टिपू सुलतानच्या तलवारीची 143 कोटींना विक्री, वाचा ही तलवार नेमकी कशी आहे...

टिपू सुलतानच्या तलवारीची सुमारे 143 कोटी रुपयांना (14 मिलियन पाऊंड्स) विक्री झालीय. लंडनमध्ये 23 मे 2023 रोजी या तलवारीचा लिलाव करण्यात आला.

लिलावकर्त्या बॉनहॅम्स संस्थेला 15 ते 20 कोटी रुपयांमध्ये विक्रीची अपेक्षा होती. मात्र, या तलवारीची विक्री विक्रमी किंमतीत झाल्यानं, भारतीय आणि इस्लामिक कला प्रकारातील वस्तूंच्या लिलावातील विक्रमी किंमत म्हणूनही नोंद झाली.

बॉनहॅम्सच्या इस्लामिक आणि भारतीय कला विभागाचे प्रमुख ऑलिव्हर व्हाईट यांनी या लिलावापूर्वी म्हटलं होतं की, “ही अत्यंत नेत्रदीपक तलवार आहे, जी टिपू सुलतानशी संबंधित आहे. टिपू सुलतानच्या खासगी तलवारींपैकी एक आहे.”

श्रीरंगपट्टनच्या लढाईत 4 मे 1799 रोजी टिपू सुलतानचा पराभव झाल्यानंतर ईस्ट इंडिया कंपनीनं टिपूकडील अनेक वस्तू ताब्यात घेतल्या. त्यात ही तलवारही होती.

या तलवारीवर ‘शासकाची तलवार’ असं लिहिलंय. तसंच, 16 व्या शतकात भारतात दाखल झालेल्या जर्मन ब्लेडच्या मॉडेलचं अनुसरण करून तलवार बनवणाऱ्या मुघल कारागीरांनी टिपू सुलतानची ही तलवार तयार केली होती.

लिलावावेळी बॉनहॅम्सचे सीईओ ब्रुनो व्हिन्सिग्युएरा म्हणाले की, “बॉनहॅम्सला या तलवारीचा लिलाव करण्याची संधी मिळाली. ही तलवार आश्चर्यकारक वस्तूंपैकी एक आहे. या अद्भूत तलवारीसाठी किंमतही तशीच मिळाली. यासाठी संपूर्ण टीमनं मेहनत घेतली. विक्रमी किंमत त्याचाच निकाल आहे.”

यापूर्वी 2015 मध्ये टिपू सुलतानच्या हिरेजडित तलवारीचा लंडनमध्ये लिलाव झाला होता. ही तलवार 21 कोटी रुपयांना विकली गेली होती. या तलवारीवरच्या मुठीवर टिपू सुलतानच्या शासनाचं बोधचिन्ह असलेला हिऱ्यांचा वाघ होता.

'राम' नावाची अंगठी

टिपू सुलतानकडे 'राम' नावाची अंगठी होती. एका ब्रिटिश अधिकाऱ्याने टिपूच्या मृतदेहातून ही अंगठी काढून घेतली होती, असं सांगितलं जातं.

2014 मध्ये 'क्रिस्टीझ लिलावघरा'ने या अंगठीचा लिलाव केला. 'क्रिस्टीझ'च्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीवरुन ती अंगठी 41 ग्रॅम वजनाची होती.

टिपूची तोफ

2010 साली टिपू सुलतानच्या शस्त्रागाराचा लिलाव झाला. यामध्ये त्यांच्या तलवारी, बंदुकांसह एका दुर्मीळ तोफेचा पण लिलाव झाला. तोफेची लांबी अडीच मीटर पेक्षा जास्त होती.

त्यावेळी या तोफेचा निर्धारीत किंमतीपेक्षा तीनपट, म्हणजे तब्बल 3 लाख पाउंडहून अधिक मध्ये लिलाव झाला.

हे वाचलंत का?