नोबेल विजेते पाकिस्तानी वैज्ञानिक, ज्यांचा मुंबईत ब्रिटिश लष्कराशी झाला होता सामना

फोटो स्रोत, KEY STONE
- Author, वकार मुस्तफा
- Role, पत्रकार आणि संशोधक
स्वीडनच्या स्टॉकहोममध्ये एका कार्यक्रमात कॅमेराच्या झगमगाटात मजबूत शरीरयष्टी, चेहऱ्यावर दाढी तसंच डोक्यावर पगडी आणि काळ्या रंगाची शेरवानी परिधान केल्यामुळे ते सर्वांचं लक्ष वेधून घेत होते.
अशा कार्यक्रमांमध्ये सर्वसाधारणपणे पुरुष सुटाबुटात असतात आणि पांढऱ्या रंगाचा टाय घालतात. मात्र पाकिस्तानी वैज्ञानिक डॉ. मोहम्मद अब्दुस सलाम यांनी 'झांग' या शहरातील पारंपारिक पोशाख परिधान केला होता.
मध्य पंजाबच्या (पाकिस्तानातील पंजाब) सुपीक भागात चिनाब नदीच्या पूर्वेला 'झांग' हे शहर आहे.
डॉ. मोहम्मद अब्दुस सलाम यांना 1979 मध्ये अमेरिकन वैज्ञानिक शेल्डन ग्लासॉ आणि स्टीव्हन वेनबर्ग यांच्याबरोबर संयुक्तरित्या भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार मिळाला होता.
गॉर्डन फ्रेझर यांनी 'कॉस्मिक अँगर' नावाचं पुस्तक लिहिलं आहे. त्यात ते लिहितात, "कोणताही ऋतू असो, सर्वसाधारणपणे ते कुठेही थ्री-पीस सूट घालायचे. मात्र स्टॉकहोममध्ये त्यांनी डोक्यावर फेटा आणि पारंपारिक पोशाख परिधान केला होता. कारण तो त्यांच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा क्षण होता."
डॉ. मोहम्मद अब्दुस सलाम यांना नोबेल पुरस्कार मिळाला होता. भौतिकशास्त्रातील एका सिद्धातांसाठी हा पुरस्कार मिळाला होता. गुरुत्वाकर्षण शक्ती, इलेक्ट्रोमॅग्नेटिक शक्ती, प्रबळ आणि कमकुवत अणुशक्ती या निसर्गातील चार मूलभूत शक्तींशी निगडीत त्यांच्या सिद्धांतामुळे त्यांना हा पुरस्कार मिळाला होता.
मात्र फ्रेझर यांच्या मते, "यातील विरोधाभास असा आहे की ज्यावेळेस अब्दुस सलाम यांना झांगमधील शाळेत इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्सेसबद्दल शिकवण्यात आलं होतं, तेव्हा त्या शहरात वीज आलेली नव्हती."


सलाम यांनी फ्रेझर यांना सांगितलं होतं, "मी दिवसा आणि रात्री कंदिलाच्या किंवा दिव्याच्या प्रकाशात अभ्यास करायचो."
आमच्या शिक्षकांनी सांगितलं होतं की, "जर तुम्हाला वीज पाहायची असेल तर रेल्वेनं प्रवास करून शेकडो मैल दूर असणाऱ्या लाहोरला जावं लागेल."
"तिथपर्यंत कोण गेलं असतं? तोपर्यंत तर लाहोरमध्ये देखील कोणालाही कमकुवत अणुशक्तीबद्दल माहित नव्हतं."
झांग शहरातील एक शाळा
झांग शहरातील ही एक सरकारी शाळा होती. मात्र ती नगरपालिकेच्या अंतर्गत यायची. त्यामुळेच त्या शाळेला संक्षिप्तपणे एमबी मिडल स्कूल म्हटलं जायचं.
या जुन्या शाळेच्या इमारतीत कधी काळी हत्तींचं वास्तव्य होतं. या शाळेच्या एका वर्गाचं रुपांतर टॉयलेटमध्ये करण्यात आलं होतं. तो अब्दुस सलाम यांचा वर्ग आहे. तिथे त्यांचा फोटोदेखील लावण्यात आलेला आहे.
या शाळेच्या मुख्याध्यापकांच्या कार्यालयात विद्यार्थ्यांच्या प्रवेशासंदर्भातील कागदपत्रांनुसार झांग शहरातील रहिवासी आणि भट्टी जातीच्या मोहम्मद हुसैन यांचा मुलगा अब्दुस सलाम यांनी 3 एप्रिल 1934 ला इथे पाचव्या इयत्तेत प्रवेश घेतला होता.
31 मार्च 1938 ला आठव्या इयत्तेतून उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी ही शाळा सोडली.
शाळेच्या कागदपत्रांनुसार, त्यांचा जन्म 29 जानेवारी 1926 ला झाला होता.

फोटो स्रोत, WAQAR MUSTAFA
हेराल्ड या इंग्रजी मासिकाच्या ऑगस्ट 1984 च्या अंकात अब्दुस सलाम यांची मुलाखत प्रकाशित झाली होती. त्यात ते म्हणाले होते, "मला मौलवी अब्दुल लतीफ हे आठव्या इयत्तेचे शिक्षक आठवतात."
"मी जेव्हा फार थोड्या वेळात एक प्रश्न सोडवला. तेव्हा त्यांनी बक्षीस म्हणून मला एक पैसा दिला होता आणि गहिवरून म्हणाले होते, मला जर शक्य असतं तर मी तुला खूप मोठं बक्षीस दिलं असतं."
झांगमधील सरकारी महाविद्यालयातील भौतिकशास्त्राचे सहायक प्राध्यापक अब्दुस मलिक म्हणतात की डॉ. अब्दुस सलाम यांना गणिताचं वेड होतं आणि त्यांना गणितात विक्रमी गुण मिळायचे.
अब्दुस मलिक म्हणतात, "नोबेल पुरस्कार मिळाल्यावर डॉ. अब्दुस जेव्हा झांगला आले तेव्हा त्यांना विचारण्यात आलं की या पुरस्काराकडे ते कसं पाहतात. त्यावर डॉ. अब्दुस सलाम म्हणाले की त्यांच्यासाठी नोबेल पुरस्कारापेक्षा शाळेत असताना बक्षीस म्हणून मिळालेला तो एक पैसा अधिक मौल्यवान आहे."
डॉ. सलाम आपल्या मुलाखतीत म्हणाले, "याच प्रकारे इंग्रजीचे शिक्षक शेख एजाज अहमद यांनी मला रागवून चुकीच्या स्पेलिंगनं मोठे-मोठे शब्द लिहिण्याची माझी सवय मोडली."
वृत्तपत्रात छापून आलं नाव
जगजीत सिंह यांनी 1933 मध्ये पंजाब विद्यापीठातून गणितात एमए केलं होतं. त्यांनी डॉ. सलाम यांच्या चरित्रात लिहिलं आहे की 1972 मध्ये विद्यार्थ्यांसमोर भाषण करताना डॉ. अब्दुस सलाम यांनी शेख एजाज साहेब यांची एक कविता वाचून दाखवली होती.
त्याचा अर्थ काहीसा असा आहे -
"गावकऱ्यांनो, मला भीती वाटते की तुम्ही काबापर्यंत पोहोचू शकणार नाही. कारण ज्या मार्गावर तुम्ही चालत आहात, तो तुर्कस्तानच्या दिशेनं जातो."
त्यांच्या शाळेच्या भिंतींवर आता डॉ. अब्दुस सलाम यांचे फोटो आहेत.
शाळेच्या मुख्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर कोपऱ्यात एका काचेच्या खोक्यात नोबेल पुरस्काराची एक प्रतिकृती ठेवण्यात आली आहे. ही प्रतिकृती शाळेतील विद्यार्थ्यांसाठी एक उदाहरण आहे, प्रेरणा आहे आणि शाळेसाठी ती अभिमानाची बाब आहे.

फोटो स्रोत, OPEN SOURCE
शाळेपासून थोड्या अंतरावर आधी उजवीकडे आणि नंतर डावीकडे वळल्यावर एक जागा आहे, जिथे अब्दुस सलाम यांनी नवव्या इयत्तेत प्रवेश घेतला होता.
आता इथे झांग-सरगोधा रोडच्या सुरूवातीला एक सरकारी शिक्षण संस्था आहे. यात डॉ. अब्दुस सलाम ब्लॉक देखील आहे. तिथे आता पदव्युत्तर पदवीचं शिक्षण दिलं जातं.
जानेवारी 1986 मध्ये तहजीब-उल-अखलाक या उर्दू मासिकात सलाम यांचा एक लेख प्रकाशित झाला होता. त्यात ते म्हणाले होते की, "1938 मध्ये मला वयाच्या 12 व्या वर्षी झांग महाविद्यालयात दाखल करण्यात आलं होतं."
"मी तिथे चार वर्षे होतो. त्या दिवसांमध्ये हे एक इंटरमीडिएट कॉलेज होतं. तिथे 9वी, 10वी, 11वी आणि 12 वीचं शिक्षण मिळत असे. महाविद्यालयातील बहुतांश विद्यार्थी हिंदू होते."
"एखाद्या शिक्षकाचा स्नेह आणि शिक्षकानं दिलेलं योग्य लक्ष एखाद्या विद्यार्थ्याचं आयुष्य घडवू शकतं किंवा बिघडवू शकतं. हे माझं सुदैवं होतं की मला असामान्य शिक्षण आणि उत्तम शिक्षक मिळाले."
लाहोरच्या सरकारी महाविद्यालयात प्रवेश
डॉ. सलाम म्हणतात की त्यांच्या शैक्षणिक करियरचा पाया याच महाविद्यालयात घातला गेला होता. तिथूनच ते मॅट्रिकच्या परीक्षेत राज्यात पहिले आले होते.
सलाम यांच्याबद्दल जगजीत सिंह यांनी लिहिलं आहे, "ते दुपारच्या वेळेस मघियानामध्ये असलेल्या आपल्या वडिलांच्या कार्यालयातून झांग शहरातील आपल्या घरी जाण्यासाठी सायकलवर निघाले."
"ते पहिले आल्याची बातमी त्या सर्व भागात आधीच पोहोचली होती. बुलंद दरवाजाजवळ असलेल्या आपल्या घरी पोहोचण्यासाठी त्यांना झांग शहरातील पोलीस गेट भागातून जावं लागलं होतं."
"एरवी त्यावेळेस उष्णतेमुळे हिंदू दुकानदार आपल्या घरी निघून जात असत. ते सलाम यांच्या स्वागतासाठी आपापल्या दुकानांबाहेर उभे होते."
28 जून 1940 ला ही बातमी देवराजद्वारे संपादित 'झांग सियाल' या झांगच्या साप्ताहिक वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर छापण्यात आली होती.
त्या बातमीचा मथळा होता, "मिस्टर अब्दुस सलाम यांनी मॅट्रिक्युलेशनमध्ये पंजाब विद्यापीठाचा विक्रम मोडला."

फोटो स्रोत, WAQAR MUSTAFA
जगजीत सिंह यांच्या मते, इंटरमीडिएटमध्ये पंजाब विद्यापीठात पहिले आल्यानंतर अब्दुस सलाम यांना लाहोरच्या सरकारी महाविद्यालयात प्रवेश मिळाला.
"महाविद्यालयात शिकत असतानाच त्यांनी बुद्धिबळ खेळण्यास सुरूवात केली होती. या गोष्टीची तक्रार कोणीतरी त्यांच्या वडिलांकडे केली. तेव्हा त्यांच्या वडिलांनी लगेचच पत्र लिहून त्यांना बुद्धिबळ खेळणं थांबवण्यास सांगितलं."
अब्दुस सलाम यांना उर्दू शायरीची आवड होती. विशेषकरून त्यांना गझल फार आवडत असत.
अब्दुस सलाम यांना गालिब यांची शायरी प्रचंड आवडायची. इतकी की त्यांनी आपल्या विद्यार्थी दशेत त्यावर एक लेख देखील लिहिला होता. 'अदबी दुनिया' या उर्दू मासिकात तो प्रकाशित झाला होता.
मात्र, हे सर्व करत असतानादेखील अब्दुस सलाम यांनी बीए आणि एमएच्या परीक्षेत पहिला क्रमांक पटकावला होता. त्यामुळेच त्यांना परदेशात शिक्षण घेण्यासाठी पंजाब सरकारची शिष्यवृत्ती देखील मिळाली.
शाळेत ठेवली आहे आठवण
पंजाबचे अर्थमंत्री सर छोटू राम स्वत: एका गरीब गावकऱ्याचा मुलगा होते. महायुद्धासाठी गोळा करण्यात आलेले पैसे त्यांनी बुद्धिमान विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यासाठी राखून ठेवले होते.
डॉ. मोहम्मद अब्दुस सलाम यांनी ही शिष्यवृत्ती आपल्या गुणवत्तेच्या जोरावर मिळवली होती.
त्यांनी आपल्या एका निबंधात लिहिलं होतं, "मी खूप नशीबवान होतो की मला केंब्रिज विद्यापीठात जाण्यासाठी शिष्यवृत्ती मिळाली."
"युद्धामुळे स्पर्धा परीक्षा थांबवण्यात आल्या होत्या आणि युद्धकाळात वापरण्यासाठी म्हणून पंजाबचे पंतप्रधान (त्यावेळेस या पदाला असंच म्हटलं जायचं) यांच्या प्रयत्नांतून एक रक्कम उभारण्यात आली होती. त्यातील एक भाग खर्च करण्यात आला नव्हता."
"ते 1946 चं वर्ष होतं. मी एका बोटीवर जागा मिळवण्यात यशस्वी झालो जी स्वातंत्र्याआधी भारतातून परत जाणाऱ्या ब्रिटिश कुटुंबांनी भरलेली होती."

फोटो स्रोत, WAQAR MUSTAFA
"जर मी त्या वर्षी गेलो नसतो, तर मी केंब्रिजला जाऊ शकलो नसतो. पुढच्याच वर्षी भारताची फाळणी झाली आणि शिष्यवृत्त्या बंद झाल्या."
जगजीत सिंह लिहितात की सलाम यांनी केंब्रिजला जाण्यासाठी एक स्टीमर बुक केलं होतं. त्यात जागा न मिळाल्यानं बोटीवर जाण्यासाठी म्हणून ते काही दिवस आधीच मुंबईसाठी निघाले होते.
ते कुलाब्यात एका ठिकाणी उतरले होते. तेव्हाच रात्री कोणीतरी दारावर टकटक केली.
जगजीत सिंह यांच्या मते, सलाम यांनी विचारलं, "कोण आहे?"
उत्तर आलं, "मिलिटरी पोलीस."
पांरपारिक पोशाखाची आवड
"ते अंथरुणातून उठले, दरवाजात गणवेशामध्ये एक ब्रिटिश सार्जंट होता. त्यांनी काय प्रकार आहे हे विचारलं; तर सांगण्यात आलं की कार्यालयात गेल्यावर कळेल."
"कार्यालयात पोहोचल्यावर कळालं की ब्रिटिश सरकारच्या विरोधात बंड करणाऱ्या नौदलाच्या अधिकाऱ्यांपैकी ते एक असल्याचा त्यांच्यावर संशय होता."
"ते सुदैवी होते की प्रवासाची कागदपत्रं पाहिल्यानंतर त्यांना दुसऱ्या दिवशी जाण्याची परवानगी मिळाली. जर पोलिसांनी त्यांचा जुना खाक्या दाखवला असता तर असं झालं नसतं."

"ते जेव्हा इंग्लंडमधील लिव्हरपूलला उतरले, तेव्हा ऑक्टोबरच्या थंडीनं त्यांना हुडहुडी भरली होती. कारण थंडीपासून संरक्षणासाठी त्यांच्याजवळ पुरेसे उबदार कपडे नव्हते."
"त्यावेळेस भारताच्या संघीय न्यायालयाचे न्यायाधीश आणि पाकिस्तानचे तत्कालीन कायदेमंत्री सर जफरुल्लाह खान यांनी त्यांची मदत केली होती."
"ते ब्रिटनला त्याच विमानानं गेले होते. त्यांनी सलाम यांना फक्त आपला जाड ओव्हरकोटच दिला नाही तर, कुली नसल्यामुळे त्यांचं सामान उचलण्यास देखील मदत केली."
मित्रांमध्ये लोकप्रिय असलेले डॉ. सलाम
डॉ. अब्दुस सलाम यांचे भाऊ चौधरी अब्दुल हमीद आपल्या संस्मरणात लिहितात,
"ते आपल्या शाळेत गेले, महाविद्यालयात गेले, प्राचार्यांसह सर्व शहरानं त्यांचं स्वागत केलं. त्यांनी आपले वडील मुहम्मद हुसैन यांच्या नावे आपल्या शाळेत एक विज्ञान ब्लॉक तयार करण्याची जबाबदारी घेतली."
अब्दुल हमीद यांनी आपल्या पुस्तकात लिहिलं आहे की फाळणीनंतर झांग शहर आणि मगियानामधील हिंदू स्थलांतरित झाले नवी दिल्ली आणि त्याच्या उपनगरांमध्ये स्थायिक झाले.
"नोबेल पुरस्कार मिळाल्यानंतर भाईजान दिल्लीला गेले. तिथे त्यांचे मित्र आणि वर्गमित्र यांनी त्यांच्या सन्मानार्थ एक मेजवानी दिली. या मेजवानीला मोठ्या संख्येनं पुरुष आणि मुलं उपस्थित होती."
योगायोगानं पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे माजी अध्यक्ष सैयद झुल्फिकार अली बुखारी त्या दिवशी दिल्लीत होते. त्यांचा संबंध शाह जियोना (झांग) शी होता.

फोटो स्रोत, DR. ABDUS SABOOR
बुखारी म्हणाले की, "ते डॉक्टर साहेबांनी पाहून खूप आनंदी झाले होते आणि घोषणा देत होते. महिला आपल्या छोट्या-छोट्या मुलांना डॉक्टर साहेबांकडे घेऊन जायच्या आणि त्यांच्या डोक्यावरून हात फिरवायच्या."
बुखांनी यांच्यानुसार, "ते दृश्य खूप थक्क करणारं होतं. झांगमधील एका व्यक्तीला विज्ञान जगतातील सर्वात मोठा पुरस्कार मिळाला आहे या गोष्टीचा त्यांना अतिशय आनंद होता. त्यांची मान अभिमानानं उंचावली होती."
पत्रकार कृष्ण कुमार कात्याल उर्फ के. के. कात्याल यांचं कुटुंब फाळणीच्या वेळेस झांगमधील भबराना भागातून दिल्लीत आलं होतं.
2016 मध्ये त्यांच्या मृत्यूवर 'द न्यूज' या इंग्रजी वृत्तपत्रातील एका लेखात मी लिहिलं होतं की "कात्याल यांच्यानुसार झांगचे डॉ. अब्दुस सलाम यांच्याबद्दल त्यांच्या मनात खूपच आदर होता."
निधन होण्यापूर्वी झालेल्या एका भेटीत कात्याल यांनी मला सांगितलं की नोबेल पुरस्कार मिळाल्यानंतर अब्दुस सलाम लगेचच त्यांचे प्राध्यापक हंस राज भट यांना भेटण्यासाठी भारतात गेले होते. प्राध्यापक हंस राज भट यांनी 1940 च्या दशकाच्या सुरूवातीला अब्दुस सलाम यांना भौतिकशास्त्राचा पहिला धडा शिकवला होता.
डॉ. सलाम यांना नोबेल पुरस्कार मिळाल्यावर
डॉ. मोहम्मद अब्दुल सबूर डॉ. सलाम यांचे छोटे बंधू डॉ. अब्दुल कादिर भट्टी यांचे पुत्र आहेत.
डॉ. अब्दुल कादिर यांचं निधन झालेलं आहे. अब्दुल रशीद या त्यांच्या जुळ्या भावाचं 11 नोव्हेंबरला ब्रिटनमध्ये निधन झालं.
डॉ. सूबर तीन दशकांहून अधिक काळापासून सामाजिक सुधारणा, मानवाधिकार आणि पर्यावरणावर काम करणाऱ्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील संस्थाशी संलग्न आहेत.
डॉ. सबूर म्हणाले की जेव्हा अब्दुस सलाम एखाद्या विशेष ठिकाणी जायचे, तेव्हा ते पन्नास आणि साठच्या दशकातील जुन्या शिक्षकांचा शोध घ्यायचे. त्यांच्या संपर्कात राहायचे आणि त्यांचं स्वागत करण्यासाठी जायचे.
ते सांगतात, "डॉ. सलाम जेव्हा नोबेल पुरस्कार घेऊन आले तेव्हा सर्व लोकांना भेटल्यानंतर आम्ही मुलांना गोळा केलं, आम्ही पंधरा-वीस जण होतो."
"आम्ही सर्व बसलो आणि मग त्यांनी आम्हाला सांगितलं की त्यांना नोबेल पुरस्कार कसा मिळाला."
"त्यांनी आम्हा सर्वांना नोबेल पुरस्कार पाहू दिला आणि त्या पुरस्काराची पार्श्वभूमी सांगितली आणि अशा पुरस्कारांसाठी आम्हाला प्रयत्न करण्यास सांगितलं."
डॉ. सलाम यांचं घर झालं आहे संग्रहालय
ते म्हणतात, "आमच्या आजोबांना सात मुलं आणि दोन मुली होत्या. डॉक्टर अब्दुस सलाम सर्व भावंडांमध्ये मोठे होते."
"आमच्या आजोबांची दोन घरं आहेत. डॉ. अब्दुस सलाम यांना नोबेल पुरस्कार मिळाल्यानंतर त्यातील एक घर त्यांनी संग्रहालय बनवण्यासाठी सरकारला दिलं."
"त्यांचं दुसरं घर कॅनाल परिसरात होतं. ते माझ्या आजोबांनी 1935 मध्ये बांधलं होतं. घरात तीन मोठ्या खोल्या, व्हरांडा, बैठकीची खोली, गॅरेज आणि एक मोठं अंगण होतं."
डॉक्टर सलाम साहेब यांच्यासाठी एक खोली राखीव होती. त्यात ते अभ्यास करायचे आणि झोपायचे. तिथे वीज नव्हती, त्यामुळे ते कंदिलाच्या प्रकाशात अभ्यास करायचे.
"ते जगात जिथे कुठे गेले, झांग या आपल्या शहराला कधीच विसरले नाहीत. झांगच्या कथा, झांगच्या समस्या त्यांच्या मनात होत्या. त्यांना जेव्हा वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलण्याची संधी मिळायची तेव्हा ते सैन्याच्या विकासाबद्दल चर्चा करायचे."

फोटो स्रोत, WAQAR MUSTAFA
आपल्या वडिलोपार्जित घरी जाताना ते शहरापासून अर्धा मैल दूर असलेल्या या घरापर्यंत पायी जायचा प्रयत्न करायचे. जाताना रस्त्यात ते लोकांना भेटायचे आणि त्यांची विचारपूस करायचे.
लोकदेखील त्यांना आदरानं भेटायचे. सर्वजण त्यांच्याशी हस्तांदोलन करायचे, नमस्ते करायचे, गळाभेट घ्यायचे.
आमचे काका चौधरी अब्दुल हमीद यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिलं आहे की ते आपल्या मित्रांबरोबर चालायचे आणि म्हणायचे की मला या शहराच्या रस्त्यांचा गंध खूप आवडतो.
त्यांनी लिहिलं आहे की जंगलात राहणाऱ्या गरीब नातेवाईकांना आणि मित्रांना कधीही विसरत नसत.
मदत करणारे डॉ. सलाम
डॉ. अब्दुस सलाम यांच्या चुलत भावाचा मुलगा असलेले मोहम्मद मजहर इकबाल झांगमध्ये राहतात.
ते शिंपी आहेत. त्यांनीच मला झांग शहरातील डॉक्टर सलाम यांचं सुरूवातीचं दोन खोल्यांचं घर दाखवलं. आता ते राष्ट्रीय स्मारक झालं आहे.
ते म्हणाले की डॉक्टर सलाम त्यांना खूप मदत करायचे आणि ते त्यांच्या दुसऱ्या घरात भाडं न देता राहायचे. दोन वर्षांपूर्वी आम्ही आपलं घर विकत घेतलं.
मजहर इकबाल म्हणाले, "डॉक्टर अब्दुस सलाम नेहमी फज्र (सकाळचा पहिला नमाज) च्या आधी किंवा नंतर यायचे. जेव्हा त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि ते उपचारांसाठी भारतात गेले, तेव्हा तिथून ते झांगला आले होते. त्यावेळेस आम्ही एकत्र बसलो, नाश्ता केला, गप्पा मारल्या."

फोटो स्रोत, DR. ABDUS SABOOR
"ज्यावेळेस त्यांना माझ्या वडिलांच्या निधनाबद्दल कळालं तेव्हा देखील ते आले होते. मला दोनदा प्रेमानं जवळ घेतलं आणि म्हणाले एक तुझ्या वडिलांकडून आहे आणि दुसरा माझ्याकडून आहे."
"त्यांना घरात जायचं होतं, माझं त्यांचे पाय उचलत नव्हते. मग आम्ही त्यांना उचलून घरात घेऊन गेलो होतो."
अडुसष्ट वर्षांचे मोहम्मद नझीर देखील इथेच वाढले आहेत आणि डॉक्टर सलाम राष्ट्रीय स्मारकाच्या समोर असलेल्या एका घरात राहतात.
लंडनमध्ये झाला मृत्यू
ते म्हणाले की ज्यावेळेस डॉक्टर सलाम नोबेल पुरस्कार घेऊन इथे आले होते, तेव्हा आम्ही सर्वजण त्यांच्या घरीच बसलो होतो. शेजार-पाजारचे सर्व लोकदेखील इथेच होते.
"माझे वडील म्हणायचे की मुलं खेळत असतील, मात्र डॉक्टर सलाम यांचं लक्ष अभ्यासावर असेल. त्यांनी डॉक्टर सलाम यांना कंदीलाच्या प्रकाशात अभ्यास करताना पाहिलं होतं. इथे आजूबाजूला शेतं होती. डॉ. सलाम दिवसा तिथे जाऊन बसत आणि अभ्यास करत असत."
"डॉक्टर सलाम जेव्हा झांगला यायचे, तेव्हा सर्व गावकऱ्यांना भेटायचे. जर कोणाला काही अडचण असेल तर ती दूर करण्यासाठी प्रयत्न करायचे."
डॉक्टर सूबर मुलतानमध्ये राहतात. तिथेच डॉक्टर सलाम यांचा एक भाऊ, बहीण आणि मेव्हणे राहायचे.

फोटो स्रोत, WAQAR MUSTAFA
त्यांनी सांगितलं, "जेव्हा डॉक्टर सलाम यांना झांग मधील आपल्या व्यस्त दिनचर्येमुळे मुलतानला जाणं शक्य व्हायचं नाही, तेव्हा अनेकदा ते सकाळच्या विमानानं मुलतानला यायचे आणि संध्याकाळी परत जायचे."
"अशा वेळी नमस्कार, विचारपूस झाल्यानंतर सर्वात होती गोष्ट व्हायची ती 'झांग दा', 'हल देव' म्हणजे झांगच्या गोष्टी सांगा."
21 नोव्हेंबर 1996 ला डॉक्टर अब्दुस सलाम यांचं लंडनमध्ये निधन झालं. त्यांना रबवाह (चिनाबनगर) मध्ये दफन करण्यात आलं. ते ठिकाण आता चिनियट जिल्ह्यात आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











