मुंबईतल्या राणीबागेचं नाव खरंच ‘हजरत हाजी पीर बाबा राणीबाग’ केलंय का?

मुंबईत भायखळा येथे असलेल्या राणीबागेचे नाव बदलल्याची एक पोस्ट व्हायरल होत आहे. त्यामुळे या बागेचं नाव बदलले आहे का असा प्रश्न सोशल मीडियावर विचारला जात आहे.

राणीची बाग अनेक कारणांमुळे चर्चेत येत असते. कधी या उद्यानातील प्राण्यांची स्थिती, कधी पेंग्विन अशा वेगवेगळ्या विषयांवर चर्चा होत राहाते.

इथल्या कोनशिलेवर असलेल्या नावामुळं या उद्यानाचं नाव बदललं असल्याचा दावा काही जण करत आहेत, तर काही जणांनी शिवसेना आणि मुंबई महापालिकेला यावरून प्रश्न विचारण्यास सुरुवात केली आहे.

नितेश राणे यांनी तर शिवसेनेवर या मुद्द्यावरून जोरदार टिका केली असून अनेक प्रकारचे आरोपही केले आहेत.

प्रकरण नेमकं काय?

सोशल मीडियावर दोन दिवसांपासून एक फोटो व्हायरल होत आहे. हा फोटो आहे राणीच्या बागेमध्ये असलेल्या एका कोनशिलेचा आहे. या कोनशिलेवर असलेल्या नावामुळं वादाला सुरुवात झाली आहे.

या कोनशिलेवर 'हजरत हाजी पीर बाबा राणी बाग' असं लिहिण्यात आलेलं आहे. या नावाच्या खाली एक दिशादर्शकही आहे. कोनशिलेवरच्या या नावामुळं विविध दावे केले जात असून तेच वादाचं कारण ठरलं आहे.

या उद्यानाचं नाव वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणीसंग्रहालय असं आहे. राणीची बाग म्हणून हे उद्यान प्रसिद्ध आहे. मात्र कोनशिलेवर हजरत हाजी पीर बाबा राणी बाग असं लिहिलं आहे.

या सर्वामुळं या बागेचं नाव बदलण्याचा घाट घातला जात आहे का? असा प्रश्न प्रामुख्यानं मुंबई महानगर पालिका आणि शिवसेनेला विचारण्यात येत आहे.

'शिवसेनेचं नाव बदलणार का?'

नितेश राणे यांनी लगेचच या मुद्द्यावरून ट्विटच्या माध्यमातून शिवसेनेवर टीका केली आहे.

"तमाम हिंदूच्या माँसाहेब जिजामाता भोसले यांच्या नावाने असलेले वीर जिजामाता उद्यानाचे नाव रातोरात बदलून हजरत पीर बाबा अशी कोनशिला लावून बदलले आहे," असा दावा नितेश राणे यांनी ट्विटच्या माध्यमातून केला आहे.

तसंच सत्तेच्या लाचारीसाठी बाळासाहेबांच्या शिवसेनेचं नावही बदलणार का? असा सावलही नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांना विचारला आहे.

मनसेचे नते संदीप देशपांडे यांनीही या मुद्द्यावरून एका वाहिनीशी बोलताना महानगरपालिकेत सत्तेत असलेल्या शिवसेनेवर टीका केली आहे.

महापौर काय म्हणाल्या

वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणीसंग्रहालयाचं म्हणजेच राणीच्या बागेचं नाव बदलल्याचा दावा हा पूर्णपणे खोटा असल्याचं, स्पष्टीकरण मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना दिलं आहे.

कोनशिलेवर राणीची बाग हे आहे हे मी स्वतः जाऊन पाहिलं आहे. पीर बाबाचं स्थान याठिकाणी अतिशय जुनं आहे. पण वीरमाता जिजाबाई उद्यान हे नाव बदलण्याचा प्रश्नच येत नाही. एवढ्याशा गोष्टीचा राईचा पर्वत बनवला जात असल्याचं आश्चर्य वाटतं.

पीरबाबांचं स्थान याठिकाणी अनेक वर्ष जुनं आहे. तिथं हिंदू मुस्लीम सर्वधर्मीय जातात, असंही किशोरी पेडणेकर यावेळी म्हणाल्या.

कोनशिला बसवण्याची परवानगी दिली की नाही, याची माहिती घेत आहे. त्याला परवानगी नसेल तर ते काढून घेतलं जाईल. पण नाव बदलण्याचा मुद्दा हा विनाकारणचा आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.

निलेश राणेंच्या टीकेवरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. उद्यानाचं नाव मुळात बदललेलं नाही. तुम्हाला मुंबई मिळवायचीच आहे तर ती अशा पद्धतीनं मिळणार नाही, असं त्यांनी म्हटलं.

कर्नाटकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची एवढी विटंबना झाली महाराष्ट्र पेटून उठला तेव्हा शांत का होते, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

'चुकीच्या भाषांतराचा परिणाम'

मुंबईतील ऐतिहासिक स्थळांचा अभ्यास असणारे भारत गोठोसकर यांनी याबाबत बोलताना हा गैरसमज भाषांतर करण्यात झालेल्या चुकीमुळं झाला असल्याची शक्यता व्यक्त केली.

राणीच्या बागेमध्ये पूर्वीपासूनच ही दर्गा आहे. याठिकाणी दोन मजार असून त्या दोन भावांच्या असल्याचं मानलं जातं असंही गोठोसकर यांनी सांगितलं.

फलकांवर दर्ग्यांबाबत लिहिताना उर्दूमध्ये ज्याठिकाणी मजार आहे त्याठिकाणचा उल्लेख केला जातो. म्हणजे हजरत हाजी पीर बाबा आणि त्यापुढे राणीच्या बागेतील असल्यामुळं राणी बाग वाले असं लिहिण्याची पद्धत आहे.

बागेच्या आजूबाजूला असलेल्या फलकांवर 'हजरत हाजी पीर बाबा राणी बाग वाले' असा उल्लेख असल्याचंही त्यांनी सांगितलं.

आपल्या भाषेत करून लिहिताना हजरत हाजी पीर बाबा यापुढं स्वल्पविराम न देता थेट पुढे राणी बाग लिहिण्यात आलं त्यामुळं हा संभ्रम झाला असावा अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली.

मात्र, राणीच्या बागेचं नाव बदललं किंवा असं काही झालं यात तथ्य नसल्याचं गोठोसकर यांनी सांगितलं.

पूर्वीचं व्हिक्टोरिया गार्डन

राणीच्या बागेतील हा दर्गा फार जुना आहे, असं गोठोसकर यांनी सांगितलं. मूळची राणी बाग ही ससून या ज्यू परिवाराची मालमत्ता होती. त्यांनी ही मालमत्ता शहराला दान केली होती. याठिकाणी बाग असावी म्हणून त्यांनी ती दान केली होती.

त्यावेळी बागेचं मूळ नाव हे व्हिक्टोरिया गार्डन होतं. त्यामुळं मराठीमध्ये लोक त्याला राणीची बाग असं म्हणू लागले, आणि तेच पुढं रुळलं असं त्यांनी सांगितलं.

पुढं इंग्रजांनी ठेवलेली नाव साठच्या दशकात बदलली तेव्हा या बागेला वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान असं ना देण्यात आल्याचं गोठोस्करांनी सांगितलं.

राणीच्या बागेची स्थापना कशी झाली?

15 डिसेंबर 1858 रोजी जगन्नाथ शंकरशेट म्हणजे नाना शंकरशेट यांच्या अध्यक्षतेखाली एक नागरिकांची सभा भरवून व्हिक्टोरिया राणीच्या नावाने एक बाग आणि वस्तुसंग्रहालय स्थापन करण्याचे निश्चित झाले होते. त्यानुसार ही बाग व म्युझियम स्थापन करण्यात आले.

या कामासाठी नाना शंकरशेट यांनी 5000 रुपयांची देणगी दिली होती. डॉ. भाऊ दाजी लाड आणि डॉ. बर्डउड यांच्या समितीने 1 लाख रुपये जमवले होते आणि तितकेच सरकारी अनुदानही त्यास मिळाले होते.

सुरुवातीच्या काळात हा प्रकल्प एस्प्लेनेडच्या जागेवर होणार होता मात्र नंतर त्याला सध्याची भायखळ्याची जागा मिळाली. शिवडीतल्या बागेतून झाडं इथं हलवण्यास 1862मध्ये सुरुवात झाली असं बाळकृष्ण बापू आचार्य आणि मोरो विनायक शिंगणे यांनी आपल्या मुंबईचा वृत्तांतमध्ये नमूद केलं आहे.

अल्बर्ट म्युझियमचे नाव नंतर डॉ. भाऊ दाजी लाड वस्तुसंग्रहालय आणि व्हिक्टोरिया गार्डनचे नाव वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान असं करण्यात आलं.

काळा घोड्यासह अनेक पुतळ्यांचं आश्रयस्थान

स्वातंत्र्यानंतर मुंबईतील वसाहतावादाची प्रतिकं, नावं, चिन्ह बदलण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. त्यानुसार प्रिन्स ऑफ वेल्ससह मुंबईतील अनेक ब्रिटिशकालीन पुतळे काढण्यात आले.

यातील बहुतेक पुतळे 'भाऊ दाजी लाड' संग्रहालयाच्या आवारात ठेवण्यात आले. तर प्रिन्स ऑफ वेल्सचा पुतळा या संग्रहालयाच्या बाहेर म्हणजेच राणीच्या बागेत ठेवण्यात आला.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)