AI ने माणसांची जागा घेतल्यामुळे सिंगापूरची बँक 4,000 जणांना नोकरीवरून काढणार

फोटो स्रोत, Getty Images
- Author, पीटर हॉस्किन्स
- Role, बिजनेस रिपोर्टर
सध्या माणसांकडून होणारं काम कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) करू लागल्यामुळे, येत्या तीन वर्षांमध्ये सुमारे 4,000 जणांना नोकरीवरून काढणार असल्याची घोषणा सिंगापूरच्या सगळ्यात मोठ्या बँकेने केली आहे.
सिंगापूरच्या डीबीएस बँकेच्या प्रवक्त्यांनी बीबीसीला सांगितलं, "पुढील काही वर्षांत तात्पुरत्या आणि कंत्राटी नोकऱ्यांमध्ये वाढ होणार असल्याने, नैसर्गिकरित्या नोकऱ्यांमध्ये कपात केली जाणार आहे."
कायमस्वरूपी नोकरीवर असणाऱ्यांवर सध्या याचा परिणाम होणार नाहीये. बँकेचे निवृत्त होत असलेले मुख्य कार्यकारी अधिकारी पियुष गुप्ता यांनीही सांगितलं की, येत्या काळात एआयशी संबंधित असणाऱ्या सुमारे 1,000 नवीन नोकऱ्या तयार होण्याची शक्यता आहे.
डीबीएस ही जगभरातली पहिली अशी बँक ठरली आहे, जिने एआयमुळे माणसांच्या नोकऱ्यांचं नेमकं काय होणार, याबाबत महत्त्वाचे तपशील दिले आहेत.
या कंपनीने सिंगापूरमध्ये नेमक्या किती किंवा कुणाच्या नोकऱ्या जातील हे अजूनही सांगितलेलं नाही. डीबीएसमध्ये सध्या आठ ते नऊ हजार तात्पुरते आणि कंत्राटी कामगार आहेत. या बँकेत एकूण 41 हजार लोक काम करतात.
मागच्या वर्षी पियुष गुप्ता यांनी सांगितलं होतं की, डीबीएस मागच्या दशकभरापासून एआयवर काम करत आहे.


ते पुढे म्हणाले, "आज आम्ही 350 प्रकारच्या कामांसाठी 800 हून अधिक एआय मॉडेल्स तयार करत आहोत आणि 2025 मध्ये या एआय मॉडेल्समुळे सुमारे 1 अब्ज सिंगापूर डॉलर्स (745दशलक्ष डॉलर्स) पेक्षा जास्त किमतीचा आर्थिक परिणाम होऊ शकतो."
मार्च महिन्याच्या शेवटी पियुष गुप्ता डीबीएस बँक सोडणार आहेत. सध्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी टॅन सु शान त्यांची जागा घेतील.
एआय तंत्रज्ञानाच्या वाढत्या प्रसारामुळे त्याचे फायदे आणि धोके काय असतील याकडे संपूर्ण जगाचं लक्ष वेधलं गेलं आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) ने 2024 मध्ये असं म्हटलं आहे की, एआयमुळे जगभरातील एकूण नोकऱ्यांपैकी जवळजवळ 40% नोकऱ्यांवर परिणाम होऊ शकतो.
आयएमएफच्या व्यवस्थापकीय संचालक क्रिस्टलिना जॉर्जिएवा म्हणाल्या की, "एआयमुळे बहुतांश सगळ्याच क्षेत्रातील विषमता आणखीन वाढण्याची शक्यता आहे."
बँक ऑफ इंग्लंडचे गव्हर्नर अँड्र्यू बेली यांनी गेल्या वर्षी बीबीसीला सांगितले होते की, एआय 'मोठ्या प्रमाणात नोकऱ्या संपवणारा' ठरणार नाही आणि माणसं नवीन तंत्रज्ञानासह काम करायला शिकतील.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











