प्रियकरासोबत आक्षेपार्ह स्थितीत सापडलेल्या बायकोने केला नवऱ्याचा खून, सहा महिन्यानंतर मिळाला मृतदेह

पवन शर्मा

राजस्थानमधील भरतपूर जिल्ह्यात सहा महिन्यानंतर एका व्यक्तीच्या मृतदेहाचे अवशेष मिळाले आहेत. पोलिसांच्या हाती केवळ हाडांचा सांगाडा लागल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

राजस्थानमधील चिकसाना पोलीस हद्दीतील नौह गावात एका मृतदेहाचे अवशेष मिळाले आहेत. हे अवशेष पवन शर्मा नावाच्या व्यक्तीचे आहेत. 29 मे रोजी पवनने त्याची पत्नी रीमा हिला भागेंद्र नावाच्या व्यक्तीसोबत आक्षेपार्ह स्थितीत आढळली.

आपले बिंग फुटू नये या भीतीने रीमाने तिचा प्रियकर आणि प्रियकराचा मित्र या तिघांनी मिळून पवनची गळा आवळून हत्या केली आणि मृतदेह घरापासून दोन किमी दूर असलेल्या एका नाल्यात फेकून दिला.

अनेक दिवसांपासून आपला मुलगा घरी आला नाही असे पाहून पवनचे वडील हरप्रसाद शर्मा यांनी पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली होती.

भागेंद्र हा रीमाला भेटण्यासाठी दिल्लीहून आला होता. त्याचा मित्र देखील त्याच्यासोबत होता. हत्या केल्यानंतर आणि मृतदेह फेकून दिल्यानंतर भागेंद्र आणि त्याचा मित्र दोघे दिल्लीला परतले.

आपला पती हरवला आहे असा कांगावा रीमाने केला आणि त्याच्या मृत्यूची गोष्ट कुटुंबातील सदस्यांपासून लपून ठेवले असे पोलिसांनी सांगितली.

हत्येनंतरही सुरू होते संबंध

हत्या झाल्याच्या काही काळानंतर पुन्हा रीमा आणि भागेंद्र हे भेटतच होते. एका महिन्यापूर्वी रीमा आणि भागेंद्र यांना शर्मा कुटुंबीयांच्या शेजाऱ्यांनी आक्षेपार्ह स्थितीत पाहिले.

त्यानंतर शर्मा यांनी रीमा आणि भागेंद्र यांच्याविरोधात तक्रार केली.

पवन शर्माची हत्या
फोटो कॅप्शन, पवन शर्माचा मृतदेह या ठिकाणी टाकण्यात आला होता

पोलिसांनी दोघांनाही चौकशीसाठी बोलवले तेव्हा त्यांनी आपल्या कृत्याची कबुली दिली. त्यांनी सांगितलेल्या ठिकाणी पोलिसांनी आपले पथक पाठवले आणि त्या ठिकाणाहून पवनच्या मृतदेहाचे अवशेष मिळवले. भागेंद्र आणि रीमाला पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांना सोमवारी संध्याकाळी कोर्टात हजर केले जाणार आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.