पालघर लोकसभा निकाल : भाजपचे हेमंत सावरा विजयी, भारती कामडींचा केला पराभव

फोटो स्रोत, FACEBOOK
- Author, नामदेव काटकर
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
पालघर लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाच्या डॉ. हेमंत विष्णू सावरा यांचा विजय झाला आहे. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या भारती कामडी यांचा पराभव केला.
सावरा यांना 6 लाख 1 हजार 244 मतं मिळाली. तर कामडी यांना 4 लाख 17 हजार 938 मतं मिळाली.
दोन्ही उमेदवारांमध्ये 1 लाख 83 हजार 306 मतांचा फरक होता. तर तिसऱ्या क्रमांकाच्या बहुजन विकास आघाडी या हितेंद्र ठाकूर यांच्या राजेश पाटील या उमेदवारानं 2 लाख 54 हजार 517 मते मिळवली.
शिवसेना, भाजप आणि काँग्रेस अशा तिन्ही प्रमुख पक्षांचे अस्तित्व असलेल्या या मतदारसंघात यंदाची लढत चुरशीची झाली. हितेंद्र ठाकूर यांच्या पक्षातर्फे उमेदवार उतरवल्यानं तिरंगी लढत झाली.
पालघर लोकसभा मतदारसंघाचा इतिहास
उत्तर मुंबई आणि डहाणू या दोन लोकसभा मतदारसंघांमधून 2008 च्या मतदारसंघ पुनर्रचनेत पालघर लोकसभा मतदारसंघाची निर्मिती झाली. डहाणू मतदारसंघातीलच बराचसा भाग आताच्या पालघर लोकसभा मतदारसंघात येतो.
डहाणू मतदारसंघात भाजप आणि कम्युनिस्टांची ताकद आहे. भाजपच्या चिंतामण वनगा यांनी अनेक वर्षे डहाणू मतदारसंघाचे खासदार म्हणून प्रतिनिधित्व केलं आहे. तसंच, त्यापूर्वी काँग्रेसच्या दामोदर शिंगडा यांनीही या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे.
मात्र, 2008 साली लोकसभा मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर इथे तीन पूर्ण आणि एक पोटनिवडणूक झाली.
पालघर लोकसभा मतदारसंघाच्या निर्मितीनंतर झालेल्या पहिल्या म्हणजे 2009 च्या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीचे बळीराम जाधव खासदार बनले. त्यानंतर 2014 च्या निवडणुकीत भाजपचे चिंतामण वनगा खासदार बनले.
चिंतामण वनगा यांचं 2018 मध्ये निधन झालं आणि त्यानंतर पोटनिवडणूक लागली. त्यात भाजपचे राजेंद्र गावित विजयी झाले. या पोटनिवडणुकीत शिवसेना आणि भाजप स्वतंत्रपणे लढले होते. त्यामुळे या निवडणुकीत रंगत आली होती.
भाजपनं राजेंद्र गावित यांना, तर शिवसेनेनं चिंतामण वनगा यांचे पुत्र श्रीनिवास वनगा यांना मैदानात उतरवलं होतं. यात राजेंद्र गावितांनी बाजी मारली.
त्यानंतर 2019 च्या निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीच्या जागावाटपात शिवसेनेच्या वाट्याला ही जागा आली. त्यावेळी शिवसेनेनं राजेंद्र गावितांनाच तिकीट दिलं, मात्र त्यासाठी भाजपमधून शिवसेनेत त्यांचा प्रवेश करवून घेण्यात आला. या राजकीय तडजोडीची त्यावेळी बरीच चर्चाही झाली.
आता शिवसेनेत दोन गट पडले आहेत आणि राजेंद्र गावित हे मूळचे भाजपचे असलेले नेते, आता शिंदे गटाकडे झुकलेले आहेत.
आताची राजकीय समीकरणं काय आहेत?
पालघर लोकसभा मतदारसंघात एकूण सहा विधानसभा मतदारसंघ येतात. आजच्या घडीला त्यातल्या तीन मतदारसंघांमध्ये बहुजन विकास आघाडीचं प्राबल्य आहे, तर इतर तीन मतदारसंघांमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार आहेत.
विधानसभा जागांच्या पातळीवर जरी भारतीय जनता पक्षाचं वर्चस्व नसलं, तरी लोकसभा मतदारसंघ म्हणून भाजपचं वर्चस्व होतं हे आधीच्या निवडणुकांमध्ये दिसून आलं होतं.

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी असताना, काँग्रेसच्या वाट्याला ही जागा येत असे. पण समीकरणं बदलल्यानं शिवेसना (उद्धव ठाकरे) पक्षाला ही जागा महाविकास आघाडीकडून मिळाली.











