कॉलेज पासआऊट झाल्यानंतर नोकरी मिळवण्यासाठीचा संघर्ष; AI च्या युगात कोणत्या कौशल्यांची आहे आवश्यकता?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, कॅटी के
- Role, बीबीसी प्रतिनिधी
गेल्या 5 वर्षांमध्ये लिंक्डइन या करिअर प्लॅटफॉर्मने जवळपास 5 लाख लोकांना विचारलं, 'त्यांना त्यांच्या करिअरबद्दल काय वाटतं?'
या वर्षाचं चित्र स्पष्ट आहे. इतर सर्व वयोगटांच्या तुलनेत तरुण, फ्रेशर्स अधिक निराश दिसत आहेत.
बातम्यांमधील मथळे पाहून तरुणांमधील नैराश्य लक्षात येऊ शकतं. सर्व बाजूनं बातम्या येत आहेत की नुकतंच पदवीधर झालेल्यांना किंवा फ्रेशर्सना आयुष्यातील पहिली नोकरी मिळणं किती कठीण झालं आहे.
2023 पासून आतापर्यंत अमेरिकेत एंट्री-लेव्हलच्या नोकऱ्यांच्या जाहिरातींमध्ये 35 टक्क्यांहून अधिकची घट झाली आहे.
लिंक्डइनच्या आकडेवारीतून दिसतं की सर्वेक्षणात सहभागी झालेल्या 63 टक्के एक्झेक्युटिव्ह लोकांना वाटतं की सध्या जे काम एंट्री-लेव्हलचे कर्मचारी करतात ते काम आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) करू लागेल.
नोकऱ्यांच्या स्थितीमागचं खरं कारण आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे की नाही, या मुद्द्याबद्दल वेगवेगळी मतं आहेत.
मात्र लिंक्डइनवरील निष्कर्ष दाखवतात की प्रोफेशनल्स खरोखरच चिंताग्रस्त आहेत.
41 टक्के प्रोफेशनल्सचं म्हणणं आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये वेगानं होत असलेल्या प्रगतीचा त्यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होत आहे.
याच मुद्द्याबाबत मी लिंक्डइनचे चीफ इकॉनॉमिक अपॉर्च्युनिटी ऑफिसर अनीश रमन यांच्याशी बोलले.
त्यांनी अलीकडेच न्यूयॉर्क टाइम्समध्ये एक लेख लिहिला त्यात करिअरमधील बदलांबाबत आणि तरुणांवर त्याच्या होणाऱ्या परिणामांबद्दल सांगण्यात आलं होतं.
या चर्चेत त्यांनी अनेक व्यवहार्य सूचना केल्या. विशेषकरून सांगितलं की आगामी काळात तरुणांना कोणत्या कौशल्यांची आवश्यकता असेल.
तसंच करिअरमधील प्रगतीचा मार्ग पूर्वीप्रमाणे आता साधासरळ आणि निश्चित स्वरूपाचा का राहिला नाही.
एंट्री लेव्हलच्या नोकऱ्या मिळणं किती कठीण?
कॅटी के: अलीकडेच कॉलेजमधून पदवी घेऊन बाहेर पडलेल्या तरुणांना एंट्री लेव्हलच्या नोकऱ्या मिळणं खूप कठीण झालं आहे, अशा बातम्या मी सातत्यानं पाहते आहे. प्रत्यक्षात काय होत आहे आणि ते किती गंभीर स्वरूपाचं आहे?
अनीश रमन: हे खरं आहे आणि खूप महत्त्वाचं देखील आहे. एंट्री-लेव्हल कर्मचारी आणि नवीन पदवीधर एक प्रकारच्या 'परफेक्ट स्टॉर्म'(परिपूर्ण वादळ) ला तोंड देत आहेत. एका बाजूला मॅक्रोइकॉनॉमिक पातळीवरील अनिश्चितता नोकर भरतीवर परिणाम करते आहे.
दुसऱ्या बाजूला एआयमुळे होत असलेले प्राथमिक बदल देखील दिसत आहेत. त्याचा परिणाम असा आहे की तरुण आणि नवीन पदवीधरांमधील बेरोजगारी राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त आहे.
आमच्या अभ्यासानुसार, जेन झी त्यांच्या भविष्याबाबत सर्वाधिक निराश आहेत.

मात्र हा सद्यस्थितीत स्थिर करिअरकडून गतिमान, डायनॅमिक करिअरच्या दिशेनं मार्गक्रमण सुरू आहे. याला प्रसिद्ध लेखक चार्ल्स डिकन्स यांच्या शब्दात सांगायचं तर "हा सर्वात चांगला काळ आहे आणि सर्वात वाईटदेखील."
माझ्या मते करिअर सुरू करण्यासाठी कोणत्या तरी एका क्षणाची निवड करायची असेल, तर हा खरोखरंच चांगला काळ आहे.
एआयचा परिणाम आणि बदलांच्या या प्रक्रियेनंतर एक नवीन अर्थव्यवस्था निर्माण होईल. ज्यात लोकांकडे करिअर बनवण्याचे आणखी जास्त पर्याय असतील.
कॅटी के: काही पदवीधरांना इतरांपेक्षा जास्त अडचणींना तोंड द्यावं लागतं आहे का? दहा वर्षांपूर्वी आपल्या सर्वांना वाटायचं की आपल्या मुलांनी कॉम्प्युटर सायन्स शिकावं. आता आपण त्यांना एखाद्या दुसऱ्या क्षेत्रातील शिक्षण दिलं पाहिजे का?
अनीश रमन: कॉम्प्युटर सायन्स तेव्हादेखील आणि आजदेखील नॉलेज इकॉनॉमीचा सर्वात मोठा चेहरा राहिला आहे. मात्र नॉलेज इकॉनॉमी आता संपण्याच्या मार्गावर आहे. आता आपण एका नवीन प्रकारच्या अर्थव्यवस्थेत प्रवेश करतो आहोत.
मी गेल्या वर्षी न्यूयॉर्क टाइम्समध्ये याच विषयावर एक लेख लिहिला होता. त्यात आमच्या आकडेवारीचा उल्लेख होता.
त्यात आढळलं होतं की एका सरासरी पातळीवरील कॉम्प्युटर सॉफ्टवेअर इंजिनिअरचं 96 टक्के काम लगेच किंवा लवकरच एआयद्वारे केलं जाऊ शकतं. मात्र याचा अर्थ असा नाही की या नोकऱ्या संपतील. मात्र कॉम्प्युटर सायन्टिस्ट होण्याचा अर्थ बदलेल.

आता आम्हाला हेदेखील दिसतं आहे की एम्प्लॉयर विचारत आहेत, "तुमच्याकडे जर कॉम्प्युटर सायन्सची पदवी असेल, तर तुमच्याकडे तत्त्वज्ञानाचे जुजबी ज्ञान देखील आहे का, जेणेकरून मी जे बनवतो आहे त्याच्या नैतिक बाजू काय असतील, हे समजण्यास तुम्ही माझी मदत करू शकाल."
"आधी करिअरचा मार्ग सरळ आणि निश्चित स्वरुपाचा होता. मी अमूक अमूक पदवी घेतली आहे, आता मला ती नोकरी द्या. जोपर्यंत तुम्ही पदवी घेऊ शकत होता तोपर्यंत ही पद्धत योग्य होती. मात्र ही पद्धत त्या लोकांसाठी योग्य नव्हती जे पदवीचा खर्च उचलू शकत नव्हते."
"तसंच ज्यांची पार्श्वभूमी अशी नव्हती की ते सहजपणे पदवी घेऊ शकले असते. आता 'माझ्याकडे पदवी आहे' फक्त इतकंच म्हणणं पुरेसं नाही. आता त्या पदवीचा खरा अर्थ काय आहे, उपयोग काय आहे, हे सांगणंदेखील आवश्यक आहे."
मला वाटतं की आगमी काळात रिटेल नोकऱ्यांचं महत्त्व आधीपेक्षा खूप जास्त असेल. नॉलेज इकॉनॉमीमध्ये त्यांना तितकं महत्व मिळालं नाही. मात्र आता परिस्थिती बदलते आहे.
जर तुम्ही असं सांगू शकलात की तुम्ही अशी नोकरी केली आहे जिथे तुम्हाला फ्लेक्झिबल राहावं लागलं आणि बदलांशी जुळवून घ्यावं लागलं, तर याच कौशल्याची एम्प्लॉयरला आवश्यकता आहे. आपल्या सर्वांकडे वेगवेगळे अनुभव आहेत, वेगळी ऊर्जा आहे आणि वेगळी सहनशक्ती आहे.
यापुढच्या काळात नोकरभरती याच गुणांच्या आधारे होईल. त्यांना योग्यप्रकारे सादर करणं आपल्या हातात आहे.
आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि नोकरी
कॅटी के: मी लिंक्डइनचा एक सर्व्हे पाहिला होता. त्यात अमेरिकेतील 3,000 एक्झेक्युटिव्ह्स सहभागी झाले होते. त्यातील 63 टक्क्यांना वाटतं की एंट्री-लेव्हलची कामं एआय करू लागेल.
मग जेन झी समोर अशाच अडचणी राहतील का? त्यांनी त्यांच्याबद्दल कितीही चांगलं सांगितलं, तरीदेखील कदाचित आता त्या एंट्री-लेव्हलच्या नोकऱ्या असणारच नाहीत. कारण कंपन्या ते काम एआयकडून करून घेतील.
अनीश रमन: नक्की काय होणार हे आम्हाला माहीत नाही. मात्र इतकं नक्कीच माहीत आहे की त्याच सर्व्हेमध्ये तितकेच टक्के एक्झेक्युटिव्हस असंही म्हणाले होते की एंट्री-लेव्हल कर्मचारी नवीन कल्पना आणि नवीन दृष्टीकोन घेऊन येतात. व्यवसायाची वाढ करण्यासाठी ते खूप महत्त्वाचं असतं.
ज्या पिढीला पहिली नोकरी मिळण्यात अडचणी येत आहेत, तीच पिढी एआय-नेटिव्हदेखील आहे. ती व्यवसायांना या नव्या अर्थव्यवस्थेत नेण्यासाठी नवीन दृष्टीकोनदेखील देते आहे.
जेव्हा कोणतीही नवीन अर्थव्यवस्था उदयाला येते, तेव्हा सर्वात आधी धक्के बसतात आणि बदल होतात. जेव्हा शेतीतून कारखान्यांच्या दिशेनं वाटचाल झाली होती आणि बदल घडले होते.
तसंच कारखान्यातून काम कार्यालयांमध्ये शिफ्ट झालं होतं, तेव्हा देखील असं झालं होतं.

फोटो स्रोत, Getty Images
आज देखील आपण त्याच बदलाला सामोरं जात आहोत. लिंक्डइनच्या आकडेवारीनुसार, 2030 पर्यंत सरासरी 70 टक्के नोकऱ्यांचं स्वरुप बदलेलं असेल.
त्यावेळेस आपण सर्वजण नवीन प्रकारच्या नोकऱ्यांमध्ये काम करत असू. मग नोकरी बदललेली असो किंवा नाही. त्याचबरोबर नवीन नोकऱ्यादेखील निर्माण होतील.
दहा वर्षांपू्र्वी 'इन्फ्लुएन्सर' हे काम नव्हतं. वीस वर्षांपूर्वी 'डेटा सायंटिस्ट' नावाची नोकरीदेखील नव्हती. अजून आपण एआय नोकऱ्यांव्यतिरिक्त नवीन प्रकारच्या नोकऱ्यांची सुरुवातदेखील पाहिलेली नाही.
जर तुम्ही एंट्री-लेव्हर कर्मचारी असलात, तर हो, सध्या तुम्ही कंपन्यांच्या धोरणांवर अवलंबून आहात. कंपन्या हा बदल कशाप्रकारे हाताळतात यावर ते अवलंबून असेल.
काही कंपन्या जुन्या पद्धतीनं विचार करतील आणि त्यांची वाढ खुंटत जाईल.
मात्र काही कंपन्या लक्षात घेतील की त्यांना तरुणांना सामावून घ्यावं लागेल. जेणेकरून ते त्यांच्या नवीन व्यवसायासाठी मॉडेल बनवू शकतील आणि वेगळ्या प्रकारे विचार करण्यात मदत करू शकतील.
तरुणांनी काय केलं पाहिजे?
कॅटी के: कॉलेजमधून पदवी घेऊन नोकरी मिळवण्यासाठी संघर्ष करत असलेल्या 22 वर्षांच्या त्या तरुणाला तुम्ही काय सांगाल? त्याच्या चिंताग्रस्त पालकांना काय सांगाल?
अनीश रमन: सर्वात पहिली गोष्ट म्हणजे स्वत:ची जमेची बाजू समजून घ्या. आधी औद्योगिक क्रांतीपासून ते आतापर्यंत, बहुतांश काम तंत्रज्ञानाच्या अवतीभोवतीच फिरत राहिलं आहे. ते माणसांवर केंद्रीत नाही.
आपण लोकांना यंत्र आणि तंत्रज्ञानाबरोबर काम करणारे टास्क मॅनेजर म्हणून प्रशिक्षित करत आलो आहोत.
आता हे स्वरुप बदलणार आहे आणि माणूस कामाच्या केंद्रस्थानी असेल. तुम्हाला खरोखरंच हे जाणून घ्यावं लागेल की तुम्हाला कशात रस आहेत, तुमचं कुतुहल कशात आहेत आणि कोणत्या गोष्टीमुळे तुम्हाला प्रेरणा मिळते.
तुम्हाला हा देखील विचार करावा लागेल की असं कोणतं क्षेत्र आहे ज्यात तुम्ही इतरांपेक्षा वरचढ ठराल, तुमच्यावर मात करणे कुणालाही शक्य होणार नाही. ते क्षेत्र निवडून काम करावे लागेल.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











