You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
गब्बर सिंह नेगी : उत्तरकाशीच्या बोगद्यात अडकलेले फोरमन जे म्हणाले सगळे निघाल्याशिवाय मी बाहेर येणार नाही
उत्तराखंडच्या उत्तरकाशीमध्ये बोगद्याचं बांधकाम सुरू असताना दरड कोसळली आणि 41 मजूर अडकले.
17 दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतर त्यांना बाहेर काढण्यात यश आलं आहे.
संपूर्ण देशाच्या तसंच आंतरराष्ट्रीय माध्यमांच्या नजरा सिलक्यारामध्ये बनत असलेल्या या बोगद्यावर खिळल्या होत्या.
शेवटचे 10-12 मीटरचं खोदकाम या बचाव मोहिमेतलं सर्वात कठीण काम होतं. यात मुख्य भूमिका बजावली ती रॅट होल मायनर्सने.
हिंदुस्तान टाईम्सने दिलेल्या बातमीनुसार दिल्लीच्या एका कंपनीत काम करणारे ‘रॅट होल मायनर’ मुन्ना कुरेशी पहिले व्यक्ती होते जे 28 तारखेला संध्याकाळी सात वाजून पाच मिनिटांनी बोगद्यात अडकलेल्या मजुरांपर्यंत पोचले आणि त्यांना भेटले.
मुन्ना एक खाणकामगार आहेत. ते ट्रेंचलेस इंजिनियरिंग सर्व्हिसेस या कंपनीसाठी काम करतात. ही कंपनी दिल्लीची गटारं आणि पाण्याचे पाईप साफ करण्याचं काम करते.
शेवटच्या 12 मीटरमध्ये असलेली दगड माती बाजूला करण्यासाठी मुन्नाला सिलक्याराला आणलं गेलं.
मुन्ना सांगतात की, 27 तारखेला संध्याकाळपासून त्यांनी दगड माती हटवायला सुरुवात केली आणि 24 तासापेक्षा कमी वेळात हे काम पूर्ण केलं.
हिंदुस्थान टाईम्सच्या बातमीत पुढे असंही म्हटलं आहे की मुन्ना कुरैशी यांनी बोगद्याबाहेर आल्यावर म्हटलं, “मी शेवटचा दगड हटवला आणि त्या लोकांना पाहिलं. त्यांनी मला मिठ्या मारल्या, टाळ्या वाजवल्या आणि माझे आभार मानले.”
एनडीआरएफचे प्रमुख मनमोहन सिंह रावत यांनी बोगद्यात पोचल्यानंतर काय वाटलं याबद्दल वृत्तसंस्था एएनआयशी बातचीत केली.
ते म्हणाले, “मी जेव्हा बोगद्याच्या आत पोचलो तेव्हा माझे श्रमिक बांधव आनंदाने उड्या मारायला लागले. त्यांचा आनंद ओसांडून वाहत होता. मी त्यांना म्हटलं की एनडीआरएफची टीम पोचली आहे. आता तुम्हाला इथून बाहेर पडायचं आहे. आमच्यासाठी ही मोहीम फार आव्हानात्मक होती. पण गोष्टी ठरल्याप्रमाणे झाल्या. बोगद्यात अडकलेल्या मजुरांचं मानसिक संतुलन बिघडू नये म्हणून आम्ही त्यांना हिंमत देत राहायचो.
काय आहे रॅट होल मायनिंग?
खाणींमधल्या अरूंद रस्त्यांवरून कोळसा काढण्याची एक जुनी पद्धत आहे तिला रॅट होल मायनिंग असं म्हणतात. मेघालयात या पद्धतीचा जास्त वापर होतो.
रॅट होलचा अर्थ आहे उंदरासारखंच जमिनीच्या आत निमुळते रस्ते खोदणं ज्यातून फक्त एक व्यक्ती सरपटत जाऊन कोळसा काढू शकेल. उंदराच्या बिळावरून हे नाव आलेलं आहे.
सिलक्याराच्या बोगद्यातून वाचवलेल्या पहिल्या मजुराला साधारण स्थानिक वेळेनुसार रात्री 8 वाजता सार्वजनिक आरोग्य केंद्रात नेण्यात आलं.
मुन्ना कुरेशी यांनी म्हटलं की, रॅट होल मायनर्स सतत दगड मातीचा ढिगारा हटवत होते.
त्यांनी म्हटलं , “माझा आनंद मी शब्दात व्यक्त करता येणार नाही. मी माझ्या सहकारी मजुरांसाठी हे काम केलं. त्यांनी जेवढा आदर मला दिला तो मी कधी विसरू शकणार नाही.”
शेवटच्या दोन मीटर अंतरात खोदकाम करणारे आणखी एक रॅट होल मायनर फिरोज यांच्या साश्रू नयनांनीच बोगद्याच्या बाहेर आले.
ते म्हणाले, “मी आत अडकलेल्या मजुराला मिठी मारली आणि मला रडू आलं.”
आणखी एका रॅट होल मायनरने म्हटलं की ही बचाव मोहीम अवघड होती कारण ढिगाऱ्यात मोठमोठे दगड होते.
ते म्हणाले, “साधारण दुपारी एक वाजता आत अडकलेल्या लोकांचे आवाज आम्हाला ऐकू यायला लागले. ते आमच्यापासून साधारण 10 मीटर दूर होते. आम्ही त्यांना ओरडून सांगितलं की तुम्हाला लवकरच वाचवण्यात येईल.”
सुबोध कुमार वर्मा त्या 41 मजुरांपैकी आहेत ज्यांना सिलक्यारा बोगद्यातून सुरक्षित बाहेर काढलं गेलं आहे. बाहेर आल्यानंतर त्यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितलं, “मी झारखंडचा आहे. खरं सांगायचं तर तिथे अडकल्यानंतर आम्हाला फक्त 24 तासच त्रास झाला. पहिल्या 24 तासात खाणंपिणं नव्हतं आणि ऑक्सिजन कमी होता.”
जवानांसाठी लहान पडले पाईप
इंडियन एक्सप्रेसने म्हटलंय की ट्रेंचलेस इंजिनियरिंगमध्ये अंडरग्राऊंड टनलिंगचे तज्ज्ञ असणारे प्रवीण यादव यांनी सांगितलं की एनडीआरएफच्या जवानांसह अनेकांनी आत जाण्याचा प्रयत्न केला पण ब्लोअर किंवा ऑक्सिजनचा पुरेसा पुरवठा नसल्याने जाऊ शकले नाहीत.
ते म्हणतात, “जेव्हा कशाचाच काही उपयोग होत नव्हता तेव्हा मी आणि माझी सहकारी बलिंदर यादव यांनी बोगद्याच्या आत जाण्याची परवानगी दिली. पण माझ्या बॉसने म्हटलं की आझी एनडीआरएफच्या जवानांना प्रयत्न करू द्या. पण त्या जवानांची शरीरयष्टी मोठी होती आणि पाईप लहान होते. आता मला आत जायचं होतं. मी गॅस कटर घेतलं, पाण्याच्या दोन बाटल्या घेतल्या आणि गुडघ्यांवर रांगत पाईपमध्ये गेलो.”
पुढे रस्ता बनवणं सोपं नव्हतं. त्या दगड मातीतल्या जाड सळया शोधून त्यांना गॅस कटरने कापायचं होतं, आणि त्याचे तुकडे बाजूला करायचे होते.
प्रवीण यादवने म्हटलं, “यामुळे तिथली उष्णता फार वाढत होती. तिथे होरपळण्याचाही धोका होता. एका निमुळत्या जागेत जाणं फारच आव्हानात्मक होतं पण अनेक तास या गॅस कटरचा वापर करणं त्याहून मोठं आव्हान होतं. सहनशक्ती आणि अनुभवाची परीक्षा होती ही.”
यादव म्हणाले की जेव्हा गॅस कटर वापरलं जात होतं तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरही ठिणग्या उडत होत्या. पण त्यांनी सेफ्टी जॅकेट्स, ग्लव्हज, गॉगल आणि हेल्मेट घातलं होतं.
त्यांनी म्हटलं की, “जर तुम्ही अनुभवी असाल तर तुम्हाला माहीत असतं की कोणत्या बाजूने धातू कापायचा म्हणजे धोका कमी असेल.”
त्यांनी सांगितलं की अनेकदा ड्रिलिंग करताना अडचणी येत होत्या आणि या अडचणी हटवण्यासाठी आम्हाला दिवसातून दोन तीनदा आत जावं लागायचं.
ते म्हणतात, “मी जेव्हा धातूच्या सळया कापून त्या थंड झाल्यावर बाहेर घेऊन यायचो, तेव्हा माझं पूर्ण अंग घामाने भिजलेलं असायचं. माझे बूटसुद्धा घामाने ओलेगच्च व्हायचे. जेव्हा बाहेर आल्यावर ताज्या हवेचा झोत जाणवायचा तेव्हा फार बरं वाटायचं. मी बाहेर आल्यावर लोकांनी माझ्यासाठी टाळ्या वाजवल्या, माझं कौतुक केलं पण मला मात्र एकच वाटत होतं की मी कधी आंघोळ करेन आणि शांतपणे झोपेन. "
त्यांनी म्हटलं की याआधीही अमोनियाने भरलेल्या जागेत अडकलेल्या चार लोकांची सुटका करण्याच्या मोहिमेचा ते हिस्सा होते पण ही मोहीम सर्वाधिक आव्हानात्मक होती.
‘बेकायदेशीर पद्धतीने’ वाचवला जीव
पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार रॅट होल मायनिंग बेकायदेशीर आहे. पण एनडीआरफच्या एका जवानाने म्हटलं की, रॅट होल मायनर्सचं कौशल्य आणि त्यांच्या अनुभवाच्या जोरावरच 41 लोकांचा जीव वाचवता आला.
ग्रीन नॅशनल ट्रिब्युनलने 2014 साली तीन ते चार फुट उंचीचे बोगदे बनवण्याच्या रॅट होल मायनिंग पद्धतीने मेघालयात कोळसा खननाच्या कामावर बंदी आणली होती.
एनडीआरएफ सदस्य लेफ्टनंट जनरल (निवृत्त) सय्यद अता हसेन यांनी म्हटलं की, 24 तासांपेक्षाही कमी कालावधीत 10 मीटरचा रस्ता बनवून रॅट होल मायनर्सने कमाल केली आहे.
त्यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं की, “भलेही रॅट होल मायनिंग अवैध असेल पण या कामगारांच्या कौशल्याचा आणि अनुभवाचा आम्ही वापर करतोय.”
एनएचआयचो सदस्य विशाल चौहान यांनी म्हटलं की भले कोळसा खाणीमध्ये होणाऱ्या रॅट होल मायनिंगवर ग्रीन नॅशनल ट्रिब्युनलने बंदी घातली असेल पण बांधकाम साईट्सवर अजूनही ही पद्धत वापरली जाते.
त्यांनी म्हटलं की, आता परिस्थिती वेगळी आहे. लोकांचा जीव वाचवायचा आहे.”
सिलक्यारामध्ये ज्या 12 रॅट होल मायनर्सने बचावात महत्त्वाची भूमिका निभावली ते दिल्ली, झाशी आणि देशाच्या इतर भागातून आले होते.
सगळ्यांचं मनोधैर्य वाढवणारे गब्बर सिंह नेगी
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पहाटे साडेपाच वाजता बोगद्यात काम करणारे 41 मजूर अडकले.
त्यानंतर आज सुटका झाल्यानंतर काही मजुरांना वाटतंय की हे एका चमत्कारापेक्षा कमी नाही. अनेकदा मृत्यू आपल्या जवळ आल्याची जाणीव त्यांना झाली पण ते सुरक्षित बाहेर निघाले.
हिंदुस्थान टाईम्सने दिलेल्या बातमीनुसार लखीमपुर खिरीचे असणारे मजूर मंजीत लाल यांचे वडील चौधरी 17 दिवसांनी आपल्या मुलाला भेटले आणि म्हणाले, “आमच्यासाठी खरी दिवाळी आजच आहे.”
चौधरी म्हणाले, “अखेर माझा मुलगा बाहेर आला. पर्वताने माझ्या मुलाला आणि इतरांना त्याच्या ताब्यातून सोडलं. मी मुलासाठी बदलायला कपडे घेऊन आलोय म्हणजे मला तो स्वच्छ कपड्यात दिसेल.”
मुंबईतल्या एका बांधकामावर काम करताना झालेल्या अपघातात चौधरी यांच्या मोठ्या मुलाचा जीव गेला होता.
त्यांनी सांगितलं की या अडकलेल्या लोकांमध्ये गब्बर सिंह नेगी नावाचे सहकारी होते. ते सर्वाचं मनोधैर्य टिकवून ठेवत होते.
गब्बर सिंह नेगी 51 वर्षांचे फोरमॅन आहेत. ते आपल्या सहकाऱ्यांना सांगायचे की शांत राहा, आपल्याला लवकरच बाहेर काढल जाईल. त्यांनी सहकाऱ्यांना म्हटलं की मी सर्वात शेवटी बाहेर निघेन आणि त्यांनी तसंच केलं.
हिंदुस्थान टाईम्सने दिलेल्या बातमीनुसार गब्बर यांचे भाऊ जयमाल सिंह नेगी यांनी म्हटलं की, “ते सर्वात शेवटी बाहेर निघाले. जेव्हा ते बाहेर आले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर हास्य होतं.”
हेही वाचलंत का?
हा व्हीडिओ पाहिलात का?
बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.