जन्माच्या वेळी झाली अदलाबदल, 55 वर्षांनी कळलं सत्य; दोन महिलांची धक्कादायक कहाणी

फोटो स्रोत, Getty Images
- Author, जेनी क्लीमन
- Role, प्रेझेंटर, द गिफ्ट
मेळ्यात किंवा जत्रेत दोन भाऊ हरवल्याचं किंवा त्यांची एकमेकांपासून ताटातूट होते आणि नंतर ते वेगवेगळ्या घरात वाढतात, अशा कथा आपण हिंदी चित्रपटांमध्ये नेहमीच पाहत आलो आहोत.
कथा, कादंबऱ्यांमध्येही अनेकदा ते वाचायला मिळतं. मात्र इंग्लंडमध्ये खरोखरच हा आश्चर्यकारक प्रकार घडला आहे. फक्त तो बाळांच्या जन्माच्या वेळी हॉस्पिटलमध्ये घडला आणि योगायोगानं उघडकीला आला आहे.
दोन मुली, ज्या आता आजी झाल्या आहेत त्यांना या वयात या वास्तवाचा सामना करावा लागतो आहे. थक्क करणाऱ्या आणि मानवी नात्यांमधील गुंतागुंत उलगडणाऱ्या या सत्य मात्र अद्भूत घटनेविषयी जाणून घेऊयात.
इंग्लंडमधील वेस्ट मिडलँड्समधील दोन कुटुंबं नुकसान भरपाईची वाट पाहत आहेत. जन्माच्या वेळीच बाळांची अदलाबदल झाल्याची नोंद झाल्याचं हे नॅशनल हेल्थ सर्व्हिसच्या (NHS) इतिहासातील पहिलंच प्रकरण आहे.
हिवाळ्यातील एका दिवशी निव्वळ कुतुहलातून ही गोष्ट समोर आली. मात्र डीएनए (DNA) चाचणीच्या धक्कादायक निष्कर्षांनी दोन महिला आणि त्यांच्या कुटुंबियांना स्वत:बद्दल माहित असलेल्या गोष्टींचा पुनर्विचार करावा लागला.
2021 च्या नाताळात टोनी यांच्या मित्रांनी त्यांच्यासाठी एक डीएनए-होम टेस्टिंग किट (DNA home-testing kit) आणलं होतं. त्यांनी ते स्वयंपाकघरातील एका कप्प्यात ठेवलं आणि दोन महिने ते ही गोष्ट विसरून गेले.
मात्र फेब्रुवारी महिन्यातील एके दिवशी त्यांचं लक्ष त्या टेस्टिंग किटकडे गेलं. टोनी घरात होते आणि दर आठवड्याला ते खेळत असलेल्या गोल्फच्या खेळाचा पावसानं विचका केला होता. त्यामुळे ते कंटाळले होते.
त्यावेळेस घरात असताना ते त्या टेस्टिंग किटच्या सॅम्पल ट्यूबवर थुंकीचा नमुना दिला आणि त्यांनी ते किट बंद करून पाठवलं आणि पुढचे काही आठवडे पुन्हा त्या किटबद्दल विसरून गेले.
त्या टेस्टिंग किटवरील चाचणीचे निष्कर्ष रविवारी संध्याकाळी आले. टोनी त्यांच्या आई, जोनसोबत फोनवर बोलत असतानाच त्या चाचणी संदर्भातील ईमेल आला.

सुरुवातीला त्यांना अपेक्षित असल्याप्रमाणेच सर्वकाही दिसत होतं. त्या चाचणीमध्ये त्यांच्या कुटुंबाची माहिती देण्यात आली होती. त्यात त्यांच्या आईचं कुटुंब मूळचं जिथलं होतं त्या आयर्लंडवर लक्ष केंद्रित करण्यात आलं होतं.
त्यांच्या कुटुंबाच्या वंशावळीत त्यांच्या एका भावडांचा उल्लेख होता. त्याच्या बहिणीचाही उल्लेख होता.
मात्र जेव्हा त्यांनी त्यांच्या बहिणीचं नाव नीट पाहिलं तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की ते चुकीचं नाव होतं. जेसिकाऐवजी त्यांच्या बहिणीचं नाव क्लेअर असं देण्यात आलं होतं (जेसिका आणि क्लेअर ही त्यांची खरं नावं नाहीत. त्या महिलांची ओळख लपवण्यासाठी ती बदलण्यात आली आहेत).
टोनी हे जोन यांच्या चार अपत्यांमध्ये सर्वात मोठे आहेत. तीन मुलांनंतर जोन यांना मुलगी हवी होती. 1967 मध्ये जेसिकाचा जन्म झाल्यावर त्यांची ही इच्छा पूर्ण झाली.
"घरात शेवटी एक मुलगी असणं ही एक सुंदर, अद्भूत भावना होती," असं जोन यांनी सांगितलं.
मात्र जेव्हा त्यांना कळालं की, टोनीच्या डीएनए चाचणीमध्ये काहीतरी अनपेक्षित गोष्ट आहे, तेव्हा त्या काळजीत पडल्या.
टोनी देखील चिंताग्रस्त झाला होता, मात्र त्यानं तसं दाखवलं नाही. टोनी यांच्या वडिलांचं निधन झाल्यानंतर 10 वर्षांनी त्यांच्या आई 80 च्या घरात पोहोचल्या होत्या आणि त्या एकट्याच राहत होत्या.
साहजिकच डीएनए चाचणीतून समोर आलेल्या सत्यामुळे निर्माण झालेल्या तणावापासून टोनी यांना आपल्या आईला दूर ठेवायचं होतं.
दुसऱ्या दिवशी सकाळी टोनी यांनी क्लेअर यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी त्यांनी डीएनए चाचणी करणाऱ्या कंपनीच्या खासगी मेसेजिंग सुविधेचा वापर केला. क्लेअर ही तीच महिला होती जी त्यांची बहीण असल्याचा दावा त्या चाचणीत करण्यात आला होता.
"हाय, माझं नाव टोनी आहे. मी ही डीएनए चाचणी केली आहे. त्यात तू माझी बहीण असल्याचं दाखवण्यात आलं आहे. मला वाटतं ही चूक आहे. तू याबाबत काही माहिती देऊ शकतेस का?" असं टोनी यांनी त्या मेसेजमध्ये लिहिलं.
'मला मी बाहेरची असल्यासारखं वाटलं'
महत्त्वाचं म्हणजे क्लेअर यांना देखील दोन वर्षांपूर्वी त्यांच्या वाढदिवशी त्यांच्या मुलानं त्याच कंपनीच्या डीएनए चाचणीचं किट दिलं होतं.
त्यांच्या डीएनए चाचणीचे निष्कर्ष देखील विचित्र होते. त्यात त्यांचे आईवडील जिथे जन्मले त्याच्याशी काहीही संबंध दाखवण्यात आला नव्हता. तर क्लेअर यांचा एक भाऊ दाखवण्यात आला होता, ज्याच्याशी त्यांचे जनुकीय संबंध होते आणि ज्याला त्या ओळखत नव्हत्या.
मग 2022 मध्ये त्यांना एक नोटिफिकेशन आलं, ज्यात म्हटलं होतं की त्यांच्या कुटुंबाच्या वंशावळीत एक भावंडं जोडलं गेलं होतं.
हे सर्व काही गोंधळात टाकणारं होतं. मात्र एका दृष्टीनं ते सर्व पूर्णपणे योग्य देखील दिसत होतं. मोठी होत असताना क्लेअर यांना एकप्रकारचा परकेपणा जाणवत होता.
"मला वाटत होतं मी बाहेरची आहे, तोतया आहे. त्यांच्यात आणि माझ्यात काहीच साम्य नव्हतं. दिसण्यात नाही, गुणांमध्ये नाही. मला वाटतं, हो कदाचित मला दत्तक घेण्यात आलं असेल," असं त्यांनी मला सांगितलं.
जेनी क्लीमन यांनी 'द गिफ्ट' या कार्यक्रमाच्या पहिल्या सीरिजमध्ये लोकांनी घरच्या घरी अॅन्सेस्ट्री (Ancestry) आणि 23 अँड मी (23andMe) सारख्या डीएनए चाचण्या केल्यानंतर त्यातून उलगडू शकणाऱ्या विलक्षण अशा सत्यांकडं पाहिलं.
दुसऱ्या सीरिजमध्ये लोक जगभरातील प्रचंड डीएनए डेटाबेसशी जोडलं गेल्यानंतर त्या चाचणीमुळे होणाऱ्या अनपेक्षित परिणामांची, धक्क्यांची जेनीला प्रचिती आली.


क्लेअर आणि टोनी या दोघांनी जेव्हा एकमेकांना मेसेज केले आणि त्यांची जीवशास्त्रीय, जनुकीय माहिती दिली, तेव्हा त्या दोघांच्या लक्षात आलं की क्लेअर आणि जेसिका यांचा दोघींचाही जन्म एकाच वेळी आणि एकाच हॉस्पिटलमध्ये झाला होता. जेसिका ही टोनी यांची बहीण होती, जिच्याबरोबर ते वाढले होते.
त्यानंतर आणखी बाबी समोर येऊ लागल्या. 55 वर्षांपूर्वी दोन बाळांची जन्माच्या वेळी अदलाबदल झाली होती आणि त्यानंतर त्या दोघी वेगवेगळ्या कुटुंबात वाढल्या.
प्रसूतीगृहांमध्ये बाळांची अपघातानं किंवा चुकून अदलाबदल झाल्याची प्रकरणं युकेमध्ये फारशी ऐकिवात नाहीत.
2017 च्या माहिती स्वातंत्र्याच्या विनंतीला प्रतिसाद देताना नॅशनल हेल्थ सर्व्हिसनं उत्तर दिलं की, त्यांच्याकडे असलेल्या नोंदींनुसार, बाळांची अदलाबदल होऊन बाळं चुकीच्या पालकांना देण्यात आलेल्या कोणत्याही नोंदी किंवा दस्तावेज नाहीत.
1980 च्या दशकापासून नवजात बाळांना त्यांच्या जन्मानंतर तात्काळ रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेन्टिफिकेशन टॅग्स (RFID)दिले जातात. त्यामुळे त्या बाळांच्या लोकेशनचा माग ठेवता येतो. मात्र त्याआधी प्रसूतीगृह हस्तलिखित टॅग आणि पलंगावरील कार्डवर विसंबून असायचे.
डीएनए चाचणीतून समोर आलेलं धक्कादायक सत्य पचवत असतानाच क्लेअर आणि टोनी यांना आता पुढे काय करायचं हे ठरवायचं होतं.
"यातून बसणारे धक्के मोठे असतील. जर तुला ही गोष्ट इथेच सोडून द्यायची असेल तर मला त्याबाबत काहीच हरकत नाही. मी ते स्वीकारेन. मग आपण याबाबत पुढे काहीही करणार नाही," असं टोनी यांनी क्लेअर यांना लिहिलं.
कोणत्याही संकोचाशिवाय क्लेअर यांना हे माहित होतं की, त्यांना टोनी आणि त्यांच्या आईला भेटायचं आहे.
"मला त्यांना पाहायचं होतं, भेटायचं होतं, त्यांच्याशी बोलायचं होतं आणि त्यांची गळाभेट घ्यायची होती," असं क्लेअर सांगतात.
अखेर जेव्हा टोनी यांनी त्यांच्या आईला, जोन यांना डीएनए चाचणीतून काय समोर आलं आहे हे सांगितलं, तेव्हा या सर्व गोष्टीसंदर्भातील उत्तरं, माहिती त्यांना लगेच जाणून घ्यायची होती. त्यामुळे त्या अस्वस्थ झाल्या होत्या. हे असं कसं घडलं असेल?
1967 ची एक गोठलेली रात्र
ज्या रात्री जोन यांच्या मुलीचा जन्म झाला, त्या रात्रीच्या त्यांच्या आठवणी ताज्या आहेत. त्यांची प्रसूती घरीच होणार होती. मात्र त्यांना उच्च रक्तदाब असल्यामुळे त्यांना प्रसूतीसाठी वेस्ट मिडलँड्सच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. तिथेच त्यांची प्रसूती झाली.
"त्यांनी मला नेलं तो दिवस रविवार होता. त्या दिवशी बर्फ पडत होता," असं जोन सांगतात.
बाळाचा जन्म रात्री 10:20 च्या सुमारास झाला. जोन यांनी त्यांच्या मुलीला फक्त काही मिनिटांसाठी हातात धरलं. त्या नवजात मुलीचे गुंता झालेले ओलसर केस आणि तिचा लाल चेहरा, याकडे टक लावून पाहत राहिल्याचं त्यांना आठवतं.
त्या रात्री त्यांच्या मुलीला नर्सरीमध्ये ठेवण्यात आलं, जेणेकरून तिच्या आईला म्हणजे जोन यांना विश्रांती घेता येईल. 1960 च्या दशकात हीच पद्धत सर्रास वापरली जायची.
मध्यरात्रीनंतर काही तासांनी त्याच हॉस्पिटलमध्ये जेसिकाचा जन्म झाला होता.
दुसऱ्या दिवशी सकाळी जोन यांच्या हातात त्यांची खरी मुलगी क्लेअरऐवजी जेसिकाला देण्यात आलं होतं.

फोटो स्रोत, Getty Images
या बाळाचे केस पांढरे होते. त्यांच्या कुटुंबात तसे केस कुणाचेही नव्हते. त्यांचे सर्वांचे केस काळे होते. मात्र त्याविषयी जोन यांच्या मनात काहीही विचार आला नाही. त्यांच्या बहिणी, मावशा यांचे केस त्या रंगाचे होते.
जेव्हा जोन यांचे पती नवजात जेसिकाला भेटायला हॉस्पिटलमध्ये आले, तेव्हा ते सर्व मुलीच्या जन्मामुळे प्रचंड आनंदात होते. त्यामुळे त्यांच्या मनात कोणतीही शंका आली नाही.
55 वर्षांनी आता जेव्हा सत्य समोर येत होतं तेव्हा क्लेअरचं आयुष्य कसं गेलं, हे जाणून घेण्यासाठी जोन अतिशय व्याकुळ झाल्या होत्या. क्लेअर आनंदात वाढली ना, तिच्या वाट्याला सुख आलं ना? असे प्रश्न त्यांच्या मनात येत होते.
मात्र त्यांच्या प्रश्नांची उत्तरं मिळण्याआधी त्यांना आणि टोनीला ही बातमी जेसिकाला सांगावी लागणार होती. जेसिका आपलं आख्खं आयुष्य त्यांच्याबरोबर जगली होती, त्यांच्यात वाढली होती. जोन याच तिच्या आई होत्या, टोनी भाऊ होता.
जेसिकाला ही सर्व माहिती सांगण्यासाठी टोनी आणि जोन स्वत: जेसिकाच्या घरी गेले. जोन म्हणतात की, त्यांनी जेसिकाला ग्वाही दिली की, त्यांचं नातं कायमच आई आणि मुलीचं राहील.
जोन पुढे सांगतात की, आम्ही तसं सांगितलं, पण तेव्हापासून जोन आणि जेसिकामधील नातं पूर्वासारखं राहिलं नाही.
या लेखासंदर्भात मुलाखत देण्यास जेसिका यांनी नकार दिला.
'मला ते योग्य वाटलं'
जोनला डीएनए चाचणीचे निष्कर्ष कळाल्यानंतर एक दिवसाने आणि टोनी यांना समजल्यावर पाच दिवसांनी क्लेअर, जोन यांच्या घरी आल्या. त्यांची घरं तशी जवळच होती.
कित्येक वर्षे क्लेअर जोन यांच्या गावावरून कामासाठी पुढे जात असत किंवा तिथूनच परतत असत. मात्र त्यांना याची अजिबात कल्पना नव्हती की, त्यांचं घरं तिथे आहे.
जेसिका येणार असल्यामुळे त्यांची वाट पाहत टोनी बाहेर उभे होते. जेसिका आल्यावर, टोनी म्हणाले, "हाय सिस. ये, आईला भेटूया."
क्लेअर म्हणाल्या की, जोन यांना पाहिल्यापासून त्यांना असं वाटलं की, त्या दोघी एकमेकांना पूर्वीपासूनच ओळखत होत्या. त्या अपरिचित असल्याचं त्यांना अजिबात वाटलं नाही.
क्लेअर म्हणाल्या, "मी त्यांच्याकडे पाहिलं आणि म्हणाले की, अरे देवा, मला तुझे डोळे मिळाले! आमचे डोळे सारखेच आहेत. अरे देवा! मी कोणासारखी तरी दिसते."
जोन म्हणाल्या, "मला देखील अगदी छान वाटलं. मला वाटलं की, मी जशी तरुणपणी दिसायची तशीच ती दिसते."
मग कुटुंबाचे फोटो पाहण्यात त्यांनी दुपार घालवली. क्लेअर यांनी टोनी आणि जोन यांना त्यांच्या पतीबद्दल, मुलं आणि नातवंडांबद्दल सांगितलं. मग त्यांनी क्लेअर यांना त्यांच्या खऱ्या वडिलांबद्दल (जैविक पिता) सर्व माहिती सांगितली. दुर्दैवानं क्लेअर यांना त्यांना आता कधीच भेटता येणार नव्हतं.
मात्र जेव्हा जोन आणि टोनी यांनी क्लेअर यांना त्यांच्या बालपणाबद्दल विचारलं. त्याचं बालपण आनंदात गेलं की नाही हे विचारलं तेव्हा क्लेअर यांनी त्याबद्दल टाळाटाळ करण्याचा प्रयत्न केला.

फोटो स्रोत, Getty Images
क्लेअर म्हणाल्या, "मी त्यांना सत्य सांगितलं नाही. मी लहान असतानाच माझे आई-वडील विभक्त झाले होते. त्यांचं एकत्र राहणं मला आठवत नाही. माझं बालपण अत्यंत गरिबीत गेलं. राहायला स्वत:च्या मालकीचं घर देखील नव्हतं. अनेकदा उपासमार व्हायची. माझं बालपण अत्यंत खडतर होतं."
क्लेअर म्हणतात की, ज्या आईनं त्यांचं संगोपन केलं, त्यांना वाढवलं त्या आईला हे सत्य सांगणं ही त्यांच्या दृष्टीनं सर्वात कठीण गोष्ट होती. संगोपन करणाऱ्या आईवडिलांना हे सत्य कळाल्यानंतर त्यांच्याबरोबरच्या आपल्या नात्यात काहीही बदलणार नाही.
त्या नात्यावर काहीही परिणाम होणार नाही, यासाठी त्यांनी त्यांच्या परीनं पूर्ण काळजी घेतली. या वर्षाच्या सुरुवातीला त्यांच्या आईचं (ज्यांनी क्लेअर यांचं संगोपन केलं) निधन झालं.
आता सत्य समोर आल्यानंतर, नवीन जनुकीय ओळख मिळाल्यानंतर त्याबरोबर इतर काही अडचणी देखील निर्माण झाल्या. या नव्या परिस्थितीत क्लेअर यांच्यासमोर काही व्यवहार्य अडचणी देखील निर्माण झाल्या.
कारण त्यांचा जन्म मध्यरात्रीच्या आधी झाला होता. त्यामुळे त्यांच्या लक्षात आलं की, त्यांना वाटत होतं त्यापेक्षा त्यांचा जन्म तांत्रिकदृष्ट्या एक दिवस अगोदर झाला होता.
त्या म्हणतात, "माझा जन्मदाखला चुकीचा आहे. माझा पासपोर्ट, माझं ड्रायव्हिंग लायसन्स - सर्वकाही चुकीचं आहे."
'एक भयंकर चूक'
जन्माच्या वेळी अदलाबदल झाल्याचं सत्य समोर आल्यानंतर काही आठवड्यांनी, टोनी यांनी नॅशनल हेल्थ सर्व्हिस ट्रस्टला (NHS) लिहिलं की, क्लेअर आणि जेसिका यांची अदलाबदल झाली होती.
त्यांनी घरीच केलेल्या डीएनए चाचणीतून समोर आलेली माहिती त्यांनी एनएचएस ट्रस्टला कळवली होती. या ट्रस्टच्या अखत्यारितच हॉस्पिटल येतं.
ट्रस्टनं या प्रकाराबद्दलची त्यांची जबाबदारी स्वीकारली. असं असलं तरी अडीच वर्षांनंतर या चुकीबद्दल किती नुकसान भरपाई द्यायची याबद्दल सहमती होणं बाकी आहे. टोनी आणि जोन म्हणतात की, गेल्या वर्षी याबद्दल अंतिम निर्णय घेतला जाईल असं त्यांना सांगण्यात आलं होतं.
या घटनेसंदर्भात आम्ही एनएचएस रेझोल्युशनशी (NHS Resolution) संपर्क केला. तेच एनएचएसच्या विरोधातील तक्रारी हाताळतात.
त्यांनी सांगितलं की, बाळांची अदलाबदल ही 'एक भयंकर चूक' होती आणि त्यासाठीची कायदेशीर जबाबदारी त्यांनी स्वीकारली आहे.
मात्र त्यांनी सांगितलं की हे एक 'गुंतागुंतीचं आणि अपवादात्मक प्रकरण' आहे. त्यामुळे यासंदर्भात नेमकी किती नुकसान भरपाई द्यायची त्याबद्दल ते काम करत आहेत.

या बातम्याही वाचा :
- ‘आमचा मुलगा गेला, पण त्याचे स्पर्म वापरून आता आम्हाला नातू मिळेल’
- कृत्रिम गर्भाशयांमुळे वेळेआधीच जन्माला येणाऱ्या बाळांचा जीव वाचेल?
- 'बाळाला जन्म दिल्यानंतर मी त्याच्या जवळ जायलाही घाबरायचे', प्रसूतीनंतरच्या OCDचा प्रकार नेमका काय आहे?
- नव्या संशोधनातून उलगडली नवजात अर्भकांच्या पचनसंस्थेबाबतची अनेक महत्त्वाची रहस्ये

आपल्यामध्ये काय काय समान आहे याचा शोध क्लेअर आणि जोन घेत आहेत. उदाहरणार्थ कपडे आणि अन्नाबद्दलची आवडनिवड तसंच चहाबद्दलच्या त्यांच्या सवयी.
त्या सुट्टीवर गेल्या होत्या. आयर्लंडमधील आपलं मूळ, आपल्या पूर्वजांचा वारसा शोधण्याचा त्यांचा प्रयत्न होता. गेला नाताळ त्यांनी एकत्र साजरा केला.
आपल्या नव्यानं सापडलेल्या कुटुंबाबद्दल क्लेअर म्हणतात, "आम्ही एकमेकांच्या खूपच जवळ आहोत. आमचं घट्ट नातं आहे. मला त्यांच्याबरोबर जास्तीत जास्त वेळ घालवायचा आहे. अर्थात ती वेळ निघून गेली आहे. ती वेळ माझ्यापासून हिरावून घेतली गेली."
क्लेअर आता जोन यांना 'आई' म्हणतात. मात्र आता जेसिका त्यांना आई म्हणत नाही, असं जोन सांगतात. जोन यांना वाटतं की, त्यांना आणखी एक मुलगी मिळाली आहे.
"जेसिका माझ्या पोटी जन्माला आलेली नाही या गोष्टीचा मला काहीही फरक पडत नाही. ती अजूनही माझी मुलगी आहे आणि ती नेहमीच माझी मुलगी राहील," असं जोन म्हणतात.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











