मुंबईच्या हमिदा बानो 22 वर्षं पाकिस्तानात अडकल्यानंतर कशा परतल्या?

- Author, प्रतिनिधी
- Role, बीबीसी पंजाबी
नोकरीसाठी किंवा चार पैसे कमावण्यासाठी माणसं घर, गाव सोडून इतरत्र जात असतात. मात्र प्रत्येकाचाच हा प्रवास सुखद आणि सुरळीत पार पडतो असं नाही. काहींच्या बाबतीत त्यांचं नशीब त्यांच्याबाजूनं दान टाकत नाही . त्यामुळे त्यांच्या आयुष्याची दिशाच बदलून जाते.
हमिदा बानो या महिलेची कहाणी देखील अशीच आहे. नोकरीसाठी दुबईला जाऊ पाहणाऱ्या हमिदा यांना फसवून पाकिस्तानात नेण्यात आलं. त्यांच्या आयुष्याचा मोठा कालखंड त्यांना नाईलाजानं तिथेच जगावा लागला.
सुदैवानं आणि काही सहृदयी माणसांमुळे त्यांना आयुष्याच्या संध्याकाळी भारतात परतणं शक्य झालं आहे. एका महिलेच्या संघर्षाची, दुर्दैवाची आणि माणुसकीच्या विजयाची ही हेलावून टाकणारी कहाणी.
"मी आयुष्याची 22 वर्षे एखाद्या एका जिवंत मृतदेहासारखेच जगले. मला भारतात परतण्याची कोणतीही आशा राहिली नव्हती."
हमिदा बानो, दोन दशकांहून अधिक काळ पाकिस्तान राहून भारतात परतल्या. मायभूमीत आल्यावर त्यांच्या डोळ्यात आनंद होता आणि मनात काही धुसर, अस्पष्ट आठवणी होत्या.
बीबीसीचे प्रतिनिधी रविंदर सिंग रॉबिन यांच्याशी बोलताना त्यांनी वरील शब्दांत त्यांच्या भावना व्यक्त केल्या.


हमिदा बानो 2002 मध्ये भारतातून बेपत्ता झाल्या होत्या आणि दोन दशकांनी त्या पाकिस्तानात असल्याचं समोर आलं होतं. 16 डिसेंबरला जेव्हा त्या वाघा-अटारी सीमेवर पोहोचल्या तेव्हा भारतात परतण्याची आणि कुटुंबाला भेटण्याची कित्येक वर्षांची त्यांची प्रतीक्षा संपली.
बीबीसीला हमीदा बानो यांनी सांगितलं की, त्या आता 75 वर्षांच्या आहेत. त्यांच्या आयुष्याची 22 वर्षे पाकिस्तानात गेली आहेत.
हमिदा बानो यांचा जन्म कर्नाटकात झाला होता. मात्र, लहानपणीच त्या मुंबईत आल्या होत्या. एका भारतीय व्यक्तीशीच त्यांचं लग्न झालं होतं. त्यांना दोन मुली देखील आहेत.
भारताच्या जमिनीवर पाय ठेवताच हमिदा बानो म्हणाल्या, "मला आता माझ्या कुटुंबाबरोबर, माझ्या मुलांबरोबर राहता येईल, याचा मला खूप आनंद झाला आहे."
हमिदा बानो पाकिस्तानात कशा पोहोचल्या?
2002 मध्ये हमिदा बानो यांना एक नोकरभरती करून देणारी एजंट भेटली. या एजंटनं त्यांना आश्वासन दिलं की, तो त्यांना दुबईत स्वयंपाक्याची नोकरी मिळवून देईल. त्यानंतर हमिदा बानो यांनी भारत सोडला.
हमिदा बानो म्हणतात की, नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली त्यांची फसवणूक करण्यात आली. त्यांना दुबईऐवजी पाकिस्तानात पाठवण्यात आलं.
मुंबईत राहणाऱ्या हमिदा बानो यांच्या कुटुंबाला दोन वर्षापूर्वीच सोशल मीडियावरुन त्यांची माहिती मिळाली. त्यावेळेस त्यांच्या कुटुंबानं बीबीसी मराठीला सांगितलं होतं की, ते गेल्या 20 वर्षांपासून हमिदा बानो यांना शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.
2022 मध्ये एका भारतीय आणि एका पाकिस्तानी नागरिकाच्या मदतीनं हमिदा यांच्याबद्दल माहिती मिळाली.
पाकिस्तान आणि भारतातील संबंध तणावाचे असल्यामुळे पाकिस्तानी आणि भारतीय नागरिकांना एका देशाची सीमा ओलांडून दुसऱ्या देशात जाण्यास अनेक अडचणी येतात. त्यातच हमीदा बानो यांच्याकडे पैसेही नव्हते आणि फारशी माहिती देखील नव्हती.
मात्र पाकिस्तानात इतकी वर्षे अडकल्यावर देखील हमिदा बानो यांनी आपल्या मुलांना भेटण्याची आशा सोडली नव्हती.

फोटो स्रोत, AMAN SHEIKH
याआधी पाकिस्तानातील सामाजिक कार्यकर्ते वलीउल्लाह मारूफ यांना दिलेल्या एका मुलाखतीत हमिदा बानो म्हणाल्या होत्या की, आपल्या पतीच्या (दुसरा पती) मृत्यूनंतर त्या आपल्या मुलांचं संगोपन करत आहेत.
हमिदा बानो यांनी कतार, दुबई आणि सौदी अरेबियात स्वयंपाकी म्हणून काम केलं होतं.
त्यांचं म्हणणं आहे की, 2002 मध्ये दुबईत नोकरी मिळावी यासाठी त्यांनी एका महिला एजंटला संपर्क केला. त्या एजंटनं हमिदा यांच्याकडे 20 हजार रुपये अॅडव्हान्स म्हणून मागितले होते.
मुलाखतीत हमिदा बानो म्हणाल्या होत्या की, त्यांना दुबईला नेण्याऐवजी पाकिस्तानातील हैदराबाद शहरात नेण्यात आलं. तिथे त्यांना तीन महिने कैदेत ठेवण्यात आलं.
नंतरच्या काही वर्षात हमिदा यांनी कराचीत राहणाऱ्या एका व्यक्तीशी लग्न केलं. हे त्यांचे दुसरे पती होते. कोरोनाच्या संसर्गामुळे त्यांच्या दुसऱ्या पतीचा मृत्यू झाला. तेव्हापासून हमिदा बानो आपल्या सावत्र मुलाबरोबर पाकिस्तानात राहत होत्या.
पाकिस्तानातील हमिदा बानोंचं आयुष्य कसं होतं?
हमिदा सांगतात की, ज्यावेळी पाकिस्तानातील त्यांचे पती जिवंत होते, तेव्हा त्यांचं आयुष्य व्यवस्थित सुरू होतं. मात्र पतीच्या निधनानंतर त्यांच्या आयुष्याला एक वेगळं वळण लागलं.
हमिदा यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानातील त्यांच्या पतीची मुलं बेरोजगार आहेत आणि त्यांचं स्वत:चं कुटुंब आहे. त्यामुळे ते हमिदा यांना सांभाळू शकत नव्हते.
हमिदा म्हणाल्या, "माझे पती रस्त्यावर एक दुकान चालवायचे. मात्र त्यांनी मला कधीही कोणत्या गोष्टीची उणीव भासू दिली नाही. मात्र, त्यांच्या मुलांशी माझं तितकं जवळचं नातं नव्हतं. ती नवी पिढी आहे. त्यांना वाटतं की, ते जे कमावतात, ते पैसा स्वत:वर खर्च करावा आणि स्वत:ची काळजी घ्यावी."
"ते विचार करतात की, लग्नं तर त्यांच्या वडिलांनी केलं होतं, मग त्यांनी त्याचा भार का उचलावा."
हमिदा म्हणतात, "मात्र तरीसुद्धा मी त्यांच्या हिताचाच विचार करते. त्यांनी मला घरातून काढलं नाही. देवानं त्याचं भलं करावं, त्यांची प्रगती होवो."

फोटो स्रोत, RavinderSinghRobin
हमिदा म्हणतात की, भारतात देखील त्या कोणावर ओझं होऊ इच्छित नाहीत.
त्या म्हणाल्या, "मुंबईत पोहोचल्यावर मी दुकान सुरू करेन किंवा काहीतरी काम करेन. इथे (पाकिस्तानात) महिलांना काम करण्याची परवानगी नाही. मात्र भारतात महिलासुद्धा काम करतात. मला भाऊ-बहीण आहेत, मुलं आहेत, मात्र मला कोणावरही ओझं व्हायचं नाही."
हमिदा भारतात कशा परतल्या?
हमिदा बानो कराचीत असल्याची माहिती मिळाल्यावर इस्लामाबाद मधील भारतीय उच्चायुक्तांनी वलीउल्लाह मारूफ यांना संपर्क केला आणि मारूफ यांच्या माध्यमातून ते हमीदा बानोशी बोलले.
मारूफ म्हणाले की, पाकिस्तानातील भारतीय दूतावासातील अधिकाऱ्यांनी त्यांना संपर्क केला आणि हमिदा बानोशी बोलणं करून देण्याची त्यांना विनंती केली. जेणेकरून हमिदा यांना भारतात पाठवता यावं.
मारूफ यांना हमिदा यांनी सांगितलं की त्या कराचीत आहेत आणि त्यांना भारतात परत जायचं आहे.
हमिदा बानो यांनी त्यांना भारतात परत पाठवण्याची विनंती केली. इस्लामाबादमधील भारतीय उच्चायुक्तांनी हमिदा बानोशी संबंधित कागदपत्रं म्हणजे फोटो, मुंबईतील रेशन कार्ड, हमिदा बानो यांच्या दोन्ही मुलींचं आधार कार्ड इत्यादी बाबी परराष्ट्र मंत्रालयात पाठवल्या.

फोटो स्रोत, RavinderSinghRobin
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाला हमीदा यांची माहिती आणि त्यांच्या नागरिकत्वाबद्दल खातरजमा करण्याची विनंती करण्यात आली. दरम्यान, पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयानं या गोष्टीची पुष्टी केली की हमीदा बानो पाकिस्तानी नागरिक नाहीत.
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं पोलीस निरीक्षक, गुप्तचर विभाग आणि मुंबईतील सीआयडीच्या अहवालाच्या आधारे सांगितलं की, हमिदा बानो भारतीय नागरिक आहेत.
यानंतर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं 18 ऑक्टोबर 2024 ला इस्लामाबादमधील भारतीय उच्चायुक्तांच्या माध्यमातून हमिदा बानो भारतीय नागरिक असल्याची माहिती पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाला दिली. त्यानंतर 16 डिसेंबरला तब्बल 22 वर्षांनी हमिदा बानो सीमा पार करून मायदेशी भारतात परतल्या.
माणुसकीचा परिस्थितीवर विजय
हमिदा कराचीत असल्याचं शोधून काढणारे वलीउल्लाह त्याच शहरातील एक मशिदीचे इमाम आहेत.
मारूफ यांचं म्हणणं आहे की, हमिदा बानोंशी त्यांची पहिली भेट जवळपास 15 वर्षांपूर्वी झाली असेल. त्यावेळेस हमिदा यांच्या पतीनं मारूफ यांच्या परिसरातच एक दुकान सुरू केलं होतं.
ते म्हणाले, "मी लहानपणापासून त्यांना पाहत आलो आहे. त्या नेहमीच तणावात असायच्या."
अनेक वर्षांपासून मारूफ गेल्या त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटच्या मदतीनं बांगलादेशातून तस्करीद्वारे पाकिस्तानात आणण्यात आलेल्या महिलांची त्यांच्या कुटुंबाशी भेट घालून देत आहेत.
हमिदा यांच्या दुसऱ्या पतीचं निधन झाल्यानंतर, त्या सासूला सांगत होत्या की त्यांनी मारूफ यांना आपली मदत करण्यास सांगावं.
मारूफ यांचं म्हणणं आहे की हमिदा यांची कहाणी ऐकल्यावर त्यांना हमिदा यांना मदत करण्याची इच्छा निर्माण झाली. मात्र भारत आणि पाकिस्तानमधील तणावपूर्ण संबंधांमुळे ते असं करण्यास संकोच करत होते.
ते म्हणाले, "माझ्या मित्रांनी मला भारतापासून दूर राहण्याचा सल्ला दिला. त्यांनी मला सांगितलं की यात अडचणी येऊ शकतात. मात्र हमिदा यांची परिस्थिती पाहून मी इतका अस्वस्थ झालो की मला स्वत:ला रोखता आलं नाही."

फोटो स्रोत, Waliullah Maruf
आता हमिदा मायदेशी, भारतात परतल्या आहेत. वलीउल्लाह मारूफ म्हणतात की आधी त्यांना भीती वाटत होती की, भारत आणि पाकिस्तानात असलेल्या तणावांमुळे हमीदा बानोंचा बळी तर जाणार नाही ना.
मारूफ म्हणाले, "मी भारत आणि पाकिस्तान सरकारचा आभारी आहे. दोन्ही देशाच्या सरकारांनी सध्याच्या राजकीय स्थितीचा परिणाम हमिदांच्या बाबतीत होऊ दिला नाही. त्यांनी हमिदा यांच्याकडे एक माणूस म्हणून पाहिलं. त्यांचं दु:ख समजून घेतलं आणि त्यांना घरी परतण्यास मदत केली. हा माणुसकीचा विजय आहे."
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











