स्कर्दूचा वेढा : फाळणीनंतर या शहरासाठी सहा महिने सुरू होते भारत - पाकिस्तानमध्ये युद्ध

फोटो स्रोत, GETTY IMAGES
- Author, वकार मुस्तफा
- Role, पत्रकार आणि संशोधक
ऐतिहासिक 1947 चं ते वर्ष होतं. भारताला स्वातंत्र्य मिळण्याचा, फाळणी होण्याचा आणि संस्थानांचं विलीनीकरण होण्याचा अत्यंत महत्त्वाचा आणि तणावाचा हा काळ होता. याच दरम्यान भारत आणि पाकिस्तान ची फाळणी झाली होती.
काश्मीरच्या विलिनीकरणाचा प्रश्न धुमसू लागला होता. आजच्या पाकव्याप्त काश्मीरमध्ये असलेल्या गिलगिटमध्ये त्यावेळी तणावाची स्थिती निर्माण झाली होती.
अजूनही दोन्ही बाजूला काही ब्रिटिश लष्करी अधिकारी कार्यरत होते.
मेजर विलियम ब्राऊन 1947 मध्ये गिलगिट स्काउट्सचे ब्रिटिश कमांडर होते. ते एका अशा बंडाचा भाग झाले ज्या बंडामुळे तो भाग पाकिस्तानात 'आझाद कश्मीर' या नावाने ओळखला जाणार होता.
मेजर ब्राऊन यांच्यानुसार, "गिलगिटमध्ये तेव्हा एक अफवा पसरली होती. ती म्हणजे काश्मीरचे महाराज त्यांच्या संस्थानाचं (काश्मीर) विलिनीकरण भारतात करणार आहेत. त्याबरोबरच गिलगिट स्काउट्सच्या संभाव्य बंडाबद्दल देखील चर्चा होऊ लागली होती."
"गव्हर्नर हाऊसच्या गेटसह भिंतीवर सर्वत्र 'पाकिस्तान जिंदाबाद' आणि 'कश्मीर के महाराजा मुर्दाबाद' अशा घोषणा लिहिण्यात आल्या होत्या."
"ते (गव्हर्नर) स्वत: या घोषणा पुसत असल्याचं मी पाहिलं. मात्र दुसऱ्याच दिवशी सकाळी माझ्या घराच्या गेटवर सुद्धा याच घोषणा पुन्हा लिहिण्यात आल्या होत्या."
या भागात गिलगिटबरोबरच स्कर्दू शहराची समावेश होता. आज हा भाग पाकिस्तानच्या ताब्यातील गिलगिट-बाल्टिस्तानचा भाग आहे. मात्र या कहाणीची सुरुवात 1947 मध्ये गिलगिटमधूनच झाली होती.


तो अतिशय तणावाचा काळ होता. भारत आणि पाकिस्तान स्वतंत्र झाले होते. मात्र जम्मू आणि काश्मीरबरोबरच काही संस्थानांचं विलीनीकरण वादग्रस्त बनलं होतं.
त्यावेळी मेजर ब्राऊन गिलगिटमध्ये होते. त्यांनी 'गिलगिट रिबेलियन' (म्हणजेच गिलगिटमधील विद्रोह) नावाचं पुस्तक लिहिलं आहे. त्यात त्यांनी लिहिलं आहे की, 25 ऑक्टोबर 1947 च्या संध्याकाळी बातम्यांमधून कळालं की भारत सरकारनं काश्मीरमध्ये सैन्य पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.
काही दिवस आधीच कबिल्यांतील हल्लेखोरांनी मुजफ्फराबाद मार्गे काश्मीरवर हल्ला केला होता. ते श्रीनगरजवळ पोहोचले होते. तेव्हा गिलगिट-बाल्टिस्तान जम्मू काश्मीर संस्थानाचाच भाग होता.
समाजशास्त्राचे प्राध्यापक सईद अहमद यांनी 'दि गिलगिट-बाल्टिस्तान कॉन्ड्रम: डायलेमाज ऑफ पॉलिटिकल इंटिग्रेशन' हे पुस्तक लिहिलं आहे. या पुस्तकात ते म्हणतात की, त्यावेळी जम्मू काश्मीर संस्थानाचे चार भाग होते. जम्मू प्रांत, काश्मीर प्रांत, गिलगिट जिल्हा आणि लडाख जिल्हा.
मात्र 1935 मध्ये इंग्रजांनी डोगरा शासकांकडून गिलगिट 60 वर्षांच्या भाडेपट्टीवर (लीज) घेतलं होतं. तर बाल्टिस्तान मात्र डोगरा शासनाच्या अखत्यारितच होतं.
गिलगिटमधील बंड, गव्हर्नर घनसारा सिंह आणि मेजर ब्राउन
सईद अहमद पुस्तकात लिहितात की, भारत आणि पाकिस्तान स्वतंत्रहोण्याच्या दोनच आठवडे अगोदर अचानक इंग्रजांनी गिलगिटचा भाडेकरार रद्द केला. त्यानंतर 30 जुलै 1947 ला काश्मीरच्या लष्कराचे ब्रिटिश कमांडर इन चीफ, मेजर जनरल स्कॉट गिलगिटला पोहोचले.
त्यांच्यासोबत ब्रिगेडियर घनसारा सिंह सुद्धा होते. काश्मीरच्या महाराजांनी ब्रिगेडियर घनसारा सिंह यांना गिलगिटचं गव्हर्नर बनवलं होतं.
तोपर्यंत काश्मीर संस्थानाचं भारतात विलिनीकरण करायचं की पाकिस्तानात, याचा निर्णय काश्मीरच्या महाराजांनी घेतलेला नव्हता. पण, ब्रिटिश राजवट संपल्याबरोबर काश्मीरच्या विविध भागात महाराजांच्या विरोधात निदर्शनं सुरू झाली होती.
त्याचवेळी टोळीवाल्यांनी श्रीनगरकडून हल्ला चढवला. त्यामुळं 27 ऑक्टोबर 1947 ला महाराजांनी काश्मीरचं भारतात विलिनीकरण करत असल्याची घोषणा केली.

फोटो स्रोत, THE GILGIT REBELLION/BOOK
मेजर ब्राऊन यांच्या पुस्तकानुसार गिलगिट स्काउट्सने आधीच एक क्रांतिकारक काऊन्सिल बनवलं होतं. या परिस्थितीत 31 ऑक्टोबर 1947 ला 'ऑपरेशन दिता खेल' या नावानं त्यांनी बंडाची सुरुवात केली.
बंडाची सुरूवात गिलगिटजवळ बोंजी इथून झाली. तिथे मिर्झा हसन खान यांच्या नेतृत्वाखाली काश्मीर संस्थानच्या सैन्यातील मुस्लिम सैनिकांनी सहाव्या काश्मीर इन्फंट्रीच्या शीख कंपन्यांवर हल्ला केला.
इकडे गिलगिटमध्येही संघर्ष सुरू होता. थोडा विरोध केल्यानंतर गव्हर्नर घनसारा सिंह यांनी सुभेदार मेजर बाबर यांच्यासमोर शरणागती पत्करली. मेजर ब्राउन यांनी देखील या करारावर सह्या करून घेतल्याचा दावा केला आहे.
एक नोव्हेंबर 1947 ला गिलगिटमध्ये हंगामी सरकारची स्थापना झाली. या सरकारनं विनाअट पाकिस्तानात विलिनीकरण करून घेतलं.
16 नोव्हेंबर 1947 ला पाकिस्तान सरकारचे प्रतिनिधी सरदार मोहम्मद आलम खान एक राजकीय प्रतिनिधी किंवा मध्यस्थ म्हणून गिलगिटला पोहोचले.
स्कर्दूची लढाई
निवृत्त पाकिस्तानी ब्रिगेडियर मसूद अहमद खान यांनी लिहिलं आहे की, त्यावेळी मेजर असलम खान (नंतर ते ब्रिगेडियर झाले) यांना गिलगिटमध्ये तैनात करण्यात आलं होतं. मेजर असलम खान यांनी परिस्थितीचा अंदाज घेत स्थानिक स्काउट्ससह रझाकारांना प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली.
या योजनेंतर्गत सैन्याच्या चार वेगवेगळ्या तुकड्या तयार करण्यात आल्या. यातील एकाचं नाव 'आय बेक्स फोर्स' असं ठेवण्यात आलं होतं.
असलम खान आठ बहिण-भावांपैकी एक होते. असगर खान हे त्यांचे भाऊ होते. पुढे हेच असगर खान पाकिस्तानच्या वायुदलाचे एअर चीफ मार्शल आणि प्रमुख बनले.
मसूद अहमद खान यांच्यानुसार स्कर्दू शहर सिंधू नदीच्या काठावर वसलेलं असून ते समुद्र सपाटीपासून 7,400 फुटांच्या उंचीवर आहे. व्यूहरचनात्मकदृष्ट्या स्कर्दू अतिशय महत्त्वाचं देखील होतं.
अशा परिस्थितीत भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांना या गोष्टीची जाणीव होती की स्कर्दू आपल्या ताब्यात असलं पाहिजे. अर्थात अतिशय दुर्गम आणि डोंगराळात भागात असल्यामुळे गिलगिटहून 160 मैलांवर असलेल्या स्कर्दूला पोहोचण्यास त्याकाळी 20 दिवस लागायचे.

फोटो स्रोत, THE GILGIT REBELLION/BOOK
स्कर्दू शहर बाल्टिस्तानचं राजकीय केंद्र होतं. तसंच काश्मीरच्या लडाखमधील एका तालुक्याचं मुख्यालय देखील होतं. सरकारी कर्मचारी तिथे वर्षातील सहा महिने वास्तव्याला असायचे तर उर्वरित सहा महिने त्यांचा मुक्काम लेह मध्ये असायचा.
एस कुमार महाजन यांनी 'डिबॅकल इन बाल्टिस्तान' नावाचं एक पुस्तक लिहिलं आहे. त्यांच्यानुसार, मेजर शेर जंग थापा यांच्या नेतृत्वाखाली सहाव्या बटालियनची एक कंपनी लेह मध्ये होती.
गिलगिटमधील बंडाची बातमी कळताच मेजर शेर जंग थापा यांना लेफ्टनंट कर्नलच्या पदावर बढती देऊन स्कर्दूच्या सुरक्षेसाठी जाण्याचा आदेश देण्यात आला.
महाजन यांच्यानुसार, 3 डिसेंबर 1947 ला शेर जंग थापा स्कर्दूला पोहोचले. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की, परिस्थिती अवघड आणि प्रतिकूल आहे. त्यांनी आणखी सैन्य पाठवण्याची मागणी केली मात्र ती फेटाळण्यात आली.
त्यांना सांगण्यात आलं की शेवटचा सैनिक आणि शेवटच्या गोळीपर्यत लढा. लढाईची तयारी करताना शेर जंग थापा यांनी शहराच्या बाहेरून एक वेढा घातला.

भारत पाकिस्तानबाबत इतर काही महत्त्वाच्या बातम्या :

स्कर्दूचा वेढा
महाजन यांच्या मते, त्यावेळी लडाखचे जिल्हा मॅजिस्ट्रेट अमरनाथ हे स्कर्दूमध्ये होते. लडाख, कारगील आणि स्कर्दूमध्ये भारतीय सैन्याला लगेच उतरण्यासाठी विमान नेमकं कुठे उतरवता येईल हे त्यांनी सांगितलं होतं.
मात्र भारतीय सैन्य तेव्हा काश्मीरमध्ये दुसऱ्या आघाड्यांवर लढत होतं. त्याचबरोबर महाजन यांच्या मते आणखी एक अडचण अशी होती की, भारतीय वायुसेनेकडं असलेली विमानं अमरनाथ यांनी सांगितलेल्या ठिकाणी उतरू शकत नव्हती.
अहमद हसन दानी यांच्या ‘तारीख-ए-शुमाली इलाकाजात’(उत्तरेकडील भागाचा इतिहास) या पुस्तकानुसार, परिस्थितीचा अंदाज मेजर असलम खान यांना देखील होता. त्यांना माहिती होतं की, जर विमानाद्वारे भारतीय सैन्य श्रीनगर प्रमाणेच स्कर्दूला पोहोचलं तर हे शहर त्यांच्या हातून जाईल.
अशा परिस्थितीत त्यांच्याकडे फारच थोडा वेळ होता.
मात्र, स्कर्दूजवळच्या रोंदो च्या राजाकडून मिळालेली मदत आणि चांगल्या योजनेमुळे मेजर एहसान यांच्या नेतृत्वाखाली आलेल्या आय बेक्स फोर्सला पहिला वेढा मोडण्यात आणि स्कर्दूपर्यत पोहोचण्यात यश मिळालं.

फोटो स्रोत, THE GILGIT REBELLION
बोंजीहून माघार घेणाऱ्या सहाव्या जम्मू काश्मीर लाइट इन्फंट्री बटालियनच्या तुकड्या स्कर्दू शहराच्या खरपोचो किल्ल्यात ग्राउंड पॉईंट 8853 वर आणि छावणीच्या आत आणि त्याच्या आसपासच्या भागात तैनात होत्या.
अशावेळी भारताच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मदतीसाठी म्हणून दोन अतिरिक्त कंपन्यांना श्रीनगरहून स्कर्दूला पाठवलं. या कंपन्यांचं नेतृत्व ब्रिगेडियर फकीर सिंह करत होते.
11 फेब्रुवारी 1948 ला स्कर्दू छावणीवर पहिला हल्ला चढवण्यात आला. यात दोन्ही बाजूने जोरदार गोळीबार झाला.
बी चक्रवर्ती यांच्या 'स्टोरीज ऑफ हिरोइझम' या पुस्तकानुसार 11 फेब्रुवारी 1948 ला आय बेक्स फोर्स आणि किल्ल्यातील सैन्यामध्ये सहा तास लढाई झाल्यानंतर हल्लेखोर मागे हटले.
तिथे फेब्रुवारी आणि मार्च मध्ये आणखी हल्ले चढवण्यात आले. मसूद खान यांच्यानुसार यात पॉईंट 8853 सह अर्धी ठाणी ताब्यात घेण्यात आली.
"याचदरम्यान अशी बातमी आली की अडचणीत असलेल्या सैन्याला मदत करण्यासाठी ब्रिगेडियर फकीर सिंह यांच्या नेतृत्वाखाली एक ब्रिगेड स्कर्दूला येते आहे. कारगिल - स्कर्दू रस्त्यावर असणाऱ्या भारतीय सैनिकांवर लपून हल्ला चढवत गोळीबार करण्यात आला," असं ते म्हणाले.
भारतीय सैनिकांवर उंचावरून मोठ-मोठे दगडही फेकण्यात आले.
यात भारतीय सैनिकांची हानी झाली. "ब्रिगेडियर फकीर सिंह आणि त्यांचे सल्लागार कमी प्रकाशामुळं काही सैनिकांसह तिथून निसटण्यात यशस्वी झाले. मात्र या हल्ल्यात बऱ्याच जणांनी सिंधू नदीत उड्या मारल्या आणि ते बुडून मेले."
शेर जंग थापांची माघार
महाजन यांच्यानुसार या सर्व प्रतिकूल परिस्थितीत स्कर्दूमध्ये अडकलेले भारतीय सैनिक आणि त्यांचे कमांडर शेर जंग थापा यांचं धैर्य खचत चाललं होतं. रसददेखील संपत चालली होती. याचदरम्यान भारतीय वायुदलानं काही प्रमाणात रसद, साहित्य किल्ल्यापर्यंत पोहोचवलं.
त्यावेळी मेजर एहसान यांनी काही सैन्य स्कर्दूहून पुढे कारगिल आणि जोझिलाच्या दिशेनं पाठवलं. मे 1948 मध्ये आय बेक्स फोर्सच्या लोकांना एक्सिमो फोर्सच्या मदतीनं कारगिल आणि द्रास ताब्यात घेण्यात यश आलं होतं.
मात्र नंतरच्या काळात भारतीय सैन्यानं केलेल्या हल्ल्यांनंतर त्यांना मागं हटावं लागलं होतं.
त्याचवेळी चित्राल स्काउट्स आणि चित्राल बॉडीगार्ड्सचे 300 जवान शहजादा मताऊल मुल्क आणि मेजर बुरहानुद्दीन यांच्या नेतृत्त्वाखाली स्कर्दूत पोहोचले. तिथे मताऊल मुल्क यांनी शरणागती पत्करण्याचा संदेश पाठवला, मात्र उत्तर आलं नाही.
चंदर बी खंडुरी लिहितात की, ऑगस्ट 1948 च्या मध्यापर्यंत स्कर्दूच्या छावणीची स्थिती वाईट झाली होती.
"13 ऑगस्ट 1948 ला स्कर्दूमध्ये असलेल्या काश्मीरी आणि भारतीय सैन्यानं छोट्या छोट्या तुकड्यांद्वारे किल्ला सोडत तिथून माघार घेतली," असं ते लिहितात.

फोटो स्रोत, DEBACLE IN BALTISTAN/BOOK
"14 ऑगस्ट 1948 ला पाच महिन्यांच्या प्रदीर्घ वेढ्यानंतर लेफ्टनंट कर्नल थापा, कॅप्टन गंगा सिंह, कॅप्टन पी सिंह आणि लेफ्टनंट अजीत सिंह यांनी अडीचशे जवानांसह शरणागती पत्करली."
इतिहासकार डॉक्टर अहमद हसन दानी यांच्यानुसार, शेवटचा विजय चित्रालचा जवानांच्या मदतीनं मिळाला. त्यांनी कर्नल मताऊल मुल्क यांच्या नेतृत्वाखाली निर्णायक हल्ला केला.
14 ऑगस्ट 1948 च्या दुपारी एक वाजता डोंगर माथ्यावर असलेल्या खरपोचो या ऐतिहासिक किल्ल्यावर पाकिस्तानचा झेंडा फडकला. त्यानंतर दक्षिण बाल्टिस्तानसह स्कर्दू पाकिस्तान शासित उत्तर प्रांताचा एक भाग बनलं.
मेजर एहसान अली यांना पाकिस्तान सरकारनं सितारा-ए-जुर्रत या पुरस्कारानं गौरवलं. तर लेफ्टनंट कर्नल शेर जंग थापा यांना नंतर भारतात महावीर चक्रानं सन्मानित करण्यात आलं.
युद्ध संपल्यानंतर लेफ्टनंट कर्नल शेर जंग थापा आणि इतर कैद्यांना भारतात परत पाठवण्यात आलं होतं.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











