पोर्टफोलिओमध्ये म्युच्युअल फंड्स किती असावेत? यात जास्त गुंतवणुकीचे तोटे काय?

    • Author, अजित गढवी
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

भारतातील म्युच्युअल फंड क्षेत्राचा विस्तार वेगाने होत आहे. सध्या म्युच्युअल फंड हाऊसेसकडून सुमारे 80 लाख कोटी रुपयांच्या मालमत्तेचे (AUM) व्यवस्थापन केलं आहे. सध्या देशात 40 हून अधिक म्युच्युअल फंड हाऊसेस कार्यरत आहेत.

रेटिंग एजन्सी ICRA च्या अंदाजानुसार 2035 पर्यंत भारतीय फंड हाऊसेसकडून 300 लाख कोटींपेक्षा अधिक मालमत्तेचे व्यवस्थापन केले जाईल.

आजकाल ऑनलाइन सुविधा आणि विविध मोबाईल अ‍ॅप्समुळे म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे खूप सोपे झाले आहे.

या सोयीमुळे अनेक गुंतवणूकदार आपल्या पोर्टफोलिओमध्ये मोठ्या प्रमाणावर फंड जमा करून ठेवतात.

मात्र, तुमच्या पोर्टफोलिओमध्ये म्युच्युअल फंड्स किती असावेत? जास्त म्युच्युअल फंड्समध्ये पैसे गुंतवण्याचे तोटे काय? आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी प्रत्यक्षात किती फंड पुरेसे ठरतात? या प्रश्नांची सविस्तर उत्तरं जाणून घ्या.

पोर्टफोलिओमध्ये किती फंड असावेत?

अनेक गुंतवणूकदार एसआयपी (सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन) किंवा एकरकमी गुंतवणुकीद्वारे एक-दोन म्युच्युअल फंडांतून सुरुवात करतात.

मोबाईल अ‍ॅप्सच्या सोयीमुळे अनेकदा ते नवीन नवीन फंडात पैसे गुंतवतात आणि फंडांची संख्या वाढत जाते.

या बाबतीत तज्ज्ञांची मते वेगवेगळी आहेत. म्युच्युअल फंडातील गुंतवणूकीविषयी काम करणारी संस्था 'व्हॅल्यू रिसर्च'चे मुख्य कार्यकारी अधिकारी धीरेंद्र कुमार सांगतात की, साधारणपणे पोर्टफोलिओमध्ये 5 ते 8 फंड असावेत; त्यापेक्षा जास्त फंडांची गरज नसते.

ते पुढे सांगतात, "काही लोकांच्या पोर्टफोलिओमध्ये अगदी 20 फंडही असतात, पण ते मॅनेज करणं अवघड होतं. 10 किंवा 20 वर्षांनी साध्य करायची आर्थिक उद्दिष्टे 5 ते 8 योग्य फंडांच्या मदतीने सहज साध्य करता येतात."

अहमदाबादमधील आर्थिक सल्लागार मिथुन जठाल यांच्या मते, फंडांच्या संख्येपेक्षा आर्थिक उद्दिष्टे अधिक महत्त्वाची आहेत. त्यांच्या मते पोर्टफोलिओमध्ये कमाल किती फंड असावेत याचा तसा कोणताही ठराविक नियम नाही.

मिथुन सांगतात, "5–8 फंडांचा नियम प्रत्येक गुंतवणूकदारासाठी लागू होईलच असे नाही. तुमची प्रत्येक उद्दिष्टं 3 वर्षांची, 5 वर्षांची, 10 वर्षांची किंवा 25 वर्षांची असतील त्याप्रमाणे वेगवेगळ्या फंडांची निवड करावी लागते."

ते त्यासाठी एक उदाहरण देतात. "मुलांचे शिक्षण, घर खरेदी, लग्न, प्रवास, कार खरेदी आणि निवृत्ती यांसारख्या विविध उद्दिष्टांसाठी कालावधी आणि जोखीम घेण्याची क्षमता लक्षात घेऊन गुंतवणूक करणे आवश्यक आहे."

फंडांच्या संख्येपेक्षा वैविध्य अधिक महत्त्वाचे

म्युच्युअल फंडांमध्ये जास्त गुंतवणूक केल्यास पोर्टफोलिओमध्ये एकाच प्रकारचे शेअर्स किंवा फंड वारंवार येण्याची जोखीम असते. तज्ज्ञांच्या मते, केवळ फंडांची संख्या वाढवण्यापेक्षा त्यामध्ये वैविध्यं असणं अधिक आवश्यक आहे.

'मनीप्लांट फिनमार्ट'चे संचालक मेहुल शाह सांगतात, "नवीन गुंतवणूकदारांसाठी 2–3 फंड पुरेसे असतात, ज्यातून योग्य वैविध्य राहतं. पोर्टफोलिओत 8 ते 10 फंड ठेवणे पुरेसं आहे.

लोक वारंवार नवे फंड जोडण्याचा आग्रह धरतात, पण त्याऐवजी जुन्या आणि चांगली कामगिरी करणाऱ्या फंडांमध्ये गुंतवणूक वाढवणे अधिक फायदेशीर ठरते."

आर्थिक सल्लागार मिथुन जठाल याबद्दल सांगतात की, "गुंतवणूक करताना तुमची रिस्क प्रोफाइल तपासणे अत्यावश्यक आहे. ती तुमचे उत्पन्न, वय आणि जबाबदाऱ्या यांवर अवलंबून असते.

या जोखीम घेण्याच्या क्षमतेनुसार 'अ‍ॅसेट अलोकेशन' करावे. यात गोल्ड ETF, सिल्व्हर ETF, बाँड्स, लार्ज-कॅप आणि मिड-कॅप फंडांचा समतोल असावा. यासाठी वेगवेगळे फंड घ्यावे लागतात, त्यामुळे फंडांची एकूण संख्या वाढू शकते."

वेगवेगळ्या फंड हाऊसेसची निवड करा

मेहुल शाह सल्ला देतात की, सर्व फंड एकाच फंड हाऊसकडून खरेदी करण्याऐवजी वेगवेगळ्या फंड हाऊसेसचे फंड घ्यावेत.

ते सांगतात की, "जर तुमच्या पोर्टफोलिओमधील 70 ते 80 टक्के शेअर्स एकसारखे असतील, तर त्याला 'ओव्हरलॅपिंग' म्हणतात.

मात्र, बाजारातील स्थितीनुसार 30 ते 40 टक्के ओव्हरलॅपिंग सामान्य मानले जाते. शेवटी जास्त परतावा मिळवणे हेच मुख्य उद्दिष्ट असते."

पण ते इशारा देताना सांगतात की, "मोबाईल अ‍ॅप्समुळे काही लोकांच्या पोर्टफोलिओमध्ये तब्बल 80 फंड दिसतात, ज्याचा फायदा न होता नुकसानच होऊ शकतं.."

गुंतवणूकदार कोणत्या चुका करतात?

मिथुन जठाल यांच्या मते, "गुंतवणूकदार अनेकदा सध्या तेजीत असलेल्या क्षेत्रांच्या मागे धाव घेतात. सध्या सोने-चांदीत तेजी असल्यामुळे लोक गोल्ड आणि सिल्व्हर ETF खरेदीकडे वळतात. मात्र हे लक्षात ठेवले पाहिजे की, तीव्र वाढीसोबतच मोठ्या घसरणीचा धोका देखील असतो."

ते पुढे सांगतात की, "तुमची उद्दिष्टे आणि रिस्क प्रोफाइल यांनुसारच फंडांची निवड करा. उदाहरणार्थ जास्त वयात स्मॉल-कॅप फंडांत एकरकमी गुंतवणूक करणे धोकादायक ठरू शकते. जर तुम्ही जास्त जोखीम असलेल्या इक्विटी फंडांत गुंतवणूक केली असेल आणि उद्दिष्ट पूर्ण होण्याच्या काळातच बाजारात मोठी घसरण झाली, तर तुमची भांडवली रक्कम मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते."

(हा लेख केवळ माहितीकरिता आहे, आर्थिक सल्ला नाही. वाचकांनी गुंतवणूक करण्यापूर्वी आर्थिक सल्लागाराची मदत घ्यावी.)

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन