You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
टिपू सुलतान यांच्यावरून पेटलेला वाद काय आहे?
टायगर ऑफ म्हैसूर अशी ख्याती असलेल्या टिपू सुलतान यांच्या नावावरून आज महाराष्ट्रातलं वातावरण पेटल्याचं दिसलं.
मालाडमधील एका मैदानाचे काँग्रेस नेते अस्लम शेख यांच्या हस्ते लोकार्पण झाले. या मैदानाला टिपू सुलतान यांचे नाव देण्यात आले त्यामुळे भाजपने महाविकास आघाडी सरकारवर टीकेची झोड उठवली.
लोकार्पण सोहळ्याआधी मैदानाबाहेर भाजप कार्यकर्त्यांनी निदर्शनं केली. काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले त्यानंतर हा सोहळा पार पडला.
टिपू सुलतान यांचे नाव तातडीने बदलण्यात यावं नाहीतर आम्ही तिथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा फलक लावू असा इशाराही भाजप नेत्यांनी दिला होता.
याबाबत बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले, "ज्या टिपू सुलतानने हिंदूंवर अत्याचार केले, तो देशगौरव होऊ शकत नाही. त्याचे नाव मैदानाला देणे सर्वथा गैर आहे. आम्ही हे कदापि खपवून घेणार नाही. हा निर्णय रद्द झाला पाहिजे."
या निर्णयामध्ये शिवसेनेने कॉंग्रेसची बाजू घेतलेली आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी या मैदानाच्या नावाबाबत बोलताना म्हटलं आहे की, "2013 मध्ये भाजपने गोवंडीमधल्या एका उद्यानाचं नाव टिपू सुलतान दिलं होतं. तेव्हा त्यांचा विरोध कुठे गेला होता? मग आताच का हे विरोध करत आहेत?"
आम्ही ते नाव दिलेच नाही?
कॉंग्रेसने मात्र आम्ही ते नाव दिलेच नाही. हा आमचा अधिकार नाही असं म्हणत हात वर केले आहेत.
कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं, "मैदानाला नाव देण्याचे काम महानगरपालिकेचे आहे. मंत्री अस्लम शेख हे त्या मैदानाचे नामकरण करायला गेले नाहीत. तर त्यांच्या निधीतून या मैदानाचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. त्याचे ते उद्घाटन करणार आहेत. त्या मैदानाचं टिपू सुलतान हे नाव पूर्वीपासून आहे. पण भाजपा विनाकारण त्याला धार्मिक रंग देत आहे."
मात्र बीबीसी मराठीने मंत्री अस्लम शेख यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले, "महानगरपालिकेचा एक वेगळा कायदा आहे या कायद्यानुसार कुठलाही रस्ता, उद्यान मैदानाला नाव देण्याचा अधिकार हा महापालिकेला आहे. मागच्या 25 वर्षांपासून भाजप आणि शिवसेना एकत्रितपणे मुंबई महापालिकेत सत्तेत आहे.
"अशावेळी वीर टिपू सुलतान नावाने अनेक रस्ते, उद्यानं आणि मैदानांचे प्रस्ताव हे भाजपच्या नगरसेवकांनी पास करून घेतलेले आहेत. त्यामुळे भाजप आत्ता का विरोध करते आणि सोयीचं राजकारण करते याचे उत्तर त्यांनी द्यावं," शेख म्हणाले.
मैदानाला झाशीची राणी नाव देण्याची शिवसेनेची भूमिका - किशोरी पेडणेकर
या मैदानाला टिपू सुलतान नाव दिल्याची नोंद मुंबई महापालिकेच्या दफ्तरात नाही. मैदानाला झाशीची राणी नाव देण्याची शिवसेनेची भूमिका आहे, असं स्पष्टीकरण मुंबई महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिलं आहे.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी पाठवलेल्या एका पत्रात या मैदानाचा उल्लेख 'वीर टिपू सुलतान क्रीडांगण' असा केला होता. पण महापालिकेने कधीच त्याचं नामकरण केलेलं नाही. भाजप विनाकारण या मुद्द्यावरून शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न करत आहे.
या प्रकरणामुळे सामाजिक शांतता भंग पावत आहे. भाजपने मुंबईची शांतता बिघडवण्याचा प्रयत्न करू नये, असं पेडणेकर यांनी म्हटलं.
मैदानावर कुणाला धर्म विचारला जात नाही - अस्लम शेख
"महापालिकेच्या निवडणुका आल्यामुळे भाजपला द्वेष पसरवायचं सुचत आहे. या मैदानावर कधीच कुणाला त्यांचा धर्म विचारला जात नाही. सर्व धर्माचे लोक याठिकाणी खेळू शकतात. धर्माच्या नावाने राजकारण केलं तर देश उद्ध्वस्त होण्याच्याच दिशेने जाईल," अशी टीका अस्लम शेख यांनी भाजपवर केली.
मैदानाच्या उद्घाटन कार्यक्रमात शेख बोलत होते.
यावेळी ते म्हणाले, "खेळ लोकांना जोडण्याचं काम करतो. खेळामुळे द्वेष मिटून लोकांमध्ये प्रेम निर्माण होतं. खेळभावना ही नेहमीच महत्त्वाची असते. मोठमोठ्या क्लबमध्ये श्रीमंतांची मुले जातात. पण गरिबांची सोय करण्यासाठी हे क्रीडा संकुल उभं करण्यात आलं आहे."
"मुंबई शहरात क्रीडा संकुल खूप आहेत. पण याठिकाणी स्पोर्ट्स सिटी बनवावी, जेणेकरून एकाच ठिकाणी खेळाडूंना विविध खेळ खेळायला मिळतील, अशी मागणी आम्ही प्रशासनाकडे केली आहे.
या मैदानाच्या नावावरून वाद निर्माण केला जात आहे. या मैदानाला हे नाव 15 वर्षांपासून आहे. आतापर्यंत भाजपचा कोणताच नेता इथपर्यंत कसं काय पोहोचला नाही, हे मला कळलेलं नाही."
"या लोकांची विचारसरणीच अशी आहे. त्यांना काही नवं करायचं नाही. देशाला पुढे जाऊ द्यायचं नाही. त्यांना कोणत्या ना कोणत्या प्रकारे लोकांमध्ये फूट पाडायची आहे. त्यामुळे तरूणांनी जास्तीत जास्त शिकावं, खेळावं आणि त्याचा आनंद घ्यावा. या लोकांच्या नादाला लागल्यास आपलं भविष्य उद्ध्वस्त होईल. हे तुम्हाला कधीच रोजगार देणार नाहीत.
"भाजपच्याच नगरसेवक आणि आमदारांनी टिपू सुलतान यांचं नाव रस्त्यांना तसंच वेगवेगळ्या ठिकाणी दिलेलं आहे. पण आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे त्याचा विरोध करत आहेत. भाजप खरंच या नावाचा विरोध करत असल्यास त्यांनी आपल्या आमदाराचा राजीनामा घ्यावा, ज्यांनी या नावाला अनुमोदन दिलेलं होतं," असा टोला शेख यांनी लगावला.
'भाजपकडून ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांची धर्माच्या आधारे विभागणी'
ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांची धर्माच्या आधारावर विभागणी करुन द्वेष पसरवणे व ध्रुवीकरणाचे राजकारण करणे ही भाजपाची विकृत पद्धती आहे. 2017 ला कर्नाटक विधानसभेत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी टिपूचा गौरवार्थ उल्लेख केला हे भाजप विसरला का, असा सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी केला आहे.
ते पुढे म्हणाले, "इतिहासाला काळा गोरा रंगवून टिपू सुलतानच्या नावाला भाजपा विरोध करत आहे. परंतु कोल्लूर येथील श्री मुकांबिका मंदिरातील पुजारी टिपूच्या सन्मानार्थ दररोज संध्याकाळी 7:30 वाजता "सलाम मंगलारती" करतात. नंजनगुड येथील श्रीकंठेश्वर मंदिरात, टिपूने सादर केलेल्या पन्नाच्या लिंगाची पूजा सुरू आहे.
"नेताजी बोस यांच्या होलोग्रामचे उद्घाटन मोदींनी केलं. त्याच नेताजींनी टिपू सुलतानाचा शहीद म्हणून उल्लेख करून टिपूच्या म्हैसूर टायगरचा समावेश आझाद हिंद सेनेच्या झेंडा तथा गणवेशावर केला होता. म्हैसूर गॅझेटमध्ये टिपू सुलतानने मदत केलेल्या 156 मंदिरांची यादी दिली आहे," असे सावंत यांनी म्हटले.
भाजपचा का विरोध?
टिपू सुलतान यांनी हिंदूवर अनेक अत्याचार केले. हिंदूंवर अत्याचार करणारा राजाला भाजप समर्थन देऊ शकत नाही असं भाजप नेत्यांचं म्हणणं आहे.
यासाठी 2019 साली कर्नाटकमध्ये भाजप सरकार असताना टिपू सुलतान यांच्या जयंतीवर बंदी घालण्यात आली होती.
तत्कालीन मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांनी कर्नाटकात ही जयंत साजरी केली जाऊ नये यासंदर्भात मंत्रिमंडळात निर्णय करून तसे आदेश जारी केले होते.
कॉंग्रेस आणि जेडीएस सरकारच्या काळात ही जयंती जोरदार साजरी केली जात होती. पण भाजप सरकार आल्यानंतर जयंती साजरी करण्यावर बंदी घातली गेली होती.
कोण होते टिपू सुलतान?
टिपू सुलतान हे म्हैसूरचे राजे होते. शाह बहाद्दूर फत्ते अलीखान असे त्याचे पूर्ण नाव होते. कन्नड भाषेत टिपू याचा अर्थ वाघ असा होतो. राजा हैदर अली हे त्यांचे वडील होते.
म्हैसूरच्या गादीवर येण्याआधी 1771 मध्ये मराठ्यांच्या सैन्यांबरोबर त्यांनी मुकाबला केला होता.
1782 साली हैदर अलीच्या मृत्यूनंतर टिपू सुलतान म्हैसूरच्या गादीवर आले. टिपू सुलतानने इंग्रजांशी दिलेल्या शहानंतर इंग्रजांना माघार घ्यायला लागली होती.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)