मेरिटच्या आधारे देखील प्रवेश मिळू शकतो.
कॉस्मेटोलॉजी, ॲस्थेटिक मेडिसिन: हे आज वेगानं विस्तारत जाणारं क्षेत्र आहे. त्वचा, केस, अँटी-एजिंग, लेझर ट्रीटमेंट, बोटॉक्स, फिलर्ससारख्या उपचारांची मागणी भारतात वेगानं वाढते आहे. अनेक ठिकाणी याचे क्लिनिक सुरू होत आहेत.
अर्थात, यात एमबीबीएस करणाऱ्यांना प्राधान्य दिलं जातं. मात्र एमबीबीएस न करतादेखील डिप्लोमा किंवा सर्टिफिकेट कोर्स केले जाऊ शकतात.
याव्यतिरिक्त बीएएमएस (आयुर्वेद), बीएचएमएस (होमिओपॅथी), बीएनवायएस (न्युरोपॅथी आणि योग सायन्स), बीयूएमएस (यूनानी) हेदेखील पर्यायी कोर्स असू शकतात.

फोटो स्रोत, Getty Images
नलिन सलूजा म्हणतात की, नर्सिंगसाठी अनेक राज्य वेगवेगळ्या प्रवेश परीक्षा घेतात. उदाहरणार्थ, राजस्थानात आरयूएचएस, उत्तर प्रदेशात यूपी सीएनईटी, पश्चिम बंगालमध्ये जेईएनपीएएस यूजी इत्यादी.
याव्यतिरिक्त काही आघाडीच्या संस्था स्वतंत्रपणे त्यांच्या प्रवेश परीक्षा घेतात. उदाहरणार्थ बीएससी नर्सिंग ऑनर्समध्ये प्रवेश देण्यासाठी एम्स स्वतंत्रपणे प्रवेश परीक्षा घेतं.
याचप्रमाणे, फिजिओथेरेपीसाठी देखील बिहार कम्बाइंड एंट्रन्स कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन (बीसीईसीई), कम्बाईंड पॅरामेडिकल, नर्सिंग अँड फार्मसी एंट्रन्स टेस्ट (सीपीएनईटी) सारख्या परीक्षा असतात.
अर्थात इंद्रप्रस्थ विद्यापीठाच्या आयपीयू सीईटीप्रमाणेच अनेक विद्यापीठ स्वतंत्रपणे प्रवेश परीक्षा घेतात.
पुढे जाण्यापूर्वी कोणत्या गोष्टींची खबरदारी घ्यावी?
यातील कोणता अभ्यासक्रम कोणत्या विद्यार्थ्यासाठी योग्य ठरेल, हे कसं ठरवायचं, हा प्रश्न मनात उपस्थित होऊ शकतो. याला उत्तर देताना अमित वर्मा म्हणतात की, अभ्यासक्रमाची निवड करण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत.
सर्वात आधी अभ्यासक्रम, विद्यार्थ्याच्या आवडीनुरुप असला पाहिजे. म्हणजे जर एखाद्याला रुग्णाची देखभाल करणं आवडत असेल, एखाद्याला लॅबमधील काम आवडत असेल, तर एखाद्याला उपकरणांमध्ये रस असेल किंवा एखाद्याला संशोधनात आवड असेल.
- तुम्ही जो अभ्यासक्रम निवडत आहात, त्यात नोकरीच्या किती संधी आहेत ते पाहा.
- अभ्यासक्रमाची व्हॅलिडिटी किंवा त्याची रेप्युटेशन कशी आहे. जे कॉलेज तुम्ही निवडत आहात, त्याला यूजीसी-एआयसीटीई किंवा संबंधित संस्थेची मान्यता आहे की नाही.
- ते कॉलेज तुम्हाला एखाद्या हॉस्पिटलमध्ये इंटर्नशिपची सुविधा देतं की नाही हेही लक्षात घ्या.
- कॉलेजचं प्लेसमेंटचं रेकॉर्डदेखील लक्षात घ्या.
- फी किती आहे आणि अभ्यासक्रमाचा कालावधी किती दिवसांचा आहे, हेदेखील लक्षात घ्या.
वैद्यकीय क्षेत्रातीलच कोर्स केल्यानंतर कुठे नोकरीच्या संधी मिळू शकतात, याबद्दल जाणकार म्हणतात.
- सरकारी किंवा खासगी, दोन्ही प्रकारच्या हॉस्पिटलमध्ये काम मिळू शकतं
- डायग्नोस्टिक लॅबमध्ये चांगली नोकरी मिळू शकते
- रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये विद्यार्थ्यांना करिअर करण्याची संधी मिळू शकते
- नर्सिंग होम किंवा खासगी क्लिनिकमध्ये नोकरी करणं हा देखील एक पर्याय आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











