You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
समृद्धी महामार्गावरील निर्माणाधीन पुलावर गर्डर लावणारी क्रेन कोसळली, 20 जणांचा मृत्यू
समृद्धी महामार्गावर निर्माणाधीन पूल कोसळून 20 जणांचा मृत्यू झाला आहे.
ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातल्या सरलांभबे गावाजवळ पुलाचं बांधकाम सुरू असताना, एक गर्डर मशीन कोसळल्याने ही घटना घडली आहे.
समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्यासाठी हा पूल बांधण्यात येत होता, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
या दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दु:ख व्यक्त केलं. त्याचसोबत त्यांनी माहिती दिली की, या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या कामगारांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपये मदत दिली जाईल.
जखमींवर तातडीने शासकीय खर्चाने योग्य ते उपचार करावेत, असे आदेशही शिंदेंनी दिले.
आज मुख्यमंत्री पंतप्रधानांच्या कार्यक्रमानिमित्त पुणे येथे असून अपघाताचे वृत्त समजताच त्यांनी जिल्हा प्रशासन तसेच संबंधित अधिकारी यांच्याशी बोलून दुर्घटनेविषयी जाणून घेतले.
मुख्यमंत्र्यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे यांच्याशी बोलून त्यांना तातडीने दुर्घटनास्थळी रवाना होण्याचे आदेश दिले.
मृतांची नावं
या दुर्घटनेतील मृतांचा आकडा 20 वर गेला असून, त्यातील 14 जणांची नावं कळली आहेत. या 14 जणांची नावं खालीलप्रमाणे
- संतोष जेई.
- कन्नन. व्ही.
- प्रदीप कुमार रॉय
- परमेश्वर
- राजेश शर्मा
- बलराम सरकार
- अरविंद कुमार उपाध्याय
- नितीन सिंग
- आनंद कुमार
- लल्लन राजभोर
- राधेश्याम जाधव
- सुरेंद्र कुमार
- पप्पू कुमार
- गणेश रॉय
- सुब्रत सरकार
- लवकुश कुमार
- मनोज सिंग
NDRF चं पथक घटनास्थळी पोहोचलं आणि बचावकार्य सुरू झालं. मात्र, आता बचावकार्य थांबवण्यात आलं असून क्रेन काढण्यात येत आहे.
जखमींना शहापूरच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
प्रिकास्ट केलेला कॉलम फिट करताना हा अपघात झाल्याचं मंत्री दादा भुसे यांनी एबीपी माझाशी बोलताना स्पष्ट केलं आहे. त्यात 20 जणांचा मृत्यू झाल्याचंसुद्धा त्यांनी सांगितलं आहे. इतर अडकलेल्या कामगारांचा शोध सुरू असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
दादा भुसे यांनी अपघाताची माहिती मिळताच या भागाचा दौरा केला. मृतांच्या नातेवाईकांना सरकार मदत करेल असंही स्पष्ट केलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करून मृतांना श्रद्धांजली वाहिली आहे.
"शहापूर,ठाणे येथे गर्डर कोसळून मोठी जिवितहानी झाली. समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याचे काम सुरू असताना हा अपघात झाला. ही घटना अतिशय दुर्दैवी व दुःखद असून, या घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. जखमींवर उपचार सुरु असून ते सुखरुप घरी परत यावे ही ईश्वरचरणी प्रार्थना," असं ट्वीट त्यांनी केलं आहे.
तर काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांनी ट्वीट करून या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे.
"शहापूर येथे क्रेन कोसळून झालेल्या अपघातात काही कामगार मृत्यूमुखी पडल्याची बातमी ह्रदयद्रावक आहे. महामार्ग निर्मितीच्या कामांमध्ये वाढत असलेले अपघात पाहता या संपूर्ण घटनेची उच्चस्तरीय चौकशी होणे गरजेचे आहे," असं ट्वीट ठाकूर यांनी केलं आहे.
पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दु:ख
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या दुर्घटनेबाबत दु:ख व्यक्त केलं.
नरेंद्र मोदींनी ट्वीटमध्ये म्हटलंय की, "महाराष्ट्रातील शहापूरमध्ये घटलेल्या घटनेमुळे वेदना झाल्या. मृतांना श्रद्धांजली अर्पण करतो."
PMNRF च्या निधीतून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 2 लाखांची मदत, तर जखमींना 50 हजारांची मदत दिली जाईल, असंही मोदींनी सांगितलं.
घटनेच्या चौकशीचे आदेश
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या घटनेबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते म्हणाले, “शहापूर तालुक्यात समृद्धी महामार्गावर पुलाचे काम सुरू असताना एक दुर्घटना होऊन काही मजुरांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुःखद आणि मनाला वेदना देणारी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.
या घटनेत 3 कामगार जखमी झाले. त्यांच्यावर रूग्ण्यालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.
या घटनेची तज्ज्ञांमार्फत चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
समृद्धी महामार्ग नेमका कसा आहे?
मुंबई ते नागपूर 812 किलोमीटरचं अंतर कापण्यासाठी 14 तास लागतात. समृद्धी हायवेमुळे हे अंतर पार करण्यासाठी 8 तास लागतील. 701 किलोमीटर या महामार्गाची लांबी आहे.
औरंगाबाद हे मध्यावर आहे. त्यामुळे औरंगाबाद ते नागपूर जाण्यासाठी 4 तास आणि औरंगाबाद ते मुंबई जाण्यासाठी 4 तास लागतील.
या प्रकल्पाचा अंदाजे खर्च 55 हजार 477 कोटी रूपये आहे.
हा मार्ग राज्यातल्या 10 जिल्ह्यांमधून जाणार आहे. त्यात नागपूर, वर्धा, अमरावती, वाशिम, बुलढाणा, जालना, औरंगाबाद, अहमदनगर, नाशिक, ठाणे या जिल्ह्यांचा सामावेश आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify,आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)