इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अपघात, बचावपथक अपघातस्थळाजवळ पोहोचलं

फोटो स्रोत, REUTERS
रविवारी (19 मे)ला खराब हवामानामुळे इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्या ताफ्यातील एका हेलिकॉप्टरचा अपघात झाला आहे.
इराणच्या सरकारी वृत्तवाहिनीने अशी माहिती दिली आहे की राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरचे अवशेष अखेर सापडले आहेत.
इराणच्या रेड क्रेसेंट सोसायटीचे प्रमुख पिरहोसेन कोलीवंद यांनी या वहिनीला दिलेल्या प्रतिक्रियेत असं म्हटलं आहे की घटनास्थळाची परिस्थिती 'चांगली' नाही.
बचावपथक आता काही मिनिटांमध्ये अपघातस्थळी पोहोचणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. पिरहोसेन म्हणाले की, हेलिकॉप्टरने ज्या ठिकाणी 'हार्ड लँडिंग' केल्याचे बोलले जात आहे त्या ठिकाणापासून आमचं पथक आता अवघे 2 किमी अंतरावर आहे.
सरकारी टीव्हीने दिलेल्या माहितीनुसार अपघातस्थळावर कुणीही जिवंत असल्याचे कुठलेही संकेत मिळालेले नाहीत. एका इराणी अधिकाऱ्याचा हवाला देत रॉयटर्स या वृत्तसंस्थेने सांगितलं आहे की या अपघातात हे हेलिकॉप्टर 'पूर्णपणे जाळून खाक झालं आहे.
इराणच्या सरकारी माध्यमांनी दिलेल्या बातम्यांनुसार अपघातग्रस्त हेलिकॉप्टरमध्ये राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्यासह इराणचे परराष्ट्रमंत्री होसेन अमीर-अब्दुल्लाहियन हेही प्रवास करत होते.
राष्ट्राध्यक्षांच्या ताफ्यातील तीनपैकी एका हेलिकॉप्टरचा अपघात झाला आहे. यासोबतच इराणी माध्यमांच्या वृत्तानुसार अपघातग्रस्त झालेल्या हेलिकॉप्टरला उड्डाणादरम्यान काही तांत्रिक समस्या निर्माण झाल्या आणि त्यामुळं 'हार्ड लँडिंग' करावं लागलं.
इराण-अझरबैजान सीमावर्ती भागातून परतल्यानंतर रायसी इराणच्या वायव्येकडील तबरीझ शहराकडे जात होते, असं स्थानिक माध्यमांनी सांगितलं.
शोधकार्यात मदत करण्यासाठी रशिया त्यांचे बचाव पथक पाठवणार
रशियाच्या सरकारी माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्या शोधकार्यात मदत करण्यासाठी रशियाचं एक बचाव पथक इराणला पाठवण्यात येणार आहे.
आरआयए नोवोस्ती या वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीनुसार या बचाव पथकात एकूण 47 बचाव कर्मचारी असतील, यासोबतच काही वाहनं आणि एका हेलिकॉप्टरचाही समावेश असणार आहे. हे बचावपथक इराणच्या तबरीझ शहराकडे तात्काळ पाठवलं जाईल.
या वृत्तसंस्थेने हेही सांगितलं आहे की क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह म्हणाले की, "आम्ही पाठवत असलेल्या बचावपथकात असलेले हेलिकॉप्टर आणि कर्मचारी हे उंच ठिकाणांवर अशा मोहीम राबवण्यासाठी प्रशिक्षित करण्यात आलेले आहेत. त्यामुळे वातावरणात सुधारणा होताच आमचे विशेषज्ञ बचावकार्यात सहभागी होतील."
अपघातानंतर बनावट फोटो आणि व्हिडिओ पसरवले जात आहेत
इराणचे राष्ट्राध्यक्ष रईसी यांच्या हेलिकॉप्टरचा अपघात झाल्याची बातमी आली आणि सोशल मीडियावर चुकीची माहिती देणाऱ्या फोटो आणि व्हिडिओचा महापूर आला.
इराणच्या पूर्व अझरबैजानमध्ये घडलेल्या या अपघातानंतर डोंगराळ प्रदेशात कोसळलेल्या एका हेलिकॉप्टरचा व्हीडिओ तब्बल 16 लाख लोकांनी पाहिला.
बीबीसी व्हेरिफायने हा व्हिडिओ जुना असल्याची पुष्टी केली आहे. त्यामुळे संबंधित व्हिडिओमध्ये दिसणारं हेलिकॉप्टर हे राष्ट्राध्यक्ष रईसी यांचं नसल्याची माहिती मिळाली आहे. जो व्हिडिओ शेअर केला जातोय तो खरंतर जॉर्जियामधला असून जुलै 2022मध्ये जॉर्जिया पोलिसांच्या हेलिकॉप्टरचा झालेला अपघात या व्हिडिओमध्ये दिसत आहे.

यासोबतच राष्ट्राध्यक्ष रईसी यांच्या हेलिकॉप्टरचे अवशेष असल्याचा दावा करणारा एक फोटो देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.
हा फोटो जवळपास एक लाख लोकांनी पाहिल्याचं दिसून आलं पण 2019 मध्ये मोरोक्को येथे झालेल्या हेलिकॉप्टर अपघाताचा हा फोटो असल्याचं बीबीसी व्हेरिफाय टीमने सांगितलं आहे.
केवळ फोटो आणि व्हिडिओच नाही तर या अपघातानंतर अनेक अफवांनाही ऊत आला आहे. राष्ट्राध्यक्षांचं हेलिकॉप्टर अपघातग्रस्त झाल्यानंतर इराणच्या सरकारी वृत्तवाहिनीने त्यांचं प्रक्षेपण थांबवल्याची बातमी ही त्यापैकीच एक.

या वृत्तवाहिनेनी त्यांचं प्रक्षेपण थांबवलं नाही आणि ती वाहिनी सध्या अपघातासंदर्भातील बातम्यांचं वार्तांकन करत आहे, त्यांचं काम नियमित आणि सुरळीत सुरू आहे.
इराणच्या रेव्होल्यूशनरी गार्डस कॉर्प्सशी संलग्न असणाऱ्या फार्स हा वृत्तसंस्थेने काढून टाकलेल्या एका ट्विटमध्ये राष्ट्राध्यक्ष रईसी यांचं हेलिकॉप्टर सुरक्षित असल्याचा दावा करणारा एक फोटो प्रसारित करण्यात आला होता.
मात्र हा फोटो 2022 चा असल्याचं उघड झालं. इराणमध्ये त्यावर्षी आलेल्या पुरानंतर काढलेला तो फोटो होता आणि सध्या राष्ट्राध्यक्ष रईसी आणि त्यांच्या हेलिकॉप्टरबाबत कोणतीही ठोस माहिती मिळालेली नाही.

काहीही झालं तरी इराणच्या धोरणावर फारसा परिणाम होणार नाही
बीबीसीच्या आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी लाईस ड्युसेट यांनी लिहिलं आहे की इब्राहिम रईसी यांच्याबाबत सध्या काहीही ठोस माहिती नसली, या अपघातात त्यांचा मृत्यू झालेला असला तरीही इराणच्या परराष्ट्र किंवा देशांतर्गत धोरणावर त्याचा परिणाम होईल हे म्हणणं धाडसाचं ठरेल.
राष्ट्राध्यक्ष रईसी हे इराणचं दैनंदिन कामकाज बघत असले तरी त्यांचा प्रभाव खूपच कमी होता. इराणमध्ये त्यांचे सर्वोच्च नेतृत्वच देशाचं धोरण ठरवतं आणि त्यांचाच निर्णय अंतिम असतो.
राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्या कार्यकाळात कोणतेही मोठे धोरणात्मक बदल झालेले नाहीत त्यामुळे त्यांच्यानंतर काय असा प्रश्न फारसा निर्माण होत नाही असं दुसे यांनी लिहिलं आहे.
त्यामुळे इराणची सत्ता गाजवणाऱ्या कंजर्वेटिव्ह पक्षासाठी या अपघातानंतर सगळी कामे सामान्यतः सुरु ठेवणं हे महत्त्वाचं असणार आहे.
संपूर्ण जग या अपघाताबाबत ठोस माहितीच्या प्रतीक्षेत आहे
बीबीसीचे मध्य पूर्वेतील प्रतिनिधी सेबॅस्टियन अशर यांच्या म्हणण्यानुसार इराणमध्ये घडलेल्या अशा एखाद्या घटनेचं वार्तांकन करत असताना येणारी अडचण हीच आहे की तिथल्या अर्ध-अधिकृत वृत्तसंस्थांनी प्रसिद्ध केलेल्या माहितीवरच आपल्याला अवलंबून राहावं लागतं.
या वृत्तसंस्था नेहमीच एक ठराविक माहिती देत नाहीत. अनेकदा अधिकाऱ्यांनी असं म्हटलं हे सांगितलं जाईल पण तेच अधिकारी पुन्हा वेगळी माहिती देत असताना दिसून येतील.

फोटो स्रोत, Getty Images
त्यामुळे अयातुल्लाह खोमेनी यांनी दिलेल्या माहितीशिवाय सध्या इराणच्या अधिकाऱ्यांनी दिलेली सुस्पष्ट माहिती अजूनही उपलब्ध झालेली नाही जी तिथे नेमकं काय घडलं हे सरळ शब्दांमध्ये सांगू शकेल.
त्यामुळे इराणच्या स्थानिक वृत्तसंस्थांनी प्रसिद्ध केलेले व्हिडिओ आणि माहिती यावरच जगाला अवलंबून राहावं लागत आहे आणि जगातले बरेचसे प्रमुख नेतेदेखील याच माहितीवर अवलंबून असल्याची शक्यता नाकारता येत नाही असं सेबॅस्टियन अशर यांनी त्यांच्या वार्तांकनात म्हटलं आहे.
( बीबीसी व्हेरीफायचे शायन सरदारीजादेह आणि घोंचेह हबीबियाझाद यांच्या सहकार्याने)











