एखादा केस आणि रक्ताच्या डागांवरुन 'हे' लोक गुन्ह्याचा छडा कसा लावतात? या क्षेत्रात करिअर कसं करायचं?

महिला

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, भारतीय न्याय संहिता (बीएनएस) अंतर्गत, आता गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांचा तपास प्रभावीपणे करण्यासाठी फॉरेन्सिक पुरावे गोळा करणं आवश्यक ठरवलं आहे.
    • Author, प्रियंका झा
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

जर तुम्हाला क्राइम थिलर चित्रपट आणि ओटीटी सीरिज आवडत असतील, तर त्यात तुम्ही एक गोष्टी नक्कीच पाहिलेली असेल. ती म्हणजे, जेव्हा कोणताही गुन्हा घडतो, तेव्हा त्या गुन्ह्याची उकल करण्यासाठी पोलिसांइतकाच महत्त्वाचा ठरतो तो 'फॉरेन्सिक एक्स्पर्ट'!

गुन्हा घडलेल्या ठिकाणी राहिलेला गुन्हेगाराचा एखादा केस, हाताचे ठसे, मृतदेहाच्या नखांमध्ये आढळलेले कण किंवा मोबाईलमधील एखादा मेसेज कशाप्रकारे अतिशय महत्त्वाचा दुवा ठरतो आणि त्याद्वारे सत्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग कसा तयार होतो, असं उत्कंठावर्धक चित्रण आपण चित्रपटांमध्ये नक्की पाहिलंय.

जे लोक हे दुवे, पुरावे गोळा करून त्यांचं विश्लेषण करतात, आकलन करतात ते 'फॉरेन्सिक एक्स्पर्ट्स' हे फॉरेन्सिक सायन्सशी (न्यायवैद्यकशास्त्र) संबंधित लोक असतात. तर्क, तंत्रज्ञान आणि विज्ञान हे या क्षेत्रातील तीन महत्त्वाचे घटक आहेत.

या लेखातून या क्षेत्रातील करियर आणि नोकरीच्या संधींबद्दल जाणून घेऊया.

कोणत्या लोकांसाठी हे करियर योग्य ठरू शकतं आणि या क्षेत्रात जाण्यासाठी कोणत्या पात्रतेची आवश्यकता असते? या मुद्दयांबद्दल जाणून घेऊया.

फॉरेन्सिक सायन्समधील करियरच्या संधी

भारतीय न्याय संहिता (बीएनएस) अंतर्गत, आता गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांचा तपास प्रभावीपणे करण्यासाठी फॉरेन्सिक पुरावे गोळा करणं आवश्यक ठरवलं आहे.

जसजसं गुन्ह्यांचं प्रमाण वाढत चाललं आहे, तसतसं फॉरेन्सिक तज्ज्ञांची आवश्यकतादेखील वाढते आहे.

फॉरेन्सिक सायन्टिस्ट किंवा तज्ज्ञ म्हणजे एखादा गुन्हा घडल्याच्या ठिकाणी सापडलेल्या पुराव्यांचं विश्लेषण वैज्ञानिक पद्धतीनं करणारे तज्ज्ञ होय.

या पुराव्यांचं किंवा दुव्यांचं विश्लेषण करून हे तज्ज्ञ जो अहवाल सादर करतात, त्याच्या आधारे पोलीस, वकील, तपास यंत्रणा किंवा न्यायाधीशांना त्या प्रकरणात नेमकं काय घडलं असेल, हे समजण्यास मदत होते.

फॉरेन्सिक तज्ज्ञ कुठे काम करू शकतात:

  • केंद्रीय आणि राज्य पातळीवरील फॉरेन्सिक लॅब (सीएफएसएल/एफएसएल)
  • क्राइम इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट (सीआयडी)
  • इंटेलिजन्स ब्युरो (आयबी)
  • सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (सीबीआय)
  • पोलीस खातं
  • खासगी डिटेक्टिव्ह एजन्सी
  • सायबर क्राइम सेल
  • कोर्ट लॅबोरेटरी
  • संशोधन संस्था
महिला

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, जाणकारांच्या मते, फॉरेन्सिक सायन्सचं शिक्षण घेण्यासाठी देशात अनेक मोठ्या संस्था आहेत.

जाणकारांच्या मते, फॉरेन्सिक सायन्सचं शिक्षण घेण्यासाठी देशात अनेक मोठ्या संस्था आहेत.

त्यात नॅशनल फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटी (एनएफएसयू), इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन्सिक सायन्स (मुंबई), बनारस हिंदू विद्यापीठ (बीएचयू) आणि हैदराबादचं उस्मानिया विद्यापीठ यांचा यात समावेश आहे.

देशातील विविध राज्यांमध्ये एनएफएसयूचे कॅम्पस आहेत. या अभ्यासक्रमांसाठी एक वेगळी प्रवेश परीक्षा असते.

याव्यतिरिक्त खासगी विद्यापीठांमध्येदेखील याच्याशी निगडीत अभ्यासक्रम शिकवले जातात आणि त्यांच्यासाठी स्वतंत्र प्रवेश परीक्षा असते.

फॉरेन्सिक सायन्समध्ये कशाचा समावेश असतो?

फॉरेन्सिक सायन्समध्ये देखील फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि कॉम्प्युटर सायन्ससारख्या वेगवेगळ्या शाखा असतात.

या सर्व शाखांचा वापर गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी किंवा न्यायालयात सादर करता येतील अशा पुराव्यांची तपासणी करण्यासाठी केला जातो.

तसं पाहता फॉरेन्सिक सायन्सची व्याप्ती बरीच मोठी असते.

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, फॉरेन्सिक सायन्समधील सर्व शाखांचा वापर गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी किंवा न्यायालयात सादर करता येतील अशा पुराव्यांची तपासणी करण्यासाठी केला जातो.

मात्र, तरीदेखील प्रश्न निर्माण होतो की फॉरेन्सिक सायन्सचे किती प्रकार असतात? त्याचं उत्तर पुढीलप्रमाणे आहे,

  • फॉरेन्सिक बायोलॉजी : यात डीएनए, रक्त आणि केस यासारख्या जैविक गोष्टींचं विश्लेषण केलं जातं.
  • फॉरेन्सिक केमिस्ट्री : यात ड्रग्स, केमिकल्स आणि स्फोटकं इत्यादींची तपासणी केली जाते.
  • फॉरेन्सिक पॅथोलॉजी : यात एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूमागचं कारण आणि मृत्यूची वेळ जाणून घेण्यासाठी त्याच्या मृतदेहाची तपासणी केली जाते.
  • फॉरेन्सिक टॉक्सिकोलॉजी : मानवी शरीरात आढळणारे टॉक्सिन्स, विष आणि ड्रग्सचं विश्लेषण यात केलं जातं.
  • डिजिटल फॉरेन्सिक : इलेक्ट्रॉनिक उपकरणं आणि सायबर गुन्ह्यांचा तपास यात केला जातो.
  • फॉरेन्सिक अँथ्रोपोलॉजी : सांगाडे किंवा अवशेषांचा अभ्यास करून त्या व्यक्तीची ओळख पटवणं आणि त्याच्या मृत्यूमागचं कारण, मृत्यूची वेळ याचा छडा यात लावला जातो.
  • फॉरेन्सिक ओडोन्टोलॉजी: यात दातांशी संबंधित पुराव्यांची तपासणी केली जाते.

फॉरेन्सिक सायन्सचं क्षेत्र हा कोणासाठी योग्य पर्याय ठरतो?

जर एखाद्याला फॉरेन्सिक सायन्सचं शिक्षण घ्यायचं असेल तर त्यासाठी बारावीमध्ये फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी/मॅथ्स असणं आवश्यक असतं.

बहुतांश कॉलेजांमध्ये प्रवेश मिळण्यासाठी बारावीत किमान 50 टक्के गुण मिळणंदेखील आवश्यक असतं.

मात्र, या अटींपेक्षा महत्त्वाचं आहे की एखाद्या विद्यार्थ्यासाठी फॉरेन्सिक सायन्स हा योग्य पर्याय आहे की नाही, हे तपासणं.

सिमरन ठाकूर मूळची हिमाचल प्रदेशची आहे. तिनं ॲमिटी विद्यापीठातून 2021 मध्ये फॉरेन्सिक सायन्समध्ये बीएससी केलं होतं. त्यानंतर तिनं इथूनच एमएससी केलं आणि सध्या ती याच विषयात पीएचडी देखील करते आहे.

बारावीत सिमरनचा बायोलॉजी विषयदेखील होता. तिच्या कुटुंबाला अपेक्षा होती की मेडिकलसाठी तयारी करेल. मात्र, तिनं फॉरेन्सिक सायन्सचं क्षेत्र निवडलं.

वाहन

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, जर एखाद्याला फॉरेन्सिक सायन्सचं शिक्षण घ्यायचं असेल तर त्यासाठी 12 वीमध्ये फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी/मॅथ्स असणं आवश्यक असतं.
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

सिमरन म्हणते की फिजिक्स आणि केमिस्ट्री हे विषयदेखील तिला तितकेच आवडायचे. फॉरेन्सिक सायन्सचं शिक्षण घेण्यामागचं सर्वात मोठं कारण होतं की तिला सर्व प्रकारच्या सायन्सचं शिक्षण घ्यायचं होतं. त्याचा वापर कसा करायचा आहे, हे तिला जाणून घ्यायचं होतं.

आम्ही तिला विचारलं की एखाद्या विद्यार्थ्यामध्ये कोणती महत्त्वाची कौशल्यं असली पाहिजेत, ज्यामुळे तो या कोर्ससाठी पात्र ठरू शकतो?

त्यावर ती म्हणाली, "सर्वात आधी निरीक्षण कौशल्यावर लक्ष दिलं पाहिजे. कारण तुम्ही कुठे फेरफटका मारत असला तरीदेखील तुमचे डोळे, नाक आणि कान उघडे असले पाहिजेत."

"प्रत्येक कोपऱ्यात काय-काय दिसलं हे तुम्हाला माहित असलं पाहिजे. फॉरेन्सिक सायन्समधील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे तुम्ही किती बारकाईनं एखाद्या गोष्टीकडे पाहता."

ती पुढे म्हणाली, "दुसरा मुद्दा म्हणजे धैर्य राखणं. कधी-कधी आपण निष्कर्ष काढण्याची घाई करतो. फॉरेन्सिक सायन्समधल्या लोकांना तसं करता येत नाही. तुम्हाला भरपूर मेहनत घ्यावी लागते."

"तुम्हाला प्रत्येक गोष्टीची सखोल माहिती असणं आवश्यक असतं. शेवटी, एखादी समस्या सोडवण्याचं कौशल्य तुमच्यामध्ये असलं पाहिजे."

फॉरेन्सिक तज्ज्ञांना पुढे काय संधी असतात?

  • फॉरेन्सिक सायन्टिस्ट - हे प्रयोगशाळेत पुराव्यांची तपासणी करतात.
  • क्राइम सीन इन्व्हेस्टिगेटर - हे घटनास्थळाहून पुरावे गोळा करतात.
  • फॉरेन्सिक टॉक्सिकोलॉजिस्ट - हे शरीरात ड्रग्स किंवा विष आहे की नाही याचा छडा लावतात.
  • फॉरेन्सिक डॉक्यूमेंट एक्सपर्ट - हे हस्तलेखन, खोटी कागदपत्रं इत्यादींचं विश्लेषण करतात.
  • सायबर फॉरेन्सिक एक्सपर्ट - हे डिजिटल क्राइम आणि हॅकिंगशी संबंधित पुराव्यांचं विश्लेषण करतात.
  • डीएनए ॲनालिस्ट - हे संशयित/पीडितांच्या डीएनए नमुन्यांचा मेळ घालतात.
  • फॉरेन्सिक बॅलिस्टिक एक्सपर्ट - हे बुलेट, बंदूक आणि दारूगोळ्याचं विश्लेषण करतात.
प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, फूड इंडस्ट्रीमध्ये देखील फॉरेन्सिक तज्ज्ञ असतात, अन्नातील भेसळ फॉरेन्सिक तज्ज्ञ शोधून काढतात.

फॉरेन्सिकशी निगडीत सरकारी नोकऱ्यांसाठी परीक्षा घेतल्या जातात, त्या पुढीलप्रमाणे असतात:

  • एसएससी सीजीएल : केंद्रीय विभागांमध्ये फॉरेन्सिकशी निगडीत कामांसाठी
  • स्टेट पीएससी : राज्य सरकारच्या प्रयोगशाळेत भरती करण्यासाठी पब्लिक सर्व्हिस कमिशन
  • यूपीएससी : सीबीआय किंवा आयबीमध्ये सायंटिफिक ऑफिसर्सच्या भरतीसाठी
  • डीआरडीओ/इस्त्रो : संशोधनावर आधारित फॉरेन्सिक कामासाठी

मात्र, फॉरेन्सिक सायन्सचं शिक्षण घेणाऱ्यांना फक्त इतक्याच संधी असतात का?

डॉ. विश्वप्रकाश नाईक, नॉयडाच्या एमिटी विद्यापीठात फॉरेन्सिक सायन्स विभागाचे प्रमुख आहेत. डॉ. विश्वप्रकाश म्हणतात की बीएससी फॉरेन्सिक्स करणाऱ्यांसाठी सरकारी नोकऱ्यांमध्ये एक मोठा पर्याय असतो की ते इंटेलिजन्स ब्युरो म्हणजे आयबीमध्ये दरवर्षी होणाऱ्या भरतीसाठी अर्ज करू शकतात.

त्यांचं म्हणणं आहे, "दरवर्षी 1200-1300 उमेदवार आयबीमध्ये जातात. 2025 मध्ये तर आयबीनं जवळपास 4,000 एसीआयओ (असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर), एक्झिक्युटिव्ह पदांची भरती केली होती. यात फॉरेन्सिकच्या विद्यार्थ्यांना असलेला सर्वात मोठा फायदा म्हणजे त्यांच्याकडे निरीक्षण कौशल्यं असतात."

डॉ. नाईक यांच्यामते, "आयटी कंपन्यांमध्ये ॲनालिस्टचं काम असतं. तेदेखील फॉरेन्सिकचंच काम करतात. फूड इंडस्ट्रीमध्ये देखील फॉरेन्सिक तज्ज्ञ असतात. समजा एखाद्या अन्नपदार्थात किंवा त्याच्याशी निगडीत सामानात कोणत्याही प्रकारची भेसळ असेल, मग ते दूध असो, मिठाई असो की पनीर असो, त्यातील भेसळ फॉरेन्सिक तज्ज्ञच शोधून काढतात."

करियरमध्ये प्रगतीच्या काय शक्यता आहेत?

सिमरन ठाकूरचं म्हणणं आहे की तुम्ही 'पीएचडी इन फॉरेन्सिक' केली की तुम्हाला बऱ्याच संधी असतात.

उदाहरणार्थ- असे उमेदवार अकॅडमिक्समध्ये जाऊन शिकवू शकतात.

दुसरं म्हणजे, संशोधन करू शकतात. दररोज गुन्हे वाढत आहेत. त्यांचा तपास करून कशाप्रकारे गुन्हा केला जातो आहे हे शोधून काढण्यासाठी आपल्याला नवीन पद्धतीदेखील हव्या आहेत.

सिमरन म्हणते, "फॉरेन्सिक सायन्सचे विद्यार्थी डिटेक्टिव्ह एजन्सीबरोबर काम करू शकतात. वकिलांबरोबर काम करू शकतात. ते एकप्रकारे देशसेवा करू शकतात."

डॉक्टर नाईक यांचंदेखील असंच मत आहे. ते म्हणतात की एमएससी केल्यानंतर अनेक पर्याय खुले होतात.

महिला

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, फॉरेन्सिकच्या विद्यार्थ्यांना लॉ फर्मदेखील मागणी असते.

ते पुढे म्हणतात की ज्यांचं फिंगरप्रिंट स्टडी आणि डॉक्युमेंट विश्लेषण चांगलं आहे, ते बँकिंग क्षेत्रात आणि विमा क्षेत्रातदेखील जाऊ शकतात.

ज्यांची केमिस्ट्री चांगली आहे ते लॅबमध्ये काम करू शकतात. आता अनेक वॉटर, एअर, फूड लॅब सुरू झाल्या आहेत.

ज्यांचं आयटी कौशल्य चांगलं आहे, ते आयटी कंपन्यांमध्ये देखील जाऊ शकतात. तिथे उत्तम पगाराच्या संधी असतात.

याशिवाय, प्रायव्हेट इन्व्हेस्टिगेशन एजन्सीच्या क्षेत्रात देखील मोठ्या प्रमाणात फॉरेन्सिकच्या विद्यार्थ्यांना नोकऱ्या मिळतात.

फॉरेन्सिकच्या विद्यार्थ्यांना लॉ फर्मदेखील मागणी असते. कारण वकिलांना कायद्याच्या कलमांचं ज्ञान असतं.

मात्र, त्यांना कोणत्याही वैज्ञानिक अहवालाचं पूर्ण आकलन होत नाही.

तिथे फॉरेन्सिक एक्सपर्ट त्यांची मदत करतात. त्यानंतर ते समजून घेऊन वकील न्यायालयात युक्तिवाद करतात.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.