‘मी ओरडत राहिले तरी ते भूल न देता कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करत राहिले’

फोटो स्रोत, Seetu Tiwari
- Author, सीटू तिवारी
- Role, बीबीसी हिंदीसाठी
30 वर्षीय कुमारी प्रतिमा अलौलीच्या वॉर्ड नं 8 मध्ये ब्युटी पार्लर चालवतात. अलौली हे छोटं गाव असल्याने प्रतिमा बऱ्याच जणांना माहिती आहेत. मात्र सध्या त्या एका व्हीडिओमुळे चर्चेत आहेत.
प्रतिमा यांनी 12 नोव्हेंबरला अलौली प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केली.
बीबीसी हिंदी शी बोलताना त्या म्हणाल्या, “दुपारी आम्ही आरोग्य केंद्रात गेलो होतो. तिथे गेल्यावर डॉक्टरांनी मला एक इंजेक्शन दिलं. त्याचा माझ्यावर काहीही परिणाम झाला नाही. त्यानंतर आम्ही ऑपरेशन थिएटर मध्ये गेलो. तिथे चार बेडवर असलेल्या महिला वेदनेने जोरजोरात ओरडत होत्या. आम्ही नर्सला विचारलं तेव्हा ती म्हणाली की त्या महिला नशा करतात म्हणून त्यांना वेदना होताहेत. तू नशा करत नाहीस ना, मग तुला काहीही होणार नाही.”
त्या पुढे म्हणतात, “जेव्हा डॉक्टरने ऑपरेशन चालू केलं तेव्हा मला असह्य वेदना झाल्या. मी डॉक्टरला तातडीने ऑपरेशन बंद करायला सांगितलं आणि कळवळून ओरडायला लागले. त्यावर डॉक्टरने चार पाच लोकांना बोलावलं आणि माझे हात पाय पकडून माझं ऑपरेशन केलं आणि त्यानंतर कमरेत एक इंजेक्शन दिलं.”
प्रतिमा यांची तिन्ही मुलं नॉर्मल डिलिव्हरीने झाली आहेत. त्यांचं अपेंडिक्सचं ऑपरेशन झालं आहे. त्या म्हणतात, “मला माहिती आहे की वेदना काय असतात. मला भूल दिली नव्हती.”
प्रतिमा यांचे पती शेती करतात. ते म्हणतात, “आम्ही सरकारी रुग्णालय आहे म्हणून गेलो होतो. एनजीओचे लोक ऑपरेशन करतात हे आम्हाला माहिती नव्हतं. ही अगदी मरता मरता वाचली आहे. आता हिचे उपचार खासगी रुग्णालयात होतील.”
बिहारच्या खगडिया जिल्ह्यातील अलौली प्रखंड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर सध्या अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
12 नोव्हेंबरला इथं 23 महिलांची कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया झाली होती. त्यानंतर तिथली एक रुग्ण प्रतिमाचा एक व्हीडिओ व्हायरल झाला आहे.
प्रतिमा यांनी सांगितलं की भूल न देताच त्यांचं ऑपरेशन करण्यात आलं होतं.
प्रतिमा यांच्या या वक्तव्यानंतर जिल्हा प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी करण्यास सुरुवात केली आहे.
खगडियाचे जिल्हाधिकारी अलोक रंजन घोष म्हणतात, “या प्रकरणात जिल्हा शल्यचिकित्सकांनी त्यांचा अहवाल सोपवला आहे. त्यानंतर अन्य मुद्द्यांवरही आम्ही अहवाल मागवला आहे.
आम्ही गुणवत्ता तपासण्याची एका समितीची बैठक बोलावली आहे त्यात स्त्रीरोगतज्ज्ञ आणि अनेक शल्यचिकित्सकांचा समावेश आहे. जिल्हा शल्यचिकित्सक आणि समितीच्या अहवालानंतर पुढची कारवाई करण्यात आलीय.”
या प्रकरणात राष्ट्रीय महिला आयोगाने हस्तक्षेप केला असून या प्रकरणी जबाबदार असलेल्या डॉक्टर्स आणि एनजीओ वर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
बीबीसी हिंदीने या प्रकरणात कुमारी प्रतिमा, पूजा देवी, कुमकुम देवी आणि पूजा कुमारी यांच्याशी संवाद साधला. यापैकी दोघींनी असह्य वेदना झाल्याचं सांगितलं तर बाकी दोघींनी ऑपरेशनने काहीही झालं नाही असं सांगितलं.

फोटो स्रोत, Seetu Tiwari
'नवऱ्याने सांगितलं की ऑपरेशन करून घे, वेदना मी सहन करतेय'
पूजा देवीचा नवरा कृष्णानंद चौधरी हरियाणामध्ये मजूरी करतात. पूजाची दोन महिन्याआधी नॉर्मल डिलेव्हरी झाली आहे.
मुलीच्या जन्मानंतर कृष्णानंद यांनी पूजाला कुटुंबनियोजनाची शस्त्रक्रिया करायला सांगितली. पूजा ने तिथल्या आशा वर्करशी संपर्क साधला.
त्या सांगतात, “मला सगळ्यांनी सांगितलं की काहीही होणार नाही. त्यामुळे मी त्या दिवशी ऑपरेशन करून घेण्यासाठी टेम्पोने तिथे गेले. तिथे गेल्यावर मला भूल दिली. त्यानंतर मला झोप येऊन लागली.
त्यानंतर जेव्हा ऑपरेशन थिएटरमध्ये जेव्हा चिरा दिला तेव्हा मला असह्य वेदना झाल्या. मी ओरडत राहिले. मात्र कोणीही ऐकलं नाही. नवऱ्याने सांगितलं की ऑपरेशन करून घे, वेदना मी सहन करतेय.”

फोटो स्रोत, Seetu Tiwari
काही लोकांना अजिबातच अडचण आली नाही.
अलौलीच्या बहादूरपूरमध्ये कुमकुमदेवी आणि पूजा कुमारी यांना या ऑपरेशनने काहीच झालं नाही.
कुमकुम सांगतात, “आम्ही रिक्षाने रुग्णालयात गेलो आणि रिक्षानेच परत आलो. ऑपरेशन करताना दोन इंजेक्शनं दिली. खालचा भाग पूर्णपणे बधीर झाला होता. डॉक्टरांचा आवाज ऐकू येत होता. पण मला काहीच झालं नाही.”
पूजा बीबीसी हिंदीशी फोनवर बोलताना म्हणाल्या, “मला काहीही वेदना झाल्या नाही, मी एकदम ठीक आहे.”
याच परिसरातली आशा वर्कर पुतुल कुमारी सांगतात, “ऑपरेशन व्यवस्थित झालं. मी असताना तरी काही वेगळं घडलं नाही.”

फोटो स्रोत, Seetu Tiwari
ऑपरेशनची दहशत
हे संपूर्ण प्रकरण उजेडात आल्यावर स्थानिक लोकांमध्ये गोंधळाचं आणि चिंतेचं वातावरण आहे.
अलौली येथील उषादेवी त्यांच्या दोन्ही सुनांची कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करू इच्छितात.
त्या म्हणतात, “ असं भूल न देता ऑपरेशन कोण करवून घेणार. जेव्हा सरकार व्यवस्थित ऑपरेशन करू लागेल तेव्हाच केलं जाईल.”
बिहार राज्य आरोग्य समितीच्या एका पत्रानुसार ज्या ठिकाणी योग्य संसाधनं उपलब्ध आहेत तिथे लोकल अनेस्थेशिया जनरल अनेस्थेशिया पेक्षा जास्त चांगला आहे.
लोकल अनेस्थेशिया दिल्यावर ज्या भागावर शस्त्रक्रिया करायची आहे तितकाच भाग बधीर होतो.
जिल्हा शल्यचिकित्सक अमरनाथ झा सांगतात, “आमच्याकडे भूल देणाऱ्या डॉक्टरांची वानवा आहे. त्यामुळे गावात लोकल अनेस्थेशिया देण्याचीच पद्धत आहे. जनरल अनेस्थेशिया देण्यासाठी एमडी डॉक्टरांची गरज असते.”

आम्ही नियमांचं पालन केलं.
महिलांच्या कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेचं लक्ष्य तिथली लोकसंख्या, प्रजनन दर आणि नसबंदीसाठी योग्य दांम्पत्याची संख्या यावर निर्धारित केलं जातं.
ही शस्त्रक्रिया करण्याची जबाबदारी अधिकृत एनजीओची असते. प्रत्येक शस्त्रक्रियेचे एनजीओला 2150 रुपये मिळतात. नसबंदी करवून घेणाऱ्या महिला 2000 रुपये आणि पोस्टपार्टम असेल तर महिला पेशंटला तीन हजार रुपये मिळतात.
खगडियामध्ये FRSH आणि GDI नावाच्या दोन एनजीओला या शस्त्रक्रियेसाठी अधिकृत असा दर्जा देण्यात आला आहे. GDI या संस्थेतर्फे 118 ऑपरेशन करण्यात आले आहेत.
संस्थेचे स्टेट प्रोग्राम मॅनेजर चंद्रभूषण यांनी बीबीसी हिंदीला सांगितलं, “या ऑपरेशनमध्ये 45 मिनिटांआधी बायकांना भूल देण्यात येते. ऑपरेशन थिएटरमध्ये लोकल अनेस्थेशिया दिला जातो. अलौलीमध्ये जे ऑपरेशन झाले त्यात दोन्ही प्रकारचे अनेस्थेशिया दिले होते.”
6328 महिलांनी, 10 पुरुषांनी ऑपरेशन करवून घेतलं
राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षण-5 नुसार बिहारमध्ये 15 ते 49 या वयोगटातील 34.8 टक्के लोकांनी कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केली आहे. NFHS-4 मध्ये हा आकडा 20.8 टक्के होता.
खगडियामध्ये झालेल्या NFHS-5 मध्ये हे प्रमाण 27.4 टक्के होतं. एप्रिल 2021 ते मार्च 2022 मध्ये खगडियामध्ये 6328 महिलांनी कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केली. यात पुरुषांची संख्या फक्त 10 होती.
बिहारमध्ये महिलांची कुटुंब शस्त्रक्रिया कायम चर्चेचा विषय असतो. 2012 मध्ये अररिया जिल्ह्यात दोन तासात 53 महिलांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केली होती.
2012 मध्येच गर्भाशय घोटाळा समोर आला होता. त्यात राष्ट्रीय आरोग्य विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी आर्थिकदृष्ट्या दुर्बळ असलेल्या महिलांचं गर्भाशय बळजबरीने काढल्याचं प्रकरण समोर आलं होतं.
हेही पाहिलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहि61890597ले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








