कराचीतील एक जगावेगळी शाळा! इथे विद्यार्थ्याबरोबर आईला देखील घ्यावा लागतो प्रवेश

आई आणि मुलगी
फोटो कॅप्शन, कराचीतील या जगावेगळ्या शाळेत मानसिक आरोग्य आणि नैतिक मूल्यांवर देखील भर दिला जातो.
    • Author, नाझिश फैज
    • Role, बीबीसी उर्दू, कराची

शाळा! हा शब्द ऐकला की आपल्या सर्वांच्या डोळ्यासमोर एक अशी इमारत उभी राहते जिथं लहानमोठी सर्व प्रकारची मुलं त्यांची दप्तरं घेऊन येतात. तिथं ते शिक्षण घेतात, अभ्यास करतात. वेगवेगळ्या वर्गांमध्ये शिक्षक त्यांना वेगवेगळे विषय शिकवत असतात.

शाळेबाबतचं हे चित्र जगभरात सर्वत्र असंच दिसून येतं. मात्र, आपण एका अशा शाळेबद्दल जाणून घेणार आहोत जिथं विद्यार्थ्याला प्रवेश देण्यासाठीची पहिली अटच ही आहे की त्या मुलासोबत त्याच्या आईलादेखील शाळेत प्रवेश घ्यावा लागेल. ऐकून धक्का बसला ना?

पण हे खरं आहे.

तहमीना यांचं कमी वयातच लग्न झालं आणि लगेचच मुलगा झाला. त्यानंतर घटस्फोट देखील झाला. या धक्क्यातून सावरत आयुष्यात पुढे जाण्यासाठी त्या कराचीच्या या शाळेत पोहोचल्या.

"मी जेव्हा माझ्या मुलाच्या प्रवेशासाठी या शाळेत गेले, तेव्हा मला सांगण्यात आलं की, तुमच्या मुलाबरोबरच तुम्हाला देखील शाळेत प्रवेश घ्यावा लागेल. मला वाटलं होतं की, माझं शिवणकामाचं कौशल्य इथं आणखी सुधारण्यात येईल. मात्र शाळेत आल्यावर माझ्या लक्षात आलं की, ही शाळा इतर सर्वसाधारण शाळांपेक्षा वेगळी आहे. या शाळेत मलादेखील शिकवण्यात आलं आणि धक्क्यातून बाहेर पडण्यासाठी अनेक थेरपी सत्रही घेण्यात आले."

कराचीच्या ल्यारी भागात 'मदर चाइल्ड ट्रॉमा इन्फॉर्म्ड स्कूल' ही शाळा आहे. या शाळेत अशा मुलांना आपल्या आईबरोबर प्रवेश दिला जातो जे एखाद्या मानसिक धक्क्यामुळं (ट्रॉमा) अडचणीत सापडले असतील आणि आयुष्यात पुढील वाटचाल कशी करावी हे त्यांच्या लक्षात येत नसेल.

सबीना खत्री या ही विशेष शाळा चालवतात. त्या स्वत: 8 वर्षांच्या असताना आईपासून वेगळं होण्याच्या धक्क्याला सामोऱ्या गेल्या आहेत.

लहानपणीच बसलेला हा धक्का (ट्रॉमा), हीच सबीना खत्री यांच्यासाठी ल्यारीमध्ये अशी विशेष शाळा सुरू करण्यामागची प्रेरणा ठरली. आज हीच शाळा अनेक मुलांना त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या धक्क्यांमधून सावरण्यासाठी एक महत्त्वाची भूमिका बजावते आहे.

ही शाळा सुरू करण्यामागं सबीना खत्री यांचा काय विचार होता? या शाळेत शिकणाऱ्या मुलांचं आणि त्यांच्या आई-वडिलांचं आयुष्यं कसं बदललं? हे जाणून घेण्यासाठी आपण जाऊया ल्यारीच्या शाळेत.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

एका आईची दुसऱ्या आईला भेट

सबीना खत्री ही शाळा म्हणजे एका आईनं दुसऱ्या आईला दिलेली भेट मानतात. त्यांनी बीबीसीला सांगितलं की, त्या जेव्हा 8 वर्षांच्या होत्या तेव्हाच आईपासून त्यांची ताटातूट झाली होती.

"त्यावेळेस नक्की काय होत आहे हे माझ्या लक्षात येत नव्हतं. मात्र त्या परिस्थितीनं बसलेल्या मानसिक धक्क्याचा प्रभाव माझ्या मनात खोलवर कुठेतरी राहून गेला."

2006 मध्ये सबीना खत्री यांनी ल्यारीमध्ये एक शाळा स्थापन करून आपल्या मिशनची सुरुवात केली.

सबीना म्हणतात की, त्यांच्या शाळेत मागास वर्गातील लोक येतात. या शाळेत मानवी मूल्यं, मानसिक आरोग्य आणि चांगुलपणासारख्या मूल्यांवर भर दिला जातो.

कराचीमधील ल्यारी भागातील गँगवॉर आणि गुन्हेगारी विश्वाच्या कहाण्यांची, बातम्यांची सर्वसाधारणपणे चर्चा होत असते. त्यामुळेच सबीना खत्री यांना भेटायला आम्ही जेव्हा ल्यारीमध्ये गेलो, तेव्हा आमच्या मनात एकप्रकारचा संकोच होता.

मात्र जुनाट इमारतींमध्ये राहणारे लोक, प्रचंड गर्दी आणि व्यवसाय-धंदा करणाऱ्या लोकांना पाहिल्यानंतर या भागाचं वेगळं चित्र समोर आलं.

सबीना खत्री
फोटो कॅप्शन, सबीना खत्री या शाळेला एका आईकडून दुसऱ्या आईला दिलेली भेट मानतात.

सबीना खत्री म्हणाल्या, "श्रीमंत घरांमधील मुलांनी प्रत्यक्षात मारामाऱ्या, हिंसाचार पाहिलेला नसतो. ते व्हिडिओ गेम्समध्ये या गोष्टी पाहतात. मात्र ल्यारीमधील मुलांनी हे सर्व स्वत:च्या डोळ्यांनी प्रत्यक्षात पाहिलेलं आहे."

सबीना यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना या गोष्टीची जाणीव झाली की, ल्यारीमध्ये जे काही घडतं आहे, त्याचा परिणाम तिथल्या मुलांवर नक्कीच होत असेल.

अशा परिस्थितीत एक दिवस त्यांनी निर्धार केला की, ज्या प्रकारे त्या आपल्या बालपणीच्या धक्क्यातून सावरल्या, तसंच त्या ल्यारीतील प्रत्येक मुलाला धक्क्यातून बाहेर काढतील.

सबीना यांना वाटतं की, अनेक मुलं अशी देखील असतात की जी धक्क्यातून सावरून शिकली तरी एका विशिष्ट वयात आल्यावर त्यांना वाटतं की त्यांच्या आई-वडिलांची विचार करण्याची पद्धत त्यांच्यापेक्षा वेगळी आहे.

या कारणामुळेच सबीना यांनी या शाळेत मुलांबरोबरच त्यांच्या आईच्या मानसिक आरोग्यावर देखील काम करण्याबद्दल विचार केला. त्यामुळंच आज या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या आईबरोबरच शाळेत प्रवेश मिळतो.

मुलांबरोबर आईच्या प्रवेशाची अट

सबीना यांचं हे काम किती प्रमाणात यशस्वी झालं आहे, याचं उत्तम उदाहरण म्हणजे ल्यारीतील तहमीना.

तहमीना यांचं वयाच्या 16 व्या वर्षी लग्न झालं होतं. लग्नानंतर एका वर्षातच त्या एका मुलाची आईदेखील झाल्या. मात्र त्यांचं लग्न फक्त तीन वर्षेच टिकलं.

त्यांनी बीबीसीला सांगितलं, "घटस्फोटानंतर मी माझ्या मुलाचं काय करू याचा मला खूप मोठा प्रश्न पडला होता."

तहमीनानं विचार केला की, काहीतरी काम करून त्या आपलं शिक्षण पुन्हा सुरू करतील.

घटस्फोटानंतर त्या गोष्टीचा थेट परिणाम मुलांच्या मानसिक आरोग्यावर देखील होतो. तहमीनाच्या मुलानं देखील आपल्या आईवर झालेले अत्याचार पाहिले होते.

तहमीनाला या शाळेबद्दल माहिती मिळाली. मात्र त्यांना सांगण्यात आलं की, मुलाबरोबर त्यांना देखील शाळेत प्रवेश घ्यावा लागेल.

(प्रातिनिधिक फोटो)

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, कराचीच्या या शाळेचं एक वैशिष्ट्यं हे देखील सांगितलं जातं की, इथे मुलांच्या खऱ्या क्षमतेची, कौशल्याची पारख केली जाते (प्रातिनिधिक फोटो)

तहमीनाला शिवणकाम-भरतकाम येत होतं. त्यामुळेच त्यांना वाटलं की, या शाळेत त्यांना शिवणकामाचं आणखी कौशल्यं शिकवलं जाईल.

मात्र जेव्हा त्या शाळेत गेल्या, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की, ही शाळा नेहमीच्या शाळांपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे.

"मानसिक आरोग्यासाठी मला थेरपी देण्यात आली. मी त्या थेरपीची अनेक सत्रं केली. मला आणि माझ्या मुलाला त्या धक्क्यांमधून सावरण्यास जवळपास 4 वर्षे लागली."

तहमीनानं या शाळेतून मॅट्रिक, इंटरमीडिएट केलं. त्यानंतर पदवी देखील घेतली. आता तहमीना त्याच शाळेत काम करत आहेत. तर तहमीना यांचा मुलगा त्याच शाळेत शिकतो आहे.

ल्यारी सारख्या भागात अशी शाळा आहे, ज्यामुळे आपलं आयुष्यंच बदललं आणि जगण्याला एक नवी दिशा मिळाली याबद्दल तहमीना स्वत:ला सुदैवी मानतात.

शाळेतील शिक्षकांनी केली गुणांची पारख

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

मोहम्मद अब्दुल्लाह देखील अशा तरुणांपैकी आहेत, ज्यांनी आपलं सुरुवातीचं शिक्षण याच शाळेतून घेतलं. आता ते एका विद्यापीठात बीबीएच्या पदवीचं शिक्षण घेत आहेत.

अब्दुल्लाह शिक्षण घेण्याबरोबरच अभिनय देखील करतात.

त्यांनी सांगितलं की, त्यांनी जेव्हा शाळेत शिकण्यास सुरुवात केली तेव्हा त्यांना एका कौटुंबिक समस्येमुळे मानसिक धक्का बसला होता.

अब्दुल्ला म्हणाले, "आयुष्यात पुढे काय करायचं, हे माझ्या लक्षात येत नव्हतं. मला शिकावंसं वाटत नव्हतं. माझ्यामध्ये नक्की काय क्षमता आहेत, हेदेखील मला माहित नव्हतं."

अब्दुल्लाहचं म्हणणं आहे की, या शाळेतील शिक्षकांनी त्यांच्यातील क्षमता ओळखली. शिक्षकांनी त्यांना त्या मानसिक धक्क्यातून बाहेर काढलं आणि त्यांच्या आयुष्याला एक नवी दिशा दिली.

आपल्यातील क्षमतेची अब्दुल्लाह यांना स्वत:ला जाणीव नव्हती, मात्र त्यांच्या शिक्षकांनी त्यांना पुढचा मार्ग दाखवला.

अब्दुल्ला यांनी शाळेत असतानाच अभिनयाची सुरुवात केली होती.

अब्दुल्ला म्हणतात की, या शाळेनं त्यांना असं वातावरण दिलं ज्यामुळे ते आपल्या शिक्षकांवर विश्वास ठेवू शकत होते.

आता त्या धक्क्यातून सावरून ते एक चांगलं आयुष्य जगत आहेत.

मुलांप्रमाणेच त्यांच्या आईसाठी देखील अभ्यासक्रम

सबीना खत्री म्हणतात की, शाळेत प्रवेश देण्यासाठीच्या अटींबाबत त्या कोणतीही तडजोड करत नाहीत.

या शाळेत मुलांना पहिल्या इयत्तेपासूनच प्रवेश घ्यावा लागतो. मुलांना आठवड्यातील पाच दिवस वर्गात यावंच लागतं. तर त्यांच्या आईला आठवड्यातून तीन दिवस शाळेत येणं बंधनकारक आहे.

मुलांप्रमाणेच त्यांच्या आईसाठी देखील अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. यामध्ये काउन्सलिंग सत्राचा देखील समावेश आहे.

मुलासह आई.
फोटो कॅप्शन, शाळेत मुलांप्रमाणेच त्यांच्या आईसाठी देखील अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे आणि आईला आठवड्यातून तीन दिवस शाळेत यावं लागतं.

ल्यारीमधील या शाळेला मिळालेलं यश लक्षात घेऊन सबीना खत्री यांनी फक्त कराचीच्या इतर भागातच नव्हे, तर पाकिस्तानातील इतर शहरांमध्ये देखील अशा प्रकारच्या शाळा सुरू करण्याचा निर्धार केला आहे. कराचीत या शाळेची दुसरी शाखा सुरू करण्यात आली आहे.

या शाळेच्या वर्गात पारंपारिक पद्धतीचे फळे किंवा ब्लॅकबोर्ड नाहीत. इथे खुर्च्यांबरोबरच मुलांसाठी जमिनीवर बसून खेळण्याची देखील उत्तम व्यवस्था आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)