You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
टिपू सुलतानाकडे होती हिरेजडीत तलवार आणि राम नावाची अंगठी?
टिपू सुलतान हा एक धाडसी शासक होता, ज्याने 18व्या शतकात ब्रिटिश वसाहतवाद्यांशी दोन हात केले होते. त्याची प्रतिमा एक धर्मनिरपेक्ष राज्यकर्ता अशी आहे, असं काहींचं म्हणणं आहे. पण आता काही लोक असा आरोप करत आहेत की टीपू सुलतानच्या काराकिर्दीत जवळजवळ 800 मंदिरं पाडण्यात आली होती.
दरवर्षीचा वाद
सध्या टिपू सुलतान जयंतीवरून भाजपा आणि काँग्रेस पक्षात जोरदार टोलेबाजी सुरू असते. याच दरम्यान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी टिपू सुलतानबद्दल गौरवोद्गार काढले होते. कर्नाटक विधानसभेला 60 वर्षं पूर्ण झाल्याच्या निमीत्तानं विधिमंडळाच्या संयुक्त अधिवेशनात ते बोलत होते.
"ब्रिटीशांशी लढताना टिपू सुलतान यांना वीरमरण आले. 'म्हैसूर रॉकेट्स' विकसित करून त्याचा युद्धात वापरही केला. हेच तंत्र पुढे युरोपीय लोकांनी आधुनिकरित्या विकसीत केले," ते म्हणाले होते.
टिपूसुलतानशी निगडीत इतिहासातल्या खास गोष्टी?
हिऱ्यांची तलवार
2015 मध्ये टिपू सुलतानच्या हिरेजडित तलवारीचा लंडनमध्ये लिलाव झाला. ही तलवार 21 कोटी रुपयांना विकली गेली.
या तलवारीवरच्या मुठीवर टिपू सुलतानच्या शासनाचं बोधचिन्ह असलेला हिऱ्यांचा वाघ आहे.
'राम' नावाची अंगठी
टिपू सुलतानकडे 'राम' नावाची अंगठी होती. एका ब्रिटिश अधिकाऱ्याने टिपूच्या मृतदेहातून ही अंगठी काढून घेतली होती, असं सांगितलं जातं.
2014 मध्ये 'क्रिस्टीझ लिलावघरा'ने या अंगठीचा लिलाव केला. 'क्रिस्टीझ'च्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीवरुन ती अंगठी 41 ग्रॅम वजनाची होती.
टिपूंचे रॉकेट
लंडनच्या सायन्स म्युझियममध्ये टिपू सुलतान यांनी विकसीत केलेली काही रॉकेटं ठेवली आहेत. 18व्या शतकात ब्रिटिश ते लंडनला घेऊन गेले होते.
ही रॉकेटं दिवाळीत फोडल्या जाणाऱ्या रॉकेट बाँब पेक्षा थोडीशी मोठी आहेत. माजी राष्ट्रपती आणि भारताचे मिसाईल मॅन डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी 'अग्निपंख' पुस्तकात लिहीलं आहे की त्यांनी नासा सेंटरमध्ये टिपूंच्या रॉकेटची चित्र बघितली होती.
टिपू आणि त्यांचे वडील हैदर अली यांनी दक्षिण भारतातील युद्धात रॉकेटचा वापर केला होता. या रॉकेटची युद्धात फारशी मदत झाली नाही, पण शत्रूंच्या टापूत भितीचं वातावरण मात्र याने निर्माण केलं होतं.
टिपूंची तोफ
2010 साली टिपू सुलतानच्या शस्त्रागाराचा लिलाव झाला. यामध्ये त्यांच्या तलवारी, बंदुकांसह एका दुर्मीळ तोफेचा पण लिलाव झाला. तोफेची लांबी अडीच मीटर पेक्षा जास्त होती.
त्यावेळी या तोफेचा निर्धारीत किंमतीपेक्षा तीनपट, म्हणजे तब्बल 3 लाख पाउंडहून अधिक मध्ये लिलाव झाला.
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)