आयुषी यादव : जिचा मृतदेह सुटकेसमध्ये मिळाला...

- Author, रजनीश कुमार
- Role, बीबीसी प्रतिनिधी
एक डिसेंबरला आयुषी यादवचा 20 वा वाढदिवस असला असता. पण काही दिवस आधी तिचा मृतदेह मथुरा यमुना एक्सप्रेसवेवर एका सुटकेसमध्ये पोलिसांना सापडला.
18 नोव्हेंबरला पोलिसांना ही सुटकेस सापडली आणि 21 नोव्हेंबरला पोलिसांच्या देखरेखीत तिच्या मृतदेहाला अग्नी देण्यात आला.
17 नोव्हेंबर रोजी तिच्या वडिलांनीच लायसन्स असलेल्या बंदुकीने तिची हत्या केली होती असं पोलिसांचं म्हणणं आहे.
आयुषी ही तिच्या आई-वडिलांसोबत राजधानी दिल्लीतील बदरपूर या ठिकाणी राहत होती. तिचे वडील नीतेश कुमार यांनी तिची हत्या करून, आईच्या मदतीने तिचा मृतदेह सुटकेसमध्ये भरून मथुरा रोडवर टाकला, असं पोलीस सांगतात. बीबीसीच्या टीमने आयुषीच्या घराला भेट दिली आणि आयुषीचं या घटनेपूर्वी आयुष्य कसं होतं, नेमकं काय घडलं, कोणत्या कारणांमुळे तिचा जीव गेला या कारणांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.
आयुषी ज्या खोलीत राहायची ती खोली घरच्या पहिल्या मजल्यावर आहे. त्या खोलीत फरशीवर रक्ताचे डाग पडलेले आहेत. रक्त साफ करण्यात आलं आहे. पण पुराव्यासाठी म्हणून काही ठिकाणी ते तसेच राहू देण्यात आले आहेत.
जर हे डाग सोडले तर असं कळत देखील नाही की या ठिकाणी असं कोणतंही चिन्ह दिसत नाही की या ठिकाणी कुणाची हत्या झाली असेल.
सर्व खोली अगदी व्यवस्थित दिसते. आयुषीची पुस्तके ठेवलेली आहेत आणि या पुस्तकामध्ये रिवॉल्वर बुकलेट देखील आहे.
पुस्तकांमध्येच एक लव्ह डायरी देखील ठेवलेली आहे. त्या डायरीच्या कव्हरवर लाल शाईने 'लव्ह जज, द लाइफ डिजायनर, करन माय गॉड जी', असे शब्द लिहिलेले आहेत.

तिच्या कपाटात काही लिपस्टिक दिसतात, तिथेच तिची पर्स आहे, ज्यात तिने अर्धं संपवलेलं चॉकलेट आहे, काही नोट्स आहेत. त्या खोलीत अजूनही आयुषीचं जग जिवंत असल्याचं जाणवतं. भिंतीवर तिचा लहानपणीचा फोटो आहे, ज्यात ती आपल्या आई-वडील, आजी-आजोबांसोबत आहे आणि बिछान्यावर एक टेडीबीअर पडलेलं आहे.
याच खोलीत तिची नाहक हत्या झाली आणि त्याच सोबत तिची पुस्तकं, खेळणी, आठवणी आणि स्वप्नं या साऱ्यांचा अंत झाला.
हे सर्व पाहिल्यावर मनात विचार येतो की तिने असा कोणता गुन्हा केला होता ज्यामुळे तिचा मृत्यू झाला.
स्वतःचा जोडीदार निवडण्याची 'चूक'
आयुषीने खूप धाडस करून आपल्याच वयाच्या मुलासोबत प्रेम केलं होतं आणि त्याच्याशी लग्न केलं होतं. तिने आंतरजातीय विवाह केल्यामुळेच तिला आपला जीव गमवावा लागला असं पोलिस सांगतात.
तिची हत्या झाल्याची माहिती त्यांच्या शेजाऱ्यांना देखील नव्हती.
त्यांच्या शेजारी दिव्या राहते, ती सांगते की दिवसा तर आणखी काही समजत नाही. जर असा काही आवाज आला तर लक्ष देखील जात नाही, असं वाटू शकतं की कुणीतरी फटाकेच फोडत आहे.

आयुषीबद्दल जर कुणाला विचारलं तर ते एकमुखाने सांगतात की ती स्वभावाला चांगली होती. ती फार कुणाशी बोलत नव्हती.
संध्याकाळी ती घराजवळच्या जीमला जात होती, पण जीममध्ये तिच्याबद्दल विचारले असता त्यांनी सांगितले की अशी कोणतीही व्यक्ती इथं येत नव्हती.
आजूबाजूच्या अनेक लोकांना आयुषी आणि त्यांच्या कुटुंबाशी आपलं काही नातं असल्याचं सांगावांसं वाटत नाही.
आयुषीचे वडील नीतेश कुमार यादव हे मूळचे उत्तर प्रदेशातील देवरियाचे आहेत. ते आपल्या कुटुंबासोबत गेल्या 25 वर्षांपासून दिल्लीतील बदरपूरच्या मोलडबंद एक्सटेंशनमध्ये राहतात.
या भागात, उत्तर प्रदेश, उत्तराखंडमधील अनेक जण राहतात. आम्ही हे समजून घेण्याचा प्रयत्न केला की ज्या भागात आयुषी राहते तिथे आंतरजातीय विवाहाबद्दल काय काय विचार आहेत. मूळचे अयोध्याचे इंद्रदेव मिश्र हे पुरोहित आहेत. इतर घरांमध्ये जाऊन ते पूजा-पाठ करतात. त्यांना मी विचारलं तुमचं आंतरजातीय विवाहांबद्दल मत काय?
ते सांगतात की, "हा तर गुन्हा आहे. हे पाप आहे. तुम्ही या गोष्टीकडे असं पाहा की समजा गाढव आणि कुत्रा या भिन्न प्रजातींमध्ये कधी संबंध होऊ शकेल का? हे तर विजोड होईल. आम्ही ब्राह्मण आहोत, आमच्या पूर्वजांचे चांगले संस्कार होते. आम्हाला आमच्या जातीवर गर्व आहे. हा गर्व आम्हाला आमच्या मुलांच्या निर्णयामुळे नष्ट करता येणार नाही. जर कुणी हा निर्णय घेतला तर त्याचं मी समर्थन नाही करणार, त्यांची आणि माझी वाट वेगळी आहे इतकंच मी म्हणेन."

पुढे ते म्हणतात की पण "कुणाचा जीव घेणं ही योग्य गोष्ट नाही. मी त्यांना त्यांच्या नशीबावर सोडेन, मी स्वतः यमराज होऊ शकत नाही." हे सर्व झाल्यावर त्यांनी मला माझी जात विचारली. मी त्यांना म्हटलं मला कोणती जात नाही, तर ते म्हणाले अच्छा तू ख्रिश्चन आहेस तर, कारण हिंदूंना जात नाही असं होत नाही आयुषी ज्या ठिकाणी जीमला जात होती, तिथे जवळच एक वृद्ध महिला भाजी विकत घेत होती. त्यांच्याशी मी बोलायला सुरुवात केली. त्यांनी सांगितलं की त्या मूळच्या आग्र्याच्या आहेत. त्यांना मी आंतरजातीय विवाहाबद्दल विचारलं तर त्या म्हणाल्या, दुसऱ्या जातीत लग्न केलं तर रक्त उसळतं, कधी कधी माय-बापाला हे पाऊल उचलावं लागतं. त्यामुळे लग्न हे आपल्याच जातीत व्हायला हवं आहे.

या भागातील बहुतांश जणांचं हेच म्हणणं आहे की लग्न हे आपल्याच जातीत व्हायला हवं. नीतेश यांच्या शेजारी राहणारी मुलगी दिव्या ही दलित आहे. तिला याबाबत विचारलं असता ती म्हणते की आम्हाला तर हेच शिकवलं जातं की मुस्लीम व्यक्तीशी लग्न करू नका. हिंदू तर आपसांत करतातच. आयुषीने लग्नानंतर आपल्या आई-वडिलांचं घर सोडायला हवं होतं. ती जर तिच्या नवऱ्यासोबत गेली असती तर कदाचित हे टळलं असतं. हीच तिची सर्वांत मोठी चुकी आहे.

आयुषीच्या भावाने पोलिसांना सांगितले सत्य
नीतेशचे म्हातारे आई-वडील देखील त्यांच्यासोबतच राहतात. पोलिसांनी नीतेश आणि त्यांची पत्नी बृजबाला यांना अटक केली आहे. मथुरा शहराचे पोलीस अधीक्षक मार्तंड सिंह यांनी बीबीसीला सांगितलं की आयुषीचा 17 वर्षीय भाऊ आयुष हा तपासात सहकार्य करत आहे. त्याने आपल्या आई-वडिलांनी केलेल्या गुन्ह्याबद्दल सांगितलं आहे.

आयुषी ही बीसीए करत होती. तिची वही पाहिली असता असं वाटतं की तिचं स्वप्न सॉफ्टवेअर इंजिनिअर होण्याचं होतं. शिकता शिकता तिचं राजस्थानमधून आलेल्या छत्रपाल सिंह या मुलावर प्रेम जडलं आणि दोघांनी लग्न केलं. ही गोष्ट घरच्यांना कळली. त्यावरुन तणाव निर्माण झाला. 17 नोव्हेंबर रोजी ती न सांगताच घराबाहेर गेली आणि नंतर घरी परतली. तेव्हा तिचे वडील तिच्यावर चिडले आणि त्यांनी गोळी झाडली. नीतेश यांच्या घरी आता 70 वर्षांची आई आहे. त्यांचे नाव जामवंती आहे. त्यांना आयुषीबद्दल विचारले असता त्या बऱ्याच काळासाठी शांत बसल्या आणि मग बोलल्या की मला काही माहित नाही. मी तर गेले 15 दिवस रुग्णालयात होते. घरी परतले तर कळलं की माझ्या मुलाला आणि सुनेला पोलिसांनी अटक केली.

शेजाऱ्यांशी विचारपूस केल्यावर कळलं की जामवंती या रुग्णालयात नव्हत्या. त्या घरीच होत्या. शेजारी सांगतात की त्या घरीच होत्या पण त्या काय करू शकत होत्या, त्यांचा मुलगा तर त्यांना देखील मारत असे. तो खूप रागीट आहे. एकदा शेजाऱ्यांशी त्याचं भांडण झालं होतं तर नीतेशने थेट रिवॉल्वर उगारली होती. जामवंती देखील हे कबूल करतात की त्यांचा मुलगा रागीट आहे आणि तो लोकांशी भांडण उकरत असे. जामवंती आपल्या नातीबद्दल सांगतात की आयुषी माझ्याशी फार बोलायची नाही. ती तिचा तिचा अभ्यास करत राहायची. अभ्यासात हुशार होती. आईचा तिच्यावर फार जीव होता. कधीकधी मला पैसे मागायची. पण आता काही उरलं नाही.

बदरपूरमध्ये नीतेश यांची दोन घरं आहेत एका घरात ते स्वतः राहत तर दुसरे घर भाड्याने दिले आहे. भाडेकरू देखील यावर काही बोलायला तयार नाहीत.
एक शेजारी नाव न सांगण्याच्या अटीवर बोलायला तयार झाला. तो म्हणाला. मुलगा गुर्जर होता, मुलगी यादव होती. गुर्जर काही छोटी जात नाही. हे लग्न स्वीकारायला हवं होतं. मुलगा मुलीचं वय लहान होतं. जर मुलाच्या आई-वडिलांना ते भेटले असते तर कदाचित गुंता सुटला असता.
पोलीस अधीक्षक मार्तंड सिंह यांना मी विचारलं की आता नीतेश पश्चाताप करत आहेत का, तर ते म्हणाले, पश्चाताप तर होतच असेल. पण ते अशा मूडमध्ये दिसले की जे व्हायचं तो होवो, आता सगळं सहन करू.
समाजापेक्षा जाती आता संग्रहालयातच सुरक्षित राहतील
बदरपूर मोलडबंद या भागात सीमा कपड्याचं एक दुकान चालवतात. त्या ब्राह्मण आहेत आणि त्यांनी लग्न पंजाबी दलित व्यक्तीशी केलं आहे. आयुषीबद्दल बोलल्यावर त्या म्हणतात की ती रोज याच रस्त्याने जीमला जात होती. ती शांत होती. पाहिल्यावर वाटायचं की ही चांगल्या घरातली मुलगी आहे. पण हे कधी वाटलं नाही की तिचे वडील या थराला जातील. माझं ही लग्न झाल्यावर मला माझ्या आईने खूप शिव्या घातल्या होत्या. वडीलही नाराज होते. पण कुणी असं कुणाचा जीव कसं घेऊ शकतं.
सीमा सांगते, आई-वडिलांनी जन्म दिला म्हणजे या अटीवर तर दिला नाही ना, की आमच्या लग्नाचा निर्णय ते करतील. जर त्यांना वाटत असेल की तर त्यांनी आपल्या जातीच्या शानसाठी मुलांना जन्मच घालू नये. या जाती समाजापेक्षा संग्रहालयातच जास्त सुरक्षित राहतील. आयुषी राहिली नाही त्याचा प्रभाव आजूबाजूच्या महिलांवर केवळ बोलण्यापुरताच मर्यादित आहे.
सर्व काही सामान्य आहे. दिल्लीत काही दिवसांपूर्वी छतरपूर पहाडी भागात एका फ्लॅटमध्ये 28 वर्षीय आफताबने श्रद्धा वालकरची हत्या करून तिचे तुकडे करून जंगलात फेकले.
जर टीव्ही पाहिला तर बातम्यांमध्ये काही लोक म्हणत आहेत की जर तिने आपल्या आई-वडिलांचं ऐकलं असतं तर तिचे असे हाल झाले नसते.

आयुषीबाबतीतही काही लोक तेच म्हणत आहेत की तिने जर आई-वडिलांचं ऐकलं असतं तर तिचे हाल असे झाले नसते.
श्रद्धा असो वा आयुषी दोघींनी आपल्या वाट्याचं प्रेम मिळावं यासाठी प्रयत्न केले आणि त्यात त्यांचा जीव गेला. प्रियकर आणि वडिलावर हत्येचा आरोप आहे. एकीकडे प्रियकर आहे आणि दुसरीकडे माय-बाप तरीपण आपल्या आई-वडिलांचं ऐकलं असतं तर हे घडलं नसतं असा जो तर्क दिला जातोय त्याला मात्र काही तोड दिसत नाहीये.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








