You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
ट्रम्प यांनी नोबेलचा ग्रीनलँडशी कसा संबंध जोडला? नॉर्वेच्या पंतप्रधानांना काय मेसेज पाठवला?
- Author, मॅलरी मोएंच
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या वर्षी नोबेल शांतता पुरस्कार न मिळाल्याने आपण आता फक्त शांततेचा विचार करण्यास बांधील नसल्याचं म्हटलं आहे.
नॉर्वेचे पंतप्रधान जोनास गार स्टोअर यांना पाठवलेल्या मेसेजमध्ये ट्रम्प यांनी नोबेल पुरस्कार न दिल्याबद्दल नॉर्वेला दोष दिला.
स्टोअर यांनी ट्रम्प यांना दिलेल्या उत्तरात स्पष्ट केले की, हा पुरस्कार नॉर्वे सरकार देत नाही, तर स्वतंत्र समिती देते.
ऑक्टोबर 2025 मध्ये हा पुरस्कार व्हेनेझुएलाच्या विरोधी पक्षनेत्या मारिया कोरिना मचाडो यांना देण्यात आला होता.
ट्रम्प यांनी अमेरिकेला ग्रीनलँडवर पूर्ण आणि संपूर्ण नियंत्रण हवे असल्याचा आग्रह मेसेजमध्ये धरला.
ग्रीनलँड हा डेन्मार्कचा अर्धस्वायत्त प्रदेश आहे. ग्रीनलँड ताब्यात घेण्यासाठी बळाचा वापर करणार का? असे ट्रम्प यांना विचारले असता त्यांनी 'नो कमेंट' असे उत्तर दिले.
डेन्मार्क नाटोचा सदस्य आहे. नाटो ही संरक्षण आघाडी असून बाह्यहल्ला झाल्यास सदस्य देशांनी एकमेकांचे संरक्षण करावे, हे नाटोचे तत्त्व आहे.
नाटोत अमेरिकेचा सर्वाधिक प्रभाव आहे. 1949 मध्ये नाटोची स्थापना झाल्यापासून एका सदस्य देशाने दुसऱ्या सदस्य देशावर हल्ला केल्याची घटना घडलेली नाही.
अमेरिकेने ग्रीनलँडमध्ये लष्करी कारवाई केली, तर नाटोचा अंत होईल, असा इशारा डेन्मार्कने दिला आहे.
या भूमिकेला युरोपमधील नाटो सदस्यांचा पाठिंबा मिळाला आहे. त्यापैकी काही देशांनी गेल्या आठवड्यात ग्रीनलँडमध्ये काही प्रमाणात सैन्य पाठवले. हा निर्णय प्रतीकात्मक मानला जात आहे.
यानंतर ट्रम्प यांनी घोषणा केली की, ग्रीनलँड ताब्यात घेण्याच्या त्यांच्या प्रस्तावाला विरोध केल्यास 1 फेब्रुवारीपासून ब्रिटनसह 8 नाटो सहयोगी देशांमधून येणाऱ्या वस्तूंवर 10 टक्के टॅरिफ लावले जाईल.
जूनपर्यंत हे टॅरिफ 25 टक्क्यांपर्यंत वाढवण्याची धमकीही त्यांनी दिली.
'नोबेल दिला नाही, आता बांधील नाही'
या वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर जोनास स्टोअर यांनी फिनलंडचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर स्टब यांच्या वतीने ट्रम्प यांना मेसेज पाठवला.
या दोन्ही युरोपीय नेत्यांनी सांगितले की, सध्याची परिस्थिती शांत करण्यासाठी आणि तणाव कमी करण्यासाठी सर्वांनी एकत्र काम करणे गरजेचे आहे.
यावर उत्तर देताना ट्रम्प म्हणाले, "8 युद्धं थांबवली तरी तुमच्या देशानं मला नोबेल शांतता पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला नाही. त्यामुळं मी आता फक्त शांततेचाच विचार करण्यास बांधील राहिलो नाही. मात्र, शांतता ही नेहमीच प्राधान्याची बाब असेल. आता अमेरिकेसाठी काय योग्य आहे, याचाही विचार मी करू शकतो."
ट्रम्प पुढे म्हणाले की, डेन्मार्क रशिया किंवा चीनपासून ग्रीनलँडचे संरक्षण करू शकत नाही. ग्रीनलँडवर मालकी हक्काचा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
"याबाबत कोणतेही लिखित दस्तऐवज नाहीत. शेकडो वर्षांपूर्वी तिथे एक बोट उतरली, एवढेच कारण दिले जाते. तिथे आमच्याही बोट उतरल्या होत्या," असेही त्यांनी म्हटले.
नाटोच्या स्थापनेपासून कोणत्याही व्यक्तीने जितके काम केले नाही, तितके आम्ही नाटोसाठी केले आहे. आता नाटोने अमेरिकेसाठी काहीतरी करायला हवे, असेही ट्रम्प यांनी म्हटले.
ग्रीनलँडवर आमचं पूर्ण आणि संपूर्ण नियंत्रण येत नाही, तोपर्यंत जग सुरक्षित राहणार नसेल, असेही त्यांनी नमूद केले.
कमी लोकसंख्या असलेले, पण नैसर्गिक साधनसंपत्तीने समृद्ध असलेले हे आर्क्टिक बेट क्षेपणास्त्र हल्ल्याच्या इशाऱ्यांसाठी आणि या भागातील जहाजांवर नजर ठेवण्यासाठी महत्त्वाचे मानले जाते.
ब्रिटनचे पंतप्रधान सर कीअर स्टार्मर यांनी सोमवारी (19 जानेवारी) सांगितले की, ग्रीनलँडच्या भविष्यातील दर्जाबाबतचा निर्णय हा फक्त ग्रीनलँडच्या लोकांचा आणि डेन्मार्कचा अधिकार आहे. मित्र देशांवर टॅरिफ लादणे चुकीचे असल्याचेही त्यांनी म्हटले.
सोमवारी (19 जानेवारी) डेन्मार्कचे संरक्षण मंत्री ट्रोल्स पॉल्सन आणि ग्रीनलँडच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री विवियन मोट्सफेल्ड यांनी नाटोचे सरचिटणीस मार्क रुटे यांची भेट घेतली.
गेल्या आठवड्यात डेन्मार्क, ग्रीनलँड आणि नाटो मित्रदेशांनी आर्क्टिक आणि उत्तर अटलांटिक भागात लष्करी उपस्थिती आणि सराव वाढवण्याचा निर्णय घेतला.
काही युरोपीय देशांनी ग्रीनलँडमध्ये मर्यादित स्वरुपात लष्कर पाठवले. याला पाहणी मोहीम असे म्हटले जात आहे.
नोबेल शांतता पुरस्कार मिळावा, ही ट्रम्प यांची इच्छा लपून राहिलेली नाही. सोमवारी (19 जानेवारी) त्यांनी पुन्हा दावा केला की, या पुरस्कारावर नॉर्वेचं नियंत्रण आहे. मात्र, नॉर्वेनं हा दावा नाकारला आहे. तसेच हा पुरस्कार स्वतंत्र समिती देते असं म्हटलं.
ट्रम्प यांनी एनबीसी न्यूजला दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटलं, "ते म्हणतात की, त्यांचा काही संबंध नाही, पण प्रत्यक्षात सर्व काही त्यांच्याच हातात आहे."
ट्रम्प यांनी खरंच 8 युद्धं थांबवली?
ट्रम्प यांचे म्हणणे आहे की, गेल्या वर्षी त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळाला सुरुवात झाल्यापासून त्यांनी 8 युद्धे थांबवली. त्यामुळे ते नोबेल पुरस्काराला पात्र आहेत.
व्हाइट हाऊसने यामध्ये इस्रायल आणि हमास, इस्रायल आणि इराण, भारत आणि पाकिस्तान, रवांडा आणि काँगो लोकतांत्रिक प्रजासत्ताक, थायलंड आणि कंबोडिया, आर्मेनिया आणि अझरबैजान, इजिप्त आणि इथिओपिया, तसेच सर्बिया आणि कोसोव्हो यांच्यातील संघर्षांचा उल्लेख केला.
बीबीसी व्हेरिफायने या दाव्यांचा आढावा घेतला आहे. त्यानुसार यामध्ये काही संघर्ष केवळ काही दिवसांचे होते. ते दीर्घकाळ चाललेल्या तणावातून निर्माण झाले होते.
इजिप्त आणि इथिओपियासारख्या काही प्रकरणांमध्ये तर थांबवण्यासाठी युद्धच झालेलं नव्हतं. रवांडा आणि काँगो यांच्यात शांतता करार होऊनही संघर्ष सुरूच असल्याचंही समोर आले आहे.
नोबेल शांतता पुरस्कार व्हेनेझुएलाच्या विरोधी पक्षनेत्या मारिया मचाडो यांना देण्यात आला होता.
यानंतर अमेरिकन सैन्याने व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो यांना कराकसमधून ताब्यात घेतले आणि अमली पदार्थांची तस्करी तसेच इतर गुन्ह्यांचे आरोप केले.
त्यावेळी ट्रम्प यांनी माचाडो यांना पुढील नेता म्हणून पाठिंबा दिला नाही. त्याऐवजी व्हेनेझुएलाच्या उपाध्यक्ष आणि मादुरो यांच्या सहकाऱ्याना हंगामी सरकारचे प्रमुख म्हणून समर्थन दिले.
मचाडो यांनी ट्रम्प यांचे कौतुक केले आहे. त्या गेल्या आठवड्यात व्हाइट हाऊसमध्ये ट्रम्प यांना भेटल्या.
यावेळी मचाडो यांनी ट्रम्प यांना त्यांचे नोबेल पदक दिले. मात्र नोबेल फाउंडेशनने स्पष्ट केले आहे की, हा पुरस्कार प्रतिकात्मक स्वरूपातही दुसऱ्याला देता येत नाही.
पृथ्वीवरील दुर्मिळ खनिजं
ग्रीनलँडच्या मोक्याच्या स्थानामुळं अमेरिकेची त्याच्यावर नजर आहे. दुसऱ्या महायुद्धादरम्यान नाझींना रोखण्याचा एक मार्ग म्हणून याकडं पाहिलं जात होतं.
शीतयुद्धाच्या काळात युरोप आणि उत्तर अमेरिका यांच्यातील सागरी मार्गांवर नियंत्रण ठेवण्यासाठीची योग्य अशी जागा म्हणून याकडं पाहिलं जात होतं. कारण ते भौगोलिकदृष्ट्या आर्क्टिकच्या जवळ आहे.
अमेरिकन सैन्य अनेक दशकांपासून अटलांटिक आणि आर्क्टिक महासागरांमध्ये पिटफिक स्पेस बेस चालवत आहे. त्याला पूर्वी थुले हवाई तळ म्हणून ओळखलं जात होतं.
या तळाचा उपयोग बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांवर लक्ष ठेवण्यासाठी केला जातो.
परंतु, डेन्मार्क आणि ग्रीनलँडच्या भूवैज्ञानिक सर्वेक्षण यांच्याकडून 2023 मध्ये प्रकाशित केलेल्या अहवालात असं नमूद करण्यात आलं आहे की, येथील चार लाख चौरस किलोमीटर क्षेत्र जे बर्फानं झाकलेलं नाही त्यात 38 खनिजांचे हलके किंवा जड साठे आहेत. या सगळ्याचा आवश्यक सामग्रीच्या युरोपियन यादीमध्ये समावेश आहे.
तसेच, तांबे, ग्रेफाइट, निओबियम, टायटॅनियम आणि रोडियमचे मोठे साठे आहेत. शिवाय पृथ्वीवरील दुर्मिळ खनिजांचेही महत्त्वपूर्ण साठे आहेत.
निओडीमियम आणि प्रासोडायमियम यामध्ये विशेष चुंबकीय गुणधर्म आहेत. ज्यामुळे त्यांचा उपयोग इलेक्ट्रिक वाहनं आणि पवन ऊर्जा उत्पादनासाठी आवश्यक असणारे टर्बाइन तयार करण्यासाठी केला जातो.
मिशिगन विद्यापीठाचे प्राध्यापक आणि भूगर्भशास्त्रज्ञ ॲडम सायमन यांनी बीबीसी न्यूज ब्राझीलला सांगितले, "ग्रीनलँडमध्ये जगातील दुर्मिळ पृथ्वीवरील 25 टक्के घटक असू शकतात."
जवळपास 15 लाख टन एवढी ही खनिजं असू शकतात.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)