श्रद्धा आणि आफताबच्या शेजाऱ्याने काय पाहिलं?

व्हीडिओ कॅप्शन, श्रद्धा आफताबच्या शेजाऱ्याने काय पाहिलं?
श्रद्धा आणि आफताबच्या शेजाऱ्याने काय पाहिलं?

राजेश हे दिल्लीत आफताब – श्रद्धाच्या घरासमोर राहतात. आफताब आणि श्रद्धा दिल्लीत आल्यापासून राजेश यांनी त्यांना पाहिलंय.

राजेश स्वतः पाण्याची मोटर रिपेअर करणारे मेकॅनिक आहेत. त्यांनी स्वतः आफताबकडे जाऊन त्याची पाण्याची मोटर रिपेअर केलीय. मात्र, या सगळ्या काळात त्यांनी श्रद्धाला एकदाच पाहिल्याचं सांगितलं.

राजेश सांगतात :

"पहिल्यांदा ते जेव्हा इथं शिफ्ट झाले, तेव्हा गल्लीतून येताना आणि शिडींवरून चढताना पाहिलं. सामान घेऊन येत होते. तेव्हा मुलीच्या हातात बॅग होती. त्यानंतर मुलीला कधी पाहिलं नाही, पण मुलाला बऱ्याचदा पाहिलं. कारण तो ऑनलाईन ऑर्डर करून जेवण मागवायचे. एकदा डिलिव्हरी बॉयनं मला विचारलं होतं की, आफताब नावाचं इथं कोण आहे, कुठे राहतात वगैरे. मला माहित नव्हतं, त्याचं नाव. त्यामुळे डिलिव्हरी बॉयला सांगायचो की, कॉल करून विचारा. कॉल केला, तेव्हा आफताब खाली आला, तेव्हाच मलाही कळलं.

"आफताबच्या घरमालकानं मला फोन केला होता की, रूममध्ये पाण्याची अडचण आहे. तिथं जाऊन एकदा त्याला सांगा पाण्याचं. तेव्हा मग तिथं गेलो होतो. मोटर कुठे आहे, कशी चालवतात हे समजावून सांगितलं होतं. त्यानंतर कधी संबंध आला नाही.

पाहिल्यावर कधी वाटलंच नाही की, हा मुलगा असं काही करू शकतो. तो अत्यंत साधेपणानं वागत होता.

मुलगी कोण होती, हे आम्हाला काहीच माहित नव्हतं, बहीण आहे की आणखी कुणी, काहीच माहित नव्हतं. तो इतरांशी बोलत असता, तर कळलं असतं. पण त्याचा दरवाजा कायम बंदच असायचा.

त्याच्या आधी तिथं राहायचे ते चांगले होते. बोलायचे वगैरे."

हे पाहिलंत का?