परदेशी लोकांची फसवणूक करून त्यांना रशियाकडून युक्रेन युद्धावर पाठवणारं नेटवर्क बीबीसीकडून उघड

    • Author, नवाल अल-मुगाफी, शीदा किरन
    • Role, वरिष्ठ आंतरराष्ट्रीय तपास प्रतिनिधी, बीबीसी आय इन्व्हेस्टिगेशन्स

एका व्हीडिओमध्ये उमरच्या पासपोर्टचा एक कोपरा जळताना दिसतो आहे आणि एका महिलेचे रशियन भाषेतील शब्द कानावर पडतात, "हा तर चांगल्या प्रकारे जळतो आहे."

उमर (26 वर्षे) हा एक सीरियन मजूर आहे. तो गेल्या 9 महिन्यांपासून युक्रेन युद्धात रशियाच्या सैन्य आघाडीवर तैनात होता. तिथेच त्याच्या फोनवर हा व्हीडिओ आला होता.

त्या महिलेचा आवाज उमरच्या परिचयातील होता. तो आवाज होता, पोलिना अलेक्झान्द्रोवना अजार्निख या महिलेचा. उमर म्हणतो की त्या महिलेनं त्याला युद्धासाठी सैन्यात भरती करून घेतलं होतं. या महिलेनं उमरला आमिष दाखवलं होतं की यातून चांगली कमाई होईल, तसंच रशियाचं नागरिकत्वदेखील मिळेल. मात्र आता ती रागात होती.

युक्रेनमधून पाठवण्यात आलेल्या अनेक व्हॉईस नोट्समध्ये उमरनं (सुरक्षेच्या कारणास्तव नाव बदललं आहे) सांगितलं की तो कसा या युद्धात अडकला आहे आणि घाबरलेला आहे.

त्याचं म्हणणं आहे की अजार्निखनं त्याला आश्वासन दिलं होतं की जर त्यानं 3,000 डॉलर (जवळपास 2,70,000 रुपये) दिले, तर त्याला युद्धावर पाठवलं जाणार नाही.

मात्र उमरनं दिलेल्या माहितीनुसार, त्याला फक्त 10 दिवसांच्या प्रशिक्षणानंतर थेट युद्धावर पाठवण्यात आलं होतं. त्यानंतर त्यानं पैसे देण्यास नकार दिला आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून अजार्निखनं त्याचा पासपोर्ट जाळून टाकला.

उमर म्हणतो की त्यानं एका मोहिमेवर जाण्यास नकार दिला, तर लष्करी अधिकाऱ्यांनी त्याला धमकी दिली की ते त्याला मारून टाकतील किंवा तुरुंगात टाकतील. उमर म्हणतो, "आमची फसवणूक करण्यात आली. ही महिला ठग आहे आणि खोटारडी आहे."

बीबीसी आयनं (BBC Eye) केलेल्या तपासातून समोर आलं आहे की माजी शिक्षिका असलेली 40 वर्षांची अजार्निख, टेलीग्राम चॅनलद्वारे अनेकदा गरीब देशांमधील तरुणांना रशियाच्या सैन्यात भरती होण्यासाठी भरीला घालते.

चेहऱ्यावर हास्य असलेले तिचे व्हीडिओ मेसेज आणि उत्साही, आवेशातील पोस्टद्वारे, 'एक वर्षाचं कंत्राट' आणि 'लष्करी सेवे'ची ऑफर दिली जाते.

'विरोध करणाऱ्यांना धमकवायची'

बीबीसी वर्ल्ड सर्व्हिसनं अशा जवळपास 500 प्रकरणांची ओळख पटवली आहे, ज्यात या महिलेनं इन्व्हिटेशन सांगून काही 'कागदपत्रं' लोकांना दिली. जेणेकरून या कागदपत्रांच्या आधारे लोकांना रशियामध्ये येऊन सैन्यात भरती होता येईल.

यातील बहुतांश लोक सीरिया, इजिप्त आणि येमेनमधून आलेले पुरुष होते. त्यांनी भरती होण्यासाठी या महिलेला त्यांच्या पासपोर्टची माहिती पाठवली होती.

मात्र भरती झालेल्या अनेकांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी बीबीसीला सांगितलं की अजार्निख यांनी त्यांची असं सांगून फसवणूक केली होती की त्यांना थेट युद्धावर पाठवलं जाणार नाही.

तसंच तिनं त्यांना हेदेखील सांगितलं नव्हतं की एक वर्षानंतर देखील तिथून बाहेर पडू शकणार नाहीत. जे लोक अजार्निखला विरोध करायचे, त्यांना ती धमकवायची.

बीबीसीनं अजार्निखला संपर्क केला. त्यावेळेस तिनं हे सर्व आरोप फेटाळले.

आम्हाला 12 कुटुंबांनी सांगितलं की अजार्निखनं भरती केलेली त्यांची तरुण मुलं, आतापर्यंत एकतर मारली गेली आहेत किंवा बेपत्ता आहेत. रशियामध्ये सरकारनं जबरदस्ती भरती करण्यामध्ये वाढ केली आहे. कैद्यांना सैन्यात भरती केलं गेलं.

युक्रेनमध्ये सुरू असलेली मोहीम सुरू ठेवण्यासाठी सातत्यानं मोठ-मोठे बोनस देऊ करण्यात आले आहेत. अर्थात यामुळे रशियाला मोठं आर्थिक नुकसान सोसावं लागलं आहे.

नाटोनुसार, 2022 मध्ये हे युद्ध सुरू झाल्यापासून रशियाचे 10 लाखांहून अधिक सैनिक मारले गेले आहेत किंवा जखमी झाले आहेत. निव्वळ डिसेंबर 2025 मध्येच 25 हजार सैनिक मारले गेले.

बीबीसी न्यूजनं शोक-संदेश आणि सार्वजनिकरीत्या उपलब्ध असलेल्या इतर नोंदींच्या आधारे केलेल्या संशोधनातून असं समोर आलं आहे की गेल्या वर्षी युक्रेनमध्ये रशियाच्या सैनिकांच्या मृत्यूंमध्ये आधीपेक्षा अधिक वेगानं वाढ झाली.

तसं तर, हे निश्चित करणं कठीण आहे की, किती परदेशी लोक रशियाच्या सैन्यात भरती झाले आहेत. बीबीसीनं केलेल्या विश्लेषणात परदेशी सैनिकांचे मृत्यू आणि जखमांवर देखील अभ्यास करण्यात आला आहे.

यातून समोर येतं की किमान 20 हजार लोक भरती झाले असतील. यात क्युबा, नेपाळ आणि उत्तर कोरियासारख्या देशांमधील लोकांचाही समावेश आहे.

युक्रेनचं देखील मोठं नुकसान झालं आहे. त्यांनीदेखील त्यांच्या सैन्यात परदेशी लोकांचा समावेश केला आहे.

'सर्वत्र मृतदेहच मृतदेह होते'

मार्च 2024 उमरचा अजार्निखशी पहिल्यांदा संपर्क झाला होता. त्यावेळेस उमर 14 इतर सीरियन तरुणांबरोबर मॉस्को विमानतळावर अडकला होता. त्याच्याकडे जेमतेम पैसे होते. सीरियामध्ये फार कमी नोकऱ्या उपलब्ध होत्या आणि त्याही खूप कमी पगाराच्या होत्या.

उमर म्हणतो की तिथे एका रिक्रूटरनं (भरती करणाऱ्यानं) त्यांना रशियातील तेलाच्या ठिकाणांची सुरक्षा करण्याचं काम देऊ केलं होतं. ते मॉस्कोला पोहोचल्यावर त्यांना माहीत झालं की त्यांची फसवणूक करण्यात आली आहे.

उमरनं दिलेल्या माहितीनुसार, ऑनलाइन पर्यायांचा शोध घेत असताना त्यांच्यापैकी एकानं अजार्निखचं चॅनल (टेलिग्राम) पाहिलं आणि तिला मेसेज केला.

त्यानंतर, काही तासांतच ती त्यांना विमानतळावर भेटली आणि त्यांना ती ट्रेननं रशियाच्या पश्चिम भागातील ब्रायंस्क भरती केंद्रात घेऊन गेली. उमरनुसार, तिथे अजार्निखनं त्यांना रशियाच्या सैन्यात काम करण्याच्या एक वर्षाच्या कंत्राटाची ऑफर दिली.

यात जवळपास 2,500 डॉलर (जवळपास 2,25,000 रुपये) इतकं मासिक वेतन आणि 5,000 डॉलरच्या (जवळपास 4,50,000 रुपये) साइन-अप बोनसचा समावेश होता. ही रक्कम इतकी होती की ज्याबद्दल ते सीरियामध्ये फक्त स्वप्नच पाहू शकत होते.

उमर म्हणतो की कंत्राट रशियन भाषेत होते. त्यांच्यापैकी कोणालाही रशियन भाषा येत नव्हती. त्या महिलेनं त्यांचे पासपोर्ट घेतले आणि त्यांना आश्वासन दिलं की ती त्यांना रशियाचं नागरिकत्व मिळवून देईल.

त्याचबरोबर असंही सांगितलं की जर त्यांनी त्यांच्या साइन-अप बोनसमधून 3,000 डॉलर (जवळपास 2,70,000 रुपये) तिला दिले, तर त्यांना युद्धावर पाठवलं जाणार नाही.

उमर म्हणतो की जवळपास एक महिन्याच्या आतच त्यांना युद्ध आघाडीवर पाठवण्यात आलं. वास्तविक त्यांना फक्त 10 दिवसांचंच प्रशिक्षण देण्यात आलं होतं आणि त्यांना कोणताही लष्करी अनुभव नव्हता.

बीबीसीच्या शोध टीमला पाठवलेल्या एका व्हॉईस नोटमध्ये तो म्हणाला की, "आम्ही इथे 100 टक्के मरणार आहोत."

मे 2024 मध्ये तो म्हणाला, "बऱ्याच जखमा, खूप स्फोट, सतत होणारा गोळीबार. जर स्फोटांनी मृत्यू झाला नाही, तर तुमच्यावर पडणाऱ्या ढिगाऱ्यामुळे तुमचा मृत्यू होईल."

पुढील महिन्यात तो म्हणाला, "सर्वत्र मृतदेहच मृतदेह आहेत...मी स्वत: मृतदेहांवर पाय ठेवला आहे. देवा मला माफ कर."

तो असंही म्हणाला, "मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं आहे की जर कोणी मारला गेला, तर त्याला कचऱ्याच्या पिशवीत टाकून झाडाखाली फेकून देतात."

जवळपास एक वर्षानं उमरला माहीत झालं की अजार्निखनं त्यांना हे सांगितलं नव्हतं की प्रत्यक्षात 2022 च्या एका रशियन आदेशानुसार लष्कराला अधिकार मिळतो की जोपर्यंत युद्ध संपत नाही तोपर्यंत सैनिकांच्या कंत्राटांची मुदत आपोआप वाढवण्यात यावी.

उमर म्हणाला, "जर त्यांनी कंत्राटाची मुदत वाढवली, तर मी उद्ध्वस्त होईन, अरे देवा."

अर्थात, त्याच्या कंत्राटाची मुदत वाढवण्यात आली होती.

अजार्निखनं भरती केलेल्या, 8 परदेशी सैनिकांशी आम्ही बोललो. यात उमरचाही समावेश आहे. त्याचबरोबर त्या 12 पुरुषांच्या कुटुंबांशीदेखील, जे आता बेपत्ता आहेत किंवा मारले गेले आहेत.

अनेकजणांना वाटतं की अजार्निखनं भरती झालेल्या तरुणांची दिशाभूल केली किंवा त्यांचं शोषण केलं. त्यांचं म्हणणं आहे की या लोकांना माहीत होतं की त्यांची सैन्यात भरती केली जाते आहे.

मात्र त्यांना असं वाटलं नव्हतं की थेट युद्धआघाडीवर पाठवलं जाईल. उमरप्रमाणेच अनेकांना वाटत होतं की त्यांना पुरेसं प्रशिक्षण मिळालेलं नाही किंवा त्यांना वाटायचं की एक वर्षानंतर त्यांना परत जाता येईल.

इजिप्तच्या युसूफनं (बदललेलं नाव) बीबीसीला सांगितलं की त्याचा मोठा भाऊ मोहम्मदनं 2022 मध्ये रशियातील येकातेरिनबुर्ग शहरातील विद्यापीठात शिक्षण घेण्यास सुरुवात केली होती. मात्र त्याला फी भरण्यात अडचण येत होती.

युसूफ म्हणतो की मोहम्मदनं कुटुंबाला सांगितलं होतं की पोलिना नावाच्या एका रशियन महिलेनं त्याला ऑनलाइन मदत करण्यास सुरुवात केली होती. यात त्यानं रशियाच्या सैन्यात काम करण्याच्या प्रस्तावाचा देखील समावेश होता. मोहम्मदला असं वाटलं की यातून त्याला त्याचं शिक्षण सुरू ठेवता येईल.

युसूफ म्हणतो, "त्यांनी राहण्याची व्यवस्था, नागरिकत्व आणि मासिक खर्चांचं आश्वासन दिलं होतं."

"मात्र त्याला अचानक युक्रेनला पाठवण्यात आलं. त्यानंतर त्याच्या लक्षात आलं की तो युद्ध आघाडीवर आला आहे."

युसूफनुसार, त्याचा भाऊ मोहम्मदचा शेवटचा कॉल 24 जानेवारी 2024 ला आला होता. जवळपास एक वर्षभरानं, युसूफला टेलीग्रामवर एका रशियन नंबरवरून मेसेज आला. यात मोहम्मदच्या मृतदेहाचे फोटो होता. त्याच्या कुटुंबाला नंतर माहित झालं की जवळपास एक वर्षभरापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.

'काही तर वेडे झाले'

हबीब हा आणखी एक सीरियन नागरिक आहे. त्यानं रशियाच्या सैन्यात काम केलं होतं. तो म्हणतो की अजार्निख, रशियाच्या सैन्यासाठी 'सर्वात महत्वाच्या भरती करण्यांपैकी एक' झाली होती.

तो कॅमेऱ्यासमोर येण्यास तर तयार होता. मात्र सुरक्षेच्या कारणास्तव तो खोट्या नावाचा वापर करून बोलला. हबीब म्हणतो की त्यानं आणि अजार्निखनं "जवळपास तीन वर्षे रशियासाठी व्हिसा इन्व्हिटेशनवर सोबत काम केलं."

त्यानं आणखी तपशील दिले नाहीत आणि आम्ही त्याच्या कामाबाबत पुष्टी करू शकलो नाही. सोशल मीडियावरच्या 2024 मधील एका फोटोमध्ये तो अजार्निखसोबत दिसतो आहे.

अजार्निख, रशियाच्या नैऋत्य (दक्षिण-पश्चिम) भागात असणाऱ्या वोरोनेज प्रदेशातील आहे. ती आधी एक फेसबुक ग्रुप चालवायची. यात अरब विद्यार्थ्यांना मॉस्कोमध्ये शिक्षणासाठी येण्यासाठी मदत केली जायची. त्यानंतर 2024 मध्ये तिनं तिचं टेलीग्राम चॅनल सुरू केलं.

हबीब म्हणतो की बहुतांश परदेशी लोक हा विचार करून नोकरी करण्यासाठी आले होते की त्यांना एखादा कारखाना किंवा मशीनरीची सुरक्षा करावी लागेल किंवा चेकपॉईंटवर उभं राहावं लागेल.

त्यांच्या मते, "जे अरब इथे येत आहेत, ते लगेच मरत आहेत. काही तर वेडे झाले. मृतदेह पाहणं ही खूप कठीण गोष्ट आहे."

हबीब म्हणतो की उमर आणि सीरियन तरुणांच्या त्या गटाशी त्याची भेट एका लष्करी प्रशिक्षण केंद्रावर झाली होती.

"त्यांनी त्यांना नागरिकत्व, चांगला पगार आणि सुरक्षित ठेवलं जाण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. मात्र इथे एकदा का कंत्राटावर सही केली की बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग नाही."

ते म्हणतात, "कोणालाही शस्त्र चालवता देखील येत नव्हतं. त्यांच्यावर जर गोळी झाडण्यात आली असती तर त्यांनी प्रत्युत्तरादाखल गोळीदेखील झाडली नसती...आणि जर तुम्ही गोळी झाडली नाही, तर तुम्ही मारले जाल."

"हे लोक मारले जाणार आहे, हे माहीत असूनही पोलिना त्या लोकांना घेऊन जात होती."

हबीबचं म्हणणं आहे की त्यांना "भरती करण्यात आलेल्या प्रत्येक व्यक्तीमागे लष्कराकडून 300 डॉलर (जवळपास 27,000 रुपये) मिळायचे."

बीबीसीला या गोष्टीची पुष्टी करता आली. मात्र भरती झालेल्या इतर लोकांनी देखील सांगितलं की त्यांना वाटतं की हबीबला मोबदला मिळत होता.

'काहीही मोफत नसतं'

अजार्निखनं 2024 च्या मध्यापासून केलेल्या पोस्टमध्ये हे स्पष्टपणे दिसू लागलं की भरती झालेल्या लोकांना 'युद्धात भाग घ्यावा लागेल' आणि त्यामध्ये परदेशी सैनिक मारले जाण्याचा उल्लेखदेखील होता.

ऑक्टोबर 2024 च्या एका व्हीडिओमध्ये ती म्हणते, "तुम्ही युद्धावर जात आहात, हे तुम्हा सर्वांना चांगल्या प्रकारे माहीत होतं. तुम्हाला वाटत होतं की रशियाचा पासपोर्ट मिळेल, काहीही करावं लागणार नाही आणि पंचतारांकित हॉटेलमध्ये राहू?...काहीही मोफत नसतं."

बीबीसीनं, 2024 च्या आणखी एका प्रकरणात, एक व्हॉईस मेसेज ऐकला. तो अजार्निखनं एका महिलेला पाठवला होता. त्या महिलेचा मुलगा सैन्यात होता. अजार्निखनं म्हटलं की त्या महिलेनं "रशियाच्या लष्कराबद्दल काहीतरी खूप वाईट प्रकाशित केलं आहे."

अजार्निखनं शिवीगाळ करत मुलाचा जीव घेण्याची धमकी देत त्या महिलेला धमकी दिली की "मी तुला आणि तुझ्या सर्व मुलांना शोधून काढेन."

बीबीसीनं अजार्निखला संपर्क करण्याचे अनेक प्रयत्न केले. सुरुवातीला तिनं सांगितलं की जर बीबीसीचे प्रतिनिधी रशियात आले तर ती मुलाखत देईल. मात्र सुरक्षेच्या कारणास्तव बीबीसीनं हा प्रस्ताव नाकारला.

नंतर, तिला जेव्हा फोनवर विचारण्यात आलं की भरती झालेल्या लोकांना बिगर-सैनिकी कामाचं आश्वासन देण्यात आलं होतं का, यावर तिनं कॉल कट केला.

नंतर पाठवण्यात आलेल्या व्हॉईस नोट्समध्ये ती म्हणाली की, आमचं काम 'प्रोफेशनल नाही' आणि मानहानीचा खटला दाखल करण्याची धमकी दिली.

बीबीसीनं रशियाचं परराष्ट्र मंत्रालय आणि संरक्षण मंत्रालयाला त्यांची बाजू जाणून घेण्यासाठी संपर्क केला. मात्र त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

याआधी मार्च 2022 मध्ये राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी पश्चिम आशियातून पुरुषांची भरती करण्याचं समर्थन केलं होतं. त्यांचं म्हणणं होतं की ती माणसं विचारधारेनं प्रेरित आहेत, ती पैशांमुळे काम करत नाहियेत.

ते म्हणाले होते, "हे असे लोक आहेत, जे स्वेच्छेनं येऊ इच्छितात, विशेषकरून पैशांसाठी नाही तर, मदत करण्यासाठी."

'पैशाचं प्रलोभन'

युद्धाबाबतचा अभ्यास असणारे पत्रकार आणि संशोधकांचं म्हणणं आहे की अजार्निखसारखे लोक रशियाच्या लष्करासाठी अनौपचारिक भरती करण्याचा नेटवर्कचा भाग आहेत.

बीबीसीला दोन आणखी टेलीग्राम अकाउंट सापडले आहेत, जे अरबी भाषेत रशियाच्या सैन्यात भरती होण्याची ऑफर देत होते. एका अकाउंटवर इन्व्हिटेशन डॉक्यूमेंट आणि नावांची यादी दाखवण्यात आली होती. तर दुसऱ्यावर 'एलीट बटालियन'मध्ये भरती होण्यासाठी मोठ्या साइन-अप बोनसची जाहिरात देण्यात आली होती.

सप्टेंबरमध्ये, केनियाच्या पोलिसांनी म्हटलं की त्यांनी एका संशयित 'ट्रॅफिकिंग सिंडिकेट'ची वस्तुस्थिती समोर आणली आहे. ते नोकरीची ऑफर देऊन केनियातील तरुणांना भुरळ पाडत होते नंतर त्यांना युक्रेन युद्धावर पाठवलं जात होतं.

इन्स्टिट्यूट फॉर द स्टडी ऑफ वॉरमधील संशोधक, कॅटरिना स्टेपानेन्को यांनी बीबीसीला सांगितलं की रशियामध्ये काही स्थानिक आणि नगरपालिका अधिकारी अशा एचआर प्रोफेशनल्स आणि स्थानिक लोकांना 4,000 डॉलरपर्यंतचं (जवळपास 3,60,000 रुपये) रोख प्रोत्साहन देत आहेत, जे रशियन लोकांची किंवा परदेशी लोकांची लष्करात भरती करत आहेत.

त्यांचं म्हणणं आहे की सुरुवातीला रशियानं, वॅग्नर प्रायव्हेट मिलिट्री ग्रुप आणि जेल सिस्टम सारख्या मोठ्या संस्थांचा वापर केला. मात्र 2024 पासून ते 'स्थानिक लोक आणि छोट्या कंपन्यां'चा देखील भरतीसाठी वापर करत आहेत.

त्या म्हणतात, "मला वाटतं की भरतीच्या आधीच्या पद्धतींद्वारे आता तितके लोक मिळत नाहियेत."

यादरम्यान, हबीब आता सीरियात परतला आहे. त्याचं म्हणणं आहे की अनेक लष्करी अधिकाऱ्यांना लाच देऊन त्यानं त्याचं कंत्राट संपुष्टात आणलं.

उमरला अखेरीस रशियाचं नागरिकत्व मिळालं आणि तोदेखील सीरियात परतला आहे. ज्या दोन सीरियन तरुणांबरोबर तो सैन्यात राहिला, त्यांच्या कुटुंबानी दिलेल्या माहितीनुसार, ते आता मारले गेले आहेत.

अजार्निखबद्दल उमर म्हणतो, "ती आमच्याकडे फक्त नंबर किंवा पैशाच्या रूपात पाहते. ती आम्हाला माणसं समजत नाही."

"तिनं आमच्यासोबत जे केलं, त्यासाठी आम्ही तिला कधीही माफ करणार नाही."

अतिरिक्त वार्तांकन, ओल्गा इव्शिना, गेहाद अब्बास, अली इब्राहिम, व्हिक्टोरिया अराकेलियान आणि रायन मारूफ

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)