8 वर्षांपासून जन्मदात्यांना शोधणाऱ्या महिलेला वडील फेसबुक फ्रेंडलिस्टमध्ये कसे सापडले?

- Author, फे नर्स
- Role, बीबीसी वर्ल्ड सर्विस
आपण लहानपणापासून ज्यांच्याबरोबर राहतोय, ते आपले खरे आई-वडील नाहीत असं जर अचानक तुम्हाला कळालं तर काय होईल? अनेक प्रश्नांचा कल्लोळ मनात अचानक उठेल ना. असाच काहीसा प्रसंग तमुना मुसेरिड्ज यांच्याबाबतीत घडला.
ज्या महिलेनं तमुना यांचा लहानपणापासून सांभाळ केला ती त्यांची खरी आई नाही हे तमुनाला कळालं आणि तिने आपल्या खऱ्या आईवडीलांचा शोध घ्यायचं ठरवलं. या प्रवासात तिला अनेक कठीण गोष्टींचा सामना करावा लागला.
तमुनाचा हा प्रवास 2016 साली सुरू झाला. आईच्या निधनानंतर एक दिवस घराची साफसफाई करताना तमुनाला तिचं जन्म प्रमाणपत्र सापडलं. या प्रमाणपत्रात तिचं नाव होतं मात्र, जन्माच्या तारखेची नोंद वेगळीच होती. यावरून तमुनाला आपण दत्तक असल्याचा संशय आला आणि तिचा शोध सुरू झाला.
तमुना यांनी फेसबुकवर वेदझेब किंवा ‘आय एम सर्चिंग’ नावाचा एक ग्रुप तयार केला. या ग्रुपचा उद्देश आपल्या आई-वडिलांचा शोध घेणं हा होता. पण, या माध्यमातून तिला आणखी एक धक्कादायक माहिती मिळाली. या शोधमोहिमेतून तिला जॉर्जियातील नवजात बाळांच्या तस्करीची माहिती मिळाली आणि तिने हे तस्करी प्रकरण उघडकीस आणलं.
बाळ जन्मताच दगावल्याचं सांगून अनेक पालकांची फसवणूक करत नवजात बाळांची इतरांना परस्पर विक्री केली जायची. माणूसकीची चीड आणणारा हा धक्कादायक प्रकार अनेक वर्षांपासून सुरू होता. यामुळे अनेक कुटुंब प्रभावित झाली होती.
तमुना स्वत: पत्रकार आहेत, त्यांनी ही तस्करी उघड करत अनेक कुटुंबांची भेट घडवून आणली. मात्र, त्या स्वत: आपल्या पालकांपर्यंत पोहचू शकल्या नव्हत्या. त्यांचा संघर्ष सुरुच होता.
तमुना म्हणतात, “ही स्टोरी माझ्यासाठी पत्रकार म्हणून आणि वैयक्तिकदृष्या दोन्ही बाजूंनी अतिशय महत्त्वाची होती.”


तमुनाच्या प्रयत्नाला अखेर यश आलं. तिला तिच्या फेसबुक ग्रुपवर एक मेसेज आला. हा मेसेज तिला जॉर्जियाच्या ग्रामीण भागातील एका व्यक्तीकडून आला होता. यात त्या व्यक्तीनं एका महिलेबाबत माहिती दिली.
या महिलेनं आपली गर्भधारणा लपवून ठेवली होती आणि सप्टेंबर 1984 मध्ये त्बिलिसी येथे एका बाळाला जन्म दिला होता. तमुना यांचा जन्मही याच काळात झाला होता. त्यांनी याबाबतची माहिती आपल्या ग्रुपवरही शेअर केली होती. तमुना यांचा जन्म आणि त्या व्यक्तीनं सांगितलेली माहिती जुळून येत होती.
ही महिला तमुना यांची आई असू शकते असं सांगत त्या व्यक्तीनं एक नावही सांगितलं.
तमुना यांनी त्या नावाचा आधार घेत ऑनलाईन तपास सुरू केला. मात्र, त्यांना काहीच आढळून आलं नाही. अखेर त्यांनी मला कोणी ओळखतं का? या आशयाची एक पोस्ट करत आवाहन केलं.
त्यांच्या या पोस्टवर एका महिलेची प्रतिक्रिया आली, यात तिनं ज्या महिलेनं गर्भधारणा लपवून ठेवली होती, ती तिची मावशी असल्याचं सांगितलं. तिनं तमुनाला ती फेसबुक पोस्ट हटवण्यास सांगितलं. सोबतच डीएनए चाचणी करण्याची तयारी दर्शवली.
अखेर डीएनए चाचणी पार पडली. या दरम्यान तमुना यांनी आपल्या आईला फोन केला.
आपल्याला दत्तक घेण्यात आलंय या भावनेनं व्याकुळ तमुना मुसेरिड्स यांना अनेक प्रयत्नानंतर हा फोन नंबर मिळाला होता. हा नंबर ज्या महिलेचा आहे, ती आपली आई असू शकते अशी कल्पनाच तमुना यांच्यासाठी एखाद्या चित्रपटातील कथेप्रमाणे होती.
फोन केल्यावर संवाद कसा होईल, अशा एक ना अनेक शंका तमुना यांच्या डोक्यात सुरू होत्या.

तमुना यांनी फोन केला मात्र, त्यांना अतिशय तुसरट आणि रागीट प्रतिसाद मिळाला. ती आठवण सांगताना तमुना म्हणतात, “त्यांनी फोनवर आरडाओरड सुरू केला. मी कोणत्याच बाळाला जन्म दिलेला नाही, मला याबाबतीत बोलायचं नाही. त्याचा माझ्याशी काही संबंध नाही, असं त्या फोनवर म्हणाल्या.”
ते ऐकून आपण कसं व्यक्त व्हावं हेच कळत नव्हतं. मी पुढे येणाऱ्या प्रत्येक प्रसंगासाठीची तयारी केली होती. परंतु, असा प्रतिसाद मिळेल याची कल्पनाही केली नव्हती, असंही तमुना यांनी नमूद केलं.
एका आठवड्यानंतर डीएनए चाचणीचा रिपोर्ट हाती आला. यातून तमुना आणि फेसबुकवर प्रतिक्रिया दिलेली ती महिला दोघी मावस बहिणी असल्याचं स्पष्ट झालं.
या रिपोर्टच्या मदतीनं तमुना यांनी आपल्या आईशी संवाद साधला आणि त्यांना वडिलांचं नाव सांगण्याची विनंती केली. अखेर तमुनाला यश आलं. त्यांच्या वडिलांचं नाव गुरगेन खोरावा असल्याचं कळालं.
ते आठवताना तमुना म्हणतात, “सुरुवातीच्या दोन महिन्यांचा काळ माझ्यासाठी अतिशय धक्कादायक होता. आपल्यासोबत हे काय घडत आहे, कोण काय आहे, काहीच कळत नव्हतं. मी ज्यांना शोधत होते, अखेर ती माणसं मला मिळाली या गोष्टींवर माझा विश्वासच बसत नव्हता.”

फोटो स्रोत, Tamuna Museridze
तमुनाला वडिलांचं नाव कळताच त्यांनी फेसबुकवर शोधाशोध सुरू केली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ज्या व्यक्तीला त्या शोधत होत्या ती व्यक्ती त्यांच्या फ्रेंडलिस्टमध्येच आढळून आली.
गुरगेन खोरावा हे देखील सोशल मीडियावर तमुना यांना फॉलो करत होते.
ज्या व्यक्तीला तमुना सर्वत्र शोधत होत्या ती व्यक्ती तीन वर्षांपासून त्यांच्या फ्रेंडलिस्टमध्ये होती. हा तमुना यांच्यासाठी आश्चर्याचा धक्काच होता. एखाद्या चित्रपटातील कथेप्रमाणं तमुना यांच्या आयुष्याचा पट सुरू होता.
“माझी आई गरोदर होती, याबाबत त्यांना काहीच माहिती नव्हतं. हा त्यांच्यासाठीही आश्चर्याचा धक्का होता”, असं तमुना यांनी सांगितलं.
त्यांनी लवकरच पश्चिम जॉर्जियामधील झुग्दिदी गावी भेटण्याची व्यवस्था केली. अखेर तमुना आणि वडील गुरगेन यांची ही भेट घडून आली. समोर येताच बाप-लेकीनं एकमेकांना आनंदानं मिठी मारली.
“माझ्या मनात बरेच प्रश्न होते. मला त्या प्रश्नांची उत्तर मला हवी होती, पण त्याची सुरुवात कुठून करावी हे त्यावेळी सुचत नव्हतं. आम्ही बराचवेळ काहीही न बोलता एकमेकांकडे बघत बसलो होतो. जणू बाप-लेक म्हणून आम्ही काहीतरी साम्य शोधण्याचाच प्रयत्न करत होतो”, असंही तमुना यांनी नमूद केलं.

फोटो स्रोत, Tamuna Museridze
तमुनाला भेटण्यासाठी गुरगेन यांनी त्यांच्या पूर्ण कुटुंबाला बोलवलं. त्यांच्या सर्व नातेवाईकांशी ओळख करुन दिली. तिचे सावत्र भाऊ-बहीण, चुलत-मावस भावंडं, काका-काकू, आत्या सर्वांनाच त्यांनी बोलवलं. जेव्हा त्यांनी एकमेकांना पाहिलं, तेव्हा त्यांची खात्री पटली की, तमुना आणि त्यांच्यात सारखेपणा आहे. माझ्या सावत्र भावंडांपेक्षा मीच अधिक माझ्या वडिलांसारखी दिसत होते, असंही तमुना यांनी सांगितलं.
सर्वांनी रात्र आनंदात घालवली. पारंपरिक जॉर्जिअन मेजवानी खात गप्पा गोष्टी केल्या, गाणी म्हटली आणि गुर्गेन यांनी अकॉर्डिअनही (बाजासारखं वाद्य) वाजवलं.
तमुना यांची त्यांच्या आईशी भेट झाली होती, पण अनेक प्रश्नं मनात घर करून होते. जसं की, हजारो जॉर्जिअन मुलांप्रमाणे मलादेखील कुणी चोरलेलं तर नाही ना? की मला माझ्या आईनेच जन्मानंतर विकलं. तमुना यांचे पालक आई-वडील आता हयात नव्हते. त्यामुळे त्यांना हे प्रश्न विचारता येत नव्हते. अशा स्थितीत हे प्रश्न सतत त्यांच्या मनात घोळत होते.
शेवटी तमुना यांना त्यांच्या जन्मदात्या आईशी बोलण्याची संधी मिळाली. ऑक्टोबर महिन्यात हा योग आला. एक पोलिश टीव्ही कंपनी तमुना आणि त्यांच्या आईवर डॉक्युमेंटरी बनवत होती. तेव्हा तमुना यांच्या आईने खासगीत बोलण्याची तयारी दाखवली आणि तमुना यांच्या मनात सुरू असलेल्या प्रश्नांची उत्तरं मिळाली.
तमुना या स्वतःच पत्रकार आहेत आणि त्यांनी शेकडो मुलांची आणि त्यांच्या पालकांची भेट घडवून आणली आहे. त्यातली बहुतांश मुलं ही कुणाकडून तरी चोरण्यात आलेली होती. तमुना यांना चोरण्यात आलं नव्हतं हे त्यांना त्यांच्या आईकडून कळालं. तमुनाला त्यांनी स्वतःहून देऊन टाकलं होतं आणि त्यांनी याबाबत गुप्तता पाळली होती.

फोटो स्रोत, Tamuna Museridze
तमुना यांची जन्मदाती आई आणि त्यांचे वडील (गुरगेन) हे नात्यात नव्हते. त्यांचा काही काळापुरता संबंध आला आणि त्यातून त्या गरोदर राहिल्या. या गोष्टीमुळे तमुना यांच्या आईला लाज वाटत होती. म्हणून त्यांनी आपलं गरोदरपण, बाळंतपण या गोष्टी गुप्तच ठेवल्या. सप्टेंबर 1984 मध्ये त्या तबलिसीला गेल्या. त्यांनी त्यांच्या नातेवाईकांना सांगितलं की, एका शस्त्रक्रियेसाठी त्या जात आहेत. तिथे जाऊन त्यांनी बाळाला जन्म दिला आणि ते बाळ म्हणजे तमुना. तिथे तमुनाचे पालकत्व घेण्याची तयारी देखील केली होती. त्यानुसार त्या दत्तक गेल्या.
"मला हे समजल्यावर खूप मोठा आघात झाला. मला दत्तक घेण्यापूर्वी 10 दिवस मी माझ्या आईसोबत होते. या गोष्टीचा विचार करण्याचं मी टाळते," असंही तमुना सांगतात.
"मला माझ्या आईने सांगितले की, मी लोकांशी खोटं बोलावं. मला चोरण्यात आलं होतं, असं मी सांगावं. जर मला चोरण्यात आलं होतं, असं मी सांगितलं नाही, तर आपल्यात जे काही नातं आहे ते तुटेल असं तिने मला बजावलं होतं. पण मी म्हणाले की, मला हे शक्य नाही."
"जर मी असं सांगितलं असतं, तर ज्यांची बाळं खरोखरच चोरली गेली त्या पालकांवर तो अन्याय झाला असता. मी खोटं बोलले असते, तर अशा मातांवर नंतर कुणी विश्वास ठेवला असता", अशी भावना तमुना यांनी व्यक्त केली.
मग तमुनाच्या आईने त्यांना जाण्यास सांगितलं आणि तेव्हापासून त्या त्यांच्या आईशी बोलल्या नाहीत.
"मला संधी मिळाली, तर मी पुन्हा त्यांना भेटेल का?" या प्रश्नावर तमुना पुढे सांगतात, "अर्थातच. मला माझ्या नव्या कुटुंबाविषयी बरंच काही जाणून घ्यायचं आहे."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











