You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
नवयुग इंजिनिअरिंग : उत्तरकाशीमध्ये अपघात झाला तो बोगदा बांधणाऱ्या कंपनीचं 'हे' आहे महाराष्ट्र कनेक्शन
हिमालयातील ज्या बोगद्यात दुर्घटना झाली, तो बोगदा उभारणारी कंपनी आता चर्चेत आहे. महाराष्ट्रासह देशातल्या इतर राज्यांतील काही प्रकल्पांची कंत्राटंही या कंपनीला मिळाली आहेत.
उत्तराखंडच्या उत्तरकाशीमध्ये धरासू ते यमुनोत्रीपर्यंत नवा महामार्ग उभारला जातो आहे. त्यावरील सिलक्यारा-बारकोट बोगद्याचा काही भाग 12 नोव्हेंबरच्या सकाळी कोसळला होता.
त्यावेळी बोगद्यात अडकलेल्या 41 कामगारांची 17 दिवसांनी 28 नोव्हेंबरला सुटका करण्यात आली.
साडेचार किलोमीटर लांबीच्या सिलक्यारा-बारकोट बोगद्याच्या कामात कथितपणे नियमांची पायमल्ली झाली का असे प्रश्न विचारले जात आहेत. बांधकाम करणारी कंपनी कोणती आहे, याविषयीही लोकांच्या मनात प्रश्न आहे.
नॅशनल हायवेज अँड इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (NHIDCL) नुसार, एनएच-134 वरील या दोन पदरी बोगद्याचे बांधकाम नवयुग इंजिनिअरिंग कंपनी लिमिटेड करत आहे.
नवयुग इंजिनिअरिंग कंपनी काय आहे?
नवयुग इंजिनिअरिंग हा हैदराबाद स्थित नवयुग समूहाचा एक भाग आहे, जो बंदरे आणि रस्ते बांधकाम, वीज आणि सिंचन प्रकल्प यासारख्या क्षेत्रात कार्यरत आहे.
'रॉयटर्स' वृत्तसंस्थेच्या म्हणण्यानुसार बोगद्यात कोणत्याही प्रकारचा 'एस्केप पॅसेज' (सुटकेचा मार्ग) नव्हता, मात्र सरकारी मार्गदर्शक तत्त्वांनुसार दीड किलोमीटरपेक्षा लांब बोगद्यात आपत्कालीन परिस्थितीत बाहेर पडण्याचा मार्ग असणे आवश्यक आहे.
'एस्केप पॅसेज' किंवा सुरक्षित बाहेर पडण्याचा मार्ग म्हणजे रस्ते किंवा रेल्वे मार्गावरील लांब मुख्य बोगद्याजवळील छोटे पर्यायी बोगदे. कोणतीही दुर्घटना घडल्यास लोकांना या एस्केप पॅसेजमधऊन सुरक्षितपणे बाहेर काढता येतं किंवा त्यांना मदत करता येते.
भारतीय रेल्वेने 111 किमी लांबीच्या उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे लिंकच्या बांधकामादरम्यान 12.89 किमी लांब एस्केप बोगदा तयार केला आहे.
अपघातानंतर तयार केलेल्या तपास पथकातील एका सदस्याचा संदर्भ देत रॉयटर्सने म्हटलेलं की, सिलक्यारा बोगद्यात आपत्कालीन परिस्थितीत बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग नव्हता.
साडेचार किलोमीटर लांबीच्या सिलक्यारा-बारकोट बोगद्यासह 0.33 किलोमीटर लांबीचा मार्ग आणि 'एस्केप' बोगदा तयार करण्याचा प्रस्ताव असल्याचा उल्लेख कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर आहे.
काय दावा केला होता?
वृत्तसंस्थेने ज्या तज्ज्ञांशी संवाद साधला तो त्या टीमचा भाग आहे ज्यांना सरकारने अपघात कशामुळे झाला आणि भविष्यात तो कसा टाळता येईल याचा तपास करण्यास सांगितलेलं.
बचाव कार्यानंतर बांधकामात राहिलेल्या त्रुटींची सखोल चौकशी केली जाईल, असं समिती सदस्यांनी म्हटलंय.
भारत सरकारने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अंतर्गत बांधण्यात येणाऱ्या 29 बोगद्यांचे ऑडिट करण्यास सांगितलं आहे.
2018 मध्ये सिलक्यारा-बारकोट बोगद्याच्या बांधकामाला मंजुरी देताना आर्थिक व्यवहारांच्या मंत्रिमंडळ समितीने बांधकामाचा एकूण कालावधी चार वर्षांचा असल्याचं सांगितलेलं, तर प्रकल्पाची किंमत 111.69 कोटी रुपये असल्याचं म्हटलेलं.
‘एनएचआयडीसीएल’चं म्हणणं आहे की, आता हे काम 2024 च्या मध्यापर्यंत पूर्ण होणं अपेक्षित आहे.
हा प्रकल्प हिंदूंच्या बद्रीनाथ, केदारनाथ, यमुनोत्री आणि गंगोत्री या चार पवित्र स्थळांना जोडणाऱ्या चारधाम महामार्ग प्रकल्पाचा एक भाग आहे.
केंद्र सरकारच्या 889 किमी लांबीच्या चारधाम महामार्ग प्रकल्पाची एकूण किंमत 12 हजार कोटी रुपये आहे.
नवयुग इंजिनीअरिंगचे महाराष्ट्रातले प्रकल्प
सिलक्यारा बोगदा प्रकल्पाच्या रचनेपासून बांधणी आणि त्याला सरकारकडे हस्तातरित करण्याची जबाबदारी नवयुग इंजिनिअरिंगची आहे.
ओडिशातील अस्त्रंगा आणि आंध्र प्रदेशातील मछलीपट्टणमची बंदरे तसंच मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग, ब्रह्मपुत्रेवरील नऊ किलोमीटर लांबीच्या पूलाची बांधणी करण्यात कंपनीचा सहभाग असल्याचं सांगितलं जातं.
नवयुगच्या वेबसाइटनुसार, कंपनी भारतातील सर्वात लांब काझीगुंड-बनिहाल महमार्ग प्रकल्पाचं काम करतेय.
श्रीनगर ते जम्मू हे अंतर आठ किलोमीटरहून अधिक लांबीच्या बोगद्यामुळे मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.
सिंचन प्रकल्प, सागरी पायाभूत सुविधांची निर्मिती आणि जलविद्युत आणि औष्णिक ऊर्जा प्रकल्पांच्या क्षेत्रातही नवयुग आहे.
आंध्र प्रदेशातील पोलावरम जलविद्युत प्रकल्प आणि पश्चिम बंगालमधील 500 मेगावॅटचा फरक्का थर्मल प्रकल्प नवयुगनेच विकसित केलाय.
आंध्र प्रदेशात सत्तेवर आल्यानंतर जगन मोहन सरकारने कंत्राट देण्याच्या प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा आरोप करत कंपनीचे अनेक प्रकल्प रद्द केले होते.
काही महिन्यांपूर्वी समृद्धी महामार्गावरील क्रेन अपघातानंतर या कंपनीचं नाव सबकाँट्रॅक्टर म्हणून समोर आलं होतं.
ठाण्यात शहापूरजवळ समृद्धी महामार्गावर झालेल्या त्या दुर्घटनेत 20 जणांचा मृत्यू झाला होता. लोकांवर क्रेन पडल्याने हा अपघात झालेला.
त्यानंतर निष्काळजीपणामुळे मृत्यू, दुखापत आणि इतरांची सुरक्षा धोक्यात आणणे या कलमांखाली पोलिसांनी बांधकाम कंत्राटदारांवर गुन्हा दाखल केला होता, त्यात दोन कंपन्यांचा समावेश होता.
त्या दोन कंपन्यांपैकी एक नवयुग इंजिनिअरिंग होती तर दुसऱ्या कंपनीचे नाव व्हीएसएल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड होते.
महाराष्ट्रात मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील 'मिसिंग लिंक' या बायपास मार्गाच्या कामातही ही कंपनी सहभागी असल्याचा उल्लेख त्यांच्या वेबसाईटवर आहे.
कंपनीसमोर अनेक आव्हानं आहेत
'इकॉनॉमिक टाईम्स' या आर्थिक आणि व्यावसायिक जगतातील प्रसिद्ध दैनिकानुसार, हे प्रकल्प रद्द केल्यास नवयुगच्या खातेपुस्तकावर नकारात्मक परिणाम होईल, कारण कंपनीने त्यांच्या नावावर बँकांकडून शेकडो कोटी रुपयांचं कर्ज घेऊन ठेवलंय. .
उत्तरकाशीच्या घटनेनंतर अदानी समूहाबाबत सोशल मीडियावर प्रश्न उपस्थित करण्यात आले असून नवयुग इंजिनिअरिंगमध्ये अदानी समूहाची भागीदारी असल्याचा दावा करण्यात आला होता.
यानंतर अदानी समूहाने एक निवेदन प्रसिद्ध करून उत्तरकाशी बोगदा प्रकल्पाच्या बांधकामात आपला कोणत्याही प्रकारे सहभाग नसल्याचं स्पष्ट केलंय.
मात्र, अदानी एंटरप्रायझेस आणि नवयुग इंजिनिअरिंग कंपनी आणखी एका प्रकल्पावर एकत्र काम करत आहेत.
या सर्व प्रकरणांबाबत बीबीसीने कंपनीच्या हैदराबाद येथील मुख्यालयाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. तसंच कंपनीच्या प्रवक्त्याला ई-मेल पाठवला.
त्यांच्या बाजूने उत्तर आल्यानंतर त्याचा बातमीत समावेश केला जाईल.
हेही नक्की वाचा
हा व्हीडिओ पाहिलात का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)