'CLAT' ही परीक्षा कशासाठी असते? कायद्याच्या क्षेत्रात करिअरच्या कोणत्या संधी आहेत?

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, भारतातील 26 नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीमधून कायद्याचं शिक्षण घेणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे.
    • Author, प्रियंका झा
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

जर तुम्हाला कोणी कायद्याचं शिक्षण घेण्याबद्दल विचारलं तर तुमच्या डोळ्यासमोर न्यायालयातील एखाद्या पांढरा शर्ट आणि काळा कोट घातलेल्या वकिलाचं चित्रच येईल.

मात्र कायद्याचं शिक्षण घेणारे फक्त वकिलीच करतात किंवा न्यायाधीशच होतात का?

तर याचं उत्तर आहे, नाही!

त्यामुळेच भारतातील 26 नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीमधून कायद्याचं शिक्षण घेणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे.

गेल्या वर्षी जवळपास 75 हजार उमेदवारांनी या लॉ युनिव्हर्सिटीमधील तीन-साडे तीन हजार जागांसाठी मार्ग मोकळा करणाऱ्या प्रवेश परीक्षेत म्हणजे कॉमन लॉ ॲडमिशन टेस्ट (क्लॅट) (CLAT) दिली होती. यात अंडर-ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट अशा दोन्ही परीक्षा देणाऱ्यांचा समावेश आहे.

तरुण या परीक्षेत इतका रस का घेत आहेत? त्यामागचं कारण म्हणजे या परीक्षेमुळे आणि शिक्षणानंतर खुल्या होणाऱ्या संधी.

कायद्याचं शिक्षण घेणाऱ्यांचं करियर किंवा भवितव्य आता फक्त कोर्ट रूम किंवा न्यायालय किंवा पेपरवर्कपुरतंच मर्यादित राहिलेलं नाही. तर यामुळे न्यायव्यवस्थेव्यतिरिक्त कॉर्पोरेट लॉ फर्म, कंपनीचे बोर्डरूम, पॉलिसी थिंक टँक, इंटरनॅशनल कंपन्यांमधील संधी आणि इतकंच काय आंत्रप्रेन्युअर होण्याचे मार्ग खुले झाले आहेत.

ही परीक्षा नेमकी काय असते आणि त्याच्या कक्षेत नेमकं काय-काय येतं? हे जाणून घेऊया.

CLAT काय असते?

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

क्लॅटचा अर्थ आहे कॉमन लॉ ॲडमिशन टेस्ट. ही नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी (एनएलयू) मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी होणारी प्रवेश परीक्षा आहे.

ही नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, बंगळूरू, हैदराबाद, भोपाळ, कोलकाता, जोधपूर, रायपूर, गांधीनगर, सिलवासा, लखनौ, पंजाब, पाटणा, कोची, ओडिशा, रांची, आसाम, विशाखापट्टणम, तिरुचिरापल्ली, मुंबई, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, सिमला, जबलपूर, हरियाणा, अगरतला, प्रयागराज आणि गोवा यासारख्या देशातील वेगवेगळ्या भागात आहे.

कंसोर्शियम ऑफ एनएलयूज वर्षातून एकदा ही परीक्षा घेतं. यात इंग्रजी, करंट अफेअर्स, लीगल रीजनिंग, लॉजिकल रीजनिंग आणि क्वांटिटेटिव्ह टेक्नीक्स यासारख्या पाच गोष्टींमधील विद्यार्थ्यांची क्षमता लक्षात घेतली जाते.

जे तरुण यात यशस्वी होतात, त्यांना पाच वर्षांसाठीच्या इंटीग्रेटेड लॉ प्रोग्रॅममध्ये प्रवेश मिळतो. उदाहरणार्थ बीए-एलएलबी, बीबीए-एलएलबी आणि बीकॉम-एलएलबी. दरवर्षी डिसेंबर महिन्याच्या पहिल्या रविवारी ही परीक्षा होते.

क्लॅट परीक्षेद्वारेच पोस्ट ग्रॅज्युएट अभ्यासक्रमामध्येही प्रवेश मिळतो. त्याचा कालावधी एक वर्षांचा असतो.

ही परीक्षा कोणाला देते येते?

यूजी (पदवी) आणि पीजी (पदव्युत्तर) या दोन्ही परीक्षा देणाऱ्यांसाठी वयाची कोणतीही कमाल अट नाही.

12 वीत किमान 45 टक्के गुण मिळालेल्या प्रत्येक उमेदवाराला यूजी परीक्षा देते येते. तर आरक्षण असलेल्या वर्गातील उमेदवाराला 40 टक्के गुण असल्यास ही परीक्षा देता येते.

यूजी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना 12 वीत असतानाच ही परीक्षा देता येते. म्हणजेच जे विद्यार्थी पुढील वर्षी मे महिन्यात 12 वी पास होतील, त्यांना पुढील महिन्यात होणाऱ्या परीक्षेला बसता येईल.

तर पीजीसाठी उमेदवाराला एलएलबीमध्ये किमान 50 टक्के गुण मिळालेलं असणं आवश्यक आहे. आरक्षण असलेल्या वर्गातील उमेदवाराला यात पाच टक्के गुणांची सूट दिली जाते.

ग्राफिक कार्ड

कोणती एनएलयू याचा भाग आहे, अभ्यासक्रमात काय-काय असतं, प्रश्न-पत्रिका कशी असते तसंच इतर काही प्रश्नांची उत्तरं कंसोर्शियम ऑफ एनएलयूजच्या वेबसाईटवर मिळतील.

मात्र ही परीक्षा पास होणं कठीण असल्याचं मानलं जातं. कारण यात जागा कमी असतात आणि दरवर्षी ही परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या खूपच जास्त असते. 26 एनएलयूमध्ये अंडरग्रॅज्युएट कोर्ससाठी 3,000-3,500 जागा असतात.

आणखी एक मुद्दा म्हणजे, एनएलयू दिल्ली दरवर्षी एक स्वतंत्र परीक्षा घेते. त्याला ऑल इंडिया लॉ एंट्रन्स टेस्ट (एआयएलईटी) म्हटलं जातं. ही परीक्षा क्लॅट नंतर एक आठवड्यानं होतं. एनएलयू दिल्लीमध्ये एलएलबी करण्यासाठी 120 जागा आहेत तर एलएलएमसाठी 81 जागा आहेत.

कोर्सचं स्वरूप काय असतं?

जोधपूर नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीची गणना टॉप पाच एनएलयूमध्ये केली जाते. केशव मालपाणी यांनी क्लॅटच्या माध्यमातूनच 2015 साली इथे प्रवेश घेतला होता. त्यानंतर त्यांनी कॉर्पोरेट लॉयर म्हणून काम केलं.

नंतर त्यांनी क्लॅटची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना शिकवण्यास सुरूवात केली. ते एक यूट्यूब चॅनल चालवतात. त्यावर ते या परीक्षेशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टींबद्दल माहिती देतात.

या अभ्यासक्रमाबद्दल ते म्हणतात की आधी लोक तीन वर्षांची पदवी घ्यायचे आणि त्यानंतर तीन वर्षांचं लॉ चं शिक्षण घ्यायचे. मात्र आता या अभ्यासक्रमाद्वारे या दोन्ही गोष्टी पाच वर्षांमध्येच होतात.

यात नंतरच्या दोन वर्षांमध्ये विद्यार्थी त्यांचा ऑनर्स कोर्स निवडतात. म्हणजेच जर त्यांना कॉर्पोरेट लॉमध्ये स्पेशलायझेशन करायचं आहे की कॉन्स्टिट्यूशन लॉमध्ये करायचं आहे की ट्रेड लॉमध्ये करायचं आहे की मग क्रिमिनल लॉमध्ये करायचं आहे.

ग्राफिक कार्ड

केशव बीबीसीशी बोलताना म्हणाले की, "क्लॅटचा सर्वात मोठा फायदा म्हणजे कोणत्याही शाखेतील विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकतात. मला वाटतं की लॉ ला एक प्रोफेशन म्हणून अजूनही कमी लेखलं जातं."

"लोकांना वाटतं की तुम्ही कायद्याचं शिक्षण घेतल्यानंतर वकीलच व्हाल. लोकांना हे माहित नाही की अलीकडे लॉ मध्ये काय नवनवीन गोष्टी आल्या आहेत."

केशव पुढे म्हणतात, "अलीकडे सर्वात मोठा पर्याय आला आहे, कॉर्पोरेट लॉयर होण्याचा. म्हणजेचे कॉर्पोरेट लॉयर याची खातरमजा करतात की ते ज्या कंपनीत काम करत आहेत, तिथे कायद्याचं पूर्णपणे पालन होतं आहे. त्यांच्यावर कंपनीच्या कंत्रांटांची जबाबदारी असते."

"तसंच मोठ्या डील किंवा विलीनीकरण किंवा खरेदी-विक्रीचे व्यवहार यात त्यांची महत्त्वाची भूमिका असते. ते बिझनेस सेटअप मध्येही मदत करतात."

याव्यतिरिक्त अनेक पर्याय आहेत, उदाहरणार्थ, लिटिगेशन. म्हणजे प्रॅक्टिसिंग लॉयर बनणं. ज्युडिशियल सर्व्हिसेसमध्ये जाणं किंवा न्यायाधीश होणं. कोणत्याही मोठ्या लॉ फर्ममध्ये काम करणं.

केशव मालपाणी म्हणतात की जसजशी वकिलांची मागणी वाढेल, तसतशी त्यांना शिकवणाऱ्यांची संख्यादेखील वाढेल. त्यामुळे जर कोणाची इच्छा असेल तर ते लेक्चरर किंवा लॉ प्रोफेसर देखील होऊ शकतात.

प्लेसमेंट आणि पर्याय

केशव मालपाणींचं म्हणणं आहे की जे टॉप पाच-सहा एनएलयू आहेत, तिथे लंडन, दुबई आणि सिंगापूरमधील कॉर्पोरेट लॉ फर्मदेखील प्लेसमेंटसाठी येतात. याशिवाय मोठ्या खासगी बँका किंवा मोठ्या आयटी कंपन्यादेखील एनएलयूमधून पास झालेल्या तरुणांना चांगल्या पॅकेजवर नोकऱ्या देतात.

ते आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उल्लेख करत लॉ चं शिक्षण घेणाऱ्यांचं महत्त्व अधोरेखित करतात.

ते म्हणतात, "एआय आल्यामुळे अनेक नवनवीन कंपन्या बनत आहेत. देश-परदेशात अनेक स्टार्ट-अप येत आहेत. या सर्व कंपन्यांना वकिलांची आवश्यकता आहे. याशिवाय भारतात स्पेशलाईज्ड कॉर्पोरेट लॉ फर्मदेखील आहेत. त्यामध्ये सुरुवातीलाच मिळणारा पगार खूप आकर्षक असतो."

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, क्लॅटचा अर्थ आहे कॉमन लॉ ॲडमिशन टेस्ट. ही नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी (एनएलयू) मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी होणारी प्रवेश परीक्षा आहे.

हरियाणाच्या रहिवासी कनिका जैननं 12 वीचं शिक्षण राजस्थानात केलं होतं. तिच्या कुटुंबात वकिलीची पार्श्वभूमी अजिबात नव्हती. एका शिक्षकाकडून तिला क्लॅटबद्दल माहिती मिळाली.

मग तिनं एक कॉर्पोरेट लॉयर व्हायचं ठरवलं. आता ती नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी ओडिशामध्ये शिकते आहे.

कनिकाचं म्हणणं आहे, "ओडिशा एनएलयूबद्दल बोलायचं तर, इथे कॉर्पोरेट लॉचं शिक्षण घेणारे अधिक आहेत. या लोकांना सुरूवातीलाच मिळणारा वार्षिक पगार 15 लाख ते 25 लाख रुपयांपर्यंत असू शकतो."

अर्थात कोणाला 15 लाख वार्षिक पगाराची नोकरी मिळणार आणि कोणाला 25 लाखांची, हे त्या विद्यार्थ्याच्या पाच वर्षांच्या कामगिरीवर अवलंबून असतं. यात विद्यार्थ्याचे ग्रेड पॉईंट्स आणि या पाच वर्षामध्ये त्यानं केलेल्या इंटर्नशिप्समधील कामगिरीची आढावा घेतला जातो.

शैक्षणिक शुल्काबद्दल बोलायचं तर ते प्रत्येक विद्यापीठानुसार वेगवेगळं असतं. उदाहरणार्थ, ओडिशा एनएलयूमध्ये ते वार्षिक जवळपास 1 लाख 40 हजार आहे. तर एनएलयू, मेघालयमध्ये ते जवळपास 1 लाख 90 हजार आहे. याव्यतिरिक्त फॉर्म भरताना देखील विद्यार्थ्यांना 4,000 रुपये भरावे लागतात.

कशी करतात तयारी?

शेवटी सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे ही परीक्षा पास होण्यासाठी कशाप्रकारे तयारी केली पाहिजे. आम्ही कनिकाला हाच प्रश्न विचारला.

त्यावर कनिका म्हणाली, "सर्वात आधी गणिताचा सराव सुरू केला पाहिजे. विद्यार्थी अनेकदा विचार करतात की गणिताचा सेक्शन शेवटी असतो आणि अनेकदा विद्यार्थी तो अटेंप्ट करत नाहीत. उलट ते इतर सेक्शनमध्ये चांगली गुण मिळवण्याचा प्रयत्न करतात."

त्या म्हणतात, "मात्र गणिताचा सेक्शन नक्की सोडवला पाहिजे. कारण हाच एकमेव सेक्शन आहे, ज्यात तुम्ही पूर्ण मार्क मिळवू शकतात. म्हणजेच परीक्षा पास होण्याची शक्यता तितकीच अधिक असते."

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

कनिका म्हणते की मॉक टेस्ट देत राहिली पाहिजे. त्यामागचं कारण म्हणजे ती खऱ्या परीक्षेपेक्षा अधिक कठीण असतात. जर कोणी ती पास झालं, तर तुम्ही जेव्हा परीक्षा द्याल तेव्हा ती सोपी जाईल.

कनिका यांच्या मते जनरल नॉलेजचा अभ्यास करताना नोट्स घेत राहिल्यामुळे रिव्हीजन करणं सोपं होतं.

कनिका म्हणते, "परीक्षा देताना कोणालाही पूर्ण दिवसभर अभ्यास करण्याची आवश्यकता नाही. तसंच भीती बाळगण्याचीही आवश्यकता नाही. परीक्षा देताना मन जितकं शांत असेल, तितकंच वेळेचं व्यवस्थापन करणं सोपं होतं. तसंच परीक्षेच्या आधी चांगली झोप घ्या."

कनिकाचं म्हणणं आहे की क्लॅटमध्ये ज्ञानापेक्षा प्रेझेन्स ऑफ माईंड म्हणजे समयसूचकता पाहिली जाते. तुम्ही 12 वीत असतानाच ही परीक्षा देत असता, त्यामुळे त्याची तयारी करण्यासाठी कोणालाही खूप वेगळी तयारी करण्याची आवश्यकता नसते.

कोचिंगशिवाय ही परीक्षा सहजपणे पास होता येतं का?

केशव म्हणतात की "हो तयारी केली असेल तर होऊ शकता. आजच्या काळात तर इंटरनेट हे सर्वात मोठं माध्यम आहे. तिथे तुम्हाला बरचसं कंटेंट मिळतं. मात्र त्याचा तोटादेखील आहे."

"कारण इतक्या मोठ्या प्रमाणात असणाऱ्या कंटेंटमधून योग्य किंवा कामाचं कोणतं हे जाणणं खूप कठीण काम आहे. त्यामुळेच मेंटर किंवा शिक्षकाकडून एक योग्य दिशा मिळते. योग्य मार्गदर्शन मिळतं."

क्लॅटसाठी अनेक खासगी कोचिंग सेंटर उपलब्ध आहेत. तिथे संपूर्ण कोर्ससाठी साधारणपणे 50 हजार ते 1 लाख रुपयांदरम्यान शुल्क असतं. मात्र ते कोचिंग सेंटर कोणत्या शहरात आहेत, ऑनलाइन आहे की ऑफलाइन यावर हे शुल्क अवलंबून असतं.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.