श्रद्धा वालकर हत्या प्रकरण: हिंदू तरूणी-मुस्लीम तरूणाच्या लग्नाचे रिसेप्शन रद्द, काय आहे कारण?

- Author, दीपाली जगताप
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणावर काही संघटनांनी 'लव्ह जिहादचा' आरोप केल्यानंतर वसईत तणावाचं वातावरण असल्याचं दिसून येत आहे.
नुकतंच वसईत नवविवाहित हिंदू-मुस्लीम जोडप्याचा स्वागत समारंभाचा (लग्नाचे रिसेप्शन) कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.
या प्रकरणी वसईतील माणिकपूर पोलिसांनी या दोघांच्या कुटुंबीयांना पोलीस स्टेशनमध्ये बोलावलं होतं. नेमकं काय घडलं? जाणून घेऊया.
पत्रिका व्हायरल झाली?
वसईमध्ये रविवारी (20 नोव्हेंबर) 'दिव्या आणि इम्रान' या जोडप्याचा लग्नाचा स्वागत समारंभ सोहळा आयोजित करण्यात आला होता. परंतु ऐनवेळी हा कार्यक्रम रद्द करण्यात आला.
या सोहळ्याच्या दोन दिवस आधी त्यांची कार्यक्रम पत्रिका व्हायरल झाली.
एका न्यूज चॅनेलच्या संपादकाने त्यांची ही पत्रिका ट्वीटरवरती पोस्ट केली होती. त्याला हॅशटॅग लव्ह जिहाद असाही उल्लेख ट्वीटमध्ये होता.
5 हजारहून अधिक लोकांनी ही पोस्ट रिट्वीट केली आहे.
या जोडप्याच्या रिसेप्शन कार्यक्रमापूर्वी अवघ्या दोन दिवसआधी ही पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाली.
दिल्ली येथे निर्घृण हत्या झालेली श्रद्धा वालकर मूळची वसईची आहे. तसंच हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेला तिचा प्रियकर आफताब पूनावाला हा देखील वसईचा आहे.
श्रद्धा बेपत्ता असल्याची पहिली तक्रार वसईतील माणिकपूर पोलीस स्टेशनमध्ये नोंदवण्यात आली होती. तसंच आफताबलाही वसईतल्या या पोलीस स्टेशनमध्ये चौकशीसाठी बोलवण्यात आलं होतं.
दरम्यान गेल्या काही दिवसांत विविध संघटनांनी या घटनेला लव्ह जिहादचा रंग देण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते. याच पार्श्वभूमीवर 'दिव्या आणि इम्रान' यांच्या लग्नाचा स्वागत समारंभ रद्द करण्यात आल्याची चर्चा आहे.
दिव्या आणि इम्रान यांचं रजिस्टर लग्न झालं असून त्यांच्या लग्नाचं रिसेप्शन 20 नोव्हेंबरला आयोजित करण्यात आलं होतं.
काही स्थानिक संघटनांनीही या सोहळ्याला विरोध केल्याचं बोललं जात आहे.

पोलीस काय म्हणाले?
तणावपूर्ण वातावरण असताना एक आंतरधर्मीय जोडप्याने आपला समारंभ रद्द केल्याने माणिकपूर पोलिसांनी जोडप्याच्या कुटुंबियांना बोलवलं होतं.
याविषयी बोलताना माणिकपूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संपतराव पाटील यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, "हिंदू मुलगी आणि मुस्लीम मुलगा असं या जोडप्याचे रिसेप्शन रविवारी होते. त्यांना आम्ही बोलवलं होतं. वैयक्तिक कारणामुळे रिसेप्शन रद्द करत असल्याचं त्यांनी आम्हाला सांगितलं आहे. त्यांना कोणाचेही फोन काॅल्स किंवा दबाव नाही. सुरक्षेच्या कारणास्तव रद्द केले असंही काही नाही. त्यांची पत्रिका ट्वीटरवर व्हायरल झाली. अनेकांनी ती पोस्ट केली. त्यानंतर त्यांनी रिसेप्शन वैयक्तिक कारणास्तव रद्द केल्याचं सांगितलं आहे."
या दोघांनी कुटुंबीयांच्या सहमतीने विवाह केला असून 17 नोव्हेंबरला विवाह नोंदणी केली आहे. मुलगी 29 वर्षांची असून मुलगा 32 वर्षांचा आहे.

'... म्हणून त्यांनी रद्द केला'
वसईतील विश्वकर्मा सभागृहात हा सोहळा आयोजित करण्यात आला होता.
जवळपास 200 पाहुणे नवविवाहित जोडप्याला शुभेच्छा देण्यासाठी येणार होते अशीही माहिती आहे.
या सभागृहाचे पदाधिकारी शिरीष जोशी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं, "त्यांनी आम्हाला कार्यक्रम रद्द करण्यास सांगितला. पैसेही परत दिले आहे. त्यांनीच आम्हाला कळवलं की आयोजन रद्द केलं आहे. वातावरण गरम असल्याने त्यादृष्टीने त्यांनी कार्यक्रम रद्द केला."
परंतु पोलिसांनी मात्र वैयक्तिक कारणामुळे हा कार्यक्रम रद्द झाल्याचं स्पष्ट केलं आहे.











