सॅम माणेकशॉ: ज्यांनी इंदिरा गांधींच्या योजनेला थेट नकार देण्याचं धाडस दाखवलं होतं

सॅम माणेकशॉ इंदिरा गांधींसोबत

फोटो स्रोत, SAM MANEKSHAW FAMILY

फोटो कॅप्शन, सॅम माणेकशॉ इंदिरा गांधींसोबत
    • Author, रेहान फझल
    • Role, बीबीसी हिंदी

सॅम होरमुजजी फ्रामजी जमशेदजी माणेकशॉ... पण या नावाने त्यांना क्वचितच कोणी हाक मारली असेल.

त्यांचे मित्र, बायको, नातवंडं आणि फिल्डवरचे अधिकारी असे सगळेच जण त्यांना सॅम किंवा 'सॅम बहादूर' म्हणायचे. पण त्यांच्या नावाला प्रसिद्धी मिळाली ती 1942 साली. दुसरं महायुद्ध सुरू असताना बर्मामध्ये एका जपानी सैनिकाने मशीनगनमधून झाडलेल्या सात गोळ्यांनी त्यांच्या आतडं, यकृत आणि मूत्रपिंडाला गंभीर इजा झाली.

त्यांचं चरित्र लिहिणारे मेजर जनरल व्ही. के. सिंग बीबीसीशी बोलताना सांगतात की, "त्यावेळचे कमांडर मेजर जनरल कोवान यांनी त्याचवेळी मिलिट्री क्रॉस सॅम यांच्या छातीवर लावला. कारण मृत सैनिकाला मिलिट्री क्रॉस देता येत नव्हता."

युद्ध सुरू असताना जखमींना आहे त्याच अवस्थेत टाकून पुढे जावं असा आदेश देण्यात आला होता. माणेकशॉ देखील जखमी होते. बटालियन जखमींना परत आणण्यात गुंतली तर सैन्याचा वेग मंदावेल म्हणून हा आदेश दिला होता. पण सुभेदार शेरसिंगने माणेकशॉ यांना खांद्यावर उचलून परत आणलं.

माणेकशॉ यांची प्रकृती इतकी गंभीर होती की, डॉक्टरांना त्यांच्यासाठी वेळ देणं योग्य वाटलं नाही.

त्यावेळी सुभेदार शेरसिंग यांनी आपली लोड केलेली रायफल डॉक्टरांच्या दिशेने रोखत म्हटलं की, "जपान्यांबरोबर लढताना जखमी झालेल्या अधिकाऱ्यांना खांद्यावर टाकून आम्ही इथवर आलोय. तुम्ही उपचारच केला नाही म्हणून त्यांचा जीव गेला आणि हे सगळं आमच्या डोळ्यादेखत घडलं असं व्हायला नको. तुम्ही यांच्यावर उपचार केले नाहीत तर मला तुमच्यावर गोळी झाडावी लागेल."

शेवटी हतबल झालेल्या डॉक्टरांनी काहीशा अनिच्छेनेच उपचार करायला सुरुवात केली. त्यांनी माणेकशॉ यांच्या शरीरात घुसलेल्या गोळ्या काढल्या, आतड्याचा खराब झालेला भाग कापला. आणि आश्चर्य म्हणजे माणेकशॉ वाचले. सुरुवातीला त्यांना मंडाले, नंतर रंगून आणि मग भारतात आणण्यात आलं. पुढे 1946 मध्ये लेफ्टनंट कर्नल सॅम माणेकशॉ यांना दिल्लीतील लष्कराच्या मुख्यालयात तैनात करण्यात आलं.

सॅम माणेकशॉ भारतीय जवानासोबत

फोटो स्रोत, BHARATRAKSHAK.COM

1948 मध्ये काश्मीरचं भारतात विलीनीकरण करायचं ठरलं. त्यावेळी व्ही. पी. मेनन श्रीनगरला महाराजा हरिसिंह यांच्याशी बोलणी करण्यासाठी गेले. त्यावेळी त्यांच्यासोबत सॅम माणेकशॉही देखील होते. 1962 मध्ये चीनसोबतचं युद्ध हरल्यानंतर फोर्थ कॉर्प्सचे कमांडर बीजी कौल यांच्या जागी सॅम यांची नियुक्ती करण्यात आली.

पदभार स्वीकारताच सॅम यांनी सीमेवर तैनात सैनिकांना उद्देशून म्हटलं की, "जोपर्यंत तुम्हाला कोणताही लिखित आदेश मिळत नाही तोपर्यंत तुम्ही सीमेवरून माघार घ्यायची नाही. आणि लक्षात ठेवा की, असा आदेश तुम्हाला कधीच मिळणार नाहीये."

खोडकर स्वभावाचे माणेकशॉ

सॅम माणेकशॉ जवानांसोबत

फोटो स्रोत, SAINIKSAMACHAR.NIC.IN

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

याच काळात पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि संरक्षणमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी सीमाभागाचा दौरा केला होता. नेहरूंसोबत त्यांच्या कन्या इंदिरा गांधीही होत्या.

सॅम यांचे एडीसी ब्रिगेडियर बहराम पंताखी त्यांच्या 'सॅम माणेकशॉ - द मॅन अँड हिज टाईम्स' या पुस्तकात लिहितात, "सॅम यांनी इंदिराजींना ऑपरेशन रूममध्ये प्रवेश करू नये असं सांगितलं. कारण त्यांनी गोपनीयतेची शपथ घेतली नव्हती. त्यावेळी इंदिरा गांधींना याचं वाईट वाटलं होतं. पण सुदैवाने या गोष्टीमुळे त्या दोघांमधील संबंध बिघडले नाहीत."

सॅम त्यांच्या मिश्किल स्वभावासाठी ओळखले जायचे. शिवाय ते त्यांच्या खाजगी आयुष्यातही तितकेच खोडकर आणि चेष्टा करणारे होते.

त्यांची मुलगी माया दारूवाला बीबीसीशी बोलताना सांगतात की, "लोकांना वाटतं की, सॅम मोठे जनरल होते. त्यांनी अनेक लढाया लढल्या, त्यांच्या मोठ्या मिशांमुळे त्यांच्या घरी खूपच शिस्तीचं वातावरण असेल. पण तसं काहीच नव्हतं.

ते लहान मुलांसारखे खोडकर स्वभावाचे होते. आमच्यासोबत ते मस्ती करायचे, आम्हाला त्रास द्यायचे, आमच्या खोड्या काढायचे. बऱ्याचदा आम्हालाच त्यांना थांबवावं लागायचं. जेव्हा केव्हा ते आमच्या रूममध्ये यायचे तेव्हा आम्हाला प्रश्न पडायचा की हे आता काय करणार आहेत?"

संरक्षण सचिवांसोबत वाद...

सॅम माणेकशॉ

फोटो स्रोत, BHARATRAKSHAK.COM

त्यांच्या याच खोडकरपणामुळे ते प्रसिद्ध होते. पण गोष्ट जेव्हा शिस्त किंवा लष्करी नेतृत्व आणि नोकरशाही यांच्याशी संबंधित असायची तेव्हा त्यांना तडजोड मान्य नसायची.

त्यांचे मिलिट्री असिस्टंट राहिलेले लेफ्टनंट जनरल दीपेंद्र सिंग त्यांच्या कडक स्वभावाचा किस्सा सांगतात.

"एकदा लष्कराच्या मुख्यालयात एक बैठक सुरू होती. त्या बैठकीला तेव्हाचे संरक्षण सचिव हरीश सरीनही उपस्थित होते. त्यांनी तिथेच बसलेल्या एका कर्नलला सांगितलं की, 'यू देअर, ओपन द विंडो.' ते कर्नल उठत होते इतक्यात सॅम खोलीत शिरले. ते संरक्षण सचिवांकडे वळून म्हणाले, "सचिव महोदय, इथून पुढे माझ्या कोणत्याही अधिकाऱ्याशी या टोनमध्ये बोलायचं नाही. हे अधिकारी कर्नल आहेत, 'यू देअर' नाहीत."

हरीश सरीन त्या काळातील अत्यंत शक्तिशाली आयसीएस ऑफिसर होते आणि तरीही त्यांना माफी मागावी लागली.

कपड्यांचा शौक

माणेकशॉ यांना चांगले कपडे घालण्याचा शौक होता. जर कधी त्यांना कॅज्युअल कपडे घालून पार्टीला यायचं निमंत्रण मिळायचं तेव्हा ते अशा निमंत्रणाला नकार द्यायचे.

दीपेंद्र सिंग सांगतात, "एकदा सॅम घरी नाहीत असं समजून मी आणि माझी पत्नी त्यांच्या घरी गेलो होतो. मी सफारी सूट घातला होता. आम्ही मिसेस माणेकशॉ यांची भेट घेऊन घरी परतणार होतो, पण अचानक सॅम आले. माझ्या पत्नीकडे वळून ते म्हणाले की, तू नेहमीप्रमाणेच सुंदर दिसते आहेस पण तू या जंगली माणसासोबत यायला तयार कशी झालीस? त्याने हे कसले कपडे घातले आहेत."

सॅम माणेकशॉ

फोटो स्रोत, Getty Images

सॅम यांना वाटायचं की, त्यांच्या एडीसींनी देखील त्यांच्यासारखेच कपडे घालावेत. पण ब्रिगेडियर बहराम पंताखी यांच्याकडे फक्त एकच सूट होता. सॅम ईस्टर्न कमांडचे प्रमुख असताना त्यांनी आपल्या कारमधून एडीसी बहराम यांना पार्क स्ट्रीटमधील बॉम्बे डाईंग शोरूममध्ये यायला सांगितलं.

तिथे ब्रिगेडियर बहराम यांनी त्यांना ब्लेझर आणि ट्वीड कापड खरेदी करण्यास मदत केली. सॅमने बिल दिले आणि घरी पोहोचताच त्या कपड्यांची पिशवी एडीसी बहराम यांच्याकडे दिली.

पिशवी देताना ते म्हणाले की, "यातले दोन कोट स्वतःसाठी शिवून घ्या."

इदी अमीन यांच्यासोबत जेवण

एकदा युगांडाचे लष्करप्रमुख इदी अमीन भारताच्या दौऱ्यावर आले होते. तेव्हा ते राष्ट्रपती झाले नव्हते. त्यांच्या दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी सॅम माणेकशॉ यांनी अशोका हॉटेलमध्ये मेजवानी आयोजित केली होती. त्यावेळी इदी अमीन म्हणाले होते की, त्यांना भारतीय सैन्याचा गणवेश खूप आवडतो. आणि त्यांना त्यांच्या मापाचे 12 गणवेश युगांडाला घेऊन जायचे होते.

सॅम यांच्या आदेशावरून कॅनॉट प्लेसचं प्रसिद्ध टेलर शॉप एडीज रात्रभर सुरू ठेवण्यात आलं होतं. सुमारे बारा टेलर इदी अमीनसाठी रात्रभर गणवेश शिवत होते.

सॅम यांना घोरण्याची सवय होती. त्यांची मुलगी माया दारूवाला सांगते की, त्यांची आई सीलू आणि सॅम कधीही एका खोलीत झोपायचे नाहीत. कारण सॅम मोठमोठ्याने घोरायचे. रशियाच्या दौऱ्यावर असताना लायजन ऑफिसर जनरल कुप्रियानो सॅम यांना त्यांच्या हॉटेलपर्यंत सोडायला गेले होते.

ते निघणार इतक्यात सीलू यांनी "माझी खोली कुठली आहे?" अशी विचारणा केली.

त्यावर लायजन ऑफिसर जनरल कुप्रियानो टेन्शनमध्ये आले. पण सॅम यांनी परिस्थिती हाताळत म्हटलं की, मी मोठमोठ्याने घोरतो आणि माझ्या पत्नीला निद्रानाशाचा त्रास आहे, त्यामुळे आम्ही दोघेही वेगवेगळ्या खोल्यांमध्ये झोपतो. इथेही सॅम यांची मस्करी करायची सवय सुटली नाही.

रशियन जनरलच्या खांद्यावर हात ठेवून ते त्याच्या कानात पुटपुटले की, "माझ्या बायकोला सोडून, आजपर्यंत ज्या स्त्रियांना भेटलो त्यातल्या एकीनेही माझ्या घोरण्याची तक्रार केलेली नाही."

इंदिरा गांधींसोबतचं नातं

सॅम माणेकशॉ जवानांसोबत

फोटो स्रोत, TWITTER@ADGPI

1971 च्या युद्धावेळी इंदिरा गांधींना मार्चमध्येच पाकिस्तानवर हल्ला करायचा होता. पण भारतीय लष्कर या हल्ल्यासाठी तयार नसल्यामुळे सॅम यांनी थेट नकार दिला.

त्यामुळे इंदिरा गांधी नाराज झाल्या. यावर मानेकशॉ त्यांना म्हणाले की, "तुम्हाला युद्ध जिंकायचं आहे की नाही? इंदिरा गांधींनी मान डोलावत 'हो' म्हटलं."

त्यावर माणेकशॉ म्हणाले, "मला सहा महिन्यांचा वेळ द्या. मी गॅरंटी देतो की, विजय आपलाच होईल."

इंदिरा गांधी आणि त्यांचं बिनसल्याचे बरेच किस्से प्रसिद्ध आहेत.

मेजर जनरल व्ही के सिंह सांगतात, "एकदा इंदिरा गांधी परदेश दौऱ्यावरून परत येत होत्या तेव्हा माणेकशॉ त्यांना रिसिव्ह करण्यासाठी पालम विमानतळावर गेले. इंदिरा गांधींना पाहताच ते म्हणाले की, तुमची हेअरस्टाईल छान दिसतेय. इंदिरा गांधी हसल्या आणि म्हणाल्या, इतर कोणीच नोटीस नाही केलं."

टिक्का खान यांची भेट...

सॅम माणेकशॉ जवानांसोबत

फोटो स्रोत, TWITTER@ADGPI

पाकिस्तान सोबतच्या युद्धानंतर सॅम माणेकशॉ पाकिस्तानात गेले होते. त्यावेळी जनरल टिक्का हे पाकिस्तानचे लष्करप्रमुख होते.

भारताची काश्मीर मधील चौकी थाकोचक पाकिस्तानच्या ताब्यात होती. पाकिस्तान ती चौकी सोडायला तयार नव्हतं. यावर जनरल एसके सिन्हा सांगतात की, टिक्का खान सॅम यांना आठ वर्षांनी ज्युनियर होते. त्यांनी सुभेदार पदापासून सुरुवात केली असल्यामुळे त्यांचा हात थोडा आखडता होता.

त्यांनी आधीच तयार केलेली वाक्य बोलायला सुरुवात केली. ते म्हणाले, "देअर आर थ्री ऑलटरनेटिव्स टू दिस."

यावर माणेकशॉ यांनी लगेच अडवत म्हटलं, "ज्या स्टाफ ऑफिसरचं ब्रीफ तुम्ही वाचताय त्यांनी खरं तर इंग्रजी लिहिता येत नाही असं दिसतंय. कारण ऑल्टरनेटिव्स नेहमी दोन असतात. पण पॉसिबिलिटीज दोनपेक्षा जास्त असू शकतात."

सॅम यांचं बोलणं ऐकून टिक्का नर्व्हस झाले, त्यांना बोलताही येईना.शेवटी थोडा वेळ गेल्यावर त्यांनी थाकोचक भारताला परत देण्याचं मान्य केलं.

ललित नारायण मिश्रा यांचे मित्र

सॅम माणेकशॉ भारतीय जवानांसोबत

फोटो स्रोत, SAINIKSAMACHAR.NIC.IN

हे फार कमी लोकांना माहिती आहे की, इंदिरा गांधींच्या मंत्रिमंडळात असणारे ललित नारायण मिश्रा सॅम माणेकशॉ यांचे अगदी जवळचे मित्र होते.

सॅम यांचे मिलिटरी असिस्टंट जनरल दीपेंद्र सिंग याविषयीचा किस्सा सांगतात की, "एका संध्याकाळी ललित नारायण मिश्रा अचानक माणेकशॉ यांच्या घरी पोहोचले. पण हे दोघेही पती-पत्नी घरी नव्हते. त्यांनी कारमधून एक पोतं काढलं आणि सीलू माणेकशॉच्या पलंगाखाली ठेऊन दिलं.

सॅमला याबद्दल विचारताच ललित नारायण मिश्रा म्हणाले, यात पार्टीसाठी जमा केलेले पैसे आहेत. सॅमने विचारलं की हे तू इथे का ठेवलं आहेस? यावर मिश्रा म्हणाले, घरी घेऊन गेलो तर माझी पत्नी यातले पैसे काढून घेईल. सीलूला कळणार नाही यात काय आहे. मी उद्या येऊन हे परत घेऊन जातो."

दीपेंद्र सिंह सांगतात की, ललित नारायण मिश्रा यांना भीती वाटायची की, कोणीतरी चोरून त्यांचं बोलणं ऐकतंय. त्यामुळे ते जेव्हा जेव्हा सॅमशी गुप्त गोष्टीबद्दल बोलायचे तेव्हा कागदावर लिहून तो कागद फाडून टाकायचे.

माणेकशॉ आणि याह्या खान

सॅम माणेकशॉ

फोटो स्रोत, TWITTER@ADGPI

सॅम यांची मुलगी माया दारूवाला सांगतात की, सॅम अनेकदा सांगायचे की, आपण जेव्हा युद्ध जिंकतो तेव्हा लोकांसाठी ही अभिमानाची गोष्ट असते. पण आम्हाला याचं कुठेतरी दुःख होत असतं कारण यात कित्येक लोक मारले गेलेले असतात.

आपल्या नेतृत्वाखाली भारताने पाकिस्तानवर विजय मिळवला आहे याचा त्यांना कधीच अभिमान नव्हता. पण या युद्धात भारताने ज्या पाकिस्तानी सैनिकांना युद्धकैदी बनवलं होतं, त्यांना भारताने चांगली वागणूक दिल्याचं त्यांनी जेव्हा कबूल केलं तेव्हा त्यांच्यासाठी हा सर्वात मोठा अभिमानाचा क्षण होता.

1947 मध्ये माणेकशॉ आणि याह्या खान दोघेही दिल्लीच्या लष्करी मुख्यालयात तैनात होते. याह्या खान यांना माणेकशॉची मोटारसायकल खूप आवडायची. त्यांना ती खरेदी करायची होती मात्र सॅम ती मोटारसायकल विकायला तयार नव्हते.

फाळणीनंतर याह्या खान यांनी पाकिस्तानात जायचा निर्णय घेतला. त्यावेळी मात्र सॅम यांनी ती मोटारसायकल विकण्याचा निर्णय घेतला. त्यांनी 1,000 रुपये किंमतीला ही मोटारसायकल विकायचं ठरवलं.

याह्या खान पाकिस्तानला जाताना मोटारसायकल तर घेऊन गेले पण पैसे कधीच पाठवले नाहीत.

पुढे बऱ्याच वर्षांनंतर जेव्हा भारत आणि पाकिस्तान असं युद्ध झालं तेव्हा माणेकशॉ आणि याह्या खान हे आपापल्या देशांचे लष्करप्रमुख होते.

युद्धात विजय मिळवल्यानंतर सॅम यांनी मजेत म्हटलं की, "मी मागच्या 24 वर्षांपासून याह्या खानच्या चेकची वाट पाहतोय, पण तो अजून काही आलेला नाही. शेवटी त्यांनी 1947 मध्ये जी उधारी केली होती, त्याची परतफेड आपला निम्मा देश देऊन केली."

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)