AI च्या मदतीने लिहिले अख्खे पुस्तक, कलाकार-लेखकांमध्ये भीतीचे वातावरण

नाताळची भेट म्हणून झूला यावर्षी तिच्या मैत्रिणीकडून एआय लिखित पुस्तक मिळालंय.
फोटो कॅप्शन, 'लेखिका म्हणून माझा फोटो पण पुस्तक लिहिलंय AI ने आणि भेट दिलं मैत्रिणीने'
    • Author, झोई क्लेनमन
    • Role, बीबीसी न्यूज, टेक रिपोर्टर

यावर्षी ख्रिसमल मला मिळालेली एक भेट अतिशय खास होती. माझ्या एका मैत्रिणीने मला एक 'बेस्ट सेलिंग' पुस्तक गिफ्ट केलं. गंमत म्हणजे हा पुस्तकाची लेखिका मी स्वतःच होते.

"टेक - स्प्लेनिंग फॉर डमीज" हे शीर्षक असलेल्या या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर माझं नाव आणि फोटो देखील लेखक म्हणून झळकत होता. मागच्या बाजूला पुस्तकाचे अनेक भन्नाट अभिप्राय देखील लिहिलेले होते‌.

लेखक म्हणून पुस्तकावर माझं नाव जरी झळकत असलं तरी हे पुस्तक पूर्णपणे AIने लिहिलेलं होतं. जेनेट या माझ्या मैत्रिणीनं माझ्याबद्दलची जी काही जुजबी माहिती AIला पुरवली होती त्यावरून एक अख्खं पुस्तक मला लेखक कल्पून एआयनं लिहून काढलं होतं.

पुस्तक तसं अतिशय रंजक होतं. काही ठिकाणी अगदी खळखळून हसवणारे विनोद देखील वाचायला मिळाले.

व्यक्तिमत्त्व विकासाचे सल्ले आणि माझ्या आयुष्यातील काही किस्से असं मिश्रण असलेलं हे पुस्तक वाचताना अनेकदा AIनं केलेलं लिखाण बरंच पाल्हाळिक आहे, हे मात्र स्पष्टपणे जाणवलं.

माझी बोलण्याची शैली कशी आहे याची माहिती या एआयला माझ्या मैत्रिणीने पुरवली होती‌. त्यावरून मी लिहित कशी असेल, याचा अंदाज बांधत एआयनं माझ्या नावानं हे पुस्तक लिहिलं असावं.

यासाठी कदाचित एआयनं जेनेटनं माझ्याविषयी पुरवलेल्या माहितीशिवाय इतरही मार्गानं माझ्याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न केला असेल. पण बऱ्याच गोष्टी पुस्तकात वारंवार आणि ओढाताण करून लिहिल्या गेलेल्या असल्यानं काही भाग थोडासा रटाळवाणा व अतिरंजित देखील वाटला.

उदाहरणार्थ पुस्तकात बऱ्याचदा स्वतः लेखिका म्हणजेच माझा उल्लेख 'तंत्रज्ञानावर वार्तांकन करणारी आघाडीची पत्रकार,' असा केलेला आढळला.

AI ने लिहिलेल्या पुस्तकांची बाजारात धडक, कलाकार-लेखकांमध्ये भीतीचं वातावरण

फोटो स्रोत, Getty Images

जो अर्थातच खुशमस्करीचा केविलवाणा प्रकार होता. भाषेला अलंकारिक आणि साहित्यिक बनवण्याच्या नादात एआयनं अस्तित्वात नसलेल्या काल्पनिक गोष्टी देखील या पुस्तकात घुसवल्या.

जसं की माझ्या मांजरीचा उल्लेख वारंवार या पुस्तकात वेगवेगळ्या निमित्तानं (कधीकधी विनाकारण) होतो. पण प्रत्यक्षात तर मी कधी मांजर अथवा कुठलाही पाळीव प्राणी पाळलेलाच नाही. शिवाय प्रत्येक पानावर रूपकांचा भडिमार केला गेलेला पाहायला मिळाला.

बऱ्याचदा तर ते अनावश्यक आणि असंबद्ध वाटले‌. एकूणात हे लिखाण मूळ मुद्द्याला धरून कमी आणि विषयांतर करणारं जास्त वाटलं.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

आजघडीला एआयच्या मदतीनं पुस्तकं लिहून देण्याची सेवा पुरवणाऱ्या डझनभर कंपन्या आहेत. माझं हे पुस्तक बुकबायएनीवन या कंपनीनं बनवून दिलं होतं.

एआयने लिहिलेल्या या पुस्तकांविषयी अधिक जाणून घेण्यासाठी मी इस्रायल स्थित या कंपनीचे प्रमुख कार्यकारी अधिकारी आदिर माशिच यांच्याशी संपर्क साधला.

आत्तापर्यंत अशी 1,50,000 पुस्तकं आम्ही वेगवेगळ्या ग्राहकांना विकल्याचं त्यांनी सांगितलं. त्यांचा बहुतांश खप अथवा व्यवसाय हा अमेरिकेत होतो.

2024 साली त्यांनी लोकांसाठी फिरायला मार्गदर्शन करणाऱ्या एआय आधारित ट्रॅव्हल गाईड पुस्तकांपासून या व्यवसायाची सुरुवात केली होती. आता ते लोकांची लेखक होण्याची स्वप्न पूर्ण करुन देत आहेत.

एआय

फोटो स्रोत, Getty Images

या 240 पानांच्या पेपरबॅक पुस्तकाची एक प्रत ते 26 युरोंना विकतात. या कंपनीचं स्वतःचं एआय टूल असून ते त्यांनी ओपन सोर्स लार्ज लँग्वेज मॉडेलमधून विकसित केलं आहे.

आता तुम्ही हे माझं पुस्तक विकत घ्या, असं माझं म्हणणं नाही. खरंतर तुम्ही ते विकतही घेऊ शकत नाही.

कारण माझी मैत्रिण जेनेटनं हे पुस्तक कंपनीला बनवायला सांगितलं होतं. त्यामुळे हे पुस्तक अथवा त्याची प्रत कंपनी फक्त जेनेटलाच विकू शकते.

असं पुस्तक तुम्ही कोणाच्याही नावानं बनवू शकता. अगदी सेलिब्रिटीचं नावदेखील तुम्ही यासाठी वापरू शकता. तूर्तास तरी यावर कुठलं बंधन अजून आलेलं नाही. पण माशिच सांगतात की आक्षेपार्ह मजकूर रोखण्यासाठी संबंधित सूचना ते वापरत असलेल्या एआयला आधीच देण्यात आलेल्या आहेत. प्रत्येक छापलेल्या पुस्तकावर हा वैधानिक इशारा आधीच लिहिलेला असतो, "या पुस्तकातील मजकूर हा काल्पनिक असून एआयच्या आधारे तो बनवण्यात आलेला आहे‌‌. याचा उद्देश फक्त लोकांचं मनोरंजन करणं आणि त्यांना हसवणं इतकाच आहे."

AI

फोटो स्रोत, Getty Images

कायदेशीररीत्या या पुस्तकावरील बौद्धिक संपदाहक्क या कंपनीचे असतात. "अशी पुस्तकं आम्ही लोकांना वैयक्तिक भेट देण्याच्या उद्देशानं बनवलेली असून इतरांना विकण्यासाठी त्यांच्या अनेक प्रती आम्ही छापतच नाही," असं कंपनीचे कार्यकारी प्रमुख माशिच निक्षून सांगतात.

येणाऱ्या काळात आपल्या व्यवसायाचा परीघ आणखी वाढवण्याचा त्यांचा मानस असून विज्ञान-कथा, आत्मचरित्र असे साहित्यप्रकार भविष्यात निर्माण करणार असल्याचं ते सांगतात. एआयच्या मदतीने कुठलेही निर्बंध व कायदे न मोडता आपल्या ग्राहकांचं फक्त हलकं फुलकं मनोरंजन करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचंही ते म्हणाले.

लिखाण हे ज्यांच्या उदारनिर्वाहाचे साधन आहे अशा माझ्यासारख्या लोकांसाठी ही गोष्ट तशी भीतीदायकच आहे. एकतर इतकं सगळं लिखाण सूचना मिळाल्यानंतर एआय अगदी काही सेकंदात करू शकतं. ते सुद्धा काही अंशी अगदी माझ्यासारखं.

मध्यंतरी एआयने एक गाणं बनवलं आणि त्या गाण्याचा आवाज प्रसिद्ध गायक ड्रेक आणि वीकेंड या गायकांच्या आवाजाशी मिळताजुळता होता.
फोटो कॅप्शन, मध्यंतरी एआयने एक गाणं बनवलं आणि त्या गाण्याचा आवाज प्रसिद्ध गायक ड्रेक आणि वीकेंड या गायकांच्या आवाजाशी मिळताजुळता होता.

एरवी मानवाची कलात्मकता आणि सर्जनशीलतेतून जन्माला येणारा मजकूर आता एआयने बनवायला सुरुवात केल्यानं यानिमित्ताने बरेच प्रश्न उभे राहतात.

या एआय टूल्सला प्रशिक्षण देण्यासाठी वेगवेगळा मजकूर पुरवला जातो‌. जेणेकरून एआय टूल आणखी विकसित होत जाईल आणि नवीन निर्मिती आणखी दर्जेदार होत जाईल. पण एआय टूल प्रशिक्षणासाठी आपल्या कलाकृती वापरल्या जात असल्याबद्दल जगभरातील संगीतकार, लेखक, कलाकार आणि अभिनेते उघड नाराजी व्यक्त करत आहेत‌‌.

"एआय ला प्रशिक्षण देण्यासाठी जो डेटा वापरला जात आहे तो फक्त डेटा नव्हे तर कलाकारांची कलाकृती असते. त्यांनी इतक्या मेहनतीने इतका वेळ देऊन बनवलेल्या कलाकृतींचा जर एआयच्या विकासासाठी त्यांच्याच परवानगी शिवाय वापर केला जात असेल, तर ही बाब गंभीर आहे," असा इशारा एड न्यूटन रेक्स देतात. एड न्यूटन रेक्स हे फेअरली ट्रेन्ड या संस्थेचे संस्थापक आहेत‌.

AI

फोटो स्रोत, Getty Images

एआय कंपन्यांनी आपला व्यवसाय करताना कलाकारांच्या हक्कांचं जतन करावं, यासाठी त्यांची संस्था काम करते‌.

प्रशिक्षणासाठी एआय टूलला कलाकारांची पुस्तकं, लेख, फोटो, गाणी असा सगळा मजकूर पुरवला जातो. याच डेटाचं विश्लेषण करून एआय टूल तसाच मजकूर पुन्हा तयार करायला आणखी सुसज्ज होतात.

2023 साली एआयनं एक गाणं बनवलं आणि ते जगभरात प्रचंड गाजलं. कॅनडाचा प्रसिद्ध गायक ड्रेक आणि वीकेंड यांच्या आवाजात एआयनं ते गाणं बनवलं होतं‌. ते सुद्धा ड्रेक आणि वीकेंडची परवानगी न घेता.

हे गाणं या दोन गायकांचंच आहे, असा लोकांचा समज झाला. वाद निर्माण झाल्यानंतर काही दिवसांनी मग हे गाणं इंटरनेटवरून हटवलं गेलं. पण ज्यांनी एआय टूल वापरून हे गाणं बनवलं ते काही मागे हटले नाहीत. त्यांनी हे गाणं आपलंच आहे, असं सांगत ग्रॅमी पुरस्कारात नामांकनासाठी देखील पाठवलं. या गाण्याचे कलाकार हे बनावट आहेत‌‌ हे समोर आल्यानंतर सुद्धा हे गाणं प्रचंड गाजलं.

AI

फोटो स्रोत, Getty Images

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

"कलाकृती निर्माण करायला एआयवर बंदी घालावी, असं माझं अजिबात म्हणणं नाही. पण किमान प्रशिक्षण देण्यासाठी ज्या कलाकारांची कलाकृती डेटा म्हणून एआय टूलला पुरवली जात आहे, त्यासाठी आधी संबंधित कलाकारांची परवानगी एआय टूल चालवणाऱ्या व्यक्तीने / कंपनीने घ्यायला हवी, इतकंच माझं म्हणणं आहे. जे एआय वापरकर्ते अशी परवानगी घेत नाहीत फक्त त्यांच्यावरच बंदी घालण्याची आमची मागणी आहे. एआय भविष्यात खूप प्रभावी बनणार आहे. पण त्याचा वापर विघातक कार्यासाठी न होता विधायक कार्यासाठी व्हावा यादृष्टीने किमान नैतिकता आणि पारदर्शकता बाळगणं आवश्यक आहे," एड न्यूटन रेक्स आपली भूमिका स्पष्ट करताना म्हणाले.

बीबीसीसह इंग्लंडमधील काही संस्थांनी एआयला प्रशिक्षण देण्यासाठी आपला आशय वापरला जाऊ नये, अशी स्पष्ट भूमिका घेतलेली आहे. तर काही संस्थांनी एआयसोबतच सहकार्य करायला मान्यता दिलेली आहे. फायनान्शिअल टाईम्स या वृत्तसंस्थेनं चॅट जीपीटीच्या ओपन एआयसोबत अधिकृतरीत्या भागीदारी करत नव्या दिशेनं वाटचाल सुरू केली आहे.

जोपर्यंत संबंधित कलाकार थेट आक्षेप घेत नाहीत तोपर्यंत एआय डेव्हलपर्संना कुठल्याही कलाकाराचा कुठलाही मजकूर आपल्या एआय टूलला प्रशिक्षण देण्यासाठी वापरता यावा, असा नवा कायदा आणण्याचा तत्कालीन ब्रिटिश सरकारचा विचार आहे‌. तसं झालंच तर एआयच्या विकासाच्या दिशेनं पडलेलं हे मोठं पाऊल असेल.

ब्रिटिश सरकारची ही भूमिका मूर्खपणाची आहे, अशा स्पष्ट शब्दात एड न्यूटन यांनी या कायद्याचा विरोध केला.

संरक्षण, आरोग्यसेवा आणि दळणवळण अशा क्षेत्रांमध्ये एआयचा विधायक वापर होऊ शकतो. त्याने अर्थव्यवस्थेला तर फायदा होईलच शिवाय कोणाच्या हक्क आणि पोटावर पाय सुद्धा पडणार नाही. पण त्याऐवजी लेखक, पत्रकार आणि कलाकारांच्या कामांमध्ये हस्तक्षेप करून त्यांच्या अस्तित्वावरच गदा आणण्यासाठी एआयचा वापर करणं मूर्खपणाचं ठरेल, असं एड न्यूटन मानतात.

AI च्या सहाय्याने लिहिलेलं पुस्तक
फोटो कॅप्शन, AI च्या सहाय्याने लिहिलेलं पुस्तक

एआय टूल्सना प्रशिक्षण देणं सोप्पं व्हावं यासाठी बौद्धिक संपदा हक्काचा कायदाच काढून टाकण्याच्या या ब्रिटिश सरकार आणू पाहत असलेल्या प्रस्तावाचा ब्रिटनच्या संसदेतील प्रतिनिधी बॅरोनेस किड्रोन यांनी देखील विरोध केला.

"कलाक्षेत्र हा एक मोठा उद्योग आहे. या कलाक्षेत्रात अब्जावधींची उलाढाल होत असते. यात लाखो लोकांना (ब्रिटनमध्ये 24 लाख) रोजगार मिळतो आणि लोकांना रोजच्या धकाधकीच्या जीवनातून एक सुटका आणि आनंद मिळतो, तो वेगळाच. या कलाक्षेत्राचं आपल्या अर्थव्यवस्थेतील आणि आयुष्यातील योगदान वादातीत आहे. आजच्या पडत्या अर्थव्यवस्थेत जोमानं वाढ होत असलेल्या मोजक्या क्षेत्रांपैकी ते एक आहे. एआय आल्यानंतर ही वाढ वेगाने होईल, अशा खोट्या आशेपाई सरकार एकूणात या कलाक्षेत्रालाच धोक्यात आणतंय," असं म्हणत त्यांनी एआयच्या विकासासाठी कलाकृतींवरील बौद्धिक संपदाहक्क हटवण्याचा प्रस्ताव खोडून काढला.

"कलाकारांचा आपल्या कलाकृतींवरील हक्क कायम राहावा, एआय मॉडेल्सनाही प्रशिक्षणातून विकसित होण्यासाठी जास्तीत जास्त व दर्जेदार मजकूर मिळावा आणि या देवणघेवाणीच्या प्रक्रियेत पारदर्शकता असावी, हेच आमचं उद्दिष्ट आहे. ही तीनही उद्दिष्ट साध्य करण्यासाठीचा सुवर्णमध्य साधला जाणारा व्यवहारिक तोडगा जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत सरकार असा कुठलाही नवीन कायदा आणणार किंवा जुना कायदा हटवणार नाही. त्यामुळे तूर्तास तरी कोणी काळजी करण्याचं कारण नाही," असा खुलासा ब्रिटन सरकारच्या प्रतिनिधीने अधिकृतरित्या केलाय.

एआयविषयी नवा कायदा ब्रिटिश सरकार लागू करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. या कायद्याअंतर्गत सरकारकडे विविध क्षेत्रातील जमा असलेला नॅशनल डेटा लायब्ररीतील अगणित दस्तावेज एआय टूल्सना प्रशिक्षण देण्यासाठी एआय संशोधकांना खुला करण्यात येणार असल्याचं म्हटलं जात आहे.

AI

फोटो स्रोत, Getty Images

आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या उदयाच्या या पार्श्वभूमीवर अमेरिकेतील कायद्यांमध्ये काय बदल होतील, हे आता नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर अवलंबून आहे.

कलाकारांच्या कलाकृतींवरील मालकीहक्कावर एआयच्या वाढत्या हस्तक्षेपाच्या पार्श्वभूमीवर 2023 साली तेव्हाचे अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी विशेष कायदा पारित केला होता. या कायद्याअंतर्गत एआयच्या क्षेत्रात काम करत असणाऱ्या संबंधित कंपन्यांना आपल्या सगळ्या कामाची इत्यंभूत माहिती सार्वजनिक करणं बंधनकारक ठरवण्यात आलं होतं.

पण राष्ट्राध्यक्ष बनल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी आता हा कायदा रद्द केला आहे. ट्रम्प आता यासंबंधी कुठला नवीन निर्णय घेणार हे अद्याप उघड झालेलं नसलं तरी खासगी एआय कंपन्यांवरील सरकारी निर्बंध अथवा निगराणी ही कमीत कमी असायला हवी, अशी ट्रम्प यांची भूमिका असल्याचं म्हटलं जात आहे.

ही सगळी चर्चा नेमकी आत्ताच घडण्याचं कारण म्हणजे न्यूयॉर्क टाईम्ससह जगभरात अनेकांनी चॅट जीपीटी व तत्सम एआय टूल्स विरोधात न्यायालयात घेतलेली धाव. एकट्या अमेरिकेत या एआय कंपन्यांविरुद्ध आज शेकडो खटले सुरू आहेत. यात फक्त न्यूयॉर्क टाईम्ससारख्या माध्यमसंस्थाच नव्हे तर लेखक, प्रकाशक, गीतकार, संगीत निर्मिती करणारे लेबल्स, इतकंच काय तर काही कॉमेडियन्सचाही समावेश आहे.

"इंटरनेटवरून आमचा आशय आमच्या परवानगी शिवाय उचलून आपल्या एआय टूलला प्रशिक्षण देण्यासाठी तो या एआय कंपन्या वापरत असून हे आमच्या बौद्धिक / कलात्मक संपदाहक्काचं उल्लंघन आहे," असा या सगळ्यांचा आक्षेप आहे.

दुसऱ्या बाजूला आम्ही कायद्याची मर्यादा पाळूनच हा सगळा मजकूर वापरला असून यातून कोणाच्याही हक्कांचं उल्लंघन झालेलं नाही, असं प्रत्युत्तर या एआय कंपन्या देत आहेत.

पण इंटरनेटवरील उपलब्ध मजकुराचा वापर 'कायदेशीर' रीत्या झालेला आहे की नाही, हे सांगणं संबंधित कायदाच मूळात संदिग्ध असल्यामुळे अवघड आहे.

एआय चूक आहे कि बरोबर हे तूर्तास कायदा स्पष्टपणे सांगू शकत नसला तरी परवानगी न घेता अथवा कुठलेही पैसे न भरता इंटरनेटवरून मजकूर उचलत आपल्या एआय यंत्राला प्रशिक्षण देऊन या आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षेत्रातील कंपन्यांनी अनेकांची नाराजी ओढवून घेतली आहे, हे मात्र नक्की.

AI

फोटो स्रोत, Getty Images

अमेरिकन एआय कंपन्यांनी उठवलेलं वादळ अजूनही जोरात घोंघावत असताना या वादात आता डीपसीक या चिनी एआय ॲपच्या प्रवेशामुळे आणखी भर पडली आहे. आत्तापर्यंत एआय क्षेत्रात फक्त अमेरिकन कंपन्यांचा दबदबा होता. मागच्या आठवड्यात डीपसीक हे चिनी ॲप या बाजारपेठेत उतरलं‌. या ॲपने येता क्षणीच धुमाकूळ घातला असून एकाच आठवड्यात हे ॲप अमेरिकेत सर्वात जास्त ॲपल वापरकर्त्यांनी डाऊनलोड केलेलं ॲप बनलं आहे.

ओपन एआय सारख्या तत्सम अमेरिकन कंपन्या ज्या किंमतीत आर्टिफिशियल इंटेलिजन्सची सेवा ग्राहकांना पुरवत आहेत, त्यापेक्षा फार कमी किंमतीत आम्ही ही सेवा ग्राहकांना पुरवू, असा दावा डीपसीकने केलेला आहे. डीपसीकच्या या प्रवेशामुळे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या क्षेत्रातील अमेरिकेची सद्दी मोडित निघण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे अमेरिकन कंपन्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

राहता राहिली गोष्ट ती माझ्यासारख्या लेखकांची. आजघडीला तरी आर्टिफिशियल इंटेलिजन्स माझ्यासारख्या लेखकांची जागा घेऊन आमच्या रोजगारावर गदा आणेल, असं मला तरी वाटत नाही.

छोटा - मोठा मजकूर एआयला बऱ्यापैकी लिहिता येत असला तरी पुस्तकासारखा मोठा प्रकल्प लिहण्यातील एआयची मर्यादा टेक - स्प्लेनिंग फॉर डमीजमधून प्रकर्षानं माझ्यासमोर आली.

बेस्ट सेलर तर फार लांबची गोष्ट झाली पण एक मोठं पुस्तक किमान दर्जा आणि विषयाशी संबंधित राहून लिहून पूर्ण करणं, हे आज तरी एआयला जमू शकत नाही, हे स्पष्ट आहे. पुस्तकासारख्या मोठ्या प्रकल्पांमधून एआयची मर्यादा उघडी पडते.

250 पानांचं पुस्तक लिहिताना आज एआयनं त्यात भरपूर चूका केल्या. वाचताना ते पुस्तक गंभीर, आशयघन लिखाण कमी, पाल्हाळिक आणि असंबद्ध बडबड जास्त वाटत होतं. त्यामुळे आजतरी माझी नोकरी शाबूत आहे, असं म्हणता येईल.

पण उद्याचं काही सांगता येत नाही. कारण आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या तंत्रज्ञानानं आता कुठे बाळसं धरलंय. मात्र ज्या वेगानं एआय स्वतःमध्ये सुधारणा घडवून आणत आहे ते पाहता माझं लिखाणाचं कौशल्य जास्त चांगलं आहे, हा दावा मी कधीपर्यंत करू शकेल हा प्रश्नच आहे.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.