श्रद्धा वालकर प्रकरणी डीएनए चाचणीबद्दल पोलिसांच्या हाती महत्त्वाची माहिती

श्रद्धा वालकर

फोटो स्रोत, ANI

श्रद्धा वालकरच्या शरीराचे काही भाग गुरुग्राम आणि मेहरौलीच्या जंगलातून मिळाले असल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी गुरुवारी (15 डिसेंबर) दिली.

दिल्लीचे विशेष पोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) सागर प्रीत हुडा यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना म्हटलं की, सेंट्रल फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीकडून डीएनए आणि पॉलिग्राफ टेस्टचा रिपोर्ट मिळाला आहे.

त्यांनी म्हटलं की, या रिपोर्टच्या आधारे आम्हाला तपास पुढे न्यायला मदत होईल. गुरुग्राम आणि मेहरौलीच्या जंगलातून मिळालेले श्रद्धाच्या शरीराचे अवशेष पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. या प्रकरणी तपास सुरू आहे.

सीएफएसएल रिपोर्ट संपूर्ण तपासात महत्त्वाचा ठरेल असं पोलिसांचं म्हणणं आहे. श्रद्धा वालकरच्या हत्येचा आरोप तिचा लिव्ह इन पार्टनर आफताब पूनावालावर आहे. आफताबला गेल्या महिन्यात अटक करण्यात आली होती आणि तो सध्या तिहार जेलमध्ये आहे.

नऊ डिसेंबरला आफताबला व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. त्याची न्यायालयीन कोठडी 14 दिवसांनी वाढविण्यात आली आहे.

श्रद्धा खून प्रकरणाच्या तपासादरम्यान दिल्ली पोलिसांनी 24 नोव्हेंबरला मुख्य आरोपी आफताब पूनावालाची पॉलिग्राफ चाचणी केली.

यावेळी आफताबला या खून प्रकरणासह त्याचे कुटुंब आणि बालपण यासंबंधी प्रश्न विचारण्यात आले. इंडियन एक्स्प्रेसमधील बातमीनुसार, दिल्ली पोलिसांनी पॉलिग्राफचाचणीच्या पहिल्या सत्रासाठी दुपारी आफताबला रोहिणी इथे नेलं.

दरम्यान, दिल्ली पोलिसांना आफताबच्या फ्लॅटमधून अनेक धारदार वस्तू सापडल्या असून त्या फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आल्या आहेत.

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

एका पोलिस अधिकाऱ्यानं सांगितलं की, “आम्ही या गोष्टींवर रक्ताचे अंश शोधत आहोत. आफताबनं आम्हाला सांगितलं होतं की, त्यानं श्रद्धाच्या शरीराचे 30-35 तुकडे करण्यासाठी दोन किंवा तीन लहान करवतीचा वापर केला. ते शस्त्र आम्हाला आजतागायत सापडलेले नाहीत. आम्ही त्याच्या दाव्यांचा तपास करत आहोत."

पॉलिग्राफ चाचणीचा उद्देश सांगताना फॉरेन्सिक टीमशी संबंधित एका अधिकाऱ्यानं 'द इंडियन एक्स्प्रेस'ला सांगितलं की, 'हत्येत वापरलेले शस्त्र शोधणे हा उद्देश आहे'.

यासोबतच श्रद्धाचा फोन आणि तिच्या शरीराचे तुकडे शोधण्याचाही या चाचणीमागचा उद्देश आहे. "यादरम्यान आम्ही आफताबला त्याच्या नातेसंबंधाबाबत प्रश्न विचारले. आफताबला त्याचे बालपण, कुटुंब, नातेसंबंध, त्याने श्रद्धा वालकरची हत्या केली का केली आणि पुरावे कुठे लपवले याबद्दल विचारणा केली. त्यानं या प्रश्नांची अतिशय चोख उत्तरं दिली."

फॉरेन्सिक टीमच्या अधिकाऱ्यानं असंही म्हटलंय की, आता त्यांची टीम या उत्तरांचा अभ्यास करेल आणि त्याचं विश्लेषण करेल, त्यानंतर ते पोलिसांसोबत शेअर केले जातील.

या प्रकरणाचा तपास करत असताना दिल्ली पोलिसांचं पथक दिल्लीपासून महाराष्ट्रापर्यंत जंगलं, तलाव आणि नदी नाल्यांमध्ये पुरावे शोधत आहे.

श्रद्धा आफताब

फोटो स्रोत, Getty Images

श्रद्धाच्या हत्येनंतर आफताब मुंबईत आला होता, तर त्यानं श्रद्धाचे सामान आणि इतर पुरावे वसई किंवा ठाण्यात फेकून दिले असावेत, असे दिल्ली पोलिस अधिकाऱ्याने सांगितले आहे.

एका सूत्रानं सांगितलं की, 'आफताबने दावा केलाय की, त्यानं श्रद्धाचे सिमकार्ड दिल्लीत आणि फोन भाईंदरजवळ समुद्रात फेकले. आपल्या आई-वडिलांना वसईहून मीरा रोडला शिफ्ट करण्यासाठी तो मुंबईत आला होता, अशी माहिती आम्हाला मिळाली आहे. जेव्हा त्याची ट्रेन खाडीतून जात होती तेव्हा त्याने फोन समुद्रात फेकल्यासारखे दिसते."

असं असलं तरी अद्याप या प्रकरणी कोणताही महत्त्वाचा पुरावा मिळाल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिलेली नाही.

दिल्ली पोलिसांना दक्षिण दिल्लीतील जंगल आणि नाल्यांतून काही हाडं सापडली असून फॉरेन्सिक टीम त्याचा तपास करत आहे.

मात्र याप्रकरणी काही ठोस सांगता येईल, अशी कोणतीही गोष्ट अद्याप समोर आलेली नाही.

श्रद्धा वालकर हत्या प्रकरणातला मुख्य आरोपी आफताब पुनावाला यानं कोर्टासमोर हत्येची कबुली दिलीय. रागाच्या भरात श्रद्धाची हत्या केल्याचं आफताबनं कोर्टासमोर सांगितलं.

बार अँड बेंचच्या माहितीनुसार, दिल्लीतल्या साकेत कोर्टात मंगळवारी (22 नोव्हेंबर) आफताब पुनावालाला व्हीडिओ लिंकद्वारे हजर करण्यात आलं. कोर्टासमोर गुन्ह्याची कबुली देतानाच आफताबनं म्हटलं की, "जे काही मी केलंय, ते चुकून केलंय. रागाच्या भरात श्रद्धाची हत्या केली."

आफताबनं असंही म्हटलं की, "माझ्याविरोधात जी माहिती पसरवली जातेय, ती बरोबर नाहीय. पोलीस चौकशीत पूर्ण सहकार्य मी करतोय. मृतदेहाचे तुकडे कुठे कुठे फेकले, हे मी पोलिसांना सांगितलं."

माध्यमांच्या वृत्तांनुसार, आफताबने पोलीस तपासात हेही सांगितलं की, श्रद्धाला मारण्यासाठी वापरलेलं ब्लेड गुरुग्राममधील डीएलएफ फेज तीनच्या जवळील झाडांमध्ये फेकलं.

गेल्या शुक्रवारी दिल्ली पोलीस मेटल डिटेक्टर घेऊन गुरुग्राममध्ये गेले होते. मात्र, तिथे गुन्ह्यात वापरण्यात आलेले शस्त्र सापडले नव्हते.

पुढील काही दिवस पोलीस तपासाच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जात आहेत. कारण या प्रकरणात पोलिसांना अद्याप कुठलेच महत्त्वाचे पुरावे सापडले नाहीत.

श्रद्धा वालकर

फोटो स्रोत, ANI

कवटी आणि हाडांचे तुकडे सापडले

दिल्ली पोलिसांना रविवारी (20 नोव्हेंबर) ला श्रद्धा वालकर हत्याकांडासंदर्भात दक्षिण दिल्ली भागातून कवटीचे काही तुकडे आणि हाडं मिळाली आहेत.

त्याचबरोबर दिल्ली पोलिसांनी दक्षिण दिल्लीच्या मैदानगढी भागातील एक तलाव देखील रिकामा केला आहे.

आतापर्यंत या प्रकरणात दिल्ली पोलिसांनी कोणताही मोठा पुरावा मिळाल्याचं सांगितलेलं नाही.

त्यामुळे तपासकर्त्यांसाठी दिवसेंदिवस अनेक अडचणी निर्माण होत आहे.

ज्या फ्लॅटवर श्रद्धा आणि आफताब कथितरित्या राहत होते तिथे घेऊन गेले. तसंच दिल्ली पोलीस आणि फॉरेंसिक टीमने नारको टेस्टसंदर्भात एक महत्त्वाची बैठक घेतली.

नारको टेस्टमधून काही महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता पोलिसांना वाटत आहे.

दिल्ली पोलीसांचे माजी आयुक्त एस.एन.श्रीवास्तव यांच्या मते या केसचा उलगडा करणं बरंच कठीण जाणार आहे.

ते म्हणतात, “ही एक मोठी गुंतागुंतीची केस होणार आहे. त्यात आफताबचा गुन्हा सिद्ध करण्यासाठी न्यायव्यवस्थेतील सर्व घटकांची मदत लागेल. पोलीस त्यांच्यातर्फे पूर्ण प्रयत्न करतील. मात्र कोर्टाची भूमिका सुद्धा महत्त्वाची असेल.”

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)