शिवजयंती: मराठे आणि मुघलांमध्ये कायम शत्रुत्व होतं का ?

    • Author, जान्हवी मुळे
    • Role, बीबीसी मराठी

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आग्रा इथं उभ्या राहात असलेल्या मुघल संग्रहालयाचं नाव बदलून आता छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय असं करणार असल्याचा निर्णय सोमवारी (14 सप्टेंबर) जाहीर केला.

तो निर्णय योग्य की अयोग्य यावरून राजकीय चर्चाही सुरू झाली. शिवाजी महाराजांचा आपले नायक असा उल्लेख करतानाच, आदित्यनाथ यांनी "गुलामीच्या मानसिकतेच्या प्रतीकचिन्हांना नव्या उत्तरप्रदेशात स्थान नाही," अशा आशयाचं विधान ट्वीट केलं.

आदित्यनाथ यांनी मुघल वारसा नाकारण्याची आणि अशा प्रकारे एखादा नामबदल करण्याची ही पहिलीच वेळ नाही. असा बदल करणारे आदित्यनाथ देशातले पहिलेच राजकारणीही नाहीत.

पण आग्र्यामधल्या या नामांतरणाविषयी इतिहासकारांना काय वाटतं? मुघल भारतातलं योगदान काय आहे आणि मुख्य म्हणजे मराठ्यांसोबतचं त्यांचं नातं नेमकं काय होतं?

नामबदलाविषयी काय वाटतं?

इतिहास संशोधक आणि लेखक उदय कुलकर्णी सांगतात, की नाव बदलण्याचा निर्णय सहसा ऐतिहासिक कारणांनी घेतला जात नाही. त्यामागची कारणं सांस्कृतिक, राजकीय, अशीही असतात.

ते म्हणतात, "असे निर्णय योग्य की अयोग्य हे त्या निर्णयाकडे पाहणाऱ्या व्यक्तीच्या दृष्टीकोनावर अवलंबून आहे. इतिहासाचा अर्थ कसा लावला जातो हे त्या त्या वेळच्या राज्यकर्त्याच्या हातात असतं. हे नवं नाही, सत्तर वर्षांपासून असंच होत आहे.

"एखाद्या रस्त्याला कुणाचं नाव द्यावं यापासून कुणाला भारतरत्न द्यावं हे निर्णय व्यक्तीनिष्ठ असतात. त्यावर टिप्पणी करणं योग्य नाही. आपण ज्या काळातून या घटना पाहतो आहोत, तेव्हाच्या राजकीय परिस्थितीनुसारही दृष्टीकोनही वेगळा असतो." खरं तर इतिहासकारांनी कुठल्याही कालखंडातील व्यक्तींकडे निष्पक्षपणे पाहणं गरजेचं असतं. तसंच इतिहासाच्या दृष्टीनं पाहता कुणी एक व्यक्ती नायक किंवा खलनायक नसते, अनेकदा गतकाळातील व्यक्तीमत्त्वांना 'ग्रे' शेड्स असतात.

पण तरीही आजच्या भारतातील बहुसंख्य लोकांना औरंगजेबापेक्षा शिवाजी महाराज अनेकांना आपले नायक वाटतात, असं ज्येष्ठ इतिहासकार पांडुरंग बलकवडे यांचं निरीक्षण आहे.

"मानवतेच्या दृष्टीनं पाहिलं, तर औरंगजेबाच्या तुलनेत शिवाजी महाराज उजवे ठरतात असं मला वाटतं. एका बाजूला वडिलांना कैद करणारा आणि सत्तेसाठी भावांची कत्तल करणारा बादशाह आणि दुसरीकडे वडिलांना आदिलशाहकडून सोडवण्यासाठी राज्याचा काही भाग सोडणारा, सावत्र भावाला दक्षिणेतलं राज्य देणारा राजा अशी ही तुलना होते.

शिवाजी महाराज हे त्या काळातल्या अनेक राज्यकर्त्यांपेक्षा वेगळे ठरले, कारण ते एक सेनानी किंवा राजा नव्हते तर उत्तम प्रशासक होते. शेतकऱ्यांवरचा कर साठ टक्क्यांवरून त्यांनी निम्म्यावर आणला. त्यांच्या अशा धोरणांमुळेच त्यांना 'रयतेचा राजा' हे बिरुद मिळालं. ही धोरणं फक्त हिंदूंनाच नाही, तर सर्वांना फायदा देणारी होती."

मुघलांकडे पाहण्याचे मतप्रवाह वेगवेगळे

शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचं कौतुक करतानाच, मुघल म्हणजे परधर्मी, परकीय आक्रमक सत्ता असं वर्णन करण्याकडे काहींचा कल असतो. आदित्यनाथ आपल्या विधानातून तेच सूचित करतात. पण मुघलांकडे कुठल्या नजरेनं पाहावं याविषयी वेगवेगळे मतप्रवाह दिसतात.

उदय कुलकर्णी सांगतात, "एका बाजूला मुघलांच्या काळात बहुतांश मानकरी सरदार, मनसबदार हे दुर्रानी, इराणी होते. त्याखालोखाल भारतीय वंशाच्या व्यक्तींचा क्रमांक लागायचा. मुघल आपली भाषा, संस्कृती, धर्म इथे घेऊन आले आणि त्यांनी ते सोडलं नाही. त्यांचा राज्यकारभार फारसीतच चालायचा. या सगळ्या गोष्टी पाहता मुघलांना कुणी परदेशी म्हणू शकतं.

"पण ब्रिटिश जसे हा देश सोडून गेले, तसं मुघल गेले नाहीत. ते इथे स्थायिक झाले, रुजले त्यातल्या पुढच्या राज्यकर्त्यांचा जन्मही भारतातला होता. त्यामुळे मुघल इथले असाही दावा दुसरीकडून केला जातो."

तसंच अठराव्या शतकातल्या भारताकडे कसं पाहावं याविषयी वैचारिक पातळीवर भारतात इतिहासकारांमध्येही मतभेद आहेत आणि तुम्ही कुठून, कुठल्या शहरातून, कुठल्या काळातून या घटनांकडे बघता त्यानुसार तुमची मतं बदलत जातात, असं कुलकर्णी यांना वाटतं.

महाराष्ट्रात सरसकटपणे सर्व मुघल आपले शत्रू असं मानलं जात नाही, याकडे पांडुरंग बलकवडे लक्ष वेधतात.

अकबराचं मोठेपण देशात बहुतेक सगळेजण मान्य करतात- त्याचा सुरुवातीच्या काळातला आक्रमक इतिहास असूनही. औरंगजेबाचा भाऊ दारा शिकोहविषयीही चांगलंच बोललं जातं. त्यामुळे मुघल-मराठा संघर्षाकडे धर्मापेक्षा, स्वकीय परकीय भेदापेक्षा अन्यायकारी सत्ता आणि त्याला झालेला विरोध असं पाहायला हवं असं त्यांना वाटतं.

"शिवाजीराजांची लढाई धर्मापेक्षा अन्यायकारी सत्तांविरोधात होती- नाहीतर गोवळकोंड्याच्या कुतुबशहाशी त्यांची मैत्री झाली नसती. ते हिंदू नसते, मराठा नसते तरीही आदर्श राजा म्हणून ओळखले गेले असते."

आग्राशी मराठ्यांचं नातं

आग्रा भेटीवर गेले असताना शिवाजी महाराजांना कैद करण्यात आलं होतं आणि त्यातून सुटका करून ते महाराष्ट्रात परतले, याविषयीच्या कथा महाराष्ट्रात आजही सगळीकडे सांगितल्या जातात.

पण महाराज परतले, तरी आग्र्यासोबतचं महाराष्ट्राचं नातं संपलं नाही. ते आणखी दृढ कसं झालं, हे बलकवडे सांगतात.

"1707 साली औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मुघलांमध्ये अंतर्गत सत्तासंघर्ष सुरू झाला. याच काळात देशात उत्तरेत मराठ्यांचा प्रभाव वाढत गेला आणि ते देशातली सर्वात ताकदवान सत्ता बनले. चौथाई कराराअंतर्गत आग्र्याचा सुभा आणि किल्ला मराठ्यांकडे आला होता. जवळपास तीस वर्षांत तिथे अधूनमधून मराठ्यांचा अंमल राहिला."

पानिपतच्या पराभवानंतर ते चित्र बदललं. पण 1785पासून आग्र्याचा किल्ला महादजी शिंदेंच्या ताब्यात आला. मग 1803 साली दुसऱ्या अँग्लो-मराठा युद्धात पराभव झाल्यावर तो इंग्रजांकडे गेला.पण या काळात आग्र्याचं मराठ्यांशी नातं कायम होतं.

मुघल आणि मराठे शत्रू की मित्र?

शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेबानं आपला दरबार दक्षिणेत औरंगाबादला हलवला. तब्बल सत्तावीस वर्ष मुघल आणि मराठा सैन्यात युद्ध सुरू होतं, जे औरंगजेबाच्या मृत्यूनंतर संपलं. "त्यादरम्यानच्या काळात झालेले हाल, संभाजी राजांचा मृत्यू अशा गोष्टी महाराष्ट्र विसरलेला नाही, आणि म्हणूनच मुघलांकडे शत्रू म्हणून पाहण्याचा कल आहे," असं उदय कुलकर्णी नमूद करतात. अर्थात सत्तेची समीकरणं बदलली तसे दोन्ही राजसत्तांमधले संबंध काळानुसार बदलत गेले. संभाजी महाराजांचे पुत्र थोरले शाहू महाराज सत्तेत आले आणि त्यांनी पेशव्यांकडे कारभार दिला, तोवर मुघलांचा प्रभाव ओसरू लागला होता.

"थोरले शाहू महाराज अठऱा वर्ष औरंगजेबाच्या तुरुंगात राहिले होते. त्यांना तिथे जीवदान मिळालं, धर्मांतर करावं लागलं नाही. औरंगजेबाच्या मुलीनं शाहूंना आपल्या मुलासारखं सांभाळलं होतं, त्याचाही त्यांच्यावर परिणाम झाला होता असं सांगतात, अर्थात तसा कुठला लिखित पुरावा उपलब्ध नाही.

"पण मुघलांकडे पाहण्याची शाहूंची दृष्टी आणि मानसिकता ही थोडी वेगळी होती. त्याचं प्रतिबिंब दोन्ही सत्तांमधल्या संबंधांमध्ये पडलं. तसंच राजाची उचलबांगडी न करता त्याचं राज्य आपण चालवायचं असं काहीसं हे धोरण होतं."

तेव्हा भारतात सत्ता मुघलांच्या हातात होती, पण प्रत्यक्ष ताबा मराठ्यांकडे होता अशी परिस्थिती होती. मुघल सत्ता इतकी कमजोर होत गेली, की 1752 साली उजाडलं आणि अहमदशाह अब्दालीनं हल्ला केला, तेव्हा त्यांना मराठ्यांची मदत घ्यावी लागली.

बलकवडे सांगतात, "आपल्या एकेकाळच्या शत्रूसाठी नाही, तर भारतावर झालेल्या परकीय आक्रमणाविरोधात आणि मुघलांसोबत केलेल्या करारासाठी मराठे त्या युद्धात लढले."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)